Friday, September 15, 2023

ये इंडिया है बॉस

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 
क्या उखाड लेगा?

सातआठ धर्म एकत्र तरी धर्मनिरपेक्ष म्हणून  थाप मारणार

अल्पसंख्येच्या नावाखाली एखाद्यालाच झुकते माप देणार

एखाद्याच्या यात्रेला वारेमाप सवलती आणि पैसा पुरवणार

गरीब वारकरयाला वर्षोंवर्ष व दिनरात उपेक्षितच ठेवणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

सैनिक भरती कमी का होते यासाठी बैठक बोलवणार

त्या बैठकीचे बिलात हजारो-लाखोंचा भ्रष्टाचार होणार

सैनिकभरतीमध्ये नेत्यांचा मुलगा नसावा हे कटाक्षाने पाळणार

वर सैनिक,पोलिस असतातच मरण्यासाठीच, निर्लज्ज मंत्री बोलणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

बॉम्बस्फोट दंगलीत मेलेल्याना पैसे जाहीर करून गाजर दाखवणार

मदतीतील नातेवाईकांना पाच पाच वर्षे  काहीच नाही मिळणार

दंगलग्रस्तांना दाखाविलेले नोकरीचे आमिष मुख्यमंत्री विसरणार

मदतीच्या बर्फाचा गोळा हातात येइपर्यंत पळीभर पाणी होणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला मुलाना उन्हात वेठिला धरणार

नेत्यांना प्यायला बाटल्या,मुलांना घोटभर पाणी नाही मिळणार

उपदेशात तुम्हीच भावी भारत अशी मोठठी वाकये ऐकवणार

मुलेही आपले भविष्य उपेक्षित आहे हे तेथेच समजुन घेणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

इतर देशात कर किती जास्त तुम्हालाच कमी हे ऐकवणार

आपल्या सोयीसाठी लोकसंख्येतला फरक नाहीच सांगणार

सुरु केलेल्या किती सोयीसुविधा चालु हे कोणीच नाही बघणार

त्या चालुच दाखवून त्याचा पैसा चालूलोक आपल्या तिजोरीत ठेवणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 

नागरीकांचा वेळ शुल्लक,त्यांना रस्त्यावर अडवून ठेवणार

मंत्री देवापेक्षा व्यस्त त्यांना दुतर्फा रस्ता मोकळा करून देणार

"रूग्णवाहिकेतच मृत" बापाचा मुलगा डेथ सर्टिफिकेटसाठी पैसे चारणार

मंत्री मात्र हेलिकॉप्टर येइपर्यन्त विश्रामगृहात झोप काढणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

माजी आमदार पेन्शन बिल सभागृहात लगेच मंजूर होणार

सभागृहात जनतेच्या फायद्याचे कायदे मंजूर होवुच नाही देणार 

कर्तव्यदक्ष अधिकारयांना बडतर्फ केल्याचा कागद दिला जाणार

"सामान्य जन"भारत निर्माणची जाहीरात कौतुकाने बघणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार 
क्या उखाड लेगा?

--- निलेश जोशी

अध्यात्म - गझल

ओठांनी “हो” म्हणणे हवे कशाला
जर तुझा होकार डोळ्यात आहे

भांडलो जरी आपण नेहमीचे
माझी काळजी तुझ्या शब्दात आहे

कशाला चिंता सर्व क्लेशतापाची
त्या जाळण्याची ताकत जपात आहे

जाणून घेऊ माझे चुकले कोठे
त्यासाठीच आत डोकावणे आहे

हे सहा शत्रू परास्त करण्यास
हे मानवा ही शक्ती तुझ्यात आहे

आजचे काम उद्यावरी टाळतो
याचाच शेवट हारण्यात आहे

दोन पावले चालू दर दिवशी
अंती फलित ध्येय पूर्तीत आहे

का अट्टाहास सर्व मलाच हवे
खरे समाधान लोकां देण्यात आहे

सत्य सांग साखरेत घोळवून
लोकांना सवय कॅप्सूलची आहे

"मी" एवढा निर्ढावलो आता
मी बरोबर खोट इतरात आहे

ओळखपत्रे फोटोसहित माझ्या
फोटोत "मी" फक्त बाह्यरूप आहे

नाहीसे करण्या अवघी ही चिंता
फक्त सामर्थ्य पांडुरंगात आहे
              
               ----निलेश जोशी





लिंबूसरबत व आयुष्य

#निलउवाच

लिंबूसरबत व आयुष्य
         लहानपणीची गोष्ट आहे, एक दिवस मी लिंबूसरबत तयार करत होतो. तयार करताना मी आवश्यकतेपेक्षा पाचपट अधिक लिंबाचा रस घातला. सरबत एकदम आंबट बनले की एक थेंबही कुणी घेऊ शकले नसते. आता, मला ते कसेही करून नीट करावे लागेल. माझी इच्छा होती की मी पाण्यातून अतिरिक्त लिंबाचा रस काढावा परंतु काही गोष्टी एकदा झाल्या की कधीही पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत. पाण्यातून लिंबाचा रस काढून टाकण्याचा कोणताही मार्ग नाही. मग उपाय  काय? आधीपासून मीच आंबट बनवलेल्या सरबतात अजून चार ग्लास पाणी घालणे हाच एकमेव मार्ग होता. 
     आता जर आपण आयुष्याबद्दल विचार केला तर तेच आहे. कधीकधी आपण अशा गोष्टी करतो ज्या पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत. काही चुकीचे निर्णय, चुकीची निवड, चुकीचे काम, चुकीच्या कृती कधीही पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत. मग उपाय काय? जेव्हा आपण गोष्टी पूर्ववत करू शकत नाही आणि जे घडले त्यामध्ये सुधारणा करू शकत नाही, तेव्हा आपण त्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नये. हे म्हणजे लिंबाचा रस सरबतातून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यासारखेच असेल. त्याऐवजी, जर गोष्टी चुकीच्या झाल्या आणि त्या पूर्ववत केल्या गेल्या नाहीत किंवा करणे शक्य नाही तर आपण आपल्या जीवनात अशा बर्‍याच चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे जोडण्यात व्यस्त असले पाहिजे. आपल्या सर्वांकडेच नकारात्मक बाजू आहेत आणि कदाचित आपण आपल्या सर्व नकारात्मक गोष्टी सुधारण्यास सक्षम होऊ शकत नाही परंतु आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार, कृती, लोक जोडणे आणि नकारात्मकता सौम्य करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण सर्वजण आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी ओलांडत, पार करत गेलो आहोत आणि आपण ते बदलू शकत नाही पण जर आपण आपल्या जीवनात नवीन व चांगल्या गुणांची भर घातली तर आपण आपला वाईटपणा फिका किंवा कमी तीव्र करू शकू. नाही का? आपल्या सर्वांच्या आयुष्यात चुका झाल्या आणि कडू आठवणी आहेत पण आपण आता नवीन आठवणी बनविण्यात आणि जोडण्यात व्यस्त होऊ शकतो. आपण बर्‍याच चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आजच्या जीवनाला अधिक सकारात्मक बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरुन भूतकाळात घडलेल्या किंवा घडलेल्या वाईट गोष्टींना आपण निष्प्रभ करू शकू.
     सहज सुचलं ते लिहिलं, गोड मानून घ्या.
---- निलेश जोशी

स्वातंत्र्यदिन बेगडी प्रेम -कविता

वर्षभर देशप्रगतीला मी नावे ठेवणार आहे,
स्वातंत्र्यदिनी दिसणारे बेगडी देशप्रेम आहे.

टोकियोत अनेक पदके मिळाली भारताला,
विरोधाला विरोध, काही पंतप्रधानाना कोसत आहे.

वर्षोवर्षं एक नावात गुंडाळल्या पुरस्कार,योजना
योग्य खेळाडूच्या नावालाही लोकांचा विरोध आहे

विचारांची बैठक माझी बहकावतो कोणीतरी
सांगेल तेच बोलण्यात मी जीभ दवडतो आहे

गाव,तालुका,जिल्हा कामांसाठी जर राजा कुचकामी
त्याचे उत्तर माझे कच्चे नागरिकशास्त्र आहे

जिथे मते मागताना युती करून लाचार नेते  
हा तर मतदारांचा केलेला विश्वासघात आहे 

कोरोनाने दाखविले किती नेते धावले मदतीला
मतदारांचे राज्य अशी नावालाच लोकशाही आहे 

आता जेव्हा येतील आश्वासने घेऊनि हे नेते
प्रत्येकाने जाब विचारावा हे माझे निवेदन आहे

शेवटी आम्ही काय देणार शिक्षा या गद्दारांना
देणारा भगवंत रामराया मोठा न्यायाधीश आहे

रेस - चूक की बरोबर

#निलउवाच
        डिसेंबर २०१२-स्थान -बुर्लाडा स्पेन
केनियाचा धावपटू आबेल मुताई शेवटच्या रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु त्याने या शर्यतीची पुर्तता केली असा विचार करून सिग्नल बघून गोंधळून गेला आणि थांबला. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे हे लक्षात येताच त्याने आबेलला ओरडून सावध करू केले. मुताईंना स्पॅनिश येत नव्हते आणि त्यांना समजले नाही. काय घडत आहे हे लक्षात घेत फर्नांडीझने मुताईला विजयासाठी ढकलले.आबेल मुताई रेसमध्ये विजयी झाला.
          नंतर एका पत्रकाराने इवानला विचारले, "तुम्ही असे का केले?" इवानने उत्तर दिले, "माझे एक स्वप्न आहे की एक दिवस असा यायला हवा जेव्हा आपण सर्वजण एक होऊन एक समुदाय बनून एकमेकांशी स्पर्धा न करता सहजीवन जगू शकतो, जिथे आपण एकमेकांना जगण्यासाठी व जिंकण्यासाठीच मदत करतो"
       पत्रकाराने आग्रह धरला "पण आपण राष्ट्रप्रेम नाही दाखवले, स्पेनऐवजी केनियाला का जिंकू दिले?" इव्हानने उत्तर दिले, "मी त्याला जिंकू दिले नाही, तो जिंकणारच होता. शर्यत त्याची होती." पत्रकाराने आग्रह धरला आणि पुन्हा विचारले, "पण आपण जिंकू शकले असते!" इवानने त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले, "पण माझ्या विजयाची योग्यता काय असेल? त्या पदकाचा सन्मान काय असेल? माझ्या आईला त्याबद्दल काय वाटले असते?"
        पिढ्यानपिढ्या मूल्ये पुढे जात आहेत.आपण आपल्या मुलांना कोणती मूल्ये शिकवित आहोत?आपण आपल्या मुलांना जिंकण्यासाठी चुकीचे मार्ग शिकवू नका. त्याऐवजी आपण इतरांना ,एकमेकांना मदत करणारे बना, मनाचे सौंदर्य वाढविणारे आणि सर्व जगणे मानवतेकडे घेऊन जाणारे होऊया. कारण प्रामाणिकपणा आणि नीतिशास्त्र हेच खरे जिंकणे आहे..!

सर्वाना एक छोटासा प्रश्न , आपण या रेसमध्ये इव्हानंच्या जागी असते तर काय केले असते?
🌹🌹🌹🌹🌹🌹

महानतेची प्रेरणादायक कहाणी

ही प्रेरणादायक कहाणी तुम्हाला आयुष्य जगण्यास, वेळ सार्थकी घालवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात  प्रगती कशी करायची हे शिकवेल. 

    एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, "बाबा, महान या शब्दाचा अर्थ काय आहे, मी हा शब्द बऱ्याच ठिकाणी वाचला आहे जसे की ती व्यक्ती महान होती, त्याने हे केले, त्याने हे केले. महान म्हणजे काय हे मला समजावून सांगा. आणि ते महान कसे होतात?"

वडील म्हणाले, "ठीक आहे" - वडिलांनी मुलाला महान शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी एक प्रश्न विचारला - ते मुलाला म्हणाले, "चला आपण 2 झाडे आणूया, एक घरात आणि दुसर्‍याला घराच्या बाहेर ठेवू." झाडे लावल्यानंतर, वडील म्हणतात की मुला, या दोन वनस्पतींपैकी कोणते झाड वाढेल व सुरक्षित राहील काय?   मुलगा म्हणाला, "बाबा, हेही काही विचारण्यासारखे आहे का? आपाल्या घराच्या आत असलेली वनस्पती सुरक्षित आहे, ती वाढेल, परंतु बाहेरील वनस्पती मुळीच सुरक्षित नाही, त्याला बर्‍याच त्रासांना सामोरे जावे लागेल." वडील म्हणाले ,"आपण वाट बघुया, आपल्याला काही वर्षांनी उत्तर मिळेलच."          मुलगा कित्येक वर्ष अभ्यासासाठी बाहेर जातो आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा घरातल्या झाडाकडे बघून तो म्हणतो, "पापा, मी म्हणालो की या झाडाचे काही होणार नाही, ते सुरक्षित होईल." वडील हसत म्हणाले," आधी बाहेरचे झाड तर बघून ये ,आणि मग मला सांग."                    मुलगा बाहेर जाऊन पाहतो तेव्हा तेथे एक फार मोठे झाड असते, हे झाड एवढे मोठे कसे झाला याबद्दल मुलाला विश्वासच बसत नाही, तर घरातले रोप बाहेरच्या झाडापेक्षा 100 पट लहान असते. वडील मुलाला हे समजावून सांगतात. बाहेरच्या वातावरणात हे झाड मोठे बनले कारण प्रत्येक हंगामात हजारो अडचणींना सामोरे जावे लागते.परंतु घराच्या आतमध्ये झाड अतिसुरक्षित राहिले ,त्यामुळे त्याला कोणत्याही हवामानाचा सामना करावा लागला नाही, किंवा त्याला योग्य सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि ते वाढू शकले नाही, वडील म्हणतात ,बाळा हे लक्षात ठेव, या झाडाप्रमाणेच, जगातील फक्त एक माणूस महान बनू शकतो ज्याने हजारो अडचणी सहन केल्या. आपण त्याचा सामना केला आहे आणि जो आपल्या जीवनात एखाद्या घरातील झाडासारखा सुरक्षित असेल असा विचार करतो तो कधीही महान होऊ शकत नाही.

       मित्रांनो, तुम्ही काही कामात अपयशी ठरलात तर तुम्ही दु: खी व्हाल.तुम्हाला अभ्यासात कमी गुण मिळाले किंवा अपयश आले तर तुम्ही दु: खी व्हाल. महान लोक महान होण्याआधी बर्‍याचदा अपयाशी ठरले आहेत, त्यामुळेच चुकातून शिकल्याने ते महान होऊ शकले.आजही व्यवस्थितरित्या आपले कार्य, समजून घेतले की कोणीही आपल्याला महान होण्यापासून रोखू शकत नाही.  

        एक गोष्ट स्वत: ला सांगा - माझ्या मार्गावर कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा, जरी मी तुटलो आणि पडलो तरी मी माझे ध्येय प्राप्त करण्यास सक्षम राहीन, त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरीही. आजपासून अश्या नवीन विचारांनी सुरुवात करूया,आपोआप आपणही आपल्या क्षेत्रात महान होऊच.

---- निलेश जोशी

गणपती येताहेत....

गणपती येताहेत ....

कोकणात पाऊस सुरू होतो ,जणू प्रत्येक रस्ता ,पायवाट धुवून काढायला
जोरदार वारा सर्व वाटेवरील वाळकी पाने दूर सारून स्वच्छ बनवायला

पावसाने हिरवेगार झालेली झाडे,पाने,फुले आणि रानफुलांची आरास
ओढ्यातील ,विहिरीतील पाण्याचा बदलून सुरू होतो नवीन प्रवास

भाताच्या ओंब्या लगडायला लागतात आणि पावसातील भाज्या तयार
सर्व मोठ्यांची लगबग आणि सोबत लहान मुलंही श्रावणसोबत तजेलदार

निसर्ग सज्ज एकदम सर्व कलाकुसर करून प्रत्येक भागात
गणपती येणार म्हणून आनंदी आहे प्रत्येकजण आपापल्या गावात

माझा बाप्पा येणार म्हणून प्रत्येकजण करतोय जय्यत तयारी
गरीबाहूनही गरीब माणूसही मनापासून झटतोय ही गंमत न्यारी

आकाशात ढग काढतात उदबतीच्या धुरासारखी वलय
स्वागत,पूजा,दुर्वा,लाल फुले यांची तयारी करतंय प्रत्येक आलय

सण,समारंभ वर्षभर कदाचित करता आले नसतीलही जोरात
गणपती येतील थाटामाटात आणि गणेशोत्सव होईल जोमात

कोकणातील घराघरात आता विराजमान होतील गणपती
एकच आशा,वर्षभर सोसलेला त्रास दूर करेल हा अधिपती

पखवाज दुरुस्ती आणि पुन्हा एकदा भजनांची तयारी 
प्रत्येक माऊलीची मोदक,करंज्यांची लगबग न्यारी

जरी कमाई कमी,खर्च व्यस्त, संकटेच आली आहेत
तरीही सर्व दुःख ,वेदना दूर करायला,गणपती येताहेत...

झेन कथा - गाडीवाला व त्याचे तत्वज्ञान

झेन कथा

'हे पाहा, गाडी सांभाळून हाक. फार मोठे संन्यासीमहाराज बसणार आहेत
मागे. आत्मनिग्रहासाठी १०८ दिवस पाण्याचा थेंबही न घेता उपोषण करतात
ते. नुसत्या फरशीवर झोपतात, अनवाणी चालतात. फार  मोठी विभूती आहे,'
असं भक्ताने बग्गीवाल्याला सांगितलं.

'बरं बरं, काळजी करू नका,' म्हणून कोचवानाने घोडे जुंपले आणि बग्गी
निघाली. बग्गीच्या संथ चालीनं आणि घोड्यांच्या टापांच्या लयबद्ध
आवाजानं संन्यासी महाराजांचा हलकासा डोळा लागला.

ते ताडकन् जागे झाले तेव्हा कोचवान चाबकाचे सपकारे ओढत होता. त्यांनी
पडदा सारून पाहिलं, तर तो बग्गीवर चाबूक ओढत होता. त्यांनी विचारलं,
काय झालं?

'काही नाही, एका खड्ड्यात चाक फसलंय, गाडी हलतच नाहीये.'

'अरे मग, बग्गीवर चाबूक ओढून ती हलेल का, घोड्यांवर चाबूक ओढायला हवा.'

'असं आहे होय? म्हणजे आतापर्यंत मी तसंच करत होतो. पण, तुमच्याकडे
पाहून वाटलं की ती पद्धत चुकीची असणार…'

हिर्र करून घोड्यांकरवी बग्गी खड्ड्याबाहेर काढल्यावर कोचवान प्रश्नार्थक
मुद्रेने पाहणाऱ्या संन्यासीबुवांना म्हणाला, 'अहो, तुम्ही मन ताब्यात आणण्यासाठी शरीराला कष्टवता ना! ते पाहून मला वाटलं की 
घोड्यांऐवजी बग्गीवर ओढून पाहावा चाबूक!'