Saturday, December 22, 2018

गझल - भलभलते सांगतेस

तू जन्माची भूल तरीही,
      तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी,
      केवळ हे गझलेचे तारण
असेल माझे चुकले तेव्हा,
      तोल जायला नकोच होता
कशास उकरूनी काढतेस तू ,
      नवीन मुद्दे जुनेच भांडण

भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस ।धृ।

रोज फक्त हासतेस , एवढे कसे पुरेल ?
सांग कधी मजसाठी ,चांदण्यात थांबतेस?

क्षणभर थांबून गडे ,मोज जुने ओरखडे
घाव नवे त्यावर तू ,मीठ किती सांडतेस ?

हे कबूल मी चुकलो ,ऐक जरा बाई ग
तेच तेच दळण पुन्हा ,तू कशाला कांडतेस

घरट्यातच रमणारी ,अबला तू पूर्वीची
आता तू जिद्दीने, सागर ओलांडतेस

गझलकार - मधुसूदन नानिवडेकर ,कणकवली