Saturday, September 20, 2014

अनसूया स्तोत्र

ज्या महिलांना विकार आटोक्यात नसल्याने षडरिपुंचा त्रास होउन पाय घसरण्याचा संभव असतो किंवा पूर्वी पाप घडल्यामुळे अपराधीपणाची भावना असेल त्यांनी परमपवित्र श्री अनसूया स्तोत्र म्हणावे
हे स्तोत्र कधीही बसून म्हणु नये श्री दत्तात्रेयांच्या मातु:श्रींचे हे दिव्य स्तोत्र आहे
उभे राहून आदराने व प्रेमाने म्हणावे
चारित्र्य रक्षण होते

।। अनसूयेचे स्तोत्र ।।

पतिव्रता शिरोरत्नभूता,सुंदरविग्रहा ।
सुचरित्रा,दिव्यतेजा ,सर्वलोक नमस्कृता ।।१।।

विष्णुप्रपौत्री,कपौत्री, सती,कर्दम पुत्रिका ।।
देवहूति,समुत्पन्ना,सुमुखी,कपिल स्वसा ।।२।।
8
अत्रिपत्नी,महाभागा,
दयाक्षान्त्यादिभूषीता ।।
अनसूया,वेदगेया,
निजधर्मजिताखिला ।।३।।

श्रीदत्तात्रयजननी ,चंद्रमाता, मनस्विनी ।।
दूर्वासोजनयित्री,सा,
जगत्संकटवारिणी ।।४।।

चतुर्विशति नामानि मंगलानि
पराणिच ।।
पावनान्यनसूयाया दत्तमातु:
पठेन्नर: ।।५।।

त्रिकालमेककालं वा
श्रद्धाभक्तिसमन्वित:।।
तस्यधर्मे रूचिर्दत्ते
भुक्तिर्मुक्ति क्रमादभवेत् ।।६।।

।।इति श्री वा.स. विरचितं अनसूया स्तोत्रम संपूर्णम ।।

Monday, September 8, 2014

चार वेदांविषयी थोडक्यात विवेचन


श्री स्वामी समर्थ
एका परिवारात वेदांवर वाचल्याचे आठवते. चर्चा ही आर्युवेदावर होती. त्या वेळी आणि काही जणांनी वेदावर काही माहिती मिळेल का असे विचारलेही...
काही वाचलेले आणि ऐकलेले आणि अभ्यासलेले असे आपल्या चारही वेदावरचे मोजके विवेचन माझ्याकडे आहे.

आज ऋग्वेद जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. थोडक्यात, ह्याबद्दलच्या माझ्या काही टिप्पणी खाली देत आहे.
================================
ऋग्वेदविषयी थोडेसे विवेचन

१) चारही वेदांमध्ये सर्वात अग्र असा हा वेद ह्याला आद्यवेद असेही म्हटले जाते. ज्या मंत्रांनी भगवंताची स्तुती केली जाते त्यास ऋग असे म्हणतात. उअश्या अनेक ऋग असलेलला वेद म्हणून त्यास ऋग्वेद हे नाव पडले.

२) पैल ऋषीनी (व्यास मुनींचे शिष्य) ह्या वेदाचे दोन भाग केले. एकास सुक्त असे म्हणतात आणि दुसऱ्यास मंडल असे ओळखले जाते. सुक्तात स्तुतीपर बरेच मंत्र आहेत. त्यास सुक्ते असेही म्हणतात. प्रत्येक सुक्तात साधारणपणे १० ते १३ मंत्र असतात. ऋग्वेदातील सूक्तांचे ऋषीसुक्त, देवतासुक्त, अर्थ सुक्त आणि छंदसुक्त असे प्रकार आहेत.

३) ऋग्वेदाचे वेगवेगळे अध्याय हे मंडल, अनुवाक, अष्टक, अध्याय, वर्ग ह्या नावाने सम्भोधले जातात.

४) संपूर्ण ऋग्वेदात १० मंडले, ८५ अनुवाक, १०१७ अष्टके, ६४ अध्याय आणि २०८ वर्ग आहेत. सर्व मिळून ऋग्वेदात १०,५८० मंत्र आहेत.

५) वेदांमध्ये प्रकरणाना छंद असे म्हणतात. ऋग्वेदात एकूण १५ छंद आहेत. त्यातील प्रमुख, गायत्री, उष्णिक, अनुस्तूप, पंक्ती, बृहती आणि जगती हे आहेत.

६) ऋग्वेद अग्नीसूक्ताने सुरु होतो आणि सज्ञानसूक्ताने संपतो.

"अग्नीमिळे पुरोहितम, यज्ञस्य देवमृत्वीजम, होतारं यज्ञधातारम" हा ऋग्वेदातील आद्य मंत्र आहे.

७) पुराणात काही ऋषीनी ऋग्वेदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांना ह्या वेदाचे द्रष्टे असेही म्हणतात. मंडल, गुत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज आणि वसिष्ठ हे ते ऋषी होत.

८) ऋग्वेदाच्या एकूण २१ शाखा किंवा खंड आहेत. त्यातील मुख्य मानले जाणारे, शाकल, बाश्फल, आश्वलायन, शांखयानी आणि मांडूकेवी हे आहेत.

९) ज्या विद्येचे मूळ एखाद्या वेदात असते, म्हणजे जी विद्या त्या वेदाचा base असतो, त्यास वेदांच्या भाषेत उपवेद म्हणतात. ऋग्वेदाचा उपवेद "आयुर्वेद" हा आहे.

१०) आपण सर्वांनी महावाक्य हे नाव ऐकले किंवा वाचले असेल. महावाक्य म्हणजे, ज्याचा अभ्यास केला जातो आणि ते पुर्णप्रकारे अंगिकारले जाते त्यास महावाक्य म्हणतात. उदाहरणार्थ "अहम ब्रह्मास्मि" हे महावाक्य आहे.

ऋग्वेदात ऐतरेय नावाचे एक उपनिषद आहे. त्यात एक महावाक्य आहे ते असे " प्रज्ञानं ब्रह्म" ह्या वाक्याचा अभ्यास खूप रंजक आहे.

=================================

यजुर्वेदचा अभ्यास आणि त्याबद्दल थोडी माहिती

१) यजुर्वेदास "अध्वर्यूवेद" असेही नाव आहे. ज्या मंत्रांच्या अक्षरांचा अंत अनिश्चित असतो त्यास संस्कृत मध्ये "यजु" असे म्हणतात. त्यावरूनही ह्यास यजुर्वेद हे नाव पडले असावे असे ज्ञानीजणांचे मत आहे. धातुपाठाच्या प्रमादाप्रमाणे "यज" म्हणजे पूजा करणे असा त्याचा अर्थ आहे. ह्यावरून हे नाव पडले असावे असावी तर्क आढळतो.

२) ह्यातील बरेचसे मंत्र हे गद्य स्वरूपात आहेत.

३) यजुर्वेदाची व्याप्ती सांगताना "यजुरेक शतात्मकम " असे म्हटले जाते. म्हणजेच यजुर्वेदाच्या १०० शाखा आहेत. त्यापैकी ५ शाखा अत्यंत महत्वाच्या. १. कठ २, मैत्रायणी ३. आपस्थंभ ४. हिरण्यकेशी ५. वाजसनेयी.

४) यजुर्वेदाचे कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे दोन मुख्य भाग आहेत. याज्ञवल्क्य ऋषी हे शुक्ल यजुर्वेदाचे अधिपती आहेत. त्याना हा वेद सूर्याकडून मिळाला अशी मान्यता आहे. तर कृष्ण यजुर्वेदाचे अधिपती वैशंपायन ऋषी आहेत.

५) यजुर्वेदात वेगवेगळ्या संहिता (प्रकरणे) आहेत. थोडक्यात खालील प्रमाणे

वाजसनेयी संहिता: संपूर्ण अध्याय ४० ह्यात वैदिक धर्माचे कर्मकांड आहे.

काण्व संहिता : संपूर्ण अध्याय ४०. ह्याचे पाठीराखे बरेच आहेत. ते काण्व शाखीय ब्राह्मण म्हणून ओळखले जातात.

काठक संहिता: ह्यात ५ खंड आणि ३०९१ मंत्र आहेत

कपिष्ठल संहिता : ह्यात ८ अध्याय आहेत

मैत्रायणी संहिता: ह्यात ३१४४ मंत्र आहेत. ह्याच संहितेत, वाजपेय, अश्वमेध, राजसूय आणि सौत्रमणी ह्या यज्ञाचे विधी आहेत.

आपस्थब संहिता: ह्यात याजमान आणि पैरोडाश ह्या यज्ञाचे विधी आहेत. दक्षिण भारतातील काण्व द्रविड आणी उत्तर भारतातील गौड काण्व आणि महाराष्ट्रातील काण्व ब्राह्मण हे ह्याचे पाठीराखे आहेत. ऋग्वेदी ब्राह्मणापेक्षा यजुर्वेदी ब्राह्मणाची संख्या खूप जास्त असल्याचे हे कारण आहे.

६) आपल्या बहुतेक सर्व पूजा, हवन, यज्ञ, याग ह्याच्या विधीने यजुर्वेद सजलेला आहे.

७) "धनुर्वेद" हा यजुर्वेदाचा उपवेद आहे.

८) वाजसेनेयी शाखेच्या ब्राह्मणोप्निशदात बृहदारन्यक हे प्रकरण आहे त्यातच " अहं ब्रह्मास्मि" हे महावाक्य आहे.

=================================

आता थोडेसे सामवेदाविषयी....

१) कोणत्याही यज्ञातील तिसऱ्या विधीस उद्गाता असे म्हणतात आणि त्याचा मंत्रसंग्रह सामवेदात आढळतो. उद्गात म्हणजे योग्य स्वरात भगवंताचे मंत्र म्हणून त्यास आळवणे. म्हणून मंत्र गायनाला साम गायन असेही म्हणतात.

२) सामगायनाचे ५ प्रकार आहेत. प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, उपद्रव आणि निधान. हे गायची एक विशिष्ठ पद्धत आहे. ते गानार्याना प्रस्तोता, उद्गाता, प्रतीहार्ता अशी नावे आहेत.

३) सामवेदाच्या सुद्धा १००० शाखा आहेत. पण त्यातील ३ अत्यंत महत्वाच्या त्या म्हणजे कौथुम, राणायनिय आणि जैमनीय. ह्यापैकी कौथुमी शाखा ही गुजरात मध्ये, राणायनिय ही शाखा महाराष्ट्रात तर जैमनीय ही शाखा कर्नाटकात मानली जाते. सामवेदात एकंदरीत १५४९ मंत्र आहेत. पण ७५ मंत्र सोडले तर बाकीचे सर्व मंत्र ऋग्वेदाचेच आहेत. ह्यामुळेच सामवेदाला ऋग्वेदाहून वेगळे समजत नाहीत.

४) आपल्या मंत्रांच्या समूहास आर्चिक असे नाव आहे. सामवेदात पुर्वार्चिक आणि उत्तरार्चीक असे दोन भाग आहेत आणी ह्यात अग्निविषयक मंत्र आहेत.

५) सामवेद हा गायनाचा पाठीराखा आहे. ह्यातील पुर्वार्चीकेत ग्रामगेय आणि अरण्यगेय असे दोन गायनाच्या प्रकारांचे विश्लेषणही आहे. सामवेद गानार्याना सामगायक असेही संबोधतात.

६) सामवेद हा गायनाची पुष्टी करतो. तलावकार ह्या उपशाखेत स्वर, ताल, लय, वाद्य ह्याचे अति सूक्ष्म असे वर्णन आहे. त्यावरून भारतीय संगीत प्राचीन काळी सुद्धा किती प्रगत होते ह्याची प्रचीती येते.

७) सामवेद हा ऋग्वेदातून आल्याने ह्याबाबत बरेच मतभेद आहेत.

८) गंधर्वविद्या हा सामवेदाचा उपवेद आहे.

९) सामवेदातील छांदोग नावाच्या शाखेत छांदोग्य नावाचे उपनिषद आहे. त्यातच "तत्वमसी" हे महावाक्य आहे.

=================================

आता शेवटचा वेद ज्यास अथर्ववेद म्हणून ओळखले जाते, त्याबद्दल थोडे बोलू या

१) ह्या वेदाच्या निर्मिती मागे एक आख्यायिका आहे. सर्वप्रथम ह्या वेदाचे नाव अथर्वान्गीरस असे आहे. ब्रह्मदेव सृष्टीउत्पत्ती साठी तप करताना त्यांच्या तप सामर्थ्यातून दोन ऋषी निर्माण झाले. एक म्हणजे भृगु ह्यांचेच दुसरे नाव अथर्वण आणि दुसरे म्हणजे अंगिरा ऋषी. ह्या दोघांनी हा ग्रंथ लिहिला (ब्रह्मदेवाचे ऐकून). म्हणून ह्याचे नाव अथर्वान्गीरस असे पडले.

२) आता हा वेद लिहित असताना, ह्या दोन महान ऋषीनी आपले काही मंत्र ह्या वेदात घातले. भृगुऋषी रोगनाशक मंत्रांचे द्रष्टे आहेत तर अंगिरा ऋषी शत्रूनाशक मंत्रांचे. त्यामुळे अथर्व वेद हा अश्या मंत्रांनी परिपूर्ण आहे.

३) संपूर्ण वेदात ५ प्रकारचे अत्यंत प्रभावशाली असे मंत्र आहेत आणि ते खालीलप्रमाणे
अ) रोग, हिंस्त्र पशु, पिशाच्च ह्यांची बाधा टाळणारे
ब) बुद्धी भ्रंश, क्षय, सर्पबाधा, कुष्ठ इत्यादी व्याधी निवारक मंत्र
क) मंत्र प्रयोग करणाऱ्या शत्रुंचा नाश करणारे मंत्र
ड) कुटुंबात शांती प्रस्थापित करणारे मंत्र
इ) दीर्घायुष्य, संतती लाभ करून देणारे मंत्र

४) धर्मशास्त्र, विवाह, राज्याभिषेक, मृत्यू इत्यादी बद्दलचे अनेक मंत्र ह्यात आहेत.

५) अथर्व वेदाच्या वीस कांडामध्ये ७३९ सुक्ते आहेत आणि ५८४९ मंत्र. ह्यातील १२०० मंत्र हे ऋग्वेदातील आहेत. ह्यात चार उपनिषदे आहेत, क्रमवार त्यांची नावे अशी... प्रश्न, मुंड, मांडुक्य, नृसिंह आणी तापिनी.

६) पहिल्या १३ कांडात जारण, मारण उच्चाटन ह्याबद्दल मंत्र आहेत. १४ व्या कांडात विवाह, १८ व्या कांडात श्राद्ध आणि २० व्या कांडात सोमयाग ह्या विधीबद्दल मंत्र आहेत.

७) अथर्व वेदाच्या ९ शाखा आहेत पण अति महत्वाच्या दोन त्या म्हणजे पैपलाद आणि शौनक. ह्या शाखांवर पाश्चात्य लोकांनी खूप संशोधन केले आहे आणि करत आहेत.

८)
) स्थापत्यशास्त्र हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.

९) अथर्व वेदाच्या मांडुक्य उपनिषदात "अयआत्मा ब्रह्म" हे महावाक्य आहे.

ह्याबरोबरच चारही वेदांचे अत्यंत संक्षिप्त विवेचन पूर्ण झाले. खूप सदस्यांनी वेदान्वरची माहिती विचारली होती. माझ्या अल्पमतीस जमेल तशी थोडक्यात लिहून स्वामीचरणी सादर केली. स्वमिकृपेनेमुळेच आज चारही वेदाची माहिती पोस्ट करू शकलो.

                               ------साभार राहुल पिकळे