Saturday, February 24, 2018

गुलाबजाम -परीक्षण

गुलाबजाम

राधाच्या मेसच्या डब्यातील गुलाबजाम जेंव्हा आदित्य पाहिल्यादा तोंडात टाकल्यावर  डोळे मिटून लहानपणी आईने चारलेला घास आठवत राहतो तिथेच हा सिनेमा ओढ लावतो चविष्ट खायला आणि खिलवायला आवडणाऱ्या सर्वांनी बघावा असा चित्रपट अस एका वाक्यात परीक्षण करणंच योग्य होत खरतर .पण हा चित्रपट आहेच इतका रसाळ की परीक्षण नको शब्दांतुन व्यक्त होणे म्हणूया हवे तर.. असो

आदित्य लंडन फ्लाईट मधून उतरून आपले पॅशन जपायला पुण्याला आलाय,त्याचा पुण्यापर्यंत रेल्वे प्रवास .मित्राच्या रूमवर राहायला आल्यावर सर्वाना मासे खिलवणे व मराठमोळा स्वयंपाक शिकवायला कोण गुरू आहे का याचा शोध घेतानाच राधा आगरकर यांचा डबा खाऊन याच माझ्या गुरू असा जिद्दीला पेटणारा आदित्य
हयातील बरेच प्रसंग आपण ट्रेलर मध्ये बघितले आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने साकारलेली बुच्चन राधा आगरकर मस्तच ,फणसासारखी
शिष्य व्हायला सगळी कामे करावी लागतील असे म्हणणे. "पोपट, गाढवा लवकर कामे करा" आणि "पोपट कधी गाढव असतो का?"  तसेच आदित्य शिष्य होऊन कामे करतोय व
राधाचे संवाद "आवरा" ओठावर हसू आणणारे.
हळू हळू गंभीर होणारा चित्रपट व त्यानंतर उलगडत जाणारी व्यक्तिमत्वे.
            तुझं वय किती आहे?त्याचा प्रश्न.
तुझं किती आहे वय?तिचा प्रतिप्रश्न...माझं होय माझं सत्तावीस, मग ती म्हणते- मग माझंही असेल की तेवढंच,या संवादानानंतर आदित्यच राधाकडे भांबावून बघणे म्हणजे आपल्याही मनातील घालमेलीच चित्रण होतंय असं वाटायला लागण्याजोग..
मुलींना कायम वय विचारलं जात आणि ९९% मुली आपलं वय विचारलं की चेहेऱ्यावर जे भाव आणतात अगदी तसेच भाव राधाच्याही चेहेऱ्यावर पण ती नेमकं वय का सांगत नाही याचं कारण मात्र त्या ९९% मुलींसारखं नाहीच ते वेगळं आहे.काय आहे हे सिनेमा बघून अनुभवणं हे जास्त चांगलं होईल.
        गुलाबजाम,हा चित्रपट पाककलेच्या पुस्तकावर पडत जाणाऱ्या शीर्षक नामावलीपासून आपलं वेगळेपण जपत जातो.हळुवार उलघड जातो.
एक्कलकोंड्या आणि स्वतःच्या ध्येयाच्या विश्वात गुंग असणाऱ्या माणसांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायला जितीजागती माणसंच लागतात अस काही नाही.
आदित्य मासळीबरोबर बोलतो,शेंगदाण्याचे कूट करण्यापूर्वी टरफले काढता ,काढता शेंगदाण्यांबरोबर बोलतो.तेंव्हा त्याच्याबद्दल,त्याच्या स्वभावाबद्दलचे एक एक कंगोरे आपल्याला माहीत होतं जातात.
     राधा आणि आदित्य या प्रमुख व्यक्तीरेखांसोबत आपण गुलाबजाम चा रसास्वाद घेत जातो.पाककला हा मुख्य विषय...
जगातील सर्वात आवडती भावना काय तर भूक.
स्वयंपाक ही कला चिरंतन आहे असे संवादांचे स्वगत.

पदार्थ बघून भूक चाळविली जाते आणि समोर उत्तम संवाद व चलचित्र व सर्वोत्तम अभिनय यात आपण गुंतत जातो.
     आठवणी नाहीत म्हणून रडू येत नाहीत,पण तू  का रडतोयस अस राधा, आदित्य ला विचारतेय की आपल्याला अस वाटणारे आणि हळवं करणारे प्रसंग..संवादही कधी खमंग फोडणी दिल्यासारखे आणि कधी साखरपेरणी म्हणजे काय असते हे जाणवून देणारे तर कधी एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याला आवडता पदार्थ करीत असताना चेहेऱ्यावर जे कोणत्याही व्याख्येत बसणार हासू असत ना तस अगदी तसच हासू आणणारे संवाद.

देवाने माझ्याकडून फार मोठी किंमत चुकवून मला आठवणीतून मुक्त केलं आहे हे ऐकल्यावर आपल्याला आठवणी आहेत म्हणून आनंदी व्हायचं की त्या बोचतात म्हणून हळवं काही कळत नाहीच.
     आजारपणातही आदित्यने केलेला स्वयंपाक चाखून राधाने दिलेल्या टिप्स पाहून मजा येते.काही स्वागत संवाद तर निव्वळ quote प्रकारचे आहेत.

काही प्रसंग एवढे सही आहेत जसे vfx माध्यमातून गल्लीच्या भिंतीवरील रेसिपी,
मूळ कथेला कलाटणी देणारा अपघात व त्याचवेळी पार्श्व्वसंगीताला वाजणारी सनई मनाला चटका लावणारी,
वदनी कवळ घेता हे बॅकग्राउंड गीत,
भूतकाळ समोर आल्यावर राधाची होणारी चिडचिड व त्रागा,
लॅपटॉप टाकल्यावर आदित्यचा पॉसिटीव्ह दृष्टिकोन , आदित्यने मी लंडनला गेल्यावर तुझे काय होईल म्हणून केलेला धाडसी प्रयत्न , क्रिएटिव्हिटी आणि उद्यमशीलतेतून उभारलेला युनिक बिजनेस, दिवाळीतील प्रसंग-----निव्वळ लाजबाब व यासाठी सचिन कुंडलकर यास 100 पैकी 100 गुण.

तेव्हा सर्वानी नक्की बघा व अनुभवा --गुलाबजाम.
--निलेश जोशी
       

Friday, February 9, 2018

हास्य टेन्शन फ्री

हसलात ना ? हसलात ना?
हसा हसा मनसोक्त हसा
आमच्यावर लोकशाही पद्धतीने
निर्णय घेणारात तुम्ही
त्यामुळे थोडा विरंगुळा हवाच
6 तासात निदान 5 तास तरी
हसायलाच हवंय
कारण शेवटी जनता कुठे आहे?
मतदान केले निवडून दिले
"दान" दिले ते दिले
त्याच्याकडून अपेक्षा नसते ठेवायची
ही भारतीय संस्कृती जपतोय आपण
तंतोतंत अगदी मनापासून

हसून हसून शेरेबाजी करून
वेळ उरला तर तुमचे ते
बिल पास करूया ,संमती देऊया
पण यात जनतेचा काय फायदा होणार
त्यापेक्षा विरोधाला विरोध कसा करता
येईल यांवरच डोळा ठेवूया

मी हसणार मग इतर त्याला उपमा देणार
कोणीतरी आगीत तेल ओतायला
रामानंद सागरकृत व्हिडीओ टाकणार
त्या व्हिडिओत शुर्पणका असंणार
त्यावरून राजकारण तापणार
विरोध निषेध संसद बंद

आमच्या निषेधाला संपाला मात्र
बेकायदेशीर ठरवणे तुमच्या हातात
आणि तुमचा गोंधळ फक्त आम्ही
बघायचा मोबाईलवर साईटवर
त्याला नवे ठेवणारे आम्ही कोण
आम्ही मतदार लोकशाहीचा पाया
पायाच्या पाया पडायचं आहे 2019
तोपर्यंत आहे दीड वर्ष हातात
तोपर्यंत मनमुराद हसून घेऊया
जोक करूया जगाला आदर्श ठेवूया
जगातील मोठ्या लोकशाहीची संसद
कशी असावी याचा वस्तुपाठ घालूया

पक्ष कोणीही असो सत्तेत असो
वा विरोधी बाकावर असो
काय फरक पडतो
इतके काय मनाला लावून घेता लेको
काम करा कर भरा जीवनाचा आनंद घ्या
फिल्म्स बघा ,व्हाट्सअप फेसबुक आहेच
सण आहेत समारंभ आहेत जल्लोष करा
तुम्ही मजा करा आम्ही मजा करतो
आपले संरक्षण करायला सीमेवर सैनिक आहेत
आणि वेळोवेळी त्यांना शाबासकी द्यायला
15 ऑगस्ट 26 जानेवारी आहे
सर्व सेट आहे मित्रानो सर्व सेट आहे
फक्त तुम्ही रोजचे जीवन रडत खडत जगा
आम्ही तुमच्यासाठीच संसदेत निर्णय घेतोय
फक्त एकच विनंती तुम्ही मजा करताय ना
आम्हालाही हसू द्या आम्हालाही हसू द्या
              -- निलेश जोशी