Monday, March 8, 2021

#ध्यानानुभव ते ज्ञानानुभव १

#ध्यानानुभव
आज श्रीसद्गुरूंची मानसपूजा झाली आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले, तो चरणस्पर्श, नुकताच त्यांच्या पावलांना लावलेला चंदनलेप,त्याचा सुगंध अनुभवत होतो, त्यावेळी श्रीसद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा असे मनापासून वाटतं होते, लगेच श्रीसद्गुरूंचा आवाज कानी पडला, सद्गुरू त्रिसूत्री माहिती आहे ना,? मग त्यानुसार श्रीसद्गुरूंची इच्छा असेल तर ते डोक्यावर हात ठेवतील, नाहीतर नाही ठेवतील ,असाही श्रीसद्गुरूंचा अदृश्य हात प्रत्येक साधकाच्या डोक्यावर असतोच, त्यामुळे अपेक्षा का करतोस ? हे हवे ,ते हवे याच आशा अपेक्षा तुम्हाला प्रपंचाच्या दलदलीत घेऊन जातात ,तिकडे तुम्ही हात पाय मारता पण उलट त्यात अजुन फसत जाता. गजेंद्रमोक्ष कथा माहिती आहे ना? त्यावेळी त्या हत्तीने आर्ततेने हाक मारली आणि भगवंतानी त्याची मगरीच्या तोंडातून व दलदलीतून सुटका केली.आताही तुम्ही प्रपंचाच्या दलदलीत फसत जात आहातच, हात पाय मारताय पण अजून रुतत जाता ,अश्यावेळी दोन अवयव यापासून अलिप्त आहेत ते म्हणजे यांचे मन व तुमचे तोंड. मग यांचाच वापर करून श्रीसद्गुरू दलदलीतून बाहेर यायचा उपाय सांगतात ते म्हणजे श्रीसद्गुरूचरणी मनाचे समर्पण व श्रीसद्गुरूंनी दिलेले नाम स्मरण जास्तीत जास्त केले की जसे दलदलीतून काढायला फायर ब्रिगेडची क्रेन येते व तुम्हाला अलगद बाहेर काढते तसाच श्रीसद्गुरूंचा आशीर्वाद व मार्गदर्शन लाभते व त्या क्रेनच्या साहाय्याने तुम्ही त्या दलदलीतून बाहेर येताही.
        आता प्रश्न पडतो एकदा अनुभव आलाय ,प्रपंचाची दलदल रुतवून ठेवते आणि ती संकटात टाकते तरीही माणूस त्याच दलदलीत असलेली आकर्षक कमळे बघून पुन्हा त्या दलदलीत जायला वळतो ,ही आकर्षित करणारी कमळे म्हणजेच माया आहे, या मायेच्या मोहात तुम्ही पुन्हा तिकडे जाता आणि पुन्हा त्याच दलदलीत फसता. आता यावर उपाय काही नाही का? तर निश्चितच आहे ,माझे घर तळ्याशेजारी आहे तर ती दलदल तर मी नाहीशी करू शकत नाही ,पण प्रपंचातील नित्य काम करत असताना अनेकदा मोह होईल ,इच्छा होईल व ती आकर्षक कमळे खुणवायला लागतील त्या त्यावेळी माझे श्रीसद्गुरू बघत आहेत ,माझ्यावर लक्ष ठेऊन आहेत हे भाव पक्का हवा. श्रीसद्गुरूंनी अनेकदा हे ठोकताळे सुद्धा दिले आहेत की तू अमुक काम करताना तुला मी अमुक वेशात भेटलो किंवा सावध केले ,म्हणजेच श्रीसद्गुरू प्रत्येक क्षणी बघत आहेत ,नजर ठेवून आहेत असा विचार केला की मग आपोआप आपल्या मनाला आपण कायम जागृत ठेऊ, श्रीसद्गुरूंच्या आठवणीत आपला प्रत्येक विचार मनातून परावर्तित होईल आणि मग आपले नित्यकर्म चोख पार पडेल ,त्यातील इच्छा आकांशा ,लोभ ,मोह ,माया यातून थोडे का होईना आपण अलिप्त व्हायला लागू. सर्व या विकारांवर श्रीसद्गुरू काकामहाराज यांनी दिलेले एकच औषध लागू पडते आणि ते म्हणजे श्रीसद्गुरू माझी प्रत्येक लहानातील लहान कृती बघत आहेत. आणि मग जर त्यांची माझ्यावर दृष्टी आहे तर मग
श्रीसद्गुरू काकासाई ,कृपादृष्टी मजकडे पाही,
तुजविण आश्रय नाही,तुजविण आश्रय नाही,
जगतामाजी या जिवां
-- निलेश जोशी