Wednesday, March 15, 2017

मराठी अंजन

मराठी माझी भाषा
एकदम जवळची
तिनेच तर घेतलंय
कवेत लहानपणापासून
पण किती मराठी
वापरतो आपण रोज
घ्यायचा का आढावा
हेच ते असेल अंजन

सकाळ झाली
अलार्म(1) वाजला
बंद करून मग
मोबाईल(2) अनलॉक(3) केला
बेड(4)वरून उतरलो
छान टाईल्स(5) गारेगार
फॅन(6)ची हवाही सुंदर
दाराचे हँडल(7) धरून
दार ढकलले

आळोखेपिळोखे देत
आलो बेसिन(8) कडे
बटन(9) दाबून बल्ब(10) लावला
लाईट(11) लागली की कसे
काळोख राहताच नाही
कपाट उघडून मग
टूथब्रश(12) काढला
नळाचा नॉब(13) फिरवून
ब्रेसल्स(14) ओले केले
टूथपेस्ट(15) काढली अलगद
ब्रशवर(16) पेस्ट(17) घेतली

झोपेतून उठून आत्ताशी
4 मिनिटे झालीत हो
17 आकडा गाठलाही
आपण अदमासे
16 तास जागे असतोच
4 मिनिटे 17 शब्द
16 तासाला किती?
4080 आंग्ल शब्द
मान्य आहे पूर्ण नाहीच
शक्य कोणालाही
हे रुळलेत शब्द ओठांवर

पण मुद्दाम बोलतो
ते तरी टाळूया
टेबल न म्हणता
मेज म्हणूया
शर्ट न म्हणता
अंगरखा म्हटले तर
समोरच्याला समजणे
अवघडच आहे म्हणा

मनात आले
ते लिहीत गेलो
ओपन चॅलेंज
आपले खुले आव्हान
वरील 17 शब्द
बदलून मराठीत लिहा

हसताय काय ?
म्हणूनच अंजन
शब्द सुरुवातीलाच
वापरला होता ना

-- निलेश जोशी