Saturday, April 11, 2020

सद्गुरूंचे आभार कधी मानलेच नाही

सदगुरु सर्वच आपल्याकडून चांगल्या गोष्टी करून घेतात ,आज अनुभूतीवर निलम ताईने सत्संग विचार पोस्ट केली.त्यात त्यांनी पोस्ट approve केली म्हणून आभार मानले ,त्यात नंतर त्या म्हणाल्या पोस्ट approve केल्याने सद्गुरुंचे विचार सर्वांपर्यंत पोचतात त्यासाठी आभार मानायला हवेतच हे मेघनाताई यांच्याकडून शिकले, हे वाचल्यावर लगेच मनात खालील ओळी सद्गुरूप्रेरणेने सुचल्या ,की कित्ती गोष्टी आपल्याला देऊनही सद्गुरूंचे आभार कधी मानतच नाही.


देती सदगुरु शुद्ध हवा पाणी ,
देती सदगुरु लोकसंग्रह विपुल
तेच देती विचार करण्याची बुद्धी
त्यांचे कधी आभार मानले नाही

सदगुरु आयोजिती सत्संग विचार
पोचविती अमूढाप्रति विनासायास
घेती करून उजळणी वारंवार
त्यांचे आभार कधी मानलेच नाही

सदगुरु प्रत्यक्ष परब्रम्ह अवतार
श्रेष्ठ असती दैवताआधीही पूज्य
हसून करिती चौकशी या जीवाची
तरीही कधी आभार मानलेच नाही

एवढे अक्षम्य चुका करूनही
संधी देती वेळोवेळी माफ करोनी
केले श्रीमंत देऊनी नामसाधने
तरी कधी आभार मानलेच नाही

आता तरी होऊनीया जागृत
सदगुरुना करू नामातून वंदन
जपुनी अमर्याद दिलेले साधन
करू सदगुरुना आभार प्रदर्शन

सद्गुरूंचा आतला आवाज -1

सदगुरु म्हणतात ,काही प्रश्न पडले तर नामस्मरण करून झाल्यावर सद्गुरूंना विचार ,सदगुरु नक्की आतून सांगत असतात ,उत्तर देत असतात ,आपल्याला ते ऐकता यायला हवे. काल एक प्रश्न पडला व तो सद्गुरूंना विचारला.
प्रश्न-  आपण व्यावहारिक जगात अनेकदा जुने विषय उगाळून काढतो ,त्यामुळे पुन्हा तेच विषय चघळले जातात, ताणतणाव वाढतात , हे कितपत योग्य आहे?

सद्गुरूंचा आतला आवाज  - जुने विषय उगाळून काढणे म्हणजे ताणतणाव वाढवणे याव्यतिरिक्त बाकी काहीच नाही ,जसे जुनी भांडी काढली तर लगेच आपण वापरू शकतो का ? नाही त्या भांड्यातील जळमटे काढून टाकावी लागतील , स्वच्छ धुवून घ्यावी लागतील म्हणजे पुन्हा वापरण्यासाठी प्रक्रिया करावी लागते तसेच जुने विचार बासनात गेलेले आहेत ,त्याला जर तर जोडलेले असतात ,त्यावेळी सहन केले हे तुझे प्रारब्द होते किंवा त्यावेळी त्या जीवाने सर्व परिणामांची मनाची तयारी केलेली होती आणि पुन्हा ते उगाळून काढून काहीच फायदा नाही फक्त नंतर हे विषय उकरून काढले तर एकमेकांचा रक्तदाब वाढवण्यासारखे आहे. 
जुने जाऊद्या विसरुनी त्याच आयुष्याचा वळणावरती.
पुन्हा उकरून काढून त्याचा काहीही उपयोग नाही ,त्याने फक्त दुःखच वाट्याला येणार.भूतकाळ हा वर्तमानाशी जोडूच नका ,भूतकाळ आता आपण जर बदलू शकणार नाहीत तर त्याचा विचारही करून उपयोग नाही, त्याचा एक फायदा करून घ्या त्यावेळी मी काय चुकीचे वागलो ? आणि तीच चूक पुन्हा नको व्हायला म्हणून माझ्यात काय बदल करायला हवेत हे जाणून घेऊन ते बदल स्वतःमध्ये घडवून आणायचे. भूतकाळाचा असा उपयोग करून घेतला तर खरा फायदा आहे.

यासंदर्भात काही त्रुटी असल्यास ज्येष्ठानी / सदगुरूंनी जरूर मार्गदर्शन करावे.

7 हॅबीट्स व सदगुरु सत्संग

सदगुरु कायम म्हणतात , कोणतीही गोष्ट करण्याआधी ,कोणाला हुकूम देण्याआधी सद्गुरुचे स्मरण करा , नामस्मरण करा आणि मग ती गोष्ट करा ,बघा परिणाम नक्कीच दिसेल.
हे सर्व कळतंय पण अंमलात कसे आणायचे ? 2 दिवस परिवर्तन या ट्रेनिंगमध्ये आहे ,त्यात स्टीफन कोव्ही यांच्या 7 हेबीट्स फॉर हायली इफेक्टिव्ह पीपल मधील पहिली स्टेप आहे ,त्या स्टेपचे नाव *बी प्रोऍक्टिव्ह*
यांत पहिली गोष्ट शिकायला मिळाली ,जी सदगुरु नेहमी सांगतात, कोणत्याही गोष्टीची ,क्रियेची (Stimulus)प्रतिक्रिया(respond) देताना एक Pause घ्या , आणि मग विचार करून प्रतिक्रिया द्या ,म्हणजे तो फ्लो stimulus --> Pause --> Respond असा व्हायला हवा, हा Pause म्हणजेच सद्गुरूंचे स्मरण ,नामाचे स्मरण आणि हे केल्याने आपले उत्तर बदलते.या pause घ्यायचा सराव होण्यासाठी ट्रेनरनी एक छोटा खेळ घेतला ,त्यात ट्रेनर तोंडाने मोठा बॉल असे बोलले तर समोरच्याने विरुद्धार्थी बोलायचे म्हणजे लहान बॉल पण हाताने action मात्र मोठ्या बॉलची दाखवायची . आता या पूर्ण खेळात खुप चूका व्हायच्या कारण आपण सवयीने respond करायला जातो. पण जेव्हा त्यांनी मुद्दाम pause घेऊन विचार करून खेळ खेळायला लावला तेव्हा खेळात चुका झाल्याचं नाहीत.
म्हणजेच सदगुरु म्हणतात तसे प्रत्येक छोट्या छोट्या respond करताना आपण सदगुरु स्मरण व नामस्मरण करायला लागलो तर आपोआपच हा pause घेणे पण साध्य होईल व नामस्मरण सुद्धा होईल. आपल्या प्रतिक्रिया बदलतील आणि आपल्याही चुका होणे बंद होत जाईल. हे सर्व अर्थातच सरावाने ,आणि त्यासाठी सदगुरु म्हणतात की प्रत्येक कामात ,मधल्या वेळेत नामस्मरण करा.
तसेच अजून एक गोष्ट आहे जी सदगुरु तंतोतंत सदगुरु त्रिसूत्रीतुन सांगतात जी आहे Circle of Concerns,यांत
आपण आपल्या समस्या लिहून काढायच्या आणि त्याच्यात विभागणी करायची की माझ्या प्रभावात किंवा माझ्या कंट्रोल मध्ये किती समस्या येतात ? 
त्या म्हणजे खरच मी त्यावर काम करू शकतो.माझ्यात बदल घडवून आणू शकतो.
काही समस्या ज्याच्यात माझा कंट्रोल ,प्रभाव असू शकत नाही त्यांना बाजूला काढायचे . असे केल्यावर जाणवते आपण बऱ्याच गोष्टींचा समस्या असे बघून आपल्यावरच ताण घेतो ,कारण ताण घेऊनही आपण त्यात काहीच करू शकत नाही जसे प्रदूषण , पर्यावरण ,पाकिस्तान हमला.
सदगुरु नेमके हेच सांगतात की माझ्यावर विश्वास ठेवून सर्व माझ्यावर सोडून दे , त्रिसूत्री बघितली तर त्यातून हाच मेसेज दिलाय , सर्व काही सद्गुरुच करतात ,सदगुरु चांगले तेच करतात आणि माझ्यासाठी जे चांगले आहे तेच सदगुरु घडवतात. हे एकदा विश्वासाने मनाला सांगितले जी सर्व समस्या सुटतात.
हे सर्व सद्गुरुकृपेने साम्यस्थळे समजली व लिहायला सुचले ,यांत काही न्यून असेल तर माझा दोष आहे व सदगुरु नक्कीच त्यावर मार्गदर्शन करतील.
जय साईराम

मी कोणाचा

सदगुरु श्री काकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य)हे नेहमी सत्संगातून  उपदेश सोप्या उदाहरणातून सांगत असतात.नामसाधना करताना अनेकदा मनाला मागायची सवय लागते ,जसे त्या जीवाला समजत नाही की माझ्यासाठी काय योग्य आहे? तरीही मागायची सवय काही संपत नाही. सदगुरु सदोदित म्हणतात की नामसाधना करताना त्यातून काय मिळेल ही अपेक्षा न करता सद्गुरुंच्या अनुसंधानात राहायचे आहे. सदगुरु जे माझ्यासाठी चांगले आहे ते सर्व देणारच आहेत त्यामुळे निश्चिंत मनाने सदगुरुपायी वाहून घ्यायचे आहे. अनेकदा आपण आपल्या मनासारखे झाले नाही तर खट्टू होतो पण तेव्हाही सद्गुरुनी माझ्यासाठी चांगले तेच घडवून आणले हा विश्वास हवा.लहान मुलाला जसे अनेकदा काय खायचे कळत नाही पण त्याची आई जे पचणार आहे असा गुरगुट्या भात भरवते तसेच सदगुरु आपल्यासाठी जर चांगले असेल ते आपल्या आयुष्यात घडवून आणतात.
मी कोण आहे यापेक्षा मी कोणाचा आहे याची जाणीव ठेवून माझ्या सद्गुरूंना कमीपणा येईल असे मी वागणार नाही असं मनाशी पक्के ठरवायला हवे
जय साईराम

नामाची झाडू

सदगुरु श्री काकामहाराज (श्री. श्रीपाद अनंत वैद्य) हे जीवनात अनवधानाकडून सावधानतेकडे जाण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग अवलंबायला सांगतात. नाम घ्याच पण नुसते नामस्मरण नाही तर नाम घेताना डोळे मिटून, आपल्या आत डोकवायचे आहे.माझ्यात काय दुर्गुण आहेत व ते घालवायला काय करायला लागेल, याचा आढावा घ्यायचा.
असं म्हणतात की एखादी सवय स्वतःला लावायची असेल तर 21 दिवस सातत्याने ती गोष्ट करायला हवी.
ज्या काही उणीवा आपल्यात असतील, त्या ओळखून यावरचे उपाय 21 दिवसात अंमलात आणून आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.पुढील 21 दिवस घरातच बसायचे आहे त्यामुळे आज चैत्र पाडवा अर्थात नववर्ष संकल्प करून तो पुढील 21 दिवस घरातूनच सातत्याने पाळूया.

इतर वेळीही रोजच्या कामकाजात व्यग्र असताना श्रीसदगुरु सतत बघत आहेत,लक्ष ठेवुन आहेत ही जाणीव जागृत ठेवायची.आपल्याकडून कळत नकळत अनेक चूका होत असतात ,श्रीसदगुरु बघत आहेत ही जाणीव ठेवल्याने त्या कमी व्हायला लागतात.श्रीसदगुरु काकामहाराज म्हणतात मी तुमच्यातच आहे मग या देहात ,हृदयात त्यांचे अस्तित्व आहेच व स्वच्छ अंतर्मनात त्यांचा वास आहे पण त्याची जाणीव व्हायला हवी असेल व तिथपर्यंत पोचायला आपले बाह्यमन स्वच्छ करायला नको का?आपले बाह्यमन झाडायला नाम व नाम जपाच्या साह्याने बनवलेली काड्यांची झाडू हवी म्हणजेच जर माझे कमी नाम होतंय तर झाडूदेखील कमी काड्यांची बनेल व अर्थातच माझ्या बाह्यमनाची सफाई व्यवस्थित होणार नाही.
तसेच सर्व नामधारकांनी हे करायला हवे की रोज झोपण्यापूर्वी श्रीसदगुरुंना डोळ्यासमोर आणून,त्यांना साक्षी ठेवून पूर्ण दिवसभरातील आपला वावर ,प्रवास ,बोलणे ,कोणाशी कसे बोललो हे सगळे rewind करायचे.त्यातून बरेच शिकायला मिळते ,अंशरूपाने शिक्षण मिळते की या ठिकाणी मी उगाच चिडलो ,मी या वेळी असे नाही वागायला हवे होते ,अरे मी असे बोललो आणि कदाचित तो दुखावला गेला असेल ,अरे त्याला मी टोचून बोललो पण त्यांच्यातही श्रीसद्गुरुस्वरूप आहेच ,त्याला तो मेसेज वेगळ्या शब्दात देऊच शकलो असतो. अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे Gratitude व्यक्त करणे ,आजच्या पूर्ण दिवसात जेव्हा जाणवते मी चुकीचे वागलो ,तेव्हा श्रीसद्गुरूंना साक्षी मानून ठरवायचे मी ती चूक भविष्यात टाळायचा मनोमन प्रयत्न करेन आणि जर ती व्यक्ती माझ्यामुळे दुखावली असेल तर मनोमन मी त्यांची माफी मागत आहे. अनेकदा
आपल्याशी जी व्यक्ती rude वागत आहे त्यामागे आपल्या मागील जन्मातील काही चुका आहेत आणि त्या चुकांचे प्रायश्चित आता आपण घेत आहोत असा विचार आणला की आपोआप त्या व्यक्तीबद्दल अढी निघून जायला मदत होते. भूतकाळातील, पूर्वजन्मातील चुका मी नाही सुधारू शकत त्यामुळे आता त्याचे प्रायश्चित घेऊ आणि आपण वर्तमानकाळात आपली कर्मे कशी शुद्ध होतील याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो.
*आपल्या साईकाका परिवारातील सर्व बंधु भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

*परमपूज्य शिवस्वरूप सदगुरु श्री काकामहाराज व सौ काकुमाऊली यांना हृदयापासून  नमस्कार*
जय साईराम

वाल्याचा वाल्मिकी

आपले सदगुरु श्री काकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य) सत्संगातून मार्गदर्शन करताना अनेक दाखले देतात.संतांचं मन कधीच का खचत नाही यावर मार्गदर्शन करताना श्रीसद्गुरू अनेक मार्मिक उदाहरणातून समजवतात. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले ते सद्गुरूंनी,नारदमुनींनी दिलेल्या  नामामुळे व वाल्या कोळीनें त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे. 
संत जनाबाईना एवढा विश्वास होता की प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांच्या मदतीला यायला लागले. 
संत गोरा कुंभार विहित कर्म करताना पांडुरंगचरणी एवढे तल्लीन झाले आणि स्वतःचे बाळ तुडवले गेले हेही समजले नाही ,शेवटी त्यांची दृढ भक्ती बघून पांडुरंगाला बाळाला जिवंत करावे लागले. 
संत मीराबाईंनी तिचे सर्व सर्वस्व श्रीकृष्णचरणी अर्पिले की त्यांचे स्वतःचे अस्तित्वच उरलेले नाहीये असा त्यांचा भाव झाला.त्यांना दिलेले विष हसत हसत मीरेने पिऊन टाकले की ते  श्रीकृष्णाने दिलेले आहे व ते तारकच असणार हे भाव जागृत ठेवला होता.मीरेच्या अंतरंगातील भक्ती व श्रीसद्गुरुंवरील दृढ श्रद्धा एवढी प्रबळ होती की ते विष पचवण्याची ताकद तिला आली.
आपणही आपली प्रत्येक कृती व अवस्था श्रीसद्गुरुचरणी अर्पण करायला शिकले पाहिजे.आनंद झाला तो सद्गुरूंना अर्पण, आजार आला तर तोही सद्गुरूंना अर्पण ,मोडकी सायकल प्राप्त जाहली तर तीही सद्गुरूंना अर्पण, अश्या प्रकारे प्रत्येक अवस्था त्यांनाच अर्पण करायची सवय लावली पाहिजे.
अशी सवय लावली की आपण मनाने अलिप्त राहायला लागू.श्रीसद्गुरूंचा ध्यास लागायला हवा ,त्यांचे चिंतन ,त्यांचे मनन आपल्यालाही मानसिक धैर्य देते ,नुसते ३५-३६ वर्षे नामस्मरण करून उपयोग नाही. श्रीसद्गुरू स्मरणात श्री सद्गुरूंचे होऊन नाम घेतले तरच जिंकाल. 
हे सर्व करताना व्यवहार मध्ये यायला नको , हे हवे ,ते हवे हा भावही मनात यायला नको, तेव्हाच अंतर्मनातील श्रीसदगुरु दर्शन होईल आणि आपणही सद्गुरूमय होऊन जाऊ.

श्रीसद्गुरू काकामहाराज व सौ काकुमाऊली चरणी विनम्र अभिवादन
जय साईराम

नामपीसा

माझे श्रीसदगुरु श्रीकाकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य) हेही सर्वांना कायम प्रपंचासक्ती सोडून देवपिसा नव्हेतर नामपीसा व्हायला सांगतात.माणूस कितीही धनवान असला ,खिशात लाखभर रुपये असले तरीही तो आनंद क्षणिकच असेल ना? पैसे खर्चून संपले किंवा रस्त्यात हरवले तर पुन्हा दुःख चालू झालेच ना? या सुख व दुःखाच्या फेऱ्यांतून मला कोण बाहेर काढणार आहे ,अशी तळमळ रात्रंदिवस लागली पाहिजे.या प्रपंचासक्तीतून बाहेर कोण काढणार आहे ? त्यांची व माझी गाठ लवकर पडू दे अशी ती ओढ सारखी लागायला हवी मगच ते श्रीसद्गुरू भेटतात.श्री काकामहाराज यावर सुंदर उदाहरण देतात की आपण खुप संकटात आहोत व भिंतीपलीकडे आपली आई बसली आहे तरीही आपण हाक मारल्याशिवाय ती मदतीला येईल का?आई आपल्यासाठी वेळेवर जेवण देईल ,ताट आवरून ठेवेल ,कपडे देईल , पण संकटात तिला आपण ओरडून सांगितल्याशिवाय मदतीला येईल का?
मांजराची पिल्ले तिच्या आसपास उन्हात खेळत असतात ,पण एखादा कुत्रा आसपास आल्यावर जेव्हा ते पिल्लू आकांताने आईला बोलावते ,तेव्हा ती मांजरी धावत जाऊन पिल्लाला तोंडात पकडून सुरक्षित स्थळी आणते.
तसेच श्रीसद्गुरू जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून तुमचा सर्व चरितार्थ चालवत असतात पण तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही त्यांना हाक मारून बोलवायला हवे ,म्हणजेच ते तुमच्याजवळ येतील व तुम्हाला आपल्या सावलीत घेतील. प्रपंचासक्तीतून नामानंदात यायला ,हा पालट घडायला श्रीसद्गुरूंनी दिलेले नामसाधन शरीराच्या प्रत्येक अणूरेणुतून अंतर्मनातील सद्गुरुस्वरूप दर्शनाच्या ओढीने घ्यायला हवे ,तेव्हाच ती माऊली आपल्याला पंखाखाली घेईल व सद्गुरूमय करून आयुष्य बदलून देईल.
जय साईराम

सदगुरु ,ईश्वर आणि नाम

*सदगुरु ,ईश्वर आणि नाम*

श्रीसद्गुरूंनी एक सुंदर विषय सर्वाना दिलेला आहे.सदगुरु ,ईश्वर व नाम या एकाच नाण्याच्या तीन बाजू कश्या असू शकतील? 

नाणे जर आपण काळजीपूर्वक बघितले तर त्याला दोन बाजू प्रकर्षाने दिसतातच ज्याला आपण छापा व काटा असे म्हणतो पण त्या नाण्याला एक तिसरी बाजू असतेच आणि ती म्हणजे नाण्याला जाडी प्रदान करणारी बाजू.
नाण्याचा पुष्ठभाग ही बाजू मूल्य दर्शवते ती काटा बाजू हे *श्रीसद्गुरू* आहेत ,नाण्याचा मागील भाग छापा बाजू ज्यावर अशोकस्तंभ चिन्ह आहे हे *ईश्वरमय* आहे आणि नाण्याला जाडी देणारी जी बाजू आहे ज्यावर जपमाळेप्रमाणे बिंदू आहेत ती बाजू *नाममय* आहे.
नीट बघितले तर प्रत्येक नाण्याला वैशिष्ट्यपूर्ण जाडी आहे आणि त्यावर काही उठावदार बिंदू आपल्या हाताला जाणवतात, एखादे समजा पाच रुपयांचे नाणे जर हातात घेतले तर त्याची जाडी आणि त्यावरील बिंदू जे हाताला जाणवतात.  दिव्यांग लोकांसाठी ही योजना केलेली असते की हातात नाणे आले की त्यांना काटा म्हणजे मूल्य समजते व नाण्याच्या जाडीवरील बिंदू ओळखून त्या नाण्याची किंमत ओळखता येते. नाण्यांवरील छापा कायम बदलत राहतो ,कधी अशोकस्तंभ वरील 4 सिंह असतील ,कधी शेतकऱ्यांचे चित्र असेल ,कधी ज्ञानेश्वर माऊली असतील तर कधी गांधीजी असतील. जेव्हा नाण्याच्या आवृत्ती येतात तेव्हा हा छापा बदलत जातो म्हणजेच छापा ही बाजू ईश्वर स्वरूप ज्याची अनेक रूपे आहेत, अनेक अवतारात , अनेक रुपात ईश्वरस्वरुप आपल्याला प्रथमदर्शनी वेगळे जाणवते.
जशीजशी नाण्याची किंमत वाढते तसतशी जाडी वाढत जाते ,व्यवहारात व चलनात 10 रुपये ,5 रुपये ,2 रुपये ,1 रुपये ,पन्नास पैसे ,दहा पैसे ही नाणी आहेत. त्याची जाडी किमतीनुसार वाढत जाते. या जाडी असलेल्या बाजूला जर नाम म्हटले तर जसजसे नाम वाढत जाईल ,तसतसे श्रीसदगुरु(काटा बाजू) व ईश्वर(छापा बाजू) हे एकच आहेत हे समजायला लागेल.याआधी आपल्याला श्रीसदगुरु माहीतच नव्हते ,जगनियंता ईश्वर माहिती होता पण जसजसे आपण श्रीसद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला लागलो ,तसतसे आपल्याला या दोन बाजू दिसायला वेगळ्या असून एकच असतात हे समजायला लागले. नंतर तर ईश्वर व सदगुरु हे एकच आहेत नव्हे नव्हे जर दोघेही एकत्र समोर आले तर श्रीसद्गुरू यांना पहिले वंदन करायचे कारण माझ्या अंतरमनाच्याजागी ज्ञानज्योत जागविणारे हे श्रीसद्गुरू आहेत हे मनापासून पटायला लागते. नाम वृद्धिंगत व्हायला लागले की बाह्यमनातील अनेक दोष जायला लागतील आणि तुमचे मूल्य वाढायला लागेल.मूल्य हे आर्थिक बाजूने बघायचे नसून अध्यात्मिक बाजूने बघायला आपण शिकू.तात्पर्य एकच श्रीसद्गुरू व ईश्वर एकच आहेत आणि हे सदोदित मनाला सांगणारे नाम सदोदित बरोबर घ्यायचे आहे. व्यावहारिक जगात आपण कितीही यशस्वी असलो तरीही या अध्यात्मिक जगात आपण दिव्यांग आहोत ,अपंग आहोत. जसे नाण्यांवरील काटा व जाडी त्या व्यक्तीला नाणी ओळखायला मदत करतात तसेच आपण अध्यात्मिक अपंग आहोत व आपण  श्रीसद्गुरू व नाम यांना बरोबर घेऊन वाटचाल करूया. नाण्यांवरील काटा असलेले माझे श्रीसद्गुरू हेच सर्वकाही आहेत व छापा अर्थात अनेक स्वरूपातील ईश्वर माझ्यासाठी गौण आहे आणि या अध्यात्मात प्रगती व्हायला माझी नामाची बाजू म्हणजे नाण्याची जाडी बाजू जास्तीत जास्त बळकट करायला हवी. त्यासाठी या ठोकळ्याला (नाण्याला काहीजण ठोकळा म्हणतात म्हणजे हे तीन बाजू असलेले नाणे म्हणजे मीच आहे) सद्गुरूंनी नामसाधन दिलेच आहे ते त्यांच्याच स्मरणात व मार्गदर्शनात जास्तीस्त जास्त घेत राहूया. 
जय साईराम