Monday, July 1, 2019

श्री सद्गुरू आणि आनंद

श्री सद्गुरवे नमः
ओम श्री साईकाकाय नमः
ओम श्री साईनाथाय नमः

आनंद म्हणजे काय ? बऱ्याचदा आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो ,पण कित्येकदा त्या आनंददायक गोष्टी नंतर दुःख देणाऱ्या असू शकतात.
काही अनपेक्षित गवसले की दुप्पट आनंद होतो कारण त्यावेळी ती गोष्ट त्याला अपेक्षित नसते. पण माणसाला असाही आनंद मिळतो जेव्हा तो खुश असतो पण नाचू शकत नाही ,व्यक्त करू शकत नाही फक्त आनंदाश्रू ओघळत राहतात डोळ्यातून तासनतास ,तो खरा त्या माणसाने अनुभवलेला आनंद.
श्री सद्गुरू यांनी आपल्याला कृपा छत्राखाली घेतल्याचा आनंद असाच आहे ,अपरिमित आणि अव्यक्त..
श्री सद्गुरू म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आणि ते जेव्हा आपल्याला अनुभूती देतात ,काळजी नको मी आहे असे आश्वासन देतात त्यावेळी प्रत्यक्ष देवाच्या आशीर्वादात आपण असतो. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर , नित्यपाठात याचा उल्लेख आहेच की आताच्या युुगात जर श्रीराम किंवा हनुुुमान अवतरले तर आपण तेे तेज बघूून गांगरून जाऊ ,म्हणूूूनच सद्गुरु आपल्याला आश्वस्त करायला आले आहेत. ओवी क्रमांक ९८ - "म्हणोनि कालमान पाहोनी ,ईश्वरही झाला सौम्य सुवदनी ,काका स्वरूप आवडोन ,मानववेषी अवतरला.

आज सद्गुरुनी जो निबंध लिहायला सांगितलंय त्याला नित्यपाठतील ओव्या आधार घेऊनच आपण श्री सद्गुरू आणि आनंद हा विषय समजून घेऊया.

नित्यपाठ ओवी क्रमांक १४ "फेडफेडीची ही भाषा , करणे माझी मनाची मूर्खता,तुमच्या उपकारी राहता ,आनंद मजसी वाटतो" 

श्रीसदगुरू या मोहमयी व स्वार्थी जीवनात तुमच्या कृपेने हे जीवनच पालटले आणि आता मनांत विचार येतात की सद्गुरुंचे खूप उपकार आहेत आपल्यावर आणि ते कसे फेडू ,दुसऱ्याच क्षणी तुमच्याच कृपेने मनात विचार येतो की फेडफेडीची ही भाषा म्हणजे निव्वळ व्यवहार आहे आणि हा व्यवहार सदगुरूंना अपेक्षित नाही, त्यापेक्षा त्यांच्या उपकारात जन्मभर राहणे मला मनापासून आवडेल.आणि हे उपकारात आहोत याची जाणीव व्हायला सद्गुरुनी दिलेली चाकोरी सर्व साधकांनी व भक्तांनी मनापासून पाळायला हवी ,आचारायला हवी.ऑटोमोबाईल मेंटेनन्स भाषेमध्ये 3 term वापरल्या जातात , CBM म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स TBM म्हणजे टाइम बेस्ड मेंटेनन्स व IR म्हणजे इंस्पेक्शन व रिपेअर ,ह्याच व्याख्या आपल्याला या भक्तिमार्गात आचारता येतील. आपली पूर्वकर्मे जळून जावीत म्हणून सद्गुरूंनी दिलेली उपासना म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स ,सद्गुरूंनी आखून दिलेली चाकोरी जेणेकरून आपण भक्तिमार्गात राहू ,सदोदित सद्गुरूंचे स्मरण होईल म्हणजेच टाइम बेस्ड मेंटेनन्स व नैमित्तिक साधना सद्गुरू करवून घेतात जसे जप ,हे निबंध लेखन व मंदिरातील सत्संग - भजन हे आपल्यातील जाणीव नेणीव घासून पुसून लख्ख करतात म्हणजेच या गोष्टी इंस्पेक्शन व रिपेअर याचेच काम करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ४१ "पुढे श्रीसाईंचीही कृपा झाली ,तू माझा बंधू ऐसी ओळख दिली ,शिरडीच आनंदनगरी आली ,साईमहिमा वाढविण्या" श्री सद्गुरु राहतात ते ठिकाण शिवकृपा ,आनंदनगर दोन्हीकडे बारकाईने बघितले तर सिंहगड रोड वरील आनंद देणारे नगर असेही आपण म्हणून शकतो.या वास्तूत स्वतः शिवस्वरूप सद्गुरू वास्तव्य करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ६५ , "आपण आनंदी राहावे ,इतरांनाही आनंदी करावे ,कष्टाची भाकर खाऊन राहावे ,एका हरिसी धरुनी"या ओवीतही सद्गुरूंनी बोध दिलेला आणि तोही जसा कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली व जगण्यातील मर्म सांगितले तेच सर्वात सोपे करून सद्गुरू आपल्या सत्संगातून सर्वाना बोध करतात ,की षड्रिपूच्या पार जाण्यासाठी सर्व काही सद्गुरू घडवून आणतात हे सत्य जाणले तर मग आनंदी राहणे सोपे होते व आपोआप आपणसुद्धा सद्गुरूना अपेक्षित तसे वागायला लागतो , त्यासाठीच सद्गुरूंनी सांगितलेली त्रिसूत्री आपण आपल्या मनावर बिंबवायला हवी.

नित्यपाठ ओवी क्रमांक ९२ आहे " तुम्हा उद्धरण्यात मला आनंद ,तुमच्या कल्याणाचाच मला छंद ,तुमचे तोडोनी सर्व बंध ,माझ्यात तुम्हा मेळविन मी " या ओवीतून सद्गुरू साधकांना स्पष्ट सांगतात की अरे मुलांनो ,सद्गुरू यांना आनंद कधी मिळतो तर जेव्हा त्यांचे साधक सर्व बंध तोडून स्वतःमधील सदगुरु तत्वाला जाणायला शिकतील तेव्हा आपोआप श्री सद्गुरूंना अपेक्षित त्यांच्या स्वतःमध्ये साधकांना मेळवायची इच्छा म्हणजे प्रत्येक साधक भगवंत स्वरूप व सद्गुरू स्वरूप होण्याची इच्छा पूर्ण होईल आणि हाच असेल श्री सद्गुरू काकामहाराज यांना मिळालेला सर्वोच्च आनंद.

नित्यपाठ ओव्या व श्री सद्गुरू काकामहाराज यांनी जे विचार माझ्या मनात परावर्तित केले ,त्यांच्याच इच्छेने हा निबंध लिहिला गेला ,जे काही न्यून असेल त्याचा दोष निव्वळ माझ्या विचारातील मळभ असेल ,बाकी सद्गुरू यांनी बोध केलेल्या विचारात व विचार लिहिण्यात काही चूक झाली असल्यास सर्वांनी क्षमा करावी व श्री सद्गुरूंनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

जय साईराम ,शिवस्वरूप सद्गुरू श्री काकामहाराज की जय ,उमास्वरूप सौ काकुमाऊली की जय,संतश्रेष्ठ श्री गडबोले महाराज की जय.

-निलेश जोशी