Friday, October 20, 2023

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान १

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 
#कोकण_संस्कृती #नवे_करणे

भाताचं नवे करायची परंपरा !!

(ही संपूर्ण पोस्ट Vinayak Bhagwat  यांची असून भारतीय संस्कृती व विज्ञान या सदरात पुन्हा देत आहे)

           कोकणात साधारण नवरात्रोत्सवाच्या आसपास भातशेतीत भाताची केसरं तयार होतात. शेतात कष्ट करून पिकवलेल हे धान्य असच वाटेल तेव्हा खाण्यास सुरु करत नाहीत तर ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने सोहळा करून ग्रहण करण्यास सुरुवात करतात.  यालाच 'नवे करणे' म्हणतात. हे नवं करण्याचे दिवसही घरा घरातुन ठरलेले असतात. काही ठिकाणी बसता घट म्हणजे घटस्थापनेला करतात काही ठिकाणी उठता घट म्हणजे दसऱ्याला (किंवा नवमीला) करतात. बहुतांशी नवान्न पौर्णिमेला करतात.  नवान्न पोर्णिमा म्हणजे कोजागिरी पोर्णिमा. काही ठिकाणी चंपाषष्ठी ला नवं करतात, कारण तोपर्यंत भात शेती पूर्णपणे तयार झालेलीे असते. 
           भात कापणीला आल्यावर सुरुवात करण्यापूर्वी पहीले पाच आवे कापून घरी आणायचे, ते केळीच्या पानावर ठेवून त्यांची केसरं काढायची (लोंब्या). त्याची पूजा करून हळदीकुंकू वाहून हे नवीन धान्य प्रथम देवाला वाहतात. मग या लोंब्या व याच शेतात उगवलेली रानफुले व मांगल्याच प्रतीक असणाऱ्या  आंब्याची पाने एकत्र बांधून ते  देव्हारा, धान्य ठेवण्याची कणगी, कोठीची जागा, इतकच काय पण ताक करायचा खुंटा व शिंके, हे धान्य (भात) मिळवण्यासाठी जे जे वापरलं तिथे म्हणजे नांगर जु वगैरे, पूर्वी धान्य कांडण्यासाठी मुसळ वापरीत म्हणून त्याला, भात भरडायची घिरट, जाते, घडवंची ई. ठिकाणी बांधतात.  काही लोंब्या हातांत सोलून किंवा पाटावर एखाद्या नळीने भरडून तांदूळ बाहेर काढायचे त्या ताज्या तांदळाची (बाकीच्या तांदळात घालून) खीर व भात करायचा त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आधी ज्यांच्यामुळे हे उत्पादित झाले त्या गायी गुरांना, जोताच्या बैल/ रेड्याना घास (नैवेद्य) द्यायचा आणि मग सहभोजन करायचे. नवे दाणे थोडेच असले तरी मग संपूर्ण जेवणच नवं होऊन जातं ही परंपरेची किमया. 
             काही लोंब्या, रानफुल व आंब्याची पानं बांधून "तोरण" करून मुख्य दरवाजावर बांधलं जातं. हे दारात दिसलं की कळतं या घरात नवं करून झालयं. कारण काही जुनी माणसं अजूनही ज्या घरात नवं केलं नाही त्या घरात जेवत नाहीत, देवाला आणि ज्यापासून हे मिळालं त्या वस्तुंना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही हा नियम. आता हे कमी होत चाललंय.. फार कशाला माझी  पण नजर या काळात दारावर नवं बांधलंय का हे बघतेच. हे तोरण खूप दिवस दरवाज्यावर टिकाव त्यातील भाताचे गोटे पडून जाऊ नये म्हणून ते बांबूच्या काठीत बांधूनही दारावर अडकवतात, आणि अशी दारं हे घर शेतकऱ्यांचं आहे, तुमच्या अन्नदात्याच आहे हे सांगत मानानं मिरवत उभी राहतात. कृतज्ञतेचा खरा अर्थ जाणून तो कृतीत उतरवणारी अशी ही आपली संस्कृती एकदा जाणून घेतली मग टाकावी म्हटली तरी टाकवत नाही. 
           हे 'नवं' एवढ्या श्रद्धेने केलं जातं की ज्याची शेती नाही त्याला गावातील इतर शेतकरी या भाताच्या लोंब्या व रानफुल नेऊन देतो. आधी देवाला ठेवल्या शिवाय आणि ज्यामुळे आपल्याला हे मिळालं त्या औजाराना, जोताच्या बैल रेड्यांना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही ही त्यामागील भावना.. अशी ही आपली संस्कृती. घरात ठिकठिकाणी बांधण्यामागेही घरीदारी धान्य भरून राहावे हीच भावना. अधिक काय लिहिणे..

©विनायक भागवत

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान २

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

"बारशाच्या वेळी आपण वरवंटा कुंची घालून सजवतो आणि प्रथम तोच कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असे म्हणत पाळण्याच्या वरून खाली 3 वेळा देतो घेतो" या वरवंट्याला काय म्हणतात ?
असे का करतात ?
जाणकारांनी कृपया सांगावे आणि का..?

विज्ञानाला परंपरेची जोड!
कुंची घातलेला वरवंटा त्याला गोपा असे म्हणतात. बाळकृष्ण चे प्रतीक. गोपाळ नाही म्हणत कारण तो दगड अर्थात शिव आहे अशी समज असे.
पूर्वी रेडिमेड पाळणे नव्हते व बाळाला काही धोका होऊ नये म्हणून हा गोपा ठेवून टेस्टिंग करायचे अनोखे तंत्र

गोपा पाळण्यात ठेवायचे कारण म्हणजे वजन टेस्टिंग, आणि प्रथम हा पाळणा आम्ही बाळकृष्ण साठी तयार केला आहे व त्यानेच ह्याची कळजी घ्यावी, येथे वास करावं अथवा आमच्या बाळा सोबत निजावा, रक्षण कराव(टेस्टिंग)

गोप फिरवतात त्याचे कारण म्हणजे, आता सर्वांनी घरी आलेल्या नवीन बाळाला कसे उचलावे, हाताळावे, जपावे हे समजुन घेण्यासाठी. जर १०-१५ पौंड चा गोपा  नीट उचलता आला तर बाळाला सांभाळणे आई,  आजी, आत्या, भावंडं, मामी..यांना सोपे जाईल. (ट्रेनिंग)

अजून एक कारण म्हणजे, हे बाळ आपण सर्वांचे अर्थात पूर्ण कुटुंबाचे आहे ही आपुलकी व्यक्त करणे. नाते जोडणे आणि आशीर्वाद प्राप्त करणे हा सुंदर उद्देश्य होता. 🙏🙏🙏(साभार G Rajesh  )

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ३

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

काल Sunil Kulkarni  यांनी विचारलेला प्रश्न की बारश्यात नाव ठेवायचा मान बाळाच्या आत्यालाच का मिळतो ? यामागे काही कारण असेल का?

कदाचित ही परंपरा चालू झाली त्यामागे काहीतरी पूर्वजांनी सूक्ष्म विचार केला असेलच ना?
माझ्या मनात काही सुचले ते थोडक्यात मांडतोय
1) कदाचित असे असेल की त्या घरातील लेकरू म्हणजे त्या घरातील मुलगी ,जी लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली असेल किंवा नसेल पण आत्या म्हणून तिला हा मान दिला गेला, कदाचित असा विचार असेल की घरातील वंशपरंपरा चालू ठेवण्यासाठी ,त्या घरातील आत्या म्हणजे जीला आजोबा ,पणजोबा,खापरपणजोबा यांची नावे माहिती आहेत आणि वंशवेल पुढे चालू राहिला अश्या अर्थाने तीच नावे(पणजोबाचे नातवाला व पणजीचे नातीला) पुन्हा ठेवायची प्रथा होती.

2) माहेरवाशीण पुन्हा त्या निमित्ताने घरी येईल ,आत्याचा मान म्हटल्यावर तिला तिच्या सासरहून पाठवणारच. जुन्या काळी माहेरी पाठवायचे प्रमाण फारच कमी होते ,हेही एक कारण असू शकेल.

3) जुन्या काळी बालविवाह होत आणि त्यावेळी सुन लहान वयाच्या असायची,मग त्यावेळी ओल्या बाळंतिणीला मैत्रिणीप्रमाणे सर्व काही समजून सांगणारी आत्या आली व तिच्याकडूनच नाव ठेवले गेले की सुनेचे सासुसासरे (आत्याचा मान म्हणून) खुश , बहीण आली व तिने नाव ठेवल्याने नवराही खुश आणि आपोआप नविन बाळाच्या आगमनाने सर्व घर एकत्र यायचे आणि सर्वच खुश. 

4)नवीन पिढीचे आगमन झाले तरीही त्या आत्यालाही मी कोणी वेगळी नाही तर या घराचीच एक घटक आहे हा मानसिक आधार देणारी मुख्य परंपरा म्हणजे बारश्यातील आत्याने नाव ठेवायची परंपरा चालू झाली असावी.

अजून कोणाला काही यावर सुचत असल्यास नक्की सांगा.
- निलेश जोशी

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ४

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान  ४

आज एका समूहावर एका ताईंनी दिव्याच्या पूजेविषयी प्रश्न विचारला ,त्या संदर्भात विचार करताना जे सुचले ते लिहितोय ,काही चुकल्यास माफी असावी.

मी स्वतः सर्वपूजा अभ्यासली आहे ,त्यानुसार जेव्हा मी षोडष-उपचार पूजा हा विधी बघतो त्यावेळी मला माझ्या इंजिनिअरिंग भाषेत ती "चेकशीट" वाटली ,पूजेत पुढे लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत की नाहीत हे बघत पुढे जाणे हे या चेकशीटचे घटक आणि मुख्य काम.हे सर्व खूपच सुंदर पद्धतीने या पूजाविधी मध्ये गुंफले आहे.

आपण एक एक उपचार बघूया

आचमन - अंशतः पाणी बघणे म्हणजे जे पाणी देवाच्या पूजेसाठी वापरणार ते चाखणे,हाताळणे 
त्याचबरोबर आपले हात स्वच्छ करणे व स्वतःकडे उपवस्त्र आहे की नाही हा चेक पॉईंट. तसेच  गुरुचरित्रात सांगितले तसे आचमन केल्यामुळे रोजच्या व्यवहारात पाणी प्यालो तर कधीच ऍसिडिटी होणार नाही. आधुनिक विज्ञानदेखील मान्य करते की आपण कितीही पाणी प्यालो तरीही त्यातील थोडाच अंश रक्तात उतरतो.सावकाश व थोड्या प्रमाणात प्राशन केलेलं पाणी शरीराच्या नसातून रक्तात मिसळते व त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राखायला मदत होते,ज्यामुळे ऍसिटीडी ,रक्तदाब यापासून आपण दूर राहतो. आचमन हे एखाद्या सलाईनसारखेच आहे.आचमन केल्याने शरीरही हलके रहाते.

भूमी आवाहन - आपण बसलोय ती जागा साफ आहे, आसन घेतलय का व ते व्यवस्थित आहे का हा चेक पॉईंट

घंटा ,दीप ,शंख ,कलश पूजा व आवाहन -
या सर्व पुढे लागणाऱ्या गोष्टी बरोबर आहेत का व चालू आहेत का ? घंटा वाजविणे , दीप वाती ज्वलन असणे

गणेश पूजन - या पूजनात श्री गणेशाचे पूजन हा मंगल विचार आहेच पण त्यासोबत मुख्य देवतेला वाहायचा सर्व गोष्टी इथेच चेक केल्या जातात (दूध ,गंध ,हळद कुंकू ,वस्त्र ,जानवे ,पत्री ,फुल ,नैवेद्य , उदबत्ती ,स्थापित दीप व धूप)

हे सर्व झाल्यावर पुढे हे 16 उपचार करायचे मुख्य देवतेसाठी करायचे आहेत, ते 16 उपचार पुढीलप्रमाणे आहेत.

१.आवाहन- मूर्तीमध्ये स्वत: परमात्मा अतिथीरूपाने आला आहे अशा भावनेने देवतेचे स्वागत.

२.आसन- देवतेला बसण्यासाठी आसन 

३.पाद्य-मूर्तीच्या चरणांवर पाणी घालून तिचे पाय धुणे.

४.अर्ध्य-देवतेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पळी वा शंखात गंध,अक्षता ,फुल घालून ते पाणी देवतेला अर्पण करतात.

५.आचमन-देवतेला पिण्यासाठी पाणी मूर्तीच्या मुखाजवळ अर्पण करतात.

६.स्नान व अभिषेक- देवतेवर सतत पाण्याची संततधार अर्पण करणे.

७.वस्त्र-देवतेला कार्पासवस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र अर्पण करणे.

दुसऱ्या प्रकारे विचार केला तर वस्त्र हे कापसाचे का अर्पण करायचे ,ते ही बनवण्याची पद्धत बघा ,कापूस लांब ओढून सुटा करून थोड्या अंतराने मणी बनवून विशिष्ट जागी कुंकू लावून पीळ देणे 
ही वस्त्रमाला खरच एखाद्या मोत्याच्या माळेसारखी दिसते 
म्हणजे जुन्याकाळी लोकांकडे पैसे नव्हते पण अश्या प्रकारच्या गोष्टीतून त्यांनी स्वस्त पण सुबक पर्याय निर्माण केले. 
मग त्यात विविधता आणण्यासाठी गणपतीला वाहायचे सिंदूर लावून पीळ द्या ,महादेवाला भस्म लावून ,देवीला हळद कुंकू लावून अश्या प्रकारे वस्त्रमाला सजवायला चालू झाले. हे कुठल्याही धर्मग्रंथातून आलेले नसेल तर आपल्या पूर्वजचे शोध आहेत .
वस्त्रमाला आपण अर्पण करतो स्नान व पंचामृत अभिषेक झाल्यावर ,कापूस असल्याने मूर्ती ओली झाली असेल तर सर्व पाणी कापसाने शोषले जाईल व मूर्ती भंग होणार नाही .मणी वस्त्रमाला पद्धतीमुळे दिसायला सुबक व कापूस पुंजके तयार होतील म्हणजेच पाणी धरून ठेवायची कापसाची ताकत वाढली.

८.उपवस्त्र-उपरणे किंवा कंचुकी म्हणून अर्पण केले जाते.

९. गंध-सुगंधासाठी देवतेला चंदन लावले जाते.अत्तर लावले जाते.

१०.पुष्प-फुले व पत्री देवाकडे देठ करून अर्पण करणे.निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचाच वापर, नको अती खर्च आणि नको अती चढाओढ, जी सजावट ती नैसर्गिक, उपलबधतेनुसारच आणि सहजजोगे मिळेल असे,आता अनेकजण दारी,परसात झाडे नाहीत असे असतील तर पत्रिसाठी तरी या वनस्पतींची लागवड आजूबाजूला करतील आणि त्याच्यायोगे शुद्ध वातावरण घराच्या आजूबाजूला सदोदित राहते. पत्रीच्या निमित्ताने बागेत, परसात पायपीट होते, पावसात झालेली पडझड लक्षात येते आणि येत्या काळात डागडुजी करणे, शुष्क वनस्पती काढून नवीन लागवड करणे शक्य होईल ही तजवीज असावी.परंतु जे फ्लॅट मध्ये राहतात व ज्यांना खरचं शक्य नाही त्यांनी अती वणवण आणि चिडचिड करून अमुक गोष्ट पाहिजेच असाही अट्टाहास टाळावा.पूजा सामग्री आणणे हा सोहळा व्हायला हवा त्याने अनेकजणांना दुखावून ,रसभंग करून त्यांच्यातील देवाला दुखावणे निषिद्ध असेल आणि देवालाही हे मान्य नसेल.

११.धूप-नैसर्गिक सुगंधी द्रव्याने तयार केलेली उदबत्ती अर्पण करणे. 

१२.दीप-तूपाचे निरांजन देवाला अर्पण करणे व देवतेतील त्जाच्या अंशाला ओवाळणे.

१३.नैवेद्य-लघुनैवेद्य,प्रसाद नैवेद्य व महानैवेद्य असे तीन प्रकार यात येतात.बरं नैवेद्य म्हणून गूळ खोबरे किंवा शेंगदाणे गूळ असतात ,हे काही देवाचा प्रसाद म्हणून घरातील मंडळी विशेषतः लहान मुलेच खातात.म्हणजेच त्यांना पौष्टिक आहार मिळण्याची तजवीज.

१४.प्रदक्षिणा-स्वत:च्या उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे फिरून देवतेला प्रदक्षिणा घालणे.

१५.नमस्कार- देवतेला नमस्कार करणे.

१६.मंत्रपुष्प-पूजेत काही न्यून राहिल्यास त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले देवाला अर्पण करणे.

काय मग? आहे की नाही ही चेकशीट?  आपले पूर्वज खूप हुशार होते व त्यामुळे त्यांनी पंचामृत ,गूळखोबरे सारखे पोंष्टीक घटक आपल्या पूजेत समाविष्ट केले म्हणजे तीर्थ प्रसाद म्हणून ते खाल्ले जातील. आपल्या हिंदू संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला तर अतिशय सूक्ष्म विचार बघायला मिळतो हे सर्वात विशेष.
-निलेश जोशी

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५

देवाकडे दिवा लावताना निरांजन, समई, नंदादीप वगैरेत जोडवात, म्हणजे दोन वाती एकत्र करुन एका ज्योतीत लावावा. (प्रत्येक ज्योतीत 2वाती एकत्र करुन)
यात पंचारत, एकारत, जी आरती करताना वापरतात त्यात, पंचारतमध्ये प्रत्येक ज्योतीत दोन वाती एकत्र करुन लावाव्या. म्हणजे 10वाती - 2वातीची एक जोडी.
दिवाळीच्या उत्सवात येणारे सण, वाढदिवसाच्या दिवशी वगैरे जी ओवाळणी केली जाते, त्या तबकातही निरांजनात दोन ज्योती (दोन -दोन वातींच्या) लावाव्या.

       सर्वप्रथम दिवा का लावला जातो? याचे उत्तर तुम्हाला शोधावे लागेल!
असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥ (बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28)
उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे "असत्य - अंधार - मृत्यु" हे समान स्वभावाचे असतात. याउलट "सत्य - प्रकाश - अमृत" हे सकारात्मक गुणही समान स्वभावाचे असतात.
      तुम्ही असत्य आणि अंधारात जीवन जगत असाल तर मृत्युकडे तुमची वाटचाल होत असते. आणि तुम्ही जर सत्य आणि प्रकाशात जीवन व्यतीत करणार तर अमृत पदाकडे तुमची वाटचाल होत असते.
म्हणून येथे "अज्ञानाचा अंधकार" घलविण्यासाठी आपल्या जीवनात "ज्ञानाचा प्रकाश" आपल्याला निर्माण करावा लागतो. तरच अमृतपद आपले होते, अन्यथा नाही.ज्याप्रमाणे ज्योतिचा प्रकाश हा भौतिक अंधाराला दूर सारून तेथे भौतिक जगताविषयी ज्ञान उत्पन्न करते - त्याच प्रमाणे "सत्याचा प्रकाश" हा मानसिक जगतातील अज्ञान दूर करून अमृतपदाचे ज्ञान आपल्यासाठी उत्पन्न करते. म्हणून ज्योती कडून प्रेरणा घेवून आपण आपल्या मनातील अज्ञान दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी दिवा लावित असतात. त्याकडून प्रेरणा घेण्यासाठी.(आता तुम्हाला किती मोठा दिवा, अन् किती मोठा प्रकाश पाडून किती मोठे ज्ञान निर्माण करायचे हे तुमच्या हातात आहे.)
       निरांजनातील जोडवात म्हणजे २ वाती एकत्र लावण्याची परंपरा आहे. याला जिवाशिवाची जोड, जोडा सलामत राहावा, द्वैताचे ( दोन वातींची ) अद्वैत ( एकच ज्योत ) अशी अनेक कारणे सांगितली जातात.दोन वातींची एक ज्योत आजुबाजुचा सारा अंधार नाहिसा करून टाकते... हे एक सुखी प्रापंचिक जीवनाचं द्योतक आहे. नवरा (पुरूष) आणि बायको (स्त्री) यांनी एकत्र येऊन जीवनातील अनेक समस्यावर मात करून संसार फुलवायचा असतो हेच दिव्यातील वात आपल्याला शिकवित असते.
       विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विचार करता दोन वाती एकत्रित करून लावण्याच वैज्ञानिक कारण काय असावे? दोन वाती एकत्र लावल्यावर त्या वातींमध्ये असणारी सूक्ष्म पोकळी ही एका सूक्ष्म नलिकेचे काम करते. त्या  capillary action मुळे ज्योतीला तेल पुरवठा उत्तम प्रकारे होतो. अन्यथा एकच वात लावणे हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे नाही. 
       येणारा नवरात्रीचा उत्सव, सर्व गोष्टी नीट समजून घेऊन कुठल्याही भीती वा दडपणाशिवाय भक्तिभावाने साजरा करावा.  

II या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: II 

- निलेश जोशी

मराठी अथर्वशीर्ष

मराठी अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥

ऋत मी सत्य मी वदे ॥२॥

करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥

जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥

सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू ॥५॥

तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥

आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥

एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥

एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥

वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥

विराट ! एक अद्भुत , अप्रतिम , विराट खेळी !

विराट !  एक अद्भुत , अप्रतिम , विराट खेळी !

19 Oct 2023
भारत विरुद्ध बांगलादेश

बांगलादेश टॉस जिंकून फलंदाजी घेतो आणि 50 षटकात 256 धावा करतो.
रोहित आणि गील सोबत धावांचा लिलया पाठलाग करण्याचे असामान्य कौशल्य विराट कडेच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
    रोहित आउट झाल्यावर विराट खेळायला आला तेच 2 धावा घेऊन नंतर लागोपाठ 2 नो बॉलमुळे चौकार,षटकार मारत 3 चेंडूत 13 धावावर पोचला. शेवटी श्रेयस आउट झाल्यावर राहुल खेळायला आला तेव्हा  बांगलादेश विरुद्ध जिंकण्यासाठी धावा पाहिजे होत्या 26 आणि विराटचे शतक होण्यासाठी हव्या होत्या 26 !        
प्रचंड संयम , धिरोदात्तपणा व करारी आक्रमण करीत विराटने ते सहज साध्य केले.यासाठी प्रचंड फॉर्ममध्ये असणाऱ्या के एल राहुल ने कमालीचा संयम ठेवून आणि विराट कोहली एक धाव घेत असताना त्याला एक धाव घेऊ नकोस म्हणून थांबविणारा , विराटच्या दोन धावा व्हाव्यात आणि तो स्ट्राईकवर रहावा यासाठी स्वतः धोका पत्करून जीवाच्या आकांताने पळणारा राहूल भारतीयत्व दाखवित होता. सहकाऱ्याचा सन्मान व संघभावना ( टीमवर्क ) कशाला म्हणतात हे त्याने जगाला दाखवून दिले.
    आज अनेकजण विराट विरुद्ध शतक करण्याचा आटापिटा केला असे मीडिया सारखे बोलत आहेत. मोदीनी काहीही केले तरीपण चुकीचेच हे मीडियाचे नरेटीव जसे मीडिया सेट करते तसेच अनेकांच्या पोस्टमध्ये दिसते. विराटने शतक करण्यासाठी काहीही आटापिटा केलेला नाही. संघाला आणि स्वत:च्या शतकाला सारखे रन हवे असतील तर कोणताही फलंदाज दोन्ही पूर्ण करायचा प्रयत्न करेलच ना? Running between wickets उत्तम घेऊन, शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन strike स्वतःकडे ठेवली. एक रनसाठी जर विराटने राहुलला एक ओव्हर टूकुटुकु खेळून काढायला लावली असती तर तो शतकासाठी आटापिटा करतोय असे म्हटले असते,पण रनरेट कमी न करता उलट त्याला गती देत पुढच्या ओव्हर मध्ये strike घेऊन शानदार षटकार ठोकून शतक करणे यालाही धाडस हवे ना ?या शतकाने तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून अजून फक्त एक शतक दूर आहे, उलट wide टाकायचा प्रयत्न करून बांगलादेश बॉलरने मनाचा कोतेपणा दाखवला. विराट कोहली व संपूर्ण भारतीय टीम एकजूट होऊन खेळत आहेत ,आपापसातील हेवेदावे आता दिसत नाहीत आणि हेच या संघाचे यश आहे.आता हे काहीजणांना आणि देशद्रोही विचाराना बघवत नाहीये यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पण भारतीय टीम आणि सर्वच फलंदाज यांना भरपूर शुभेच्छा, विराट कोहलीने या विश्वचषकात सचिनचा विक्रम मोडून ३-४ शतक अजून करावेत हीच सदिच्छा.
- निलेश जोशी

Wednesday, October 4, 2023

युपीआय पेमेंटला अनेकजण जीपे किंवा फोनपे का म्हणतात?

#अर्थिक_साक्षरता 

युपीआय पेमेंटला अनेकजण जीपे किंवा फोनपे का म्हणतात? 
यूपीआय पेमेंट की भारत सरकारने दिलेली सुविधा खरच अनोखी आहे , आज जगात अनेक देश ही सुविधा आपल्या देशात चालू करावी यासाठी भारत सरकारला विनंती करत आहेत.यामुळे करस्वरूपात जमां झालेली रक्कम सरकारला मिळतेच त्यासोबत व्यवहारात पारदर्शकता येते, आणि यासाठीच ही सुविधा अनेक देशांना हवी आहे.
      भारतात मात्र पेमेंट करायचे असल्यास मला जीपे कर , फोनपे कर, पेटीएम कर असे सर्रास म्हटले जाते ,यात आपले अज्ञान आहेच पण जाहिरातीमुळे हे शब्द म्हणजेच UPI पेमेंट असा अनेकांचा गैरसमज होतो.जसे ग्लूसाठी फेविकॉल आणि टूथपेस्ट साठी कोलगेट , कोपियर मशिनला झेरॉक्स शब्द प्रचलित झाला तसाच हा प्रकार आहे.त्यामुळे यापुढे जिपे किंवा फोनपे न म्हणता UPI पेमेंट म्हणुया, आपला upi नंबर शेअर करूया. आता फोनपे व पेटिंएम् प्लॅटफॉर्म फी म्हणून पैसे घ्यायला लागली आहे, भविष्यात गुगल पे देखील हा अतिरिक्त भार ग्राहकाकडून वसूल करायला लागेल.
आता काही मूलभूत प्रश्न 

1)UPI पेमेंटसुविधा भारत सरकारने उभारली तर भारत सरकारचे काही ॲप आहे का? 
   उत्तर हो आहे आणि Bhim ॲप हे भारत सरकारने बनवलेले UPI पेमेंट ॲप आहे, सर्वात सुरक्षित आहे आणि आता तर क्रेडिट कार्ड लिंक करून आपण त्याद्वारे पेमेंट करू शकतो.या ॲपमध्ये आपला बँकेत दिलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन केले की तुमचे upi अकाऊंट बनवले जाते.जनरली तुमचा मोबाईल नंबर@upi असा तुमचा UPI ID बनतो,जो तुम्ही एखाद्याला पेमेंट करण्याआधी शेअर करू शकता.त्याचा QR कोड पण येतो जो तुम्ही स्कॅन करायला सांगू शकता किंवा व्हॉट्सॲप , ईमेल ने पाठवू शकता.तुमचा UPI I'd तुम्हाला हवा असा बनवू शकता.जसे की तुमचे नाव@upi असा आयडी बनवू शकता.सध्या भारत सरकारकडून कोणतेही चार्जेस घेतले जात नाही.

2)जर UPI मुळे बँक to बँक पैसे खात्यात ट्रान्स्फर होत असतील तर प्रत्येक बँकेचे काही असे ॲप असते का? 
  उत्तर हो आहे,प्रत्येक बँकेचे ,अगदी साध्या को-ऑपरेटिव्ह बँकेनेही ऑनलाइन व डिजिटल पेमेंट सुविधा ग्राहकांना मिळावी म्हणून स्वतची UPI सिस्टीम चालू केली आहे.काही बँकेनी स्पॉन्सर बँकेची UPI वापरून हा पर्याय चालू केला आहे. भारतात  UPI पेमेंट करणाऱ्या बँका ज्या स्वतःसोबत इतर अनेक बँकेना स्पॉन्सर करतात त्या मुख्यत्वे १० बँक आहेत ,ज्यात HDFC bank, UCO bank, BANK OF BARODA, ICICI BANK, United Bank of India,SBI, bank of Maharashtra, Dena Bank, PNB bank, IDBI,GKSB या सर्वांची नावे येतात.

3) एखाद्याला आपल्याला पैसे पाठवायचे असल्यास काय करावे?
    आपल्या बँकेत जो मोबाईल नंबर दिला आहे ,तो चालू हवा, BHIM ॲप किंवा कोणतेही upi ॲप उघडून (ज्यात बँक UPI किंवा प्रायव्हेट upi जसे जीपे किंवा फोंनपे, पेटीएम)त्यात आपल्या या मोबाईल नंबर रजिस्टर करा व  OTP टाकल्यावर रजिस्टर होईल, काही ठिकाणी तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख ,बँक अकाऊंट नंबर व त्याचा प्रकार जसे बचत खाते किंवा चालू खाते असे विचारले जाईल ,माहिती भरून रजिस्टर करा.त्यांनंतर लॉगिन करा.

4) एखाद्याला पेमेंट करायचे असल्यास काय करावे?
ज्याला पेमेंट करायचे त्याचा UPI  ID विचारून तो आपल्या बँकेच्या ॲप किंवा upi पेमेंट ॲप मध्ये टाका , send money म्हटले की किती रुपये व ज्याला ट्रान्स्फर करायचे त्याचा UPI ID अणि नाव दिसेल , ते त्या व्यक्तीशी कन्फर्म करूनच पेमेंट करावे. व्यक्ती समोर असल्यास चांगलेच, पण लांब असल्यास त्याला फोन करून एकदा खात्री करावी.
सर्वात सेफ उपाय .@निलेशजोशी आधी फक्त एक रुपया पाठवावा, तो त्याला मिळाल्याची खात्री करून मगच मग उरलेली रक्कम त्याच नंबरवर पाठवावी,म्हणजे चुकीच्या नंबरवर पेमेंट झाले तरी एक रुपयाच तोटा होईल व आपले इतर पैसे वाचतील.

5) एखाद्याकडून पैसे या असल्यास काय करावे?
रिसिव्ह मनी हा ऑप्शन वापरून त्या UPI id ला money request पाठवावी,समोरच्या व्यक्तीने ok म्हटले की तेवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

6) आपल्याला UPI पेमेंटमधून पैसे हॅक करून घेतले जाऊ शकतात,त्यावर उपाय काय?
मी खालील प्रकारे हा धोका टाळण्यासाठी काळजी घेतो. आपले मुख्य अकाऊंट कोणत्याही UPI पेमेंटला लिंक करू नका.त्या बँकेचा मोबाईल नंबर शक्यतो वेगळा ठेवा.@निलेशजोशी
दुसऱ्या एखाद्या बँकेचा अकाऊंट जिथे.कमी पैसे असतील किंवा CURRENT अकाऊंट असलेल्या बँकेचा लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून upi अकाऊंट बनवा.त्यात(जास्तीत जास्त हजार किंवा दोन हजार) पैसे असतील असेच बघा .जास्त पैसे आल्यास आपल्या मुख्य बँकेत (UPI पेमेंट वापरून तुम्ही बँक अकाऊंट मध्येहिं पैसे ट्रान्स्फर करू शकता) ट्रान्स्फर करा. अगदी हॅकर्स तुमच्या UPI अकाऊंट पर्यंत पोचले तरीही अमाऊंट अगदी कमी बघून मेहनत घेत नाहीत.अगदी हॅक झालेच तरीही कमीत कमी नुकसान होईल असे पाहा.
- @निलेशजोशी

Friday, September 15, 2023

ये इंडिया है बॉस

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 
क्या उखाड लेगा?

सातआठ धर्म एकत्र तरी धर्मनिरपेक्ष म्हणून  थाप मारणार

अल्पसंख्येच्या नावाखाली एखाद्यालाच झुकते माप देणार

एखाद्याच्या यात्रेला वारेमाप सवलती आणि पैसा पुरवणार

गरीब वारकरयाला वर्षोंवर्ष व दिनरात उपेक्षितच ठेवणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

सैनिक भरती कमी का होते यासाठी बैठक बोलवणार

त्या बैठकीचे बिलात हजारो-लाखोंचा भ्रष्टाचार होणार

सैनिकभरतीमध्ये नेत्यांचा मुलगा नसावा हे कटाक्षाने पाळणार

वर सैनिक,पोलिस असतातच मरण्यासाठीच, निर्लज्ज मंत्री बोलणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

बॉम्बस्फोट दंगलीत मेलेल्याना पैसे जाहीर करून गाजर दाखवणार

मदतीतील नातेवाईकांना पाच पाच वर्षे  काहीच नाही मिळणार

दंगलग्रस्तांना दाखाविलेले नोकरीचे आमिष मुख्यमंत्री विसरणार

मदतीच्या बर्फाचा गोळा हातात येइपर्यंत पळीभर पाणी होणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला मुलाना उन्हात वेठिला धरणार

नेत्यांना प्यायला बाटल्या,मुलांना घोटभर पाणी नाही मिळणार

उपदेशात तुम्हीच भावी भारत अशी मोठठी वाकये ऐकवणार

मुलेही आपले भविष्य उपेक्षित आहे हे तेथेच समजुन घेणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

इतर देशात कर किती जास्त तुम्हालाच कमी हे ऐकवणार

आपल्या सोयीसाठी लोकसंख्येतला फरक नाहीच सांगणार

सुरु केलेल्या किती सोयीसुविधा चालु हे कोणीच नाही बघणार

त्या चालुच दाखवून त्याचा पैसा चालूलोक आपल्या तिजोरीत ठेवणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

नागरीकांचा वेळ शुल्लक,त्यांना रस्त्यावर अडवून ठेवणार

मंत्री देवापेक्षा व्यस्त त्यांना दुतर्फा रस्ता मोकळा करून देणार

"रूग्णवाहिकेतच मृत" बापाचा मुलगा डेथ सर्टिफिकेटसाठी पैसे चारणार

मंत्री मात्र हेलिकॉप्टर येइपर्यन्त विश्रामगृहात झोप काढणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

माजी आमदार पेन्शन बिल सभागृहात लगेच मंजूर होणार

सभागृहात जनतेच्या फायद्याचे कायदे मंजूर होवुच नाही देणार 

कर्तव्यदक्ष अधिकारयांना बडतर्फ केल्याचा कागद दिला जाणार

"सामान्य जन"भारत निर्माणची जाहीरात कौतुकाने बघणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 
क्या उखाड लेगा?

--- निलेश जोशी

अध्यात्म - गझल

ओठांनी “हो” म्हणणे हवे कशाला
जर तुझा होकार डोळ्यात आहे

भांडलो जरी आपण नेहमीचे
माझी काळजी तुझ्या शब्दात आहे

कशाला चिंता सर्व क्लेशतापाची
त्या जाळण्याची ताकत जपात आहे

जाणून घेऊ माझे चुकले कोठे
त्यासाठीच आत डोकावणे आहे

हे सहा शत्रू परास्त करण्यास
हे मानवा ही शक्ती तुझ्यात आहे

आजचे काम उद्यावरी टाळतो
याचाच शेवट हारण्यात आहे

दोन पावले चालू दर दिवशी
अंती फलित ध्येय पूर्तीत आहे

का अट्टाहास सर्व मलाच हवे
खरे समाधान लोकां देण्यात आहे

सत्य सांग साखरेत घोळवून
लोकांना सवय कॅप्सूलची आहे

"मी" एवढा निर्ढावलो आता
मी बरोबर खोट इतरात आहे

ओळखपत्रे फोटोसहित माझ्या
फोटोत "मी" फक्त बाह्यरूप आहे

नाहीसे करण्या अवघी ही चिंता
फक्त सामर्थ्य पांडुरंगात आहे
              
               ----निलेश जोशी





लिंबूसरबत व आयुष्य

#निलउवाच

लिंबूसरबत व आयुष्य
         लहानपणीची गोष्ट आहे, एक दिवस मी लिंबूसरबत तयार करत होतो. तयार करताना मी आवश्यकतेपेक्षा पाचपट अधिक लिंबाचा रस घातला. सरबत एकदम आंबट बनले की एक थेंबही कुणी घेऊ शकले नसते. आता, मला ते कसेही करून नीट करावे लागेल. माझी इच्छा होती की मी पाण्यातून अतिरिक्त लिंबाचा रस काढावा परंतु काही गोष्टी एकदा झाल्या की कधीही पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत. पाण्यातून लिंबाचा रस काढून टाकण्याचा कोणताही मार्ग नाही. मग उपाय  काय? आधीपासून मीच आंबट बनवलेल्या सरबतात अजून चार ग्लास पाणी घालणे हाच एकमेव मार्ग होता. 
     आता जर आपण आयुष्याबद्दल विचार केला तर तेच आहे. कधीकधी आपण अशा गोष्टी करतो ज्या पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत. काही चुकीचे निर्णय, चुकीची निवड, चुकीचे काम, चुकीच्या कृती कधीही पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत. मग उपाय काय? जेव्हा आपण गोष्टी पूर्ववत करू शकत नाही आणि जे घडले त्यामध्ये सुधारणा करू शकत नाही, तेव्हा आपण त्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नये. हे म्हणजे लिंबाचा रस सरबतातून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यासारखेच असेल. त्याऐवजी, जर गोष्टी चुकीच्या झाल्या आणि त्या पूर्ववत केल्या गेल्या नाहीत किंवा करणे शक्य नाही तर आपण आपल्या जीवनात अशा बर्‍याच चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे जोडण्यात व्यस्त असले पाहिजे. आपल्या सर्वांकडेच नकारात्मक बाजू आहेत आणि कदाचित आपण आपल्या सर्व नकारात्मक गोष्टी सुधारण्यास सक्षम होऊ शकत नाही परंतु आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार, कृती, लोक जोडणे आणि नकारात्मकता सौम्य करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण सर्वजण आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी ओलांडत, पार करत गेलो आहोत आणि आपण ते बदलू शकत नाही पण जर आपण आपल्या जीवनात नवीन व चांगल्या गुणांची भर घातली तर आपण आपला वाईटपणा फिका किंवा कमी तीव्र करू शकू. नाही का? आपल्या सर्वांच्या आयुष्यात चुका झाल्या आणि कडू आठवणी आहेत पण आपण आता नवीन आठवणी बनविण्यात आणि जोडण्यात व्यस्त होऊ शकतो. आपण बर्‍याच चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आजच्या जीवनाला अधिक सकारात्मक बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरुन भूतकाळात घडलेल्या किंवा घडलेल्या वाईट गोष्टींना आपण निष्प्रभ करू शकू.
     सहज सुचलं ते लिहिलं, गोड मानून घ्या.
---- निलेश जोशी

स्वातंत्र्यदिन बेगडी प्रेम -कविता

वर्षभर देशप्रगतीला मी नावे ठेवणार आहे,
स्वातंत्र्यदिनी दिसणारे बेगडी देशप्रेम आहे.

टोकियोत अनेक पदके मिळाली भारताला,
विरोधाला विरोध, काही पंतप्रधानाना कोसत आहे.

वर्षोवर्षं एक नावात गुंडाळल्या पुरस्कार,योजना
योग्य खेळाडूच्या नावालाही लोकांचा विरोध आहे

विचारांची बैठक माझी बहकावतो कोणीतरी
सांगेल तेच बोलण्यात मी जीभ दवडतो आहे

गाव,तालुका,जिल्हा कामांसाठी जर राजा कुचकामी
त्याचे उत्तर माझे कच्चे नागरिकशास्त्र आहे

जिथे मते मागताना युती करून लाचार नेते  
हा तर मतदारांचा केलेला विश्वासघात आहे 

कोरोनाने दाखविले किती नेते धावले मदतीला
मतदारांचे राज्य अशी नावालाच लोकशाही आहे 

आता जेव्हा येतील आश्वासने घेऊनि हे नेते
प्रत्येकाने जाब विचारावा हे माझे निवेदन आहे

शेवटी आम्ही काय देणार शिक्षा या गद्दारांना
देणारा भगवंत रामराया मोठा न्यायाधीश आहे

रेस - चूक की बरोबर

#निलउवाच
        डिसेंबर २०१२-स्थान -बुर्लाडा स्पेन
केनियाचा धावपटू आबेल मुताई शेवटच्या रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु त्याने या शर्यतीची पुर्तता केली असा विचार करून सिग्नल बघून गोंधळून गेला आणि थांबला. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे हे लक्षात येताच त्याने आबेलला ओरडून सावध करू केले. मुताईंना स्पॅनिश येत नव्हते आणि त्यांना समजले नाही. काय घडत आहे हे लक्षात घेत फर्नांडीझने मुताईला विजयासाठी ढकलले.आबेल मुताई रेसमध्ये विजयी झाला.
          नंतर एका पत्रकाराने इवानला विचारले, "तुम्ही असे का केले?" इवानने उत्तर दिले, "माझे एक स्वप्न आहे की एक दिवस असा यायला हवा जेव्हा आपण सर्वजण एक होऊन एक समुदाय बनून एकमेकांशी स्पर्धा न करता सहजीवन जगू शकतो, जिथे आपण एकमेकांना जगण्यासाठी व जिंकण्यासाठीच मदत करतो"
       पत्रकाराने आग्रह धरला "पण आपण राष्ट्रप्रेम नाही दाखवले, स्पेनऐवजी केनियाला का जिंकू दिले?" इव्हानने उत्तर दिले, "मी त्याला जिंकू दिले नाही, तो जिंकणारच होता. शर्यत त्याची होती." पत्रकाराने आग्रह धरला आणि पुन्हा विचारले, "पण आपण जिंकू शकले असते!" इवानने त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले, "पण माझ्या विजयाची योग्यता काय असेल? त्या पदकाचा सन्मान काय असेल? माझ्या आईला त्याबद्दल काय वाटले असते?"
        पिढ्यानपिढ्या मूल्ये पुढे जात आहेत.आपण आपल्या मुलांना कोणती मूल्ये शिकवित आहोत?आपण आपल्या मुलांना जिंकण्यासाठी चुकीचे मार्ग शिकवू नका. त्याऐवजी आपण इतरांना ,एकमेकांना मदत करणारे बना, मनाचे सौंदर्य वाढविणारे आणि सर्व जगणे मानवतेकडे घेऊन जाणारे होऊया. कारण प्रामाणिकपणा आणि नीतिशास्त्र हेच खरे जिंकणे आहे..!

सर्वाना एक छोटासा प्रश्न , आपण या रेसमध्ये इव्हानंच्या जागी असते तर काय केले असते?
🌹🌹🌹🌹🌹🌹

महानतेची प्रेरणादायक कहाणी

ही प्रेरणादायक कहाणी तुम्हाला आयुष्य जगण्यास, वेळ सार्थकी घालवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात  प्रगती कशी करायची हे शिकवेल. 

    एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, "बाबा, महान या शब्दाचा अर्थ काय आहे, मी हा शब्द बऱ्याच ठिकाणी वाचला आहे जसे की ती व्यक्ती महान होती, त्याने हे केले, त्याने हे केले. महान म्हणजे काय हे मला समजावून सांगा. आणि ते महान कसे होतात?"

वडील म्हणाले, "ठीक आहे" - वडिलांनी मुलाला महान शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी एक प्रश्न विचारला - ते मुलाला म्हणाले, "चला आपण 2 झाडे आणूया, एक घरात आणि दुसर्‍याला घराच्या बाहेर ठेवू." झाडे लावल्यानंतर, वडील म्हणतात की मुला, या दोन वनस्पतींपैकी कोणते झाड वाढेल व सुरक्षित राहील काय?   मुलगा म्हणाला, "बाबा, हेही काही विचारण्यासारखे आहे का? आपाल्या घराच्या आत असलेली वनस्पती सुरक्षित आहे, ती वाढेल, परंतु बाहेरील वनस्पती मुळीच सुरक्षित नाही, त्याला बर्‍याच त्रासांना सामोरे जावे लागेल." वडील म्हणाले ,"आपण वाट बघुया, आपल्याला काही वर्षांनी उत्तर मिळेलच."          मुलगा कित्येक वर्ष अभ्यासासाठी बाहेर जातो आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा घरातल्या झाडाकडे बघून तो म्हणतो, "पापा, मी म्हणालो की या झाडाचे काही होणार नाही, ते सुरक्षित होईल." वडील हसत म्हणाले," आधी बाहेरचे झाड तर बघून ये ,आणि मग मला सांग."                    मुलगा बाहेर जाऊन पाहतो तेव्हा तेथे एक फार मोठे झाड असते, हे झाड एवढे मोठे कसे झाला याबद्दल मुलाला विश्वासच बसत नाही, तर घरातले रोप बाहेरच्या झाडापेक्षा 100 पट लहान असते. वडील मुलाला हे समजावून सांगतात. बाहेरच्या वातावरणात हे झाड मोठे बनले कारण प्रत्येक हंगामात हजारो अडचणींना सामोरे जावे लागते.परंतु घराच्या आतमध्ये झाड अतिसुरक्षित राहिले ,त्यामुळे त्याला कोणत्याही हवामानाचा सामना करावा लागला नाही, किंवा त्याला योग्य सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि ते वाढू शकले नाही, वडील म्हणतात ,बाळा हे लक्षात ठेव, या झाडाप्रमाणेच, जगातील फक्त एक माणूस महान बनू शकतो ज्याने हजारो अडचणी सहन केल्या. आपण त्याचा सामना केला आहे आणि जो आपल्या जीवनात एखाद्या घरातील झाडासारखा सुरक्षित असेल असा विचार करतो तो कधीही महान होऊ शकत नाही.

       मित्रांनो, तुम्ही काही कामात अपयशी ठरलात तर तुम्ही दु: खी व्हाल.तुम्हाला अभ्यासात कमी गुण मिळाले किंवा अपयश आले तर तुम्ही दु: खी व्हाल. महान लोक महान होण्याआधी बर्‍याचदा अपयाशी ठरले आहेत, त्यामुळेच चुकातून शिकल्याने ते महान होऊ शकले.आजही व्यवस्थितरित्या आपले कार्य, समजून घेतले की कोणीही आपल्याला महान होण्यापासून रोखू शकत नाही.  

        एक गोष्ट स्वत: ला सांगा - माझ्या मार्गावर कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा, जरी मी तुटलो आणि पडलो तरी मी माझे ध्येय प्राप्त करण्यास सक्षम राहीन, त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरीही. आजपासून अश्या नवीन विचारांनी सुरुवात करूया,आपोआप आपणही आपल्या क्षेत्रात महान होऊच.

---- निलेश जोशी

गणपती येताहेत....

गणपती येताहेत ....

कोकणात पाऊस सुरू होतो ,जणू प्रत्येक रस्ता ,पायवाट धुवून काढायला
जोरदार वारा सर्व वाटेवरील वाळकी पाने दूर सारून स्वच्छ बनवायला

पावसाने हिरवेगार झालेली झाडे,पाने,फुले आणि रानफुलांची आरास
ओढ्यातील ,विहिरीतील पाण्याचा बदलून सुरू होतो नवीन प्रवास

भाताच्या ओंब्या लगडायला लागतात आणि पावसातील भाज्या तयार
सर्व मोठ्यांची लगबग आणि सोबत लहान मुलंही श्रावणसोबत तजेलदार

निसर्ग सज्ज एकदम सर्व कलाकुसर करून प्रत्येक भागात
गणपती येणार म्हणून आनंदी आहे प्रत्येकजण आपापल्या गावात

माझा बाप्पा येणार म्हणून प्रत्येकजण करतोय जय्यत तयारी
गरीबाहूनही गरीब माणूसही मनापासून झटतोय ही गंमत न्यारी

आकाशात ढग काढतात उदबतीच्या धुरासारखी वलय
स्वागत,पूजा,दुर्वा,लाल फुले यांची तयारी करतंय प्रत्येक आलय

सण,समारंभ वर्षभर कदाचित करता आले नसतीलही जोरात
गणपती येतील थाटामाटात आणि गणेशोत्सव होईल जोमात

कोकणातील घराघरात आता विराजमान होतील गणपती
एकच आशा,वर्षभर सोसलेला त्रास दूर करेल हा अधिपती

पखवाज दुरुस्ती आणि पुन्हा एकदा भजनांची तयारी 
प्रत्येक माऊलीची मोदक,करंज्यांची लगबग न्यारी

जरी कमाई कमी,खर्च व्यस्त, संकटेच आली आहेत
तरीही सर्व दुःख ,वेदना दूर करायला,गणपती येताहेत...

झेन कथा - गाडीवाला व त्याचे तत्वज्ञान

झेन कथा

'हे पाहा, गाडी सांभाळून हाक. फार मोठे संन्यासीमहाराज बसणार आहेत
मागे. आत्मनिग्रहासाठी १०८ दिवस पाण्याचा थेंबही न घेता उपोषण करतात
ते. नुसत्या फरशीवर झोपतात, अनवाणी चालतात. फार  मोठी विभूती आहे,'
असं भक्ताने बग्गीवाल्याला सांगितलं.

'बरं बरं, काळजी करू नका,' म्हणून कोचवानाने घोडे जुंपले आणि बग्गी
निघाली. बग्गीच्या संथ चालीनं आणि घोड्यांच्या टापांच्या लयबद्ध
आवाजानं संन्यासी महाराजांचा हलकासा डोळा लागला.

ते ताडकन् जागे झाले तेव्हा कोचवान चाबकाचे सपकारे ओढत होता. त्यांनी
पडदा सारून पाहिलं, तर तो बग्गीवर चाबूक ओढत होता. त्यांनी विचारलं,
काय झालं?

'काही नाही, एका खड्ड्यात चाक फसलंय, गाडी हलतच नाहीये.'

'अरे मग, बग्गीवर चाबूक ओढून ती हलेल का, घोड्यांवर चाबूक ओढायला हवा.'

'असं आहे होय? म्हणजे आतापर्यंत मी तसंच करत होतो. पण, तुमच्याकडे
पाहून वाटलं की ती पद्धत चुकीची असणार…'

हिर्र करून घोड्यांकरवी बग्गी खड्ड्याबाहेर काढल्यावर कोचवान प्रश्नार्थक
मुद्रेने पाहणाऱ्या संन्यासीबुवांना म्हणाला, 'अहो, तुम्ही मन ताब्यात आणण्यासाठी शरीराला कष्टवता ना! ते पाहून मला वाटलं की 
घोड्यांऐवजी बग्गीवर ओढून पाहावा चाबूक!'