Tuesday, June 28, 2016

थेंब

थेंब थेंब बनते एक धार
धारा धारा मिळून बनतो पाऊस
पण पाऊस पडायला लागल्यावर
धारा कोण बघतयं ?
अनुभवायचा तो पाण्याचा थंड थेंब

जपून ठेवायचा मनात थेंब अन थेंब
पुढील भविष्यातील वर्षभरासाठी
जशी ऊर्जा साठवावी उमेदीची
पुढील प्रवासात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करण्यासाठी

तो अनुभवायचा प्रत्येक थेंब
वर्तमानातील घटनांसारखा
आणि अवलोकन करत टाकायची भर रोजच्या अनुभवात
उगाच नाही अनुभवला पावसाळे बघितले म्हणत

आणि तोच प्रत्येक थेंब घेऊन जातो भूतकाळात
पावसाळा ऋतूच थोडा अवखळ चांगले वाईट अनुभव जागे करतो
जशी पावसाची खळखळ बाहेर त्याच्या दुप्पट आवाज होत असतो मनाच्या आत
तरंग उमटवत मनावर हळूहळू पुन्हा वर्तमानात यायला कारणीभूत ठरतो आताच्या पावसाचा थेंबच

नकळत त्याचेच प्रतिबिंब झिरपतेय डोळ्यातून अश्रूंच्या रुपात
पाऊस संपला निरभ्र झाले आकाशही आणि सोबत माझे मनही
आणि या सर्वाचा साक्षीदार सुंदर टपोरा पाण्याचा थेंब

-- निलेश जोशी

Thursday, June 16, 2016

हुरहुर सूर्यास्ताची

"भावना वेळीच ओळखणे व नियंत्रित करणे, माणसासाठी महाकठीण काम !!  जेव्हा ते जमेल तोच  खरा संतपदाला पोचला असे समजावे "
टीव्ही वरील प्रवचन संपले आणि शारदाने टीव्ही बंद केला व बाहेर येऊन बसली .
सर्व जीवनपट सर्रकन तीच्या डोळ्यासमोरून सरकला , कोकणातील बालपण , अल्लडपणा , केलेला दंगा मस्ती व चांगले स्थळ आले म्हणून 18व्या वर्षी झालेले लग्न , त्यानंतरचा 5 वर्षाचा राजा राणी संसार , स्वतःचे घर आवरणे ,सांभाळणे ,वाढवणे पण यात लहान मुलाची काही भर पडली नाही.
नवरा शेखर अतिशय लाघवी , मनमिळावू व समजूतदार , छान संसार व जोडीला घरातील मोठे माणूस म्हणून मदतीला अक्का , या अक्का म्हणजे शेखरच्या लांबच्या मावशी म्हणज नात्यानेे शारदाच्या सासू पण मायेने आईच अधिक.

अक्का बाहेर आल्या व शारदाच्या शेजारी बसल्या , त्यांच्या डोळ्यातून काही अश्रू थांबत नव्हते , शारदेचे दुःख मोठे पण तिला कसे समजवावे कळत नव्हते.
3 महिन्यापूर्वी शेखरचे अपघाती निधन झाले होते , कंपनीच्या कामासाठी गेलेला शेखर अपघातात जागीच ठार झाला होता , डेड बॉडी असूनही तो शेखर आहे हे पण मानायला शारदा तयार नव्हती आणि समजावणे आक्कांना जमत नव्हते. शेवटी कंपनीतील लोकांनी सर्व सोपस्कार केले व निघून गेले.

त्या दिवसापासून शारदा खूप आतल्या आत कुढू लागली , अक्कांशी बोलणे कमी , जेवण खाण नाही , शुद्ध नाही , एकटक शेखरच्या फोटोकडे बघत राहणे किंवा टीव्ही बघणे एवढाच उद्योग.
शारदाने घरातील शेखरच्या फोटोला हार घालू दिला ना दिवसकार्य करायला दिले , तिचा एकच विश्वास शेखर परत येणारे , माझे मन मला सांगतेय शेखर जिवंत आहे.

अक्का खूप खचल्या होत्याच पण या पोरीच्या काळजीने अजूनच काळजीत पडल्या. तिला कसे समाजवयाचे कि शेखर गेला तरी हिचे आयुष्य पडलेय , सत्य स्वीकारून पुढे गेले पाहिजे , शो मस्ट गो ऑन.

लाईट गेले म्हणून आक्कांनी मेणबत्ती लावली व कंदील लावायला त्या खाली बसल्या , कंदील साफ करताना त्यांना काच फुटलेली दिसली व एक कल्पना सुचली , त्यांनी शारदाला बोलावून घेतले व विचारले , हा कंदील कुठे घेतलेला ग?
शारदा म्हणालीं,"आम्ही केरळला गेलो तेव्हा घेतलेला , शेखरला खूप आवडायचा हा कंदील,का हो पण असे का विचारले?"
"अग, याची काच फुटली , आता काय करूया असाच वापरायचा का? कि फेकून देऊया "
"नाही आक्का, काच मिळते बाजारात आपण नवीन आणू आणि बदलू , त्यासाठी कंदील कशाला फेकला पाहिजे"
"पोरी, मी हेच तर सांगतेय तुला , काच फुटली म्हणून
आपण वस्तू फेकून देत नाही तसेच बॅड पॅच आला म्हणून आयुष्य तिथेच गोठवून नाही ठेवायचे , जीवन एक झरा आहे तो वाहत राहिला पाहिजे , शेखर नाही हे सत्य स्वीकारून तुला पुढे गेलेच पाहिजे , मी जुने खोड कितीवेळ साथ देईन माहित नाही पण आयुष्याच्या सूर्यास्ताला सामोरे जाताना तशीच तजवीज केली पाहिजे निदान हे सत्य तुला स्विकारलेच पाहिजेस"

शारदा आक्काच्या कुशीत शिरली व हमसून रडू लागली जणू कंदीलाचे उदाहरण तिला पटले होते व तिच्या मनाने जणू सत्य स्वीकारायला सुरुवात केली होती.

आक्का मनाने शांत झाल्या , मोकळेपणाने रडणाऱ्या शारदाला थोपटत राहिल्या , सूर्यास्ताचा संधिप्रकाश त्याने वाढणारी हुरहुर व दूरवरून गाण्याचे बोल ऐकू येत होते

"कहीं दूर जब दिन ढल जाए
साँझ की दुल्हन बदन चुराए"

"दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे
खो गये कैसे मेरे सपने सुनहरे
ये मेरे सपने यही तो हैं अपने
मुझसे जुदा न होंगे इनके ये साये"

-- निलेश जोशी

Saturday, June 4, 2016

Misal भेट देण्याजोगी ठिकाणे

रविवारी काटाकीर प्लान करणाऱ्या सदस्यांसाठी - मी आपल्या समुहाचा एक सदस्य आहे म्हणून नाही पण माझ्या कडची मिसळ नक्कीच चवदार असते म्हणून माझ्या वडोबाला नक्की भेट द्या ….
११ प्रकारचे बटाटे वडे आणि ७ प्रकारची मिसळ देणारे श्री वडोबा हे जगातील एकमेव ठिकाण आहे !!
… फ्युजन बटाटे वड्यात तुम्हाला आगळे वेगळे उडीद ,मुग , डाळ बटाटे वडे सुद्धा मिळतील … आणि हो माझ्या कडे मिसळ खाणे म्हणजे एरवीच ( already ) तुम्हाला डिसकाउंट मिळतो … कारण काटाकिरररर ची अर्धी वाटी ( आमच्या मिसळ वाटीच्या मनाने )मिसळ आहे ६० रुपयाला  आणि आमची आहे ५० रुपयांना शिवाय आमच्या कडील पाव हे एफडीआय प्रमाणित बेकरीतूनच येतात आणि त्याचा आकार सुद्धा काटाकिरररर मध्ये मिळतो त्या पावपेक्षा दुप्पट असतो :) आमची निखारा दम मिसळ हि सगळ्यात स्पेशल मिसळ, याची किंमत आहे ७० रुपये …

नगरला जाताना सरदवाडीला संजय मिसळ.किंवा नवनाथ मिसळ

सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटाआधी भैरवनाथ.
मिसळीसाठी फेवरीट!!!

नाशिक रस्त्याला भामा नदी ओलांडली की लगेचच भाम रिव्हर टी हाऊस येथील मिसळ

बोरिवलीत ..  बाभई नाक्यावर  गोडवा उपहारगृह आणि  दहिसर  पूल  (पश्चिम ) समोर  सनाता  उपहार गृह आहे  तिकडे  काळ्या मसाल्यातली  मिसळ उत्तम  मिळते .. जरूर  खाऊन  बघा

...  अजून  एक  ठिकाण  म्हणजे  प्रबोधनकार  ठाकरे  नाट्यगृहाच्या  बाजूला  प्रकाश  खांडेकर  यांच अन्नदाता  पोळीभाजी  केंद्र  आहे  तिथे  पण  मिसळ उत्तम  मिळते ..

नॅन्सी बस डेपो उपहारगृह मिसळ