Saturday, November 12, 2016

दिव्यानुभव 5

कोणाचा विश्वास असो वा नसो , प्रत्येक मानवाला एक अनामिक शक्ती सूचना देत असते व जाणीव करून देत असते , अर्थात ज्याने या सूचना अंमलात आणल्या त्याला त्याचा फायदा होतो , शेवटी देव म्हणजे तरी काय तर एक शक्ती जी प्रत्येकाच्या मनात,शरीरात आहे.
या ग्रुपवरचे अनेक अनुभव वाचून मलाही माझे अनुभव सर्वाना सांगावेसे वाटले व याआधीही हे मी सांगत आलेलो आहे.अर्थात हा समूह त्यासाठीच आज ज्याने देवावरील श्रद्धा वृद्धिंगत होईल,
मागच्या महिन्यातील रविवारची गोष्ट , सकाळपासून मन खूप खिन्न झालेले , माझा 5 महिन्यापूर्वी अपघात झालेला व त्यात झालेल्या इजांमुळे खूप त्रासलो होतो, तसेच सलग 5 वर्षे नित्य जीवनात खूप अडचणी येतच आहेत,त्यावर मार्ग सापडत नव्हता.
पूजा केल्यावर नेहमीसारखा डोळे मिटून देवाचे आवाहन केले व मार्ग दाखव म्हणून आळवणी केली. दुपारचे जेवण केले व पुस्तक वाचत पडलो होतो तेव्हा सवयीप्रमाणे डुलकी लागली. कदाचित तेव्हाही देवाने मार्गदर्शन करावे हे मनात चालू असेल म्हणून असावे पण कोणीतरी एक व्यक्ती माझ्याही बोलतेय असा भास झाला , झोपेतच मी त्या व्यक्तीचे बोलणे ऐकतोय तर मला मागील 5 वर्षातील ठळक घटना मग दोन्ही चांगल्या वाईट ऐकू येऊ लागल्या व नंतर एकदम गंभीर आवाजात "हे सर्व फेब्रु 2011 सालापासून झाले आहे व त्यात तू जो मोबाईल नंबर वापरतोस त्याचाही मोठा हात आहे , नीट बघ तुझ्या मोबाईल नंबर मधील 6 वेळा येणारा 8 आकडा हा शनी प्रतीत करतो आणि त्यामुळे तुला त्रास होतोय , जेवढ्या लवकर तू नंबर बदलशील ते फायद्याचे ठरेल व या सर्वात आपोआप मार्गदर्शन मिळेल , काळजी नसावी"
एवढे सर्व संभाषण मी डुलकी असताना ऐकत होतो पण ते सर्व उठल्यावर आठवायला लागले , मी माझ्या बायकोशी या संदर्भात बोलून यावर अंमल करायचा निर्णय घेतला व त्यासाठी काम चालूही केले लवकरच नवीन नंबर मिळवण्यासाठी खटपट चालू केला व आज तो नंबर चालूही झाला.
ही प्रोसेस चालू केल्यावर माझ्या नावावर 2 jio सिम पण मिळाली व  प्रलंबित कामांना गती मिळायला लागली .कंपनीत जो आत्मविश्वास कमी झाला होता तो परत आला.
या सर्वात मला आपल्या ऐडमीन प्रज्ञा साने यांचेही छान मार्गदर्शन झाले.त्यांनाही खूप खूप धन्यवाद

अर्थात आपल्या श्रद्धास्थानावर विश्वास ठेवा व मनापासून आळवणी करा , आपल्याला तोच त्यातून मार्ग दाखवतो हे खरेच आहे ,
श्री स्वामी समर्थ , गजानन महाराज की जय
--निलेश जोशी

Wednesday, November 2, 2016

फटाका

संपली दिवाळी , निघालोय एकटाच रस्त्यावरून
बघत रस्त्यावरील फटाक्यांचा कचरा व धुरळा
तुडवत असंख्य चिटोरे एकमेकांशी असंबंधीत

काय नाहीये त्या फटाक्यांच्या तुटलेल्या कागदात
अनेक यशस्वी अयशस्वी जगावेगळ्या कहाण्या
चांगले वाईट दोन्हीही कधीकाळी आलेले छापून

दररोज लाखो करोडो घटना घडताहेत पृथ्वीवर
त्यातील अदमासे 2-3 टक्के बातम्या हक्कदार
या कागदावर छापून यायचे भाग्य लेवून आलेल्या

अनेक व्यक्ती नावे भाषा लेख ओळी शब्द
चुराडा होऊन पुन्हा मिळाल्या आहेत जमिनीवरच
अनेक भाषा,बातम्या रद्दीमोल होऊन विखुरलेल्या

अनेकातून ऐकता साधत स्फोटक दारू बांधून
त्या सर्व बातम्यांची झालीय आता एकच सुरळी
दाहकता जपत आणि एकत्र गुंफून लड तय्यार

आनंद झाला सण आला एका ठिणगीने पेटवला
फटाका आणि निमिषार्धात असंख्य आवाज
जणू सर्व बातम्या एकत्र बोलायला लागल्यात

टाळ्या जल्लोष फटाक्यांचा आवाजाबरोबर विरून
पुन्हा झालेय रूपांतर त्यांचे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
पुनर्वापर झाल्याच्या आनंदात तो कागद विरून गेलाय

असंख्य कागदांच्या आकारांची नक्षी पायाखाली
हवेत गारवा व पायाखाली तुडवले जात असतीलही
कदाचित आपली श्रद्धास्थाने व आपलीच कर्तृत्वस्थाने

उत्पत्ती मध्य लय साधत ती बातमी पुन्हा एकदा
मातीमोल होऊन पायाशी पडलीय व त्याशी निगडित
लोक सर्व विसरूनही दैनंदिन आयुष्यात मग्न झालेत

--निलेश जोशी