Sunday, June 7, 2020

अजय व अतुल यांची बेस्ट songs

#निलउवाच
आज खुप दिवसांनी गाणी ऐकायचे ठरवले आणि amazon prime music वर समोर आली ती अजय व अतुल यांची बेस्ट songs प्लेलिस्ट
मग काय कानात हेडफोन घालून ऐकायला सुरुवात केली. ऐकलेली गाणीच होती तरीही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडत होत.
आज अजय अतुल संगीतशैली बद्दल थोडं बोलायचं धाडस करतो ,कारण मी काही संगीतातील तज्ञ नाही फक्त ठेका धरायला लावते ते गाणे आवडते ,हा निकष लावला तर सर्वच अजय अतुल गाणी सर्वोत्तम वाटायला लागतात.
आज ऐकलेल्या 30 गाण्यात नटरंग ,जोगवा ,सैराट ,धडक ,अग्निपथ ,सुपर30 ,झिरो, सिंगम ,जाऊ द्या ना बाळासाहेब,पि के ,लय भारी ,पानिपत आणि नीलकंठ मास्तर मधील गाणी होती. आता वरील चित्रपटाची नावे वाचूनच साधारण कल्पना आली असेल की किती दमदार गाणी असतील. त्यांनतर ऐकताना lyrics पण वाचताना मजा येत होती ,Amazon prime music वर x-ray lyrics म्हणून सर्व गाण्याचे बोल येतात आणि ते ऐकताना वाचत अजून मजा येते, फक्त हे मराठी गाण्यांना नाहीये ,मी लगेच tweet करून विनंती केली आहे पण सर्वानी मराठी गाण्यांना lyrics द्या अशी विनंती करायला हवी.असो,
तर मी बोलत होतो शैलीबद्दल, पारंपरिक बॉलिवूड संगीत म्हटले की एक अंतरा धून असते ,मग पहिला मुखडा व अंतरा आणि त्याच चालीत दुसरा मुखडा ,मग तिसरा असे दळण चालू, तसेच 2 मुखड्यातील संगीतही प्रत्येक मुखड्यात सेमच, म्हणजे समजा एखादे गाणे इन्स्ट्रुमेंटल म्हणून ऐकले तर सगळे मुखडे सेमच वाजवले जातात. आणि इथेच अजय अतुल शैली वेगळी आहे हे जाणवते.त्यांच्या 30 गाण्यात फक्त 2 गाणी अशी सापडली त्यांचा अंतरा ,मधील संगीत ,मुखडा ,पुन्हा संगीत व दुसरा मुखडा अशी मांडणी आहे ,बाकी 28 गाण्यात अंतऱ्याच्या आधी संगीत ,मग अलगद अंतरा चालू होतो ,music pieses वाजतात ,हळुवार वेगळ्याच दुनियेत हरवून टाकतात हे दोघे ,आणि नंतर पुन्हा पहिला मुखडा चालू होतो ,त्यानंतरचे संगीत सुमधुर तरीही वेगळेच आणि अलगद दुसऱ्या मुखड्यापर्यंत पोचवतात हे दोघे. संगीतातील जाण असणारे याबद्दल जास्त चांगले सांगू शकतात पण तरीही एक श्रोता म्हणून हा नाविन्यपूर्ण प्रकार लोकांना आवडतोय ,आणि म्हणूनच त्यांची गाणी सुपरहिट आहेत.दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हिंदीत फक्त सुफी गाण्यांवर भर, भक्तीभावपूर्ण सुफी गाण्यात अल्ला,मौला शब्दांचा भडीमार, पण अजय अतुल यांनी पहिल्यांदा हिंदीत घालीन लोटांगण,देवा श्रीगणेशा पासून मोरया मोरया,गौरी तनयाय धीमही ची भुरळ सर्वाना घातली.मोठे यश आहे हे दोघांचेही, आता भक्ती गीते म्हणजे फक्त उर्दू,हिंदी शब्द नाही तर मराठी ,संस्कृत शब्दही आहेत,हे जगाला सांगितले.एखाद्या गाण्याचा sequel असू शकतो हे त्यांनीच दाखवून दिले(लय भारी मधील माऊली गाणे व त्याचा sequal माऊली चित्रपटातील पंढरीची माय - दोन्ही गाणी लागोपाठ ऐका -एकदम superb व गाण्याचे शब्दही अप्रतिम आहेत)
अजून एक जाणवले ते म्हणजे जवळपास 90% गाण्यात male vocal अजय गोगावले ,काही ठिकाणी अतुल सुद्धा छान गाऊन जातो. अनेक गाणीही त्यांनीच लिहिली आहेत त्यात सैराट ,जाऊ द्या ना बाळासाहेब(या चित्रपटाची निर्मिती त्यांचीच होती) हे प्रमुख चित्रपट. अजून एक साम्य म्हणजे त्या त्या गाण्याच्या वैशिष्ट्यनुसार गायक निवड , स्वतः अजयशिवाय हिंदीत विशाल दादलानी त्यांचा आवडता गायक असावा व बेला शेंडे आवडती गायिका असावी.हिंदीत गीतलेखन अमिताभ भट्टाचार्य कडून लिहून घेतलेली आहेत.एक गाणे तर चक्क उदित नारायण सारख्या अनुभवी गायकाकडून गाऊन घेतले आहे.वाद्यांमध्ये ढोल ताशा ,सिंफनी ,ब्रास मेटल ही विशेष आवडीची आहेत. ते बोलताना उल्लेख करतात की ढोल म्हटले की पंजाबी ठेकाच का?आमचा मराठी ठेका पण खुपच सुंदर आहे आणि म्हणून मुद्दाम आम्ही मराठी पारंपरिक वाद्ये वाजवतो, किती अभिमान आहे या दोघांनाही मराठी असण्याचा,खुपच भारी वाटलं.
सैराट सिंफनी त्यांनी LA मधील SONY स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड केली जी निव्वळ अफलातून. तिकडे ते नावाजलेले मुझिशिअन सुद्धा अजय अतुल यांची तारीफ करत होते ,म्हणजे काय ग्रेट वर्क घेऊन ते तिकडे गेले आणि त्यांच्याकडून काम काढून घेतले याची कल्पना न केलेली बरी.
दस्तरखुद्द रेहमाननलासुद्धा त्याचा हटके संगीताचा वारसा कोण सांभाळेल असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने अजय अतुल यांचे नाव घेतले, पहिले मराठी चित्रपटाचे संगीतकार ज्यांनी जोगवासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला(त्याआधी 2006 मध्ये अशोक पत्की यांना पुरस्कार मिळालेला आहे पण तो कोकणी चित्रपटासाठी होता) ,ज्या बॉलिवूड मध्ये मराठी माणसाला घाटी म्हटले जाते तिथे अनेक लोक रांगेत आहेत की अजय अतुल संगीत देतील तर बरंय , लवकरच 2021ला शिवाजी trialogy म्हणजे शिवाजी महाराजांवर 3 चित्रपट ज्यात अजय अतुल संगीत आहे ,ते बघायला मिळतील. एकूण संगीतात बाप माणूस म्हणजे आमचे मराठी अजय अतुल.
अर्थात हे माझे निरीक्षण.
खाली प्लेलिस्ट मधील गाण्यांचे स्नॅपशॉट देतोय ,ही गाणी अवश्य ऐका व माझें आवडते संगीतकारअजय अतुल यांच्या जबरदस्त संगीताची मजा घ्या.
आणि हो , मीरा कहे हा त्यांचा अल्बम नक्की ऐका, अप्रतिम रचना आहेत पण फारच कमी लोकांना माहिती असेल,खाली लिंक देतोय.
https://youtu.be/EBBCy5x-9_M
खालील गाणी जरूर ऐका व खाली कमेंटमध्ये अभिप्राय द्या.
Njoy the sound of Ajay Atul
Bring it on Baby.......
-- निलेश जोशी



https://amzn.to/3dKrB2R

Sunday, May 24, 2020

दाढ दुखी व सदगुरु अनुभूती

श्री सद्गुरवे नमः
25 एप्रिल ला माझ्या दाढ दुखीची पोस्ट लिहिली ,त्यात सद्गुरूंनी ,मी चुकीची गोळी घेतली हे सांगितले व त्यांनतर उदी लावायला सांगितली. हा उपाय केल्यावर पूर्णपणे अक्कलदाढ दुखायची थांबली ,ज्या दाढेला सर्जरी आवश्यक असे डॉचे मत तिथे सद्गुरूंनी विज्ञानालाही निरुत्तर केले.
  त्यानंतर 6 दिवसांनी माझ्या अजून 2 दाढा ज्यात कॅव्हिटी होती म्हणून सिमेंट भरले होते,ते निघून आले. आता कॅव्हिटी ओपन झाल्याने अन्नकण अडकणे व दुखणे चालू झाले. 2 दिवस सुसह्य होते पण नंतर मात्र हा त्रास खूपच व्हायला लागला. सद्गुरूंनी शांत केलेली दाढ एकदम निपचित पडून आणि या कॅव्हिटी झालेल्या दाढा मात्र दुखताहेत ,खरंच सद्गुरूंना मनोमन शरण गेलो. त्यादरम्यान फेसबुक ग्रुपवर डेंटिस्ट लोक सांगतील या हिशोबाने घरगुती काही फिलिंग आहे का अशी चौकशी पोस्ट टाकली. त्यावर अनुभूती सदस्य सौ कुमुदताई ढवळेकर यांनी त्यांची मुलगी कामाला आहे त्या डेंटिस्ट चालू आहे असे कळवले ,पत्ता बघितला तर घराजवळच म्हणजे जायला हरकत नाही.तिकडे फोन करून अपॉइंटमेंट घेतली ,थोडक्यात अतिहुषारी दाखवलीच. पण नंतर मनात भीती वाटायला लागली कारण सद्गुरूंनी एकदा कोरोना पासून वाचवले आणि मी डेंटिस्टकडे गेलो तर हा संसर्ग डेंटिस्टकडे पसरण्याची शक्यता जास्त कारण समान टूल्स वापरतात व सॅनिटायझेंशनला मर्यादा आहेत. पुन्हा एकदा श्रीसद्गुरूंना शरण गेलो व घाबरत त्यांना मेसेजच्या माध्यमातून जाऊ का अशी परवानगी मागितली.सद्गुरूंनी मेसेज वाचून फोनच केला व सांगितले की डेंटिस्टकडे जाऊ नकोस ,आता जाणे घातक आहे.कॅव्हिटीवर घरगुती उपाय कापसात लवंग तेल किंवा लसूण ठेचून त्या दातात ठेव ,कीड मरून जाईल व दुखणेही बंद होईल.लवंगतेल जास्त लागले तर तोंड येईल किंवा आतील त्वचा सोलवटेल तीही काळजी घ्यायला सांगितली जय साईराम म्हणून फोन ठेवला एकतर श्रीसद्गुरू बोलले ,दाढ दुखणे थांबणार आहे असेही सांगितले म्हणजे आता काळजीच नाही.
डेंटिस्टकडे न जाण्याची सद्गुरुआज्ञा मिळाली आणि हायसे वाटले ,वाईटही वाटले की माझ्यामुळे सद्गुरूंना त्रास झाला असेल ,पण आपले डॉक्टर ,वैद्य सर्वच काही ब्रम्हांडनायक श्रीसदगुरु काकामहाराज. त्यामुळे क्षणात मनातील किंतु परंतु संपला ,डॉ क्लिनिकला फोन करून अपॉइंटमेंट कॅन्सल करायला सांगितली ,बाहेर जाऊन लवंग तेल आणले ,मेडिकल मधून सर्जिकल कॉटन आणले आणि सद्गुरुस्मरण करून दातात तो तेल लावून बोळा ठेवला.हे सर्व 2 मेला झाले अन त्यानंतर आतापर्यंत कॅव्हिटी असलेल्या दाढा दुखल्याच नाहीत. रोज सद्गुरुनी सांगितलेला उपाय करतोय ,2-3 वेळ थोड्या वेदना झाल्या पण नामासोबत त्याचे दुखणे जाणवलेच नाही.
श्रीसद्गुरू यांनी वेळोवेळां खरंच या लोकडाऊनमध्ये मला तीनवेळा संकटातून बाहेर काढले ,मग ते कोरोना इन्फेक्शन असो की दाढदुखी असो. 
 सूक्ष्मातून कार्य करणाऱ्या श्रीसद्गुरूंना साष्टांग नमस्कार. एकाचवेळी अनेक ठिकाणी अनेकांना मार्गदर्शन आणि तेही एकदम घरगुती उपायांनी. खरंच आपले काहीतरी पुण्यसंचय आहे म्हणून श्रीसद्गुरूचा वरदहस्त डोक्यावर आहे ,तो सदोदित राहावा म्हणून नामाची कास सोडायची नाही.
श्रीसद्गुरुंच्या ऋणात जन्मोजन्मी राहायला आवडेल, त्यांच्या असीम कृपेला साष्टांग नमस्कार
जय साईराम
निलेश जोशी

दाढदुखी व उदीची महती

श्री सद्गुरवे नमः

दाढेचे दुखणे व उदीची महती

श्रीसद्गुरू काकामहाराज अनेक अनुभव देत असतात ,ते अनुभव आयुष्यात आले की वाटते की खरंच श्रीसदगुरू किती सूक्ष्मातून कार्य करत असतात ,सदगुरु सर्वसाक्षी आहेत याचीच मनोमन खात्री पटते.
      काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू संक्रमण श्रीसद्गुरूंनी आतून आवाज देऊन रोखले,त्यांनतर फोन करून सर्व घटना सविस्तर सांगितली. त्यानंतर सद्गुरुंच्या लीला आणि त्यासमोर आपण केवळ ऋणातच राहू शकतो हे पटले. त्यांनतर अजून 2 अनुभव आले ,त्यातील एक मुलाच्या समर कॅम्प संदर्भात जो नंतर सांगेन . आता जो अनुभव सांगणार आहे तो श्रीसदगुरूंच्या उदीची महती सांगणारा आहे व आजच सकाळी अनुभवायला आला ,आणि पुन्हा एकदा सदगुरुकृपेसमोर नतमस्तक झालो.
     काही महिन्यांपूर्वी माझ्या दाढेच्या सर्जरीवेळी श्रीसदगुरूंनी अवघड काम डॉ ना प्रेरणा देऊन त्यांच्या माध्यमातून सोपे केले. त्यानंतर माझ्या 3 दाढांचे काम चालू होते. डावी अक्कलदाढ जिथे आधी ब्रिज होता तो काढून ती दाढ काढायची होती.डॉ म्हणाले त्या दाढेची दुख कमी झाली की आपण काढू, त्यासाठी औषधे दिली ,दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन होणार अशी कुणकुण लागल्यावर डॉ नी फोन करून मला बोलावून घेतले व माझ्या एका दाताची कॅप बसवली व 2 दिवसांनी दाढ काढायला शस्त्रक्रियेसाठी बोलावले. दरम्यान विषाणू संसर्ग पुण्यात वाढला व दोन दिवसांनी अपॉइंटमेंट होती तेव्हा गेल्यावर म्हणाले की दाढ खोल रुतलेली आहे ,त्यामुळे आता सर्जरी केली टाके पडतील आणि जखम ओली असेल तर विषाणू संक्रमण होण्याची शक्यता जास्त ,त्यामुळे सर्जरी लॉक डाऊन संपल्यावर करूया ,तोपर्यंत गोळ्याच चालू ठेवा. मलाही त्यांचे म्हणणे पटले ,मला वाटले लॉकडाऊन 10-20 दिवसांत संपेल व नंतर सर्जरी करता येईल.त्यांनी अँटिबायोटिक गोळी क्लेवम 600 व एक दुखणे अगदीच सहन नाही झाले तर दुखीवर गोळी दिली.श्रीसद्गुरुकृपेने या काळात फक्त 4 वेळ दाढ दुखली व गोळी घ्यावी लागली.पण मागचे 2 दिवस म्हणजे गुरुवार व शुक्रवार रोज संध्याकाळी हमखास दुखायला लागतेच व त्याबरोबर कानही दुखायला लागला.डॉ ना फोन केला तर म्हणाले 3 मे पर्यंत क्लिनिक उघडणारच नाही, शेवटी दुखल्यावर गोळी हा एकच पर्याय होता.अर्थात हा माझा भ्रम होता कारण श्रीसद्गुरू यांच्या कृपेचा विचार आलाच नाही. त्यात भौतिक गोष्टीत सदगुरु एवढे भरभरून देताहेत मग अजून काय मागायचे? असा विचार करून मी दाढ दुखली की गोळी घेऊन नामस्मरण करायचो.आज पहाटे 3 वाजता दाढ प्रचंड दुखायला लागली म्हणून जाग आली ,नेहमीप्रमाणे उठलो व गोळी घेऊन बिछान्यावर पडलो ,तरीही दुखणे काही थांबायला तयार नाही. अर्ध्या तासाने सहन न होऊन मांडी घालून बसलो व श्रीसद्गुरूंना शरण गेलो ,की सदगुरु माझी दाढ दुखतेय म्हणजे तुम्हालाही त्रास होतोच आहे. मला गोळी घेऊनही त्रास थांबत नाहीये,आता तुम्हीच सर्वेसर्वा असे म्हणून डोळे मिटून सद्गुरुस्मरण केले व मानसपूजा केली व मानसपूजेतच श्रीसद्गुरुसमोर बसून जप करायला लागलो.त्यावर फक्त श्रीसद्गुरूंचा आवाज ऐकू आला ,"अरे ,कोणती गोळी घेतलीस? अँटिबायोटिक गोळी घेऊन दुखणे कसे थांबेल? नीट जाऊन बघ ,दुखीवरची गोळी घेतलीच नाहीयेस,तेव्हा आता जाऊन दुखीवरची गोळी घे ,पाणी पी ,नंतर मी दिलेली उदी आहे ती थोडी हातावर घेऊन ,त्या दाढेवर त्याचे आवरण कर ,दाढेचा बाहेरचा भाग कमकुवत झाला आहे ,उदी लावल्यावर ठीक होईल ,मी आहे ,जा, सांगितले तेवढे कर".
   श्रीसद्गुरू यांचा आवाज ऐकून मी उठलो ,जाऊन बघितले तर मी क्लेवम ही अँटिबायोटिक गोळी घेतली होती ,सोबतची दुखीची गोळी नीट प्रेस्क्रिपशन वाचून घेतली व नंतर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उदी लावून श्रीसद्गुरूना नमस्कार करून बेडवर पडलो. अक्षरश 4 मिनिटात गाढ झोप लागली आणि त्यांनतर आता 12 तासात ती दाढ दुखलीही नाहीये.आज कोणीही मान्य करेल की गोळी घेऊन 3 मिनिटात वेदना थांबणे अशक्य आहे म्हणजेच ही श्रीसद्गुरूंच्या उदीची महती आहे.श्रीसद्गुरू यांनी पुन्हा एकदा सर्वसाक्षीत्वाची प्रचिती दिली आणि दाढेच्या दुखण्यातून वाचविले. श्रीसदगुरु यांच्या चरणी माफी मागतो कारण त्यांना पुन्हा एकदा त्रास दिला, माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे नामस्मरण ,चाकोरी पाळली जात नसूनही श्रीसद्गुरूमाऊलीनी कुपेचा वर्षाव केला, सांभाळून घेतले व प्रत्येक संकटाचे निवारण करायची शक्ती व युक्ती प्रदान करते आहे.श्रीसद्गुरू, असाच सदोदित आशिर्वाद राहू दे. त्रास दिलाच आहे त्याबद्दल माफी असावी.
श्रीसद्गुरू काकामहाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार

जय साईराम
सद्गुरुदास निलेश जोशी

Tuesday, May 19, 2020

भरवसा कविता

श्री सद्गुरवे नमः

श्रीसद्गुरुच सर्व करवून घेतात ,आणि तेच लिहवून घेतात ,आपले सौभाग्य की ते आपल्याला लेखनिक व्हायची संधी देतात.
      हा अनुभव सध्या चैतन्य चिंतन ही लेखमालिका लिहीतोय या संदर्भातील.मूळ लेखमालिकेच्या यादीमध्ये लेख क्रमांक 43 ते 48 हे लेख दिललेच नव्हते म्हणजे त्या वेबसाईटवर उपलब्द नाहीत.लेख 42 पर्यंत एकाच बैठकीत श्रीसद्गुरूंनी ६ लेख लिहून घेतल्याने काळजी नव्हती.पण जेव्हा समजले ज्या लेखमालिकेतून मी संदर्भ व गोषवारा घेतो ते ६ लेखच गायब. मी क्षणभर घाबरलो ,आता संदर्भ कोणता घेणार आणि लिहिणार काय? त्यात लेख ४३ मी कसाबसा लिहिला पण मनाला पटत नव्हता ,कारण तो श्रीसद्गुरूंनी सुचवला नव्हता. लेख ४३ प्रसिद्ध करायच्या दिवशी नोटस मध्ये लिहिलेला लेख नव्हता ,म्हटलं श्रीसद्गुरूंना माझ्याकडून नवीन लिहून घ्यायचे असेल आणि अक्षरश सदगुरूंचे नाव घेऊन तो लेख लिहिला व अनेकांना तो लेख आवडला.आता पुढील ४ लेख कसे लिहिणार ही काळजी होती ,संध्याकाळी नित्योपासना म्हणून झाली ,श्रीसदगुरूंना प्रार्थना केली.दुसऱ्या दिवशी पहाटे गॅलरीत चिमण्या दाणा पाणी खायला आल्या आणि सद्गुरुकृपेने एक कविता स्फुरली ,झरझर लिहून काढली आणि मग मनात विचार आला ,सद्गुरूंनी या ८ कडवी लिहून घेतली व ४ लेख लिहायचा संदर्भ दिला. मूळ लेख नाहीत म्हणून ही सदगुरूंनीच योजना केली आहे.खुप आनंद झाला ,त्यादिवशीचा लेख अवगुण सद्गुरूरनीच लिहून घेतला होता. त्यापुढील ४ लेख असेच श्रीसद्गुरूंनी एक बैठकीत लिहून घेतले आणि मनाला विश्वास मिळाला की सदगुरु सदोदित सोबत आहेतच.कालच प्रज्ञताईने छान लिहिताय यावर मी श्रीसद्गुरुच लिहून घेतात असे लिहिले ,तेव्हा हा प्रसंग लिहायचा होता ,पण नंतर सेपरेट पोस्ट करू असे ठरवले.
सद्गुरू कृपेने स्फुरलेली कवीता मागील 4 लेखात दिली ,ती आज सलग देतो आणि श्रीसद्गुरूंना वंदन करून असेच साहित्य लिहून घ्या अशी मनःपूर्वक विनंती करतो.

*भरवसा*

*गाईंचा कळप चरतो माळरानावर, आपली भूक भागवतात*
*म्हशी जातात पाणवठ्यावर, पाण्यात छान डुंबून घेतात*
*गवत विषारी की पाणी गढूळ, चिंता त्यांना कधीच नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*कोकिळा छान करते रियाझ,तिला गरम पाणी लागत नाही,*
*पोपटाचा रंग हिरवा,त्याला लिपस्टिक मेकअप चालत नाही*
*घश्याची व दिसण्याची काळजी, प्राणी कधीच करत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*चिमण्या येतात खिडकीत,मस्त दाणेपाणी टिपून जातात*
*गल्लीतील कुत्रेही येऊन, रस्त्यावरची पोळी खाऊन जातात*
*दाणे तुटके,पोळी करपली याची चिंता ते करत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*कोल्हे,लांडगे मांसाहारी तरीही ते जंगलातच राहतात*
*हत्ती ,हरीण शाकाहारी तेदेखील जंगलातच असतात*
*मेनू वेगळा म्हणून कोणी वेगळी रेस्टोरंट शोधत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*मोर म्हणतो,मनाला येईल तेव्हा सरावाशिवाय मी नाचतो*
*बगळा शांत समाधी लावून हळूच मासे टिपून घेतो*
*ही स्किल्स यायला त्यांना, क्लास लावायला लागत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*गरुड घेतो उंच भरारी ,मस्त तोल सावरत जातो*
*सुतारपक्षी कठीण खोडात, कोरून छान ढोल बनवतो*
*पडेन मी ,चोच तुटेल याची भीती त्यांना वाटत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*इतके प्राणी ,इतके पक्षी हे उपाशी कधी झोपले का?*
*उद्याची चिंता असूनही त्यांनी साठेबाजी केली का?*
*माणसाची शंका घ्यायची वृत्ती ह्यांची कधी दिसत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*उद्याच काय, पुढच्या पिढीचं काय ,कोडं प्राण्यांना का नाही?*
*शास्त्रद्यांनी शोध लावला की,म्हणे त्यांना ब्रेनच नाही*
*मेंदू असलेला माणूस तरी इतकी युगं सुधारला काय?*
*कारण प्रपंचात सद्गुरूंच देईल यावर त्याचा भरोसा नाय*

जय साईराम
 सद्गुरुदास निलेश जोशी

Saturday, April 11, 2020

सद्गुरूंचे आभार कधी मानलेच नाही

सदगुरु सर्वच आपल्याकडून चांगल्या गोष्टी करून घेतात ,आज अनुभूतीवर निलम ताईने सत्संग विचार पोस्ट केली.त्यात त्यांनी पोस्ट approve केली म्हणून आभार मानले ,त्यात नंतर त्या म्हणाल्या पोस्ट approve केल्याने सद्गुरुंचे विचार सर्वांपर्यंत पोचतात त्यासाठी आभार मानायला हवेतच हे मेघनाताई यांच्याकडून शिकले, हे वाचल्यावर लगेच मनात खालील ओळी सद्गुरूप्रेरणेने सुचल्या ,की कित्ती गोष्टी आपल्याला देऊनही सद्गुरूंचे आभार कधी मानतच नाही.


देती सदगुरु शुद्ध हवा पाणी ,
देती सदगुरु लोकसंग्रह विपुल
तेच देती विचार करण्याची बुद्धी
त्यांचे कधी आभार मानले नाही

सदगुरु आयोजिती सत्संग विचार
पोचविती अमूढाप्रति विनासायास
घेती करून उजळणी वारंवार
त्यांचे आभार कधी मानलेच नाही

सदगुरु प्रत्यक्ष परब्रम्ह अवतार
श्रेष्ठ असती दैवताआधीही पूज्य
हसून करिती चौकशी या जीवाची
तरीही कधी आभार मानलेच नाही

एवढे अक्षम्य चुका करूनही
संधी देती वेळोवेळी माफ करोनी
केले श्रीमंत देऊनी नामसाधने
तरी कधी आभार मानलेच नाही

आता तरी होऊनीया जागृत
सदगुरुना करू नामातून वंदन
जपुनी अमर्याद दिलेले साधन
करू सदगुरुना आभार प्रदर्शन

सद्गुरूंचा आतला आवाज -1

सदगुरु म्हणतात ,काही प्रश्न पडले तर नामस्मरण करून झाल्यावर सद्गुरूंना विचार ,सदगुरु नक्की आतून सांगत असतात ,उत्तर देत असतात ,आपल्याला ते ऐकता यायला हवे. काल एक प्रश्न पडला व तो सद्गुरूंना विचारला.
प्रश्न-  आपण व्यावहारिक जगात अनेकदा जुने विषय उगाळून काढतो ,त्यामुळे पुन्हा तेच विषय चघळले जातात, ताणतणाव वाढतात , हे कितपत योग्य आहे?

सद्गुरूंचा आतला आवाज  - जुने विषय उगाळून काढणे म्हणजे ताणतणाव वाढवणे याव्यतिरिक्त बाकी काहीच नाही ,जसे जुनी भांडी काढली तर लगेच आपण वापरू शकतो का ? नाही त्या भांड्यातील जळमटे काढून टाकावी लागतील , स्वच्छ धुवून घ्यावी लागतील म्हणजे पुन्हा वापरण्यासाठी प्रक्रिया करावी लागते तसेच जुने विचार बासनात गेलेले आहेत ,त्याला जर तर जोडलेले असतात ,त्यावेळी सहन केले हे तुझे प्रारब्द होते किंवा त्यावेळी त्या जीवाने सर्व परिणामांची मनाची तयारी केलेली होती आणि पुन्हा ते उगाळून काढून काहीच फायदा नाही फक्त नंतर हे विषय उकरून काढले तर एकमेकांचा रक्तदाब वाढवण्यासारखे आहे. 
जुने जाऊद्या विसरुनी त्याच आयुष्याचा वळणावरती.
पुन्हा उकरून काढून त्याचा काहीही उपयोग नाही ,त्याने फक्त दुःखच वाट्याला येणार.भूतकाळ हा वर्तमानाशी जोडूच नका ,भूतकाळ आता आपण जर बदलू शकणार नाहीत तर त्याचा विचारही करून उपयोग नाही, त्याचा एक फायदा करून घ्या त्यावेळी मी काय चुकीचे वागलो ? आणि तीच चूक पुन्हा नको व्हायला म्हणून माझ्यात काय बदल करायला हवेत हे जाणून घेऊन ते बदल स्वतःमध्ये घडवून आणायचे. भूतकाळाचा असा उपयोग करून घेतला तर खरा फायदा आहे.

यासंदर्भात काही त्रुटी असल्यास ज्येष्ठानी / सदगुरूंनी जरूर मार्गदर्शन करावे.

7 हॅबीट्स व सदगुरु सत्संग

सदगुरु कायम म्हणतात , कोणतीही गोष्ट करण्याआधी ,कोणाला हुकूम देण्याआधी सद्गुरुचे स्मरण करा , नामस्मरण करा आणि मग ती गोष्ट करा ,बघा परिणाम नक्कीच दिसेल.
हे सर्व कळतंय पण अंमलात कसे आणायचे ? 2 दिवस परिवर्तन या ट्रेनिंगमध्ये आहे ,त्यात स्टीफन कोव्ही यांच्या 7 हेबीट्स फॉर हायली इफेक्टिव्ह पीपल मधील पहिली स्टेप आहे ,त्या स्टेपचे नाव *बी प्रोऍक्टिव्ह*
यांत पहिली गोष्ट शिकायला मिळाली ,जी सदगुरु नेहमी सांगतात, कोणत्याही गोष्टीची ,क्रियेची (Stimulus)प्रतिक्रिया(respond) देताना एक Pause घ्या , आणि मग विचार करून प्रतिक्रिया द्या ,म्हणजे तो फ्लो stimulus --> Pause --> Respond असा व्हायला हवा, हा Pause म्हणजेच सद्गुरूंचे स्मरण ,नामाचे स्मरण आणि हे केल्याने आपले उत्तर बदलते.या pause घ्यायचा सराव होण्यासाठी ट्रेनरनी एक छोटा खेळ घेतला ,त्यात ट्रेनर तोंडाने मोठा बॉल असे बोलले तर समोरच्याने विरुद्धार्थी बोलायचे म्हणजे लहान बॉल पण हाताने action मात्र मोठ्या बॉलची दाखवायची . आता या पूर्ण खेळात खुप चूका व्हायच्या कारण आपण सवयीने respond करायला जातो. पण जेव्हा त्यांनी मुद्दाम pause घेऊन विचार करून खेळ खेळायला लावला तेव्हा खेळात चुका झाल्याचं नाहीत.
म्हणजेच सदगुरु म्हणतात तसे प्रत्येक छोट्या छोट्या respond करताना आपण सदगुरु स्मरण व नामस्मरण करायला लागलो तर आपोआपच हा pause घेणे पण साध्य होईल व नामस्मरण सुद्धा होईल. आपल्या प्रतिक्रिया बदलतील आणि आपल्याही चुका होणे बंद होत जाईल. हे सर्व अर्थातच सरावाने ,आणि त्यासाठी सदगुरु म्हणतात की प्रत्येक कामात ,मधल्या वेळेत नामस्मरण करा.
तसेच अजून एक गोष्ट आहे जी सदगुरु तंतोतंत सदगुरु त्रिसूत्रीतुन सांगतात जी आहे Circle of Concerns,यांत
आपण आपल्या समस्या लिहून काढायच्या आणि त्याच्यात विभागणी करायची की माझ्या प्रभावात किंवा माझ्या कंट्रोल मध्ये किती समस्या येतात ? 
त्या म्हणजे खरच मी त्यावर काम करू शकतो.माझ्यात बदल घडवून आणू शकतो.
काही समस्या ज्याच्यात माझा कंट्रोल ,प्रभाव असू शकत नाही त्यांना बाजूला काढायचे . असे केल्यावर जाणवते आपण बऱ्याच गोष्टींचा समस्या असे बघून आपल्यावरच ताण घेतो ,कारण ताण घेऊनही आपण त्यात काहीच करू शकत नाही जसे प्रदूषण , पर्यावरण ,पाकिस्तान हमला.
सदगुरु नेमके हेच सांगतात की माझ्यावर विश्वास ठेवून सर्व माझ्यावर सोडून दे , त्रिसूत्री बघितली तर त्यातून हाच मेसेज दिलाय , सर्व काही सद्गुरुच करतात ,सदगुरु चांगले तेच करतात आणि माझ्यासाठी जे चांगले आहे तेच सदगुरु घडवतात. हे एकदा विश्वासाने मनाला सांगितले जी सर्व समस्या सुटतात.
हे सर्व सद्गुरुकृपेने साम्यस्थळे समजली व लिहायला सुचले ,यांत काही न्यून असेल तर माझा दोष आहे व सदगुरु नक्कीच त्यावर मार्गदर्शन करतील.
जय साईराम

मी कोणाचा

सदगुरु श्री काकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य)हे नेहमी सत्संगातून  उपदेश सोप्या उदाहरणातून सांगत असतात.नामसाधना करताना अनेकदा मनाला मागायची सवय लागते ,जसे त्या जीवाला समजत नाही की माझ्यासाठी काय योग्य आहे? तरीही मागायची सवय काही संपत नाही. सदगुरु सदोदित म्हणतात की नामसाधना करताना त्यातून काय मिळेल ही अपेक्षा न करता सद्गुरुंच्या अनुसंधानात राहायचे आहे. सदगुरु जे माझ्यासाठी चांगले आहे ते सर्व देणारच आहेत त्यामुळे निश्चिंत मनाने सदगुरुपायी वाहून घ्यायचे आहे. अनेकदा आपण आपल्या मनासारखे झाले नाही तर खट्टू होतो पण तेव्हाही सद्गुरुनी माझ्यासाठी चांगले तेच घडवून आणले हा विश्वास हवा.लहान मुलाला जसे अनेकदा काय खायचे कळत नाही पण त्याची आई जे पचणार आहे असा गुरगुट्या भात भरवते तसेच सदगुरु आपल्यासाठी जर चांगले असेल ते आपल्या आयुष्यात घडवून आणतात.
मी कोण आहे यापेक्षा मी कोणाचा आहे याची जाणीव ठेवून माझ्या सद्गुरूंना कमीपणा येईल असे मी वागणार नाही असं मनाशी पक्के ठरवायला हवे
जय साईराम

नामाची झाडू

सदगुरु श्री काकामहाराज (श्री. श्रीपाद अनंत वैद्य) हे जीवनात अनवधानाकडून सावधानतेकडे जाण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग अवलंबायला सांगतात. नाम घ्याच पण नुसते नामस्मरण नाही तर नाम घेताना डोळे मिटून, आपल्या आत डोकवायचे आहे.माझ्यात काय दुर्गुण आहेत व ते घालवायला काय करायला लागेल, याचा आढावा घ्यायचा.
असं म्हणतात की एखादी सवय स्वतःला लावायची असेल तर 21 दिवस सातत्याने ती गोष्ट करायला हवी.
ज्या काही उणीवा आपल्यात असतील, त्या ओळखून यावरचे उपाय 21 दिवसात अंमलात आणून आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.पुढील 21 दिवस घरातच बसायचे आहे त्यामुळे आज चैत्र पाडवा अर्थात नववर्ष संकल्प करून तो पुढील 21 दिवस घरातूनच सातत्याने पाळूया.

इतर वेळीही रोजच्या कामकाजात व्यग्र असताना श्रीसदगुरु सतत बघत आहेत,लक्ष ठेवुन आहेत ही जाणीव जागृत ठेवायची.आपल्याकडून कळत नकळत अनेक चूका होत असतात ,श्रीसदगुरु बघत आहेत ही जाणीव ठेवल्याने त्या कमी व्हायला लागतात.श्रीसदगुरु काकामहाराज म्हणतात मी तुमच्यातच आहे मग या देहात ,हृदयात त्यांचे अस्तित्व आहेच व स्वच्छ अंतर्मनात त्यांचा वास आहे पण त्याची जाणीव व्हायला हवी असेल व तिथपर्यंत पोचायला आपले बाह्यमन स्वच्छ करायला नको का?आपले बाह्यमन झाडायला नाम व नाम जपाच्या साह्याने बनवलेली काड्यांची झाडू हवी म्हणजेच जर माझे कमी नाम होतंय तर झाडूदेखील कमी काड्यांची बनेल व अर्थातच माझ्या बाह्यमनाची सफाई व्यवस्थित होणार नाही.
तसेच सर्व नामधारकांनी हे करायला हवे की रोज झोपण्यापूर्वी श्रीसदगुरुंना डोळ्यासमोर आणून,त्यांना साक्षी ठेवून पूर्ण दिवसभरातील आपला वावर ,प्रवास ,बोलणे ,कोणाशी कसे बोललो हे सगळे rewind करायचे.त्यातून बरेच शिकायला मिळते ,अंशरूपाने शिक्षण मिळते की या ठिकाणी मी उगाच चिडलो ,मी या वेळी असे नाही वागायला हवे होते ,अरे मी असे बोललो आणि कदाचित तो दुखावला गेला असेल ,अरे त्याला मी टोचून बोललो पण त्यांच्यातही श्रीसद्गुरुस्वरूप आहेच ,त्याला तो मेसेज वेगळ्या शब्दात देऊच शकलो असतो. अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे Gratitude व्यक्त करणे ,आजच्या पूर्ण दिवसात जेव्हा जाणवते मी चुकीचे वागलो ,तेव्हा श्रीसद्गुरूंना साक्षी मानून ठरवायचे मी ती चूक भविष्यात टाळायचा मनोमन प्रयत्न करेन आणि जर ती व्यक्ती माझ्यामुळे दुखावली असेल तर मनोमन मी त्यांची माफी मागत आहे. अनेकदा
आपल्याशी जी व्यक्ती rude वागत आहे त्यामागे आपल्या मागील जन्मातील काही चुका आहेत आणि त्या चुकांचे प्रायश्चित आता आपण घेत आहोत असा विचार आणला की आपोआप त्या व्यक्तीबद्दल अढी निघून जायला मदत होते. भूतकाळातील, पूर्वजन्मातील चुका मी नाही सुधारू शकत त्यामुळे आता त्याचे प्रायश्चित घेऊ आणि आपण वर्तमानकाळात आपली कर्मे कशी शुद्ध होतील याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो.
*आपल्या साईकाका परिवारातील सर्व बंधु भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

*परमपूज्य शिवस्वरूप सदगुरु श्री काकामहाराज व सौ काकुमाऊली यांना हृदयापासून  नमस्कार*
जय साईराम

वाल्याचा वाल्मिकी

आपले सदगुरु श्री काकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य) सत्संगातून मार्गदर्शन करताना अनेक दाखले देतात.संतांचं मन कधीच का खचत नाही यावर मार्गदर्शन करताना श्रीसद्गुरू अनेक मार्मिक उदाहरणातून समजवतात. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले ते सद्गुरूंनी,नारदमुनींनी दिलेल्या  नामामुळे व वाल्या कोळीनें त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे. 
संत जनाबाईना एवढा विश्वास होता की प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांच्या मदतीला यायला लागले. 
संत गोरा कुंभार विहित कर्म करताना पांडुरंगचरणी एवढे तल्लीन झाले आणि स्वतःचे बाळ तुडवले गेले हेही समजले नाही ,शेवटी त्यांची दृढ भक्ती बघून पांडुरंगाला बाळाला जिवंत करावे लागले. 
संत मीराबाईंनी तिचे सर्व सर्वस्व श्रीकृष्णचरणी अर्पिले की त्यांचे स्वतःचे अस्तित्वच उरलेले नाहीये असा त्यांचा भाव झाला.त्यांना दिलेले विष हसत हसत मीरेने पिऊन टाकले की ते  श्रीकृष्णाने दिलेले आहे व ते तारकच असणार हे भाव जागृत ठेवला होता.मीरेच्या अंतरंगातील भक्ती व श्रीसद्गुरुंवरील दृढ श्रद्धा एवढी प्रबळ होती की ते विष पचवण्याची ताकद तिला आली.
आपणही आपली प्रत्येक कृती व अवस्था श्रीसद्गुरुचरणी अर्पण करायला शिकले पाहिजे.आनंद झाला तो सद्गुरूंना अर्पण, आजार आला तर तोही सद्गुरूंना अर्पण ,मोडकी सायकल प्राप्त जाहली तर तीही सद्गुरूंना अर्पण, अश्या प्रकारे प्रत्येक अवस्था त्यांनाच अर्पण करायची सवय लावली पाहिजे.
अशी सवय लावली की आपण मनाने अलिप्त राहायला लागू.श्रीसद्गुरूंचा ध्यास लागायला हवा ,त्यांचे चिंतन ,त्यांचे मनन आपल्यालाही मानसिक धैर्य देते ,नुसते ३५-३६ वर्षे नामस्मरण करून उपयोग नाही. श्रीसद्गुरू स्मरणात श्री सद्गुरूंचे होऊन नाम घेतले तरच जिंकाल. 
हे सर्व करताना व्यवहार मध्ये यायला नको , हे हवे ,ते हवे हा भावही मनात यायला नको, तेव्हाच अंतर्मनातील श्रीसदगुरु दर्शन होईल आणि आपणही सद्गुरूमय होऊन जाऊ.

श्रीसद्गुरू काकामहाराज व सौ काकुमाऊली चरणी विनम्र अभिवादन
जय साईराम

नामपीसा

माझे श्रीसदगुरु श्रीकाकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य) हेही सर्वांना कायम प्रपंचासक्ती सोडून देवपिसा नव्हेतर नामपीसा व्हायला सांगतात.माणूस कितीही धनवान असला ,खिशात लाखभर रुपये असले तरीही तो आनंद क्षणिकच असेल ना? पैसे खर्चून संपले किंवा रस्त्यात हरवले तर पुन्हा दुःख चालू झालेच ना? या सुख व दुःखाच्या फेऱ्यांतून मला कोण बाहेर काढणार आहे ,अशी तळमळ रात्रंदिवस लागली पाहिजे.या प्रपंचासक्तीतून बाहेर कोण काढणार आहे ? त्यांची व माझी गाठ लवकर पडू दे अशी ती ओढ सारखी लागायला हवी मगच ते श्रीसद्गुरू भेटतात.श्री काकामहाराज यावर सुंदर उदाहरण देतात की आपण खुप संकटात आहोत व भिंतीपलीकडे आपली आई बसली आहे तरीही आपण हाक मारल्याशिवाय ती मदतीला येईल का?आई आपल्यासाठी वेळेवर जेवण देईल ,ताट आवरून ठेवेल ,कपडे देईल , पण संकटात तिला आपण ओरडून सांगितल्याशिवाय मदतीला येईल का?
मांजराची पिल्ले तिच्या आसपास उन्हात खेळत असतात ,पण एखादा कुत्रा आसपास आल्यावर जेव्हा ते पिल्लू आकांताने आईला बोलावते ,तेव्हा ती मांजरी धावत जाऊन पिल्लाला तोंडात पकडून सुरक्षित स्थळी आणते.
तसेच श्रीसद्गुरू जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून तुमचा सर्व चरितार्थ चालवत असतात पण तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही त्यांना हाक मारून बोलवायला हवे ,म्हणजेच ते तुमच्याजवळ येतील व तुम्हाला आपल्या सावलीत घेतील. प्रपंचासक्तीतून नामानंदात यायला ,हा पालट घडायला श्रीसद्गुरूंनी दिलेले नामसाधन शरीराच्या प्रत्येक अणूरेणुतून अंतर्मनातील सद्गुरुस्वरूप दर्शनाच्या ओढीने घ्यायला हवे ,तेव्हाच ती माऊली आपल्याला पंखाखाली घेईल व सद्गुरूमय करून आयुष्य बदलून देईल.
जय साईराम

सदगुरु ,ईश्वर आणि नाम

*सदगुरु ,ईश्वर आणि नाम*

श्रीसद्गुरूंनी एक सुंदर विषय सर्वाना दिलेला आहे.सदगुरु ,ईश्वर व नाम या एकाच नाण्याच्या तीन बाजू कश्या असू शकतील? 

नाणे जर आपण काळजीपूर्वक बघितले तर त्याला दोन बाजू प्रकर्षाने दिसतातच ज्याला आपण छापा व काटा असे म्हणतो पण त्या नाण्याला एक तिसरी बाजू असतेच आणि ती म्हणजे नाण्याला जाडी प्रदान करणारी बाजू.
नाण्याचा पुष्ठभाग ही बाजू मूल्य दर्शवते ती काटा बाजू हे *श्रीसद्गुरू* आहेत ,नाण्याचा मागील भाग छापा बाजू ज्यावर अशोकस्तंभ चिन्ह आहे हे *ईश्वरमय* आहे आणि नाण्याला जाडी देणारी जी बाजू आहे ज्यावर जपमाळेप्रमाणे बिंदू आहेत ती बाजू *नाममय* आहे.
नीट बघितले तर प्रत्येक नाण्याला वैशिष्ट्यपूर्ण जाडी आहे आणि त्यावर काही उठावदार बिंदू आपल्या हाताला जाणवतात, एखादे समजा पाच रुपयांचे नाणे जर हातात घेतले तर त्याची जाडी आणि त्यावरील बिंदू जे हाताला जाणवतात.  दिव्यांग लोकांसाठी ही योजना केलेली असते की हातात नाणे आले की त्यांना काटा म्हणजे मूल्य समजते व नाण्याच्या जाडीवरील बिंदू ओळखून त्या नाण्याची किंमत ओळखता येते. नाण्यांवरील छापा कायम बदलत राहतो ,कधी अशोकस्तंभ वरील 4 सिंह असतील ,कधी शेतकऱ्यांचे चित्र असेल ,कधी ज्ञानेश्वर माऊली असतील तर कधी गांधीजी असतील. जेव्हा नाण्याच्या आवृत्ती येतात तेव्हा हा छापा बदलत जातो म्हणजेच छापा ही बाजू ईश्वर स्वरूप ज्याची अनेक रूपे आहेत, अनेक अवतारात , अनेक रुपात ईश्वरस्वरुप आपल्याला प्रथमदर्शनी वेगळे जाणवते.
जशीजशी नाण्याची किंमत वाढते तसतशी जाडी वाढत जाते ,व्यवहारात व चलनात 10 रुपये ,5 रुपये ,2 रुपये ,1 रुपये ,पन्नास पैसे ,दहा पैसे ही नाणी आहेत. त्याची जाडी किमतीनुसार वाढत जाते. या जाडी असलेल्या बाजूला जर नाम म्हटले तर जसजसे नाम वाढत जाईल ,तसतसे श्रीसदगुरु(काटा बाजू) व ईश्वर(छापा बाजू) हे एकच आहेत हे समजायला लागेल.याआधी आपल्याला श्रीसदगुरु माहीतच नव्हते ,जगनियंता ईश्वर माहिती होता पण जसजसे आपण श्रीसद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला लागलो ,तसतसे आपल्याला या दोन बाजू दिसायला वेगळ्या असून एकच असतात हे समजायला लागले. नंतर तर ईश्वर व सदगुरु हे एकच आहेत नव्हे नव्हे जर दोघेही एकत्र समोर आले तर श्रीसद्गुरू यांना पहिले वंदन करायचे कारण माझ्या अंतरमनाच्याजागी ज्ञानज्योत जागविणारे हे श्रीसद्गुरू आहेत हे मनापासून पटायला लागते. नाम वृद्धिंगत व्हायला लागले की बाह्यमनातील अनेक दोष जायला लागतील आणि तुमचे मूल्य वाढायला लागेल.मूल्य हे आर्थिक बाजूने बघायचे नसून अध्यात्मिक बाजूने बघायला आपण शिकू.तात्पर्य एकच श्रीसद्गुरू व ईश्वर एकच आहेत आणि हे सदोदित मनाला सांगणारे नाम सदोदित बरोबर घ्यायचे आहे. व्यावहारिक जगात आपण कितीही यशस्वी असलो तरीही या अध्यात्मिक जगात आपण दिव्यांग आहोत ,अपंग आहोत. जसे नाण्यांवरील काटा व जाडी त्या व्यक्तीला नाणी ओळखायला मदत करतात तसेच आपण अध्यात्मिक अपंग आहोत व आपण  श्रीसद्गुरू व नाम यांना बरोबर घेऊन वाटचाल करूया. नाण्यांवरील काटा असलेले माझे श्रीसद्गुरू हेच सर्वकाही आहेत व छापा अर्थात अनेक स्वरूपातील ईश्वर माझ्यासाठी गौण आहे आणि या अध्यात्मात प्रगती व्हायला माझी नामाची बाजू म्हणजे नाण्याची जाडी बाजू जास्तीत जास्त बळकट करायला हवी. त्यासाठी या ठोकळ्याला (नाण्याला काहीजण ठोकळा म्हणतात म्हणजे हे तीन बाजू असलेले नाणे म्हणजे मीच आहे) सद्गुरूंनी नामसाधन दिलेच आहे ते त्यांच्याच स्मरणात व मार्गदर्शनात जास्तीस्त जास्त घेत राहूया. 
जय साईराम