Sunday, May 24, 2020

दाढ दुखी व सदगुरु अनुभूती

श्री सद्गुरवे नमः
25 एप्रिल ला माझ्या दाढ दुखीची पोस्ट लिहिली ,त्यात सद्गुरूंनी ,मी चुकीची गोळी घेतली हे सांगितले व त्यांनतर उदी लावायला सांगितली. हा उपाय केल्यावर पूर्णपणे अक्कलदाढ दुखायची थांबली ,ज्या दाढेला सर्जरी आवश्यक असे डॉचे मत तिथे सद्गुरूंनी विज्ञानालाही निरुत्तर केले.
  त्यानंतर 6 दिवसांनी माझ्या अजून 2 दाढा ज्यात कॅव्हिटी होती म्हणून सिमेंट भरले होते,ते निघून आले. आता कॅव्हिटी ओपन झाल्याने अन्नकण अडकणे व दुखणे चालू झाले. 2 दिवस सुसह्य होते पण नंतर मात्र हा त्रास खूपच व्हायला लागला. सद्गुरूंनी शांत केलेली दाढ एकदम निपचित पडून आणि या कॅव्हिटी झालेल्या दाढा मात्र दुखताहेत ,खरंच सद्गुरूंना मनोमन शरण गेलो. त्यादरम्यान फेसबुक ग्रुपवर डेंटिस्ट लोक सांगतील या हिशोबाने घरगुती काही फिलिंग आहे का अशी चौकशी पोस्ट टाकली. त्यावर अनुभूती सदस्य सौ कुमुदताई ढवळेकर यांनी त्यांची मुलगी कामाला आहे त्या डेंटिस्ट चालू आहे असे कळवले ,पत्ता बघितला तर घराजवळच म्हणजे जायला हरकत नाही.तिकडे फोन करून अपॉइंटमेंट घेतली ,थोडक्यात अतिहुषारी दाखवलीच. पण नंतर मनात भीती वाटायला लागली कारण सद्गुरूंनी एकदा कोरोना पासून वाचवले आणि मी डेंटिस्टकडे गेलो तर हा संसर्ग डेंटिस्टकडे पसरण्याची शक्यता जास्त कारण समान टूल्स वापरतात व सॅनिटायझेंशनला मर्यादा आहेत. पुन्हा एकदा श्रीसद्गुरूंना शरण गेलो व घाबरत त्यांना मेसेजच्या माध्यमातून जाऊ का अशी परवानगी मागितली.सद्गुरूंनी मेसेज वाचून फोनच केला व सांगितले की डेंटिस्टकडे जाऊ नकोस ,आता जाणे घातक आहे.कॅव्हिटीवर घरगुती उपाय कापसात लवंग तेल किंवा लसूण ठेचून त्या दातात ठेव ,कीड मरून जाईल व दुखणेही बंद होईल.लवंगतेल जास्त लागले तर तोंड येईल किंवा आतील त्वचा सोलवटेल तीही काळजी घ्यायला सांगितली जय साईराम म्हणून फोन ठेवला एकतर श्रीसद्गुरू बोलले ,दाढ दुखणे थांबणार आहे असेही सांगितले म्हणजे आता काळजीच नाही.
डेंटिस्टकडे न जाण्याची सद्गुरुआज्ञा मिळाली आणि हायसे वाटले ,वाईटही वाटले की माझ्यामुळे सद्गुरूंना त्रास झाला असेल ,पण आपले डॉक्टर ,वैद्य सर्वच काही ब्रम्हांडनायक श्रीसदगुरु काकामहाराज. त्यामुळे क्षणात मनातील किंतु परंतु संपला ,डॉ क्लिनिकला फोन करून अपॉइंटमेंट कॅन्सल करायला सांगितली ,बाहेर जाऊन लवंग तेल आणले ,मेडिकल मधून सर्जिकल कॉटन आणले आणि सद्गुरुस्मरण करून दातात तो तेल लावून बोळा ठेवला.हे सर्व 2 मेला झाले अन त्यानंतर आतापर्यंत कॅव्हिटी असलेल्या दाढा दुखल्याच नाहीत. रोज सद्गुरुनी सांगितलेला उपाय करतोय ,2-3 वेळ थोड्या वेदना झाल्या पण नामासोबत त्याचे दुखणे जाणवलेच नाही.
श्रीसद्गुरू यांनी वेळोवेळां खरंच या लोकडाऊनमध्ये मला तीनवेळा संकटातून बाहेर काढले ,मग ते कोरोना इन्फेक्शन असो की दाढदुखी असो. 
 सूक्ष्मातून कार्य करणाऱ्या श्रीसद्गुरूंना साष्टांग नमस्कार. एकाचवेळी अनेक ठिकाणी अनेकांना मार्गदर्शन आणि तेही एकदम घरगुती उपायांनी. खरंच आपले काहीतरी पुण्यसंचय आहे म्हणून श्रीसद्गुरूचा वरदहस्त डोक्यावर आहे ,तो सदोदित राहावा म्हणून नामाची कास सोडायची नाही.
श्रीसद्गुरुंच्या ऋणात जन्मोजन्मी राहायला आवडेल, त्यांच्या असीम कृपेला साष्टांग नमस्कार
जय साईराम
निलेश जोशी

दाढदुखी व उदीची महती

श्री सद्गुरवे नमः

दाढेचे दुखणे व उदीची महती

श्रीसद्गुरू काकामहाराज अनेक अनुभव देत असतात ,ते अनुभव आयुष्यात आले की वाटते की खरंच श्रीसदगुरू किती सूक्ष्मातून कार्य करत असतात ,सदगुरु सर्वसाक्षी आहेत याचीच मनोमन खात्री पटते.
      काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू संक्रमण श्रीसद्गुरूंनी आतून आवाज देऊन रोखले,त्यांनतर फोन करून सर्व घटना सविस्तर सांगितली. त्यानंतर सद्गुरुंच्या लीला आणि त्यासमोर आपण केवळ ऋणातच राहू शकतो हे पटले. त्यांनतर अजून 2 अनुभव आले ,त्यातील एक मुलाच्या समर कॅम्प संदर्भात जो नंतर सांगेन . आता जो अनुभव सांगणार आहे तो श्रीसदगुरूंच्या उदीची महती सांगणारा आहे व आजच सकाळी अनुभवायला आला ,आणि पुन्हा एकदा सदगुरुकृपेसमोर नतमस्तक झालो.
     काही महिन्यांपूर्वी माझ्या दाढेच्या सर्जरीवेळी श्रीसदगुरूंनी अवघड काम डॉ ना प्रेरणा देऊन त्यांच्या माध्यमातून सोपे केले. त्यानंतर माझ्या 3 दाढांचे काम चालू होते. डावी अक्कलदाढ जिथे आधी ब्रिज होता तो काढून ती दाढ काढायची होती.डॉ म्हणाले त्या दाढेची दुख कमी झाली की आपण काढू, त्यासाठी औषधे दिली ,दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन होणार अशी कुणकुण लागल्यावर डॉ नी फोन करून मला बोलावून घेतले व माझ्या एका दाताची कॅप बसवली व 2 दिवसांनी दाढ काढायला शस्त्रक्रियेसाठी बोलावले. दरम्यान विषाणू संसर्ग पुण्यात वाढला व दोन दिवसांनी अपॉइंटमेंट होती तेव्हा गेल्यावर म्हणाले की दाढ खोल रुतलेली आहे ,त्यामुळे आता सर्जरी केली टाके पडतील आणि जखम ओली असेल तर विषाणू संक्रमण होण्याची शक्यता जास्त ,त्यामुळे सर्जरी लॉक डाऊन संपल्यावर करूया ,तोपर्यंत गोळ्याच चालू ठेवा. मलाही त्यांचे म्हणणे पटले ,मला वाटले लॉकडाऊन 10-20 दिवसांत संपेल व नंतर सर्जरी करता येईल.त्यांनी अँटिबायोटिक गोळी क्लेवम 600 व एक दुखणे अगदीच सहन नाही झाले तर दुखीवर गोळी दिली.श्रीसद्गुरुकृपेने या काळात फक्त 4 वेळ दाढ दुखली व गोळी घ्यावी लागली.पण मागचे 2 दिवस म्हणजे गुरुवार व शुक्रवार रोज संध्याकाळी हमखास दुखायला लागतेच व त्याबरोबर कानही दुखायला लागला.डॉ ना फोन केला तर म्हणाले 3 मे पर्यंत क्लिनिक उघडणारच नाही, शेवटी दुखल्यावर गोळी हा एकच पर्याय होता.अर्थात हा माझा भ्रम होता कारण श्रीसद्गुरू यांच्या कृपेचा विचार आलाच नाही. त्यात भौतिक गोष्टीत सदगुरु एवढे भरभरून देताहेत मग अजून काय मागायचे? असा विचार करून मी दाढ दुखली की गोळी घेऊन नामस्मरण करायचो.आज पहाटे 3 वाजता दाढ प्रचंड दुखायला लागली म्हणून जाग आली ,नेहमीप्रमाणे उठलो व गोळी घेऊन बिछान्यावर पडलो ,तरीही दुखणे काही थांबायला तयार नाही. अर्ध्या तासाने सहन न होऊन मांडी घालून बसलो व श्रीसद्गुरूंना शरण गेलो ,की सदगुरु माझी दाढ दुखतेय म्हणजे तुम्हालाही त्रास होतोच आहे. मला गोळी घेऊनही त्रास थांबत नाहीये,आता तुम्हीच सर्वेसर्वा असे म्हणून डोळे मिटून सद्गुरुस्मरण केले व मानसपूजा केली व मानसपूजेतच श्रीसद्गुरुसमोर बसून जप करायला लागलो.त्यावर फक्त श्रीसद्गुरूंचा आवाज ऐकू आला ,"अरे ,कोणती गोळी घेतलीस? अँटिबायोटिक गोळी घेऊन दुखणे कसे थांबेल? नीट जाऊन बघ ,दुखीवरची गोळी घेतलीच नाहीयेस,तेव्हा आता जाऊन दुखीवरची गोळी घे ,पाणी पी ,नंतर मी दिलेली उदी आहे ती थोडी हातावर घेऊन ,त्या दाढेवर त्याचे आवरण कर ,दाढेचा बाहेरचा भाग कमकुवत झाला आहे ,उदी लावल्यावर ठीक होईल ,मी आहे ,जा, सांगितले तेवढे कर".
   श्रीसद्गुरू यांचा आवाज ऐकून मी उठलो ,जाऊन बघितले तर मी क्लेवम ही अँटिबायोटिक गोळी घेतली होती ,सोबतची दुखीची गोळी नीट प्रेस्क्रिपशन वाचून घेतली व नंतर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उदी लावून श्रीसद्गुरूना नमस्कार करून बेडवर पडलो. अक्षरश 4 मिनिटात गाढ झोप लागली आणि त्यांनतर आता 12 तासात ती दाढ दुखलीही नाहीये.आज कोणीही मान्य करेल की गोळी घेऊन 3 मिनिटात वेदना थांबणे अशक्य आहे म्हणजेच ही श्रीसद्गुरूंच्या उदीची महती आहे.श्रीसद्गुरू यांनी पुन्हा एकदा सर्वसाक्षीत्वाची प्रचिती दिली आणि दाढेच्या दुखण्यातून वाचविले. श्रीसदगुरु यांच्या चरणी माफी मागतो कारण त्यांना पुन्हा एकदा त्रास दिला, माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे नामस्मरण ,चाकोरी पाळली जात नसूनही श्रीसद्गुरूमाऊलीनी कुपेचा वर्षाव केला, सांभाळून घेतले व प्रत्येक संकटाचे निवारण करायची शक्ती व युक्ती प्रदान करते आहे.श्रीसद्गुरू, असाच सदोदित आशिर्वाद राहू दे. त्रास दिलाच आहे त्याबद्दल माफी असावी.
श्रीसद्गुरू काकामहाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार

जय साईराम
सद्गुरुदास निलेश जोशी

Tuesday, May 19, 2020

भरवसा कविता

श्री सद्गुरवे नमः

श्रीसद्गुरुच सर्व करवून घेतात ,आणि तेच लिहवून घेतात ,आपले सौभाग्य की ते आपल्याला लेखनिक व्हायची संधी देतात.
      हा अनुभव सध्या चैतन्य चिंतन ही लेखमालिका लिहीतोय या संदर्भातील.मूळ लेखमालिकेच्या यादीमध्ये लेख क्रमांक 43 ते 48 हे लेख दिललेच नव्हते म्हणजे त्या वेबसाईटवर उपलब्द नाहीत.लेख 42 पर्यंत एकाच बैठकीत श्रीसद्गुरूंनी ६ लेख लिहून घेतल्याने काळजी नव्हती.पण जेव्हा समजले ज्या लेखमालिकेतून मी संदर्भ व गोषवारा घेतो ते ६ लेखच गायब. मी क्षणभर घाबरलो ,आता संदर्भ कोणता घेणार आणि लिहिणार काय? त्यात लेख ४३ मी कसाबसा लिहिला पण मनाला पटत नव्हता ,कारण तो श्रीसद्गुरूंनी सुचवला नव्हता. लेख ४३ प्रसिद्ध करायच्या दिवशी नोटस मध्ये लिहिलेला लेख नव्हता ,म्हटलं श्रीसद्गुरूंना माझ्याकडून नवीन लिहून घ्यायचे असेल आणि अक्षरश सदगुरूंचे नाव घेऊन तो लेख लिहिला व अनेकांना तो लेख आवडला.आता पुढील ४ लेख कसे लिहिणार ही काळजी होती ,संध्याकाळी नित्योपासना म्हणून झाली ,श्रीसदगुरूंना प्रार्थना केली.दुसऱ्या दिवशी पहाटे गॅलरीत चिमण्या दाणा पाणी खायला आल्या आणि सद्गुरुकृपेने एक कविता स्फुरली ,झरझर लिहून काढली आणि मग मनात विचार आला ,सद्गुरूंनी या ८ कडवी लिहून घेतली व ४ लेख लिहायचा संदर्भ दिला. मूळ लेख नाहीत म्हणून ही सदगुरूंनीच योजना केली आहे.खुप आनंद झाला ,त्यादिवशीचा लेख अवगुण सद्गुरूरनीच लिहून घेतला होता. त्यापुढील ४ लेख असेच श्रीसद्गुरूंनी एक बैठकीत लिहून घेतले आणि मनाला विश्वास मिळाला की सदगुरु सदोदित सोबत आहेतच.कालच प्रज्ञताईने छान लिहिताय यावर मी श्रीसद्गुरुच लिहून घेतात असे लिहिले ,तेव्हा हा प्रसंग लिहायचा होता ,पण नंतर सेपरेट पोस्ट करू असे ठरवले.
सद्गुरू कृपेने स्फुरलेली कवीता मागील 4 लेखात दिली ,ती आज सलग देतो आणि श्रीसद्गुरूंना वंदन करून असेच साहित्य लिहून घ्या अशी मनःपूर्वक विनंती करतो.

*भरवसा*

*गाईंचा कळप चरतो माळरानावर, आपली भूक भागवतात*
*म्हशी जातात पाणवठ्यावर, पाण्यात छान डुंबून घेतात*
*गवत विषारी की पाणी गढूळ, चिंता त्यांना कधीच नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*कोकिळा छान करते रियाझ,तिला गरम पाणी लागत नाही,*
*पोपटाचा रंग हिरवा,त्याला लिपस्टिक मेकअप चालत नाही*
*घश्याची व दिसण्याची काळजी, प्राणी कधीच करत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*चिमण्या येतात खिडकीत,मस्त दाणेपाणी टिपून जातात*
*गल्लीतील कुत्रेही येऊन, रस्त्यावरची पोळी खाऊन जातात*
*दाणे तुटके,पोळी करपली याची चिंता ते करत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*कोल्हे,लांडगे मांसाहारी तरीही ते जंगलातच राहतात*
*हत्ती ,हरीण शाकाहारी तेदेखील जंगलातच असतात*
*मेनू वेगळा म्हणून कोणी वेगळी रेस्टोरंट शोधत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*मोर म्हणतो,मनाला येईल तेव्हा सरावाशिवाय मी नाचतो*
*बगळा शांत समाधी लावून हळूच मासे टिपून घेतो*
*ही स्किल्स यायला त्यांना, क्लास लावायला लागत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*गरुड घेतो उंच भरारी ,मस्त तोल सावरत जातो*
*सुतारपक्षी कठीण खोडात, कोरून छान ढोल बनवतो*
*पडेन मी ,चोच तुटेल याची भीती त्यांना वाटत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*इतके प्राणी ,इतके पक्षी हे उपाशी कधी झोपले का?*
*उद्याची चिंता असूनही त्यांनी साठेबाजी केली का?*
*माणसाची शंका घ्यायची वृत्ती ह्यांची कधी दिसत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*उद्याच काय, पुढच्या पिढीचं काय ,कोडं प्राण्यांना का नाही?*
*शास्त्रद्यांनी शोध लावला की,म्हणे त्यांना ब्रेनच नाही*
*मेंदू असलेला माणूस तरी इतकी युगं सुधारला काय?*
*कारण प्रपंचात सद्गुरूंच देईल यावर त्याचा भरोसा नाय*

जय साईराम
 सद्गुरुदास निलेश जोशी