Tuesday, July 30, 2013

रूप की गुण??

एकदा सम्राट चंद्र्गुप्तानी आपले प्रतिभाशील मंत्री चाणक्य यांना म्हटले की "किती चांगले झाले असते जर तुम्ही रूपवान पण असता"
त्यावर चाणक्यनी उत्तर दिले की "रूप व सौन्दर्य हे मृगजळासारखे आहे,माणसाची खरी ओळख त्याच्यातील गुण व बुद्धिने होते त्याच्या रुपाने नाही"

त्यावर चंद्रगुप्ताने विचारले की असे काही उदहारण आहे का ज्याच्या गुणासमोर रूप फिके पडेल??
त्यावर चाणक्यानी उत्तर दिले की "अशी खुप उदाहरणे आहेत महाराज पण त्याआधी आपण पाणी पिवून मन हलके करावे मग आपण यावर सविस्तर बोलूच"
एवढे बोलून त्यानी राजाला दोन पाण्याचे पेले भरुन राजाला पाणी प्यायला लावले
आणि मग राजाला विचारले "महाराज पहिल्या पेल्यातील पाणी हे सोन्याच्या घड्यातील होते व दुसरया पेल्यातील पाणी हे काळ्या मातीच्या घड्यातील होते आता मला सांगा की कोणत्या पेल्यातील पाणी थंड व चवदार होते ?"
राजाने उत्तर दिले की "काळ्या मातीच्या घड्यातील पाणी हे थंड व चविष्ट होते व त्याने मनाला तृप्ति मिळाली."

तेथे उपस्थित महाराणी हसत राजाला म्हणाल्या की "महाराज आपले प्रधानमंत्री खुपच हुशार आहेत आणि त्यानी आपल्या बुद्धिचातुर्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे
तो सुन्दर सोन्याचा घड़ा काय कामाचा ज्यातील पाणी बेचव आहे दुसरीकडे काळ्या मातीचा घड़ा दिसायला जरी बेढब व कुरूप असला तरी त्यात असे गुण दडले आहेत ज्यामुळे त्यातील पाणी थंड व चवदार बनले आहे व ते मनाला तृप्ती देते आहे
आता तुम्हीच सांगा महाराज रूप श्रेष्ठ की गुण व बुद्धि श्रेष्ठ ??"

Monday, July 29, 2013

परिचित

परिचित व्यक्ति म्हणजे काय आपल्याला ज्याचा परिचय आहेअशी व्यक्ति पण खरच आपण ज्याला परिचित म्हणतो त्या व्यक्तीला आपण पूर्ण ओळखतो का??
समोरचा खोटे बोलतोय की खरे बोलतोय हेही मेंदुने पडताळ्याणापूर्वी आपण त्या व्यक्तीला किती ओळखतोय आणि हा माणुस आपल्याला फसवणार नाही हा निकष लावतो
खरे तर कधी कधी आपले स्वत:चे वागणेही एकदम बदलून जाते तेव्हा आपण स्वत:ला परिचित असतो का??
एखाद्या क्षणी आपले भान हरपून जाते किंवा एखाद्या क्षणी रागाचा पारा चढून जातो तेव्हाही बरयाचदा समोरची व्यक्ति ओळखीची असतेच ना तरीही आपण त्याला दुखावुन जातो
ओळख आणि परिचय ह्या दोन्ही भिन्न गोष्टी का ??विरुध्द अर्थी तर नाहीच पण समान अर्थी तरी आहेत का??आपण थोड्या वेळात कोणती प्रतिक्रिया देणार आहोत हेही आपल्याला कळत नाही मग आपण स्वत:ला व स्वत:च्या मेंदूला परिचित आहोत का?
आपण आपल्याला ओळखलेलेच नसते बहुधा आणि त्यामुळेच माझा मेंदू ,माझे शरीर ही संकल्पना मांडताना फ़क्त अहंभाव शिल्लक राहतो आणि हाच अहंभाव परिचय आणि ओळख विसरायला लावतो

परिचित व्यक्तिकडून झालेली फसवणुक म्हणुुनच जिव्हारी लागते कारण त्या व्यक्तिवरील विश्वास जो परिचयातुन दृढ़ झाला आहे त्या विश्वासाच्या बळावरच आपण त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतो किंवा मेंदू बाजुला ठेवून आपण त्या क्षणी तो निर्णय घेतो
जेव्हा फसवणुक कळते तेव्हा दोन पर्याय असतात पुन्हा फसवणुक होवू नये म्हणून सावध व्हायचे किंवा आपलेच काहीतरी चुकले असेल म्हणुन विश्वास कायम ठेवायचा.

असे म्हणतात की जेव्हा तुम्ही दुसरयाला दोषी म्हणून बोट दाखवता तेव्हा 4 बोटे तुमच्याकडे असतात म्हणजे जर तो माणुस एकपट जबाबदार तर आपण स्वत: त्याच्या चार पट जबाबदार असतो त्यामुळे जे घडते ते माझ्यामुळेच,

Saturday, July 27, 2013

तक्रार -- एक लघुकथा

ही लघुकथा मी हिंदीमध्ये वाचली होती त्याचे मराठी रूपांतरण इथे लिहितोय
अर्थात फ़क्त मराठी रूपांतरणचे श्रेय माझे आहे
ही कथा आपल्या भारतीय मानासिकतेसाठी लिहिली असावी बहुतेक .....

एक राजा होता आपल्याच दुनियेत मस्त
त्याची प्रजाही खुप सहनशील होती
खुप लोकानी प्रयत्न केला प्रजेला जागे करण्याचा व जे चुकीचे आहे त्याचा विरोध करावा म्हणून प्रजेची एकजुट करण्याचा पण काहीच फरक पडला नाही
राजाने तेलावर कर लादला प्रजेने तो निमुटपणे सहन केला
राजाने आगळे वेगळे कर प्रजेवर लादले पण तेही निमुटपणे सहन केले,एक दिवस राजाने राज्यातील मोठा रस्ता खोदून तिथे पुल बांधायचा निर्णय घेतला त्या जागी खरेतर पुलाची काहीच गरज नव्हती पण याही वेळी या निर्णयाला कोणीच विरोध केला नाही
पुल चालू झाला व यायला जायला तोच रस्ता असल्याने लोक तो पुल वापरू लागले
थोड्या दिवसानी राजाने त्या पुलावर प्रवेश कर बसवला व तो आकारण्यासाठी तिथे आपली माणसे नेमली याही वेळी कोणीच विरोध केला नाही की राजाला जाब विचारला नाही

थोड्या दिवसानी राजाने त्याच्या माणसाना आदेश दिला की त्या पुलावरून जो कोणी जाइल त्याला चार थपडा लगावयाच्या आणि ज्याला त्याविषयी तक्रार असेल त्याने बाजूला ठेवलेल्या तक्रार पेटीत तक्रार लिहून देवू शकता
त्याच दिवसापासून त्याची अमंलबजावणी चालू झाली
एवढा टोकाचा निर्णय अंमलात येवुनही प्रजा गप्पच होती ना कोणीही त्या तक्रार पेटीत कोणी तक्रार लिहून टाकली ना या प्रकाराला विरोध केला
राजा मात्र रोज त्या तक्रार पेटीत कोणी तक्रार लिहितोय का याची रोज विचारणा करायचा पण रोज पेटी रिकामीच मिळायची

एके दिवशी त्या पेटीत एक चिठ्ठी सापडली तेव्हा लगेच ती राजाकडे पोचवण्यात आली
राजाही खुश झाला चला एका माणसाला तरी जाग आली आणि आहे त्या यंत्रणेविरुद्ध तक्रार करायची बुद्धी झाली त्याने चिठ्ठी उघडून वाचायला घेतली त्यात लिहिले होते
"महाराज पुलावर कामाच्या वेळी खुप गर्दी होते तरी कृपया थपडा मारणारया सैनिकात वाढ करा,कमी सैनिकामुळे रोज कामावर जायला उशीर होतो"

हिशोब

या जीवनात जगणे महाग झालेय पण मरण स्वस्त झालेय
बॉम्बस्फोट जाळपोळ दंगल यांनी मरणाला सोपा प्रवेश दिलाय

सरकार दिखावा करते आहे जनतेची खुप काळजी घेतेय
दारिद्ररेषेची मर्यादा मात्र दिवसेंदिवस खुप बदलते आहे

मंत्र्याचा कुत्रा मेला तरी शोकसंदेशाचे फलक लावले जाताहेत
उत्तराखंड,लातूर ग्रस्त लोक अजुनही मदतीच्या प्रतिक्षेतचआहेत

सर्वसामान्य जनता आर्थिक विवंचनेने त्रस्त आहेत
सरकार मात्र पाच बारा रुपये जेवणाचे हिशोब मांडत आहे

गृहिणी सहा सिलेंडर कसे पुरवायचे याचा आटापिटा करताहेत
मंत्री लग्नात जेवण हजार की पंधराशे याचे आयोजन करताहेत

दिवसाला तिस रुपये कमावणारा गरीब कसा नाही हे सरकार पटवतेय
स्वत: मात्र संसद भवनात केन्टिनमध्ये जनतेच्या पैश्यावर सूट घेताहेत

दिल्लीच्या मैडम कोणतेही पद नसताना लष्कराची विमाने वापराताहेत
तुम्ही मी मात्र स्वकमाईवरचा कर भरायला रांगेत धडपडतो आहोत

--निलेश जोशी

Monday, July 22, 2013

कित्येक दिवस झालेत

कित्येक दिवस झालेत...

खरच कित्येक दिवस झालेत...

एरंडाच्या पानांचे बुडबुडे उडवून
पानांच्या डिन्काचा आरसा करून
लाजाळुच्या पानांना हाताने लाजवुन
कित्येक दिवस झालेत...

भर पावसात ओलेचिम्ब भिजुन
वाळुतल्या शिम्पल्यांचा आकार शोधून
लाटांना न जुमानता वाळुचा बंगला बांधून
कित्येक दिवस झालेत...

रातकिड्यांची किरकिर ऐकून
ढगांमध्ये वेगवेगळे आकार शोधून
चांदण्यांची अविरत लुकलुक बघून
कित्येक दिवस झालेत...

झाडावर चढून पेरू तोडून
कैरीने दात आंबट करून घेवुन
आवळे चिंचा दगड़ाने पाडून
कित्येक दिवस झालेत...

शांत एकांतात शिळ वाजवून
काठीदोरीचा धनुष्यबाण करून
टायर काठीची गाड़ी करून
कित्येक दिवस झालेत...

स्वत: कागदी होडी बनवून
चपटा दगड पाण्यात भिरकावून
काठीने पाण्यात तरंग काढून
कित्येक दिवस झालेत...

नकली पिस्तुलाने चोरपोलिस खेळुन
पत्यांचा बारामजली बंगला बनवून
पाच तिन दोन,भिकार सावकार खेळुन
कित्येक दिवस झालेत...

चित्र स्पष्ट यायला एंटेना फिरवून
लगोरच्या व आबाधुबी खेळुन
फुटलेल्या फुग्याचा डमरू करून
कित्येक दिवस झालेत...

मंदिरातील घंटा उड्या मारत वाजवून
लाकडातील भुंगे हाताने पळवून
देवासमोरील साखर फुटाणे खावुन
कित्येक दिवस झालेत...

जगाबरोबर धावण्यासाठी स्वत:चा वेग वाढवुन
करतोय ते चुक की बरोबर हे न समजुन
काही कमावण्यासाठी बरेच काही गमावून
कित्येक दिवस झालेत...
खरच सांगतो कित्येक दिवस झालेत...

---निलेश जोशी

Sunday, July 21, 2013

देवा तूच वाचव.....

आषाढ़ी एकादशीला गेलो मंदिरात दर्शनाला
रुक्मिणी व पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला
पंत उभे,हार गळ्यात,सोन्याचा शेला कमरेला
विटेवरी होते सज्ज सर्वाना आशीर्वाद द्यायला

मी वाकलो,तुळशी फुले चरणाशी वहायला
कुजबुज ऐकू आली म्हणून लागलो ऐकायला
चक्क पांडुरंग सांगत होते पत्नी रुक्मिणीला
"खुप वेळ झाला पण एकहि भक्त नाही आला"

रुक्मिणी म्हणाली "अहो तुम्ही लागले विसरायला"
"सकाळपासून आहे रांग फ़क्त तुम्हाला भेटायला"
"विसरले तुम्ही त्या भक्तांच्या सहनशाक्तिला"
"उपवासातही तासंतास लागते रांगेत वाट बघायला"

पांडुरंग म्हणाले "हे आले सगळे करार करायला"
एवढे दे,म्हणजे मी येईन केलेला नवस फेडायला
आत्ताच जो नेता येवून गेला,दिली रक्कम मंदिराला
रस्ते धरणाचे पैसे खाऊन दानधर्म करायला आला

थोड़ी तरी बुद्धि त्याने हवी होती वापरायला
जनतेची कामे करण्याला निधी होता खर्चायला
स्वत:ची तिजोरी भरुन देणगी दिली दाखवायला
जनतेची कामे झाली नाही तरी तो दानी ठरला

"जनता हाच पांडुरंग"अरें सांगा कोणीतरी त्याला
मूर्ती आहे फ़क्त प्रतिक,देव आहे सर्व दिशेला
ज्या माणसांना हा नेता बसला आहे लुबाडायला
त्यांनीच निवडून दिले आहे त्याला हे मात्र तो विसरला

जी हीच माणसे आता देती शिव्या त्या भ्रष्ट नेत्याला
निवडणुकीला विसरतील सारे स्वत:च्या सद्दविवेकबुद्धीला
एक दिवसाची सुट्टी घेवुन जातील सहकुटुम्ब फिरायला
निवडणुकीला पैसे खावुन निवडतील त्याच नेत्याला

हेच भक्त मग म्हणतील,देवा वाढ आली महागाईला
स्वत:च्या चूका लपवायला वेठिला धरतील देवाला
आहे विटेवरी पांडुरंग,सदैव आमची काळजी घ्यायला
"देवा आता तूच वाचव"सांगतील प्रत्येक आषाढीला

---निलेश जोशी

Monday, July 15, 2013

अंध अनुकरण

अनुकरण नावाखाली माणसाने प्राण्याचे गुण घेण्याचा प्रयत्न केला
नेहमी प्रमाणे आपल्याला पाहीजे तो अर्थ काढून मतलबी असल्याचा दाखला दिला

कुत्र्याचा लाळघोटीपणा घेतला पण त्याचा ईमानदारी घ्यायला कचरला
आपले काम होण्यासाठी प्रसंगी लाळ गाळुन
कामापुरता मामा व्ह्यायला शिकला

मुंगीचे सुईसारखे टोचणे घेतले पण मेहनत घ्यायला नाही धजावला
शब्दाने समोरच्याला घायाळ करुन काम का झाले नाही याची कारणे देवू लागला

वाघाची झड़प घालणे शिकला पण भूक नसताना शिकार करणे नाही टाळु शकला
तीच सवय सगळीकडे वापरुन भ्रष्टाचारातुन जगाला ओरबडायला शिकला

फुलपाखरांचे स्वत्छदीं आयुष्य कसे जगायचे हे ओळखुन तसेच जगु लागला
पण कुठे थांबायचे हे कळत असुनही त्याकडे मात्र डोळेझाक करायला लागला

देणारयाने देत जावे हे बरोबर लक्षात ठेवून जे मिळेल ते घेत सुटला
पण जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा माझी झोळी खाली म्हणून रडू लागला

अनुकरण असावे शहाणे हे समर्थांचे शब्द सोयीस्कररित्या विसरला
नाकी डोळी धड धाकट असुनही नको ते अंध अनुकरण करतच राहिला

---- निलेश जोशी

Wednesday, July 10, 2013

जोशी आसा कसो???

सचिन चमनकरने सुरवात करून दिल्यान त्याकाच पुढे सुचता तसा रेटतय
आत्माप्रोढि नाय पण वायच मजा
आवडला तर सांगा नाय तर गाली घाला

बटबटया डोळ्यांचो
वाकड्या तिकडया बोटान्चो
जोशी भट कसलो
जोशी भट असलो

जीपीएम् ला गप्प असणारो
आता मोठे हुषारे मारनारो
खयव ग्रूप बनयनारो
जोशी भट असलो

तिन तिन नाष्ट्ये करनारो
खा खा खायत रवनारो
उंच सायकल चालयनारो
जोशी भट असलो

सचिन काकडयाक पिडनारो
ratio ला रेटियो म्हननारो
दहावीनंतर डिप्लोमा करणारो
जोशी भट असलो

आनी आता देवबागाक घाबरानारो
मलेवाडचो धसको घेतलेलो
उभ्याडांड्याक फाटयार मारनारो
जोशी भट असलो

नातवाक जिराफ म्हननारो
नातूचो grandson करनारो
इंस्पे जाधवला घाबरलेलो
जोशी भट असलो

वरसून कड़क वाटनारो
आतसून मऊ काळजाचो
कोकणातल्या फणसासारखो
जोशी भट असलो


Saturday, July 6, 2013

पैसा

उधळ पट्टी नको पैशांची
ती ठेव तुझ्या पाकिटात
उधळ पट्टी कर सुविचारांची
तुझ्या आजुबाजुंच्या लोकांत

चन्दनही देते सुगंध जगाला
त्याआधी लागते त्याला उगळायला
पैसाही तसाच मौल्यवान बाळा
लावेल कोणत्याही गोष्टीचा लळा

लाव लगाम स्वतःवर
आणि बस कायम तोलत
घेतोय ती वस्तु
जरुरत आहे की चाहत

पैसा कमव कष्टाने अन
सार्थकी लाव जीवन
पैसा नाही साध्य बाळा
बनव त्याला साधन

---निलेश जोशी

यशस्वी

आपण मोठे झाल्यावर मन आठवतय बालपण
आणि बालपणात मात्र हवं असतं मोठेपण

माणुस करतोच असा विचार आगळा वेगळा
जे नसते त्यापाशी तेच करायला लागतो गोळा

बघा ना पैसेवाला करतो खर्च पैसे मिळवायला सुखशान्ति
आणि सुखात असलेला मध्यम वर्ग पैश्यांसाठी खंती

चार चाकी असणारा वजन कमी करायला मारतो चकरा
आणि पायी चालणारा माणूस घेउ इत्छितो चारचाकीचा आसरा

एकूण काय माणूस फ़क्त रडतो काहीच नाही माझ्यापाशी
अरे वेड्या क्षमता आहे तुझ्यापाशी परी तू ओळखायला चुकलासी

हे उमगल्यावर मात्र मी होतो थोडा शहाणा
मोठा झालो असलो तरी करतो बालरुपी बहाणा

असतो मी नेहमीच मशगुल माझ्याच जीवनात
अन प्रत्येक गोष्ट करतो सकारात्मक विचारात

अरे असतीलही त्या गोष्टीची फळेही थोड़ी नकारात्मक
पण ती गोष्ट स्वतः केल्याने ती आता मलाही अवगत

हाच तर आहे यशस्वी जीवनाचा मन्त्र व द्योतक
करीन धाडस धडपड आणि ठरवेन स्वतःला सार्थक

---निलेश जोशी

Friday, July 5, 2013

लोकल ट्रेन

मुबंईत तू नसलीस तर जीवन व्यर्थ आहे
तू आहेस म्हणून आयुष्याला गति आहे
अख्या मुबंईची तू तारणहार आहे
लोकल रेल्वे हेच तुझे नाव आहे

एक दोन मिनीटाचे महत्व तू समजावते आहे
एकीचे बळ डब्यामध्ये अनुभवायला देते आहे
बेशिस्त्यालाही टाइम म्येनेजमेन्ट शिकवत आहे
लोकल रेल्वे हेच तुझे नाव आहे

कोणत्याही जाती पंथाचा तुझ्यात सामावतो
गरीब श्रीमंत तुझ्यावरच आपले घर चालवतो
तुच खरया अर्थी या आर्थिक राजधानीची नाळ आहे
लोकल रेल्वे हेच तुझे नाव आहे

असे असुनही आम्हीही कधी क्रूर बनतो
संप बंद यात तुझीच तोड़फोड़ करतो
एवढे सोसुनही तू क्षमाशील आहेस
लोकल रेल्वे हेच तुझे नाव आहे

मेट्रो सारखे कितीही पर्याय आले तरीही
तुझे महत्व कमी नाही होणार तिळभरही
सर्व मुम्बई तुझ्याच कक्षेत आहे
लोकल रेल्वे हेच तुझे नाव आहे

मानवनिर्मित कचरयामुळे तुला अड़थळा होत आहे
बोम्बस्फोट महापुर यात तुला त्रास होत आहे
तरीही जगाला "शो मस्ट गो ऑन" सांगत आहे
लोकल रेल्वे हेच तुझे नाव आहे

निलेश जोशी

पालवी

रोज ग्यालरित चकरा मारताना
एक गोष्ट मन वेधून घेते
निसर्गाच्या कुशितली एक वेल
आमच्या घरात डोकावू पाहतेय

उन पाउस असला तरी
आहे मनाने खुपच खंबीर
कधीतरी मी निराश झाल्यावर
खचल्यावर देइ मला धीर

म्हणते "इतकी तकलादू जरी मी
आसमंतात झेपावु पाहतेय
आणि तूच का असा खचतोस?
उठ,जग ताठ मानेने"सांगू पाहतेय

त्याच वेलीवर आज नविन नजाकत आली
आणि ती नाजुक वेल अजुनच सुन्दर झाली
वेलीवर दिसू लागलीय नविन हिरवी पालवी
अस्वस्थेतहि देइ दिलासा आणि निराशा घालवी

मनाला देते उभारी वेल मला खंबीर बनवतेय
मला शिष्य बनवुन स्वतः गुरुपण घेतेय
भिंतीवर आधार नसताना स्वबळावर वाढतेय
आहे त्यात जमवून घे हे मला शिकवतेय

-- निलेश जोशी

Tuesday, July 2, 2013

झव बायेक व्हरान --- मालवणी कविता

आपल्या मालवणी भाषेत शीवी पण भावना व्यक्त करण्याचे माध्यम त्यात कुणालाही दुखावायाचा उद्देश अजिबात नसतो,तरीही आधीच क्षमा मागतो

----++++----++++----++++----++++

न्हान होतय शालेत जावक लागलय
2-3 मित्र झाले मी सोशल झालय
मित्रात पेन्सिली देवक घेवक लागलय
भांडन झाल्यार मित्र म्हणालो
माझी तीच पेनस परत दी

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
आता ती पेनस हाड़ू खयसून?

थोड़ो मोठो झालय
सायकल शिकलय आणि उतारावरसून
जोरात स्पीड धरलय
आणि समाजला
ब्रेक लागनत नाय

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
आता सायकल थाम्बव कशी?

जत्रेत गेलय दशावतारी नाटक बघुक
खाजा भजी खावन एकदम फुुढे बसलय
मोठ्या केसांचो राक्षस इलो पाय आपटित
आणि खाज्याच्या पुडी फोडून टाकल्यान

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
आता घराक खाजा नेव कसा?

रात्रीचो एकटो जाताना
माडाचे सावल्ये घाबरवक लागले
वरसून घुबडा आणि पायाखालसून
फुरसा सरसरत गेला

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
आता घराक जाव कसो?

कंदील दुरुस्त करून घराक जाताना
एसटीक एवढी गर्दी
चढ़ाक मिलात की नाय ही शंका

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
कंदील जपून नेव कसो?

दहावी बारावीत बाबुन
बरे मार्क मिलयल्यांन
आता म्हनाक लागलो
फुकट शिक्षण संपला
आता फी भरुची लागतली

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
आता पैसे हाड़ू खयसुन?

पावसान गेलो सगळो भात व्हावान
दानो नाय घरात जेव्हा
गणपतीत पावणे येतत रवाक

मनात घंटा वाजली
झव बायेक व्हरान
उसनी श्रीमंती हाड़ू खयसून?

निलेश जोशी

Monday, July 1, 2013

एक अतिशय सुन्दर संग्रहित कविता

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
तंत्रज्ञाना मागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा ही शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

धन जमा करताना समाधान विसरलो
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्यामुळे चागलं निवडणं विसरलो
गाडी आल्यापासून चालणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

स्वतःमध्ये मग्न राहून दुस-याच्या विचार विसरलो
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो