Friday, October 20, 2023

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान १

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 
#कोकण_संस्कृती #नवे_करणे

भाताचं नवे करायची परंपरा !!

(ही संपूर्ण पोस्ट Vinayak Bhagwat  यांची असून भारतीय संस्कृती व विज्ञान या सदरात पुन्हा देत आहे)

           कोकणात साधारण नवरात्रोत्सवाच्या आसपास भातशेतीत भाताची केसरं तयार होतात. शेतात कष्ट करून पिकवलेल हे धान्य असच वाटेल तेव्हा खाण्यास सुरु करत नाहीत तर ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने सोहळा करून ग्रहण करण्यास सुरुवात करतात.  यालाच 'नवे करणे' म्हणतात. हे नवं करण्याचे दिवसही घरा घरातुन ठरलेले असतात. काही ठिकाणी बसता घट म्हणजे घटस्थापनेला करतात काही ठिकाणी उठता घट म्हणजे दसऱ्याला (किंवा नवमीला) करतात. बहुतांशी नवान्न पौर्णिमेला करतात.  नवान्न पोर्णिमा म्हणजे कोजागिरी पोर्णिमा. काही ठिकाणी चंपाषष्ठी ला नवं करतात, कारण तोपर्यंत भात शेती पूर्णपणे तयार झालेलीे असते. 
           भात कापणीला आल्यावर सुरुवात करण्यापूर्वी पहीले पाच आवे कापून घरी आणायचे, ते केळीच्या पानावर ठेवून त्यांची केसरं काढायची (लोंब्या). त्याची पूजा करून हळदीकुंकू वाहून हे नवीन धान्य प्रथम देवाला वाहतात. मग या लोंब्या व याच शेतात उगवलेली रानफुले व मांगल्याच प्रतीक असणाऱ्या  आंब्याची पाने एकत्र बांधून ते  देव्हारा, धान्य ठेवण्याची कणगी, कोठीची जागा, इतकच काय पण ताक करायचा खुंटा व शिंके, हे धान्य (भात) मिळवण्यासाठी जे जे वापरलं तिथे म्हणजे नांगर जु वगैरे, पूर्वी धान्य कांडण्यासाठी मुसळ वापरीत म्हणून त्याला, भात भरडायची घिरट, जाते, घडवंची ई. ठिकाणी बांधतात.  काही लोंब्या हातांत सोलून किंवा पाटावर एखाद्या नळीने भरडून तांदूळ बाहेर काढायचे त्या ताज्या तांदळाची (बाकीच्या तांदळात घालून) खीर व भात करायचा त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आधी ज्यांच्यामुळे हे उत्पादित झाले त्या गायी गुरांना, जोताच्या बैल/ रेड्याना घास (नैवेद्य) द्यायचा आणि मग सहभोजन करायचे. नवे दाणे थोडेच असले तरी मग संपूर्ण जेवणच नवं होऊन जातं ही परंपरेची किमया. 
             काही लोंब्या, रानफुल व आंब्याची पानं बांधून "तोरण" करून मुख्य दरवाजावर बांधलं जातं. हे दारात दिसलं की कळतं या घरात नवं करून झालयं. कारण काही जुनी माणसं अजूनही ज्या घरात नवं केलं नाही त्या घरात जेवत नाहीत, देवाला आणि ज्यापासून हे मिळालं त्या वस्तुंना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही हा नियम. आता हे कमी होत चाललंय.. फार कशाला माझी  पण नजर या काळात दारावर नवं बांधलंय का हे बघतेच. हे तोरण खूप दिवस दरवाज्यावर टिकाव त्यातील भाताचे गोटे पडून जाऊ नये म्हणून ते बांबूच्या काठीत बांधूनही दारावर अडकवतात, आणि अशी दारं हे घर शेतकऱ्यांचं आहे, तुमच्या अन्नदात्याच आहे हे सांगत मानानं मिरवत उभी राहतात. कृतज्ञतेचा खरा अर्थ जाणून तो कृतीत उतरवणारी अशी ही आपली संस्कृती एकदा जाणून घेतली मग टाकावी म्हटली तरी टाकवत नाही. 
           हे 'नवं' एवढ्या श्रद्धेने केलं जातं की ज्याची शेती नाही त्याला गावातील इतर शेतकरी या भाताच्या लोंब्या व रानफुल नेऊन देतो. आधी देवाला ठेवल्या शिवाय आणि ज्यामुळे आपल्याला हे मिळालं त्या औजाराना, जोताच्या बैल रेड्यांना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही ही त्यामागील भावना.. अशी ही आपली संस्कृती. घरात ठिकठिकाणी बांधण्यामागेही घरीदारी धान्य भरून राहावे हीच भावना. अधिक काय लिहिणे..

©विनायक भागवत

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान २

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

"बारशाच्या वेळी आपण वरवंटा कुंची घालून सजवतो आणि प्रथम तोच कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असे म्हणत पाळण्याच्या वरून खाली 3 वेळा देतो घेतो" या वरवंट्याला काय म्हणतात ?
असे का करतात ?
जाणकारांनी कृपया सांगावे आणि का..?

विज्ञानाला परंपरेची जोड!
कुंची घातलेला वरवंटा त्याला गोपा असे म्हणतात. बाळकृष्ण चे प्रतीक. गोपाळ नाही म्हणत कारण तो दगड अर्थात शिव आहे अशी समज असे.
पूर्वी रेडिमेड पाळणे नव्हते व बाळाला काही धोका होऊ नये म्हणून हा गोपा ठेवून टेस्टिंग करायचे अनोखे तंत्र

गोपा पाळण्यात ठेवायचे कारण म्हणजे वजन टेस्टिंग, आणि प्रथम हा पाळणा आम्ही बाळकृष्ण साठी तयार केला आहे व त्यानेच ह्याची कळजी घ्यावी, येथे वास करावं अथवा आमच्या बाळा सोबत निजावा, रक्षण कराव(टेस्टिंग)

गोप फिरवतात त्याचे कारण म्हणजे, आता सर्वांनी घरी आलेल्या नवीन बाळाला कसे उचलावे, हाताळावे, जपावे हे समजुन घेण्यासाठी. जर १०-१५ पौंड चा गोपा  नीट उचलता आला तर बाळाला सांभाळणे आई,  आजी, आत्या, भावंडं, मामी..यांना सोपे जाईल. (ट्रेनिंग)

अजून एक कारण म्हणजे, हे बाळ आपण सर्वांचे अर्थात पूर्ण कुटुंबाचे आहे ही आपुलकी व्यक्त करणे. नाते जोडणे आणि आशीर्वाद प्राप्त करणे हा सुंदर उद्देश्य होता. 🙏🙏🙏(साभार G Rajesh  )

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ३

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

काल Sunil Kulkarni  यांनी विचारलेला प्रश्न की बारश्यात नाव ठेवायचा मान बाळाच्या आत्यालाच का मिळतो ? यामागे काही कारण असेल का?

कदाचित ही परंपरा चालू झाली त्यामागे काहीतरी पूर्वजांनी सूक्ष्म विचार केला असेलच ना?
माझ्या मनात काही सुचले ते थोडक्यात मांडतोय
1) कदाचित असे असेल की त्या घरातील लेकरू म्हणजे त्या घरातील मुलगी ,जी लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली असेल किंवा नसेल पण आत्या म्हणून तिला हा मान दिला गेला, कदाचित असा विचार असेल की घरातील वंशपरंपरा चालू ठेवण्यासाठी ,त्या घरातील आत्या म्हणजे जीला आजोबा ,पणजोबा,खापरपणजोबा यांची नावे माहिती आहेत आणि वंशवेल पुढे चालू राहिला अश्या अर्थाने तीच नावे(पणजोबाचे नातवाला व पणजीचे नातीला) पुन्हा ठेवायची प्रथा होती.

2) माहेरवाशीण पुन्हा त्या निमित्ताने घरी येईल ,आत्याचा मान म्हटल्यावर तिला तिच्या सासरहून पाठवणारच. जुन्या काळी माहेरी पाठवायचे प्रमाण फारच कमी होते ,हेही एक कारण असू शकेल.

3) जुन्या काळी बालविवाह होत आणि त्यावेळी सुन लहान वयाच्या असायची,मग त्यावेळी ओल्या बाळंतिणीला मैत्रिणीप्रमाणे सर्व काही समजून सांगणारी आत्या आली व तिच्याकडूनच नाव ठेवले गेले की सुनेचे सासुसासरे (आत्याचा मान म्हणून) खुश , बहीण आली व तिने नाव ठेवल्याने नवराही खुश आणि आपोआप नविन बाळाच्या आगमनाने सर्व घर एकत्र यायचे आणि सर्वच खुश. 

4)नवीन पिढीचे आगमन झाले तरीही त्या आत्यालाही मी कोणी वेगळी नाही तर या घराचीच एक घटक आहे हा मानसिक आधार देणारी मुख्य परंपरा म्हणजे बारश्यातील आत्याने नाव ठेवायची परंपरा चालू झाली असावी.

अजून कोणाला काही यावर सुचत असल्यास नक्की सांगा.
- निलेश जोशी

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ४

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान  ४

आज एका समूहावर एका ताईंनी दिव्याच्या पूजेविषयी प्रश्न विचारला ,त्या संदर्भात विचार करताना जे सुचले ते लिहितोय ,काही चुकल्यास माफी असावी.

मी स्वतः सर्वपूजा अभ्यासली आहे ,त्यानुसार जेव्हा मी षोडष-उपचार पूजा हा विधी बघतो त्यावेळी मला माझ्या इंजिनिअरिंग भाषेत ती "चेकशीट" वाटली ,पूजेत पुढे लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत की नाहीत हे बघत पुढे जाणे हे या चेकशीटचे घटक आणि मुख्य काम.हे सर्व खूपच सुंदर पद्धतीने या पूजाविधी मध्ये गुंफले आहे.

आपण एक एक उपचार बघूया

आचमन - अंशतः पाणी बघणे म्हणजे जे पाणी देवाच्या पूजेसाठी वापरणार ते चाखणे,हाताळणे 
त्याचबरोबर आपले हात स्वच्छ करणे व स्वतःकडे उपवस्त्र आहे की नाही हा चेक पॉईंट. तसेच  गुरुचरित्रात सांगितले तसे आचमन केल्यामुळे रोजच्या व्यवहारात पाणी प्यालो तर कधीच ऍसिडिटी होणार नाही. आधुनिक विज्ञानदेखील मान्य करते की आपण कितीही पाणी प्यालो तरीही त्यातील थोडाच अंश रक्तात उतरतो.सावकाश व थोड्या प्रमाणात प्राशन केलेलं पाणी शरीराच्या नसातून रक्तात मिसळते व त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राखायला मदत होते,ज्यामुळे ऍसिटीडी ,रक्तदाब यापासून आपण दूर राहतो. आचमन हे एखाद्या सलाईनसारखेच आहे.आचमन केल्याने शरीरही हलके रहाते.

भूमी आवाहन - आपण बसलोय ती जागा साफ आहे, आसन घेतलय का व ते व्यवस्थित आहे का हा चेक पॉईंट

घंटा ,दीप ,शंख ,कलश पूजा व आवाहन -
या सर्व पुढे लागणाऱ्या गोष्टी बरोबर आहेत का व चालू आहेत का ? घंटा वाजविणे , दीप वाती ज्वलन असणे

गणेश पूजन - या पूजनात श्री गणेशाचे पूजन हा मंगल विचार आहेच पण त्यासोबत मुख्य देवतेला वाहायचा सर्व गोष्टी इथेच चेक केल्या जातात (दूध ,गंध ,हळद कुंकू ,वस्त्र ,जानवे ,पत्री ,फुल ,नैवेद्य , उदबत्ती ,स्थापित दीप व धूप)

हे सर्व झाल्यावर पुढे हे 16 उपचार करायचे मुख्य देवतेसाठी करायचे आहेत, ते 16 उपचार पुढीलप्रमाणे आहेत.

१.आवाहन- मूर्तीमध्ये स्वत: परमात्मा अतिथीरूपाने आला आहे अशा भावनेने देवतेचे स्वागत.

२.आसन- देवतेला बसण्यासाठी आसन 

३.पाद्य-मूर्तीच्या चरणांवर पाणी घालून तिचे पाय धुणे.

४.अर्ध्य-देवतेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पळी वा शंखात गंध,अक्षता ,फुल घालून ते पाणी देवतेला अर्पण करतात.

५.आचमन-देवतेला पिण्यासाठी पाणी मूर्तीच्या मुखाजवळ अर्पण करतात.

६.स्नान व अभिषेक- देवतेवर सतत पाण्याची संततधार अर्पण करणे.

७.वस्त्र-देवतेला कार्पासवस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र अर्पण करणे.

दुसऱ्या प्रकारे विचार केला तर वस्त्र हे कापसाचे का अर्पण करायचे ,ते ही बनवण्याची पद्धत बघा ,कापूस लांब ओढून सुटा करून थोड्या अंतराने मणी बनवून विशिष्ट जागी कुंकू लावून पीळ देणे 
ही वस्त्रमाला खरच एखाद्या मोत्याच्या माळेसारखी दिसते 
म्हणजे जुन्याकाळी लोकांकडे पैसे नव्हते पण अश्या प्रकारच्या गोष्टीतून त्यांनी स्वस्त पण सुबक पर्याय निर्माण केले. 
मग त्यात विविधता आणण्यासाठी गणपतीला वाहायचे सिंदूर लावून पीळ द्या ,महादेवाला भस्म लावून ,देवीला हळद कुंकू लावून अश्या प्रकारे वस्त्रमाला सजवायला चालू झाले. हे कुठल्याही धर्मग्रंथातून आलेले नसेल तर आपल्या पूर्वजचे शोध आहेत .
वस्त्रमाला आपण अर्पण करतो स्नान व पंचामृत अभिषेक झाल्यावर ,कापूस असल्याने मूर्ती ओली झाली असेल तर सर्व पाणी कापसाने शोषले जाईल व मूर्ती भंग होणार नाही .मणी वस्त्रमाला पद्धतीमुळे दिसायला सुबक व कापूस पुंजके तयार होतील म्हणजेच पाणी धरून ठेवायची कापसाची ताकत वाढली.

८.उपवस्त्र-उपरणे किंवा कंचुकी म्हणून अर्पण केले जाते.

९. गंध-सुगंधासाठी देवतेला चंदन लावले जाते.अत्तर लावले जाते.

१०.पुष्प-फुले व पत्री देवाकडे देठ करून अर्पण करणे.निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचाच वापर, नको अती खर्च आणि नको अती चढाओढ, जी सजावट ती नैसर्गिक, उपलबधतेनुसारच आणि सहजजोगे मिळेल असे,आता अनेकजण दारी,परसात झाडे नाहीत असे असतील तर पत्रिसाठी तरी या वनस्पतींची लागवड आजूबाजूला करतील आणि त्याच्यायोगे शुद्ध वातावरण घराच्या आजूबाजूला सदोदित राहते. पत्रीच्या निमित्ताने बागेत, परसात पायपीट होते, पावसात झालेली पडझड लक्षात येते आणि येत्या काळात डागडुजी करणे, शुष्क वनस्पती काढून नवीन लागवड करणे शक्य होईल ही तजवीज असावी.परंतु जे फ्लॅट मध्ये राहतात व ज्यांना खरचं शक्य नाही त्यांनी अती वणवण आणि चिडचिड करून अमुक गोष्ट पाहिजेच असाही अट्टाहास टाळावा.पूजा सामग्री आणणे हा सोहळा व्हायला हवा त्याने अनेकजणांना दुखावून ,रसभंग करून त्यांच्यातील देवाला दुखावणे निषिद्ध असेल आणि देवालाही हे मान्य नसेल.

११.धूप-नैसर्गिक सुगंधी द्रव्याने तयार केलेली उदबत्ती अर्पण करणे. 

१२.दीप-तूपाचे निरांजन देवाला अर्पण करणे व देवतेतील त्जाच्या अंशाला ओवाळणे.

१३.नैवेद्य-लघुनैवेद्य,प्रसाद नैवेद्य व महानैवेद्य असे तीन प्रकार यात येतात.बरं नैवेद्य म्हणून गूळ खोबरे किंवा शेंगदाणे गूळ असतात ,हे काही देवाचा प्रसाद म्हणून घरातील मंडळी विशेषतः लहान मुलेच खातात.म्हणजेच त्यांना पौष्टिक आहार मिळण्याची तजवीज.

१४.प्रदक्षिणा-स्वत:च्या उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे फिरून देवतेला प्रदक्षिणा घालणे.

१५.नमस्कार- देवतेला नमस्कार करणे.

१६.मंत्रपुष्प-पूजेत काही न्यून राहिल्यास त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले देवाला अर्पण करणे.

काय मग? आहे की नाही ही चेकशीट?  आपले पूर्वज खूप हुशार होते व त्यामुळे त्यांनी पंचामृत ,गूळखोबरे सारखे पोंष्टीक घटक आपल्या पूजेत समाविष्ट केले म्हणजे तीर्थ प्रसाद म्हणून ते खाल्ले जातील. आपल्या हिंदू संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला तर अतिशय सूक्ष्म विचार बघायला मिळतो हे सर्वात विशेष.
-निलेश जोशी

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५

देवाकडे दिवा लावताना निरांजन, समई, नंदादीप वगैरेत जोडवात, म्हणजे दोन वाती एकत्र करुन एका ज्योतीत लावावा. (प्रत्येक ज्योतीत 2वाती एकत्र करुन)
यात पंचारत, एकारत, जी आरती करताना वापरतात त्यात, पंचारतमध्ये प्रत्येक ज्योतीत दोन वाती एकत्र करुन लावाव्या. म्हणजे 10वाती - 2वातीची एक जोडी.
दिवाळीच्या उत्सवात येणारे सण, वाढदिवसाच्या दिवशी वगैरे जी ओवाळणी केली जाते, त्या तबकातही निरांजनात दोन ज्योती (दोन -दोन वातींच्या) लावाव्या.

       सर्वप्रथम दिवा का लावला जातो? याचे उत्तर तुम्हाला शोधावे लागेल!
असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥ (बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28)
उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे "असत्य - अंधार - मृत्यु" हे समान स्वभावाचे असतात. याउलट "सत्य - प्रकाश - अमृत" हे सकारात्मक गुणही समान स्वभावाचे असतात.
      तुम्ही असत्य आणि अंधारात जीवन जगत असाल तर मृत्युकडे तुमची वाटचाल होत असते. आणि तुम्ही जर सत्य आणि प्रकाशात जीवन व्यतीत करणार तर अमृत पदाकडे तुमची वाटचाल होत असते.
म्हणून येथे "अज्ञानाचा अंधकार" घलविण्यासाठी आपल्या जीवनात "ज्ञानाचा प्रकाश" आपल्याला निर्माण करावा लागतो. तरच अमृतपद आपले होते, अन्यथा नाही.ज्याप्रमाणे ज्योतिचा प्रकाश हा भौतिक अंधाराला दूर सारून तेथे भौतिक जगताविषयी ज्ञान उत्पन्न करते - त्याच प्रमाणे "सत्याचा प्रकाश" हा मानसिक जगतातील अज्ञान दूर करून अमृतपदाचे ज्ञान आपल्यासाठी उत्पन्न करते. म्हणून ज्योती कडून प्रेरणा घेवून आपण आपल्या मनातील अज्ञान दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी दिवा लावित असतात. त्याकडून प्रेरणा घेण्यासाठी.(आता तुम्हाला किती मोठा दिवा, अन् किती मोठा प्रकाश पाडून किती मोठे ज्ञान निर्माण करायचे हे तुमच्या हातात आहे.)
       निरांजनातील जोडवात म्हणजे २ वाती एकत्र लावण्याची परंपरा आहे. याला जिवाशिवाची जोड, जोडा सलामत राहावा, द्वैताचे ( दोन वातींची ) अद्वैत ( एकच ज्योत ) अशी अनेक कारणे सांगितली जातात.दोन वातींची एक ज्योत आजुबाजुचा सारा अंधार नाहिसा करून टाकते... हे एक सुखी प्रापंचिक जीवनाचं द्योतक आहे. नवरा (पुरूष) आणि बायको (स्त्री) यांनी एकत्र येऊन जीवनातील अनेक समस्यावर मात करून संसार फुलवायचा असतो हेच दिव्यातील वात आपल्याला शिकवित असते.
       विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विचार करता दोन वाती एकत्रित करून लावण्याच वैज्ञानिक कारण काय असावे? दोन वाती एकत्र लावल्यावर त्या वातींमध्ये असणारी सूक्ष्म पोकळी ही एका सूक्ष्म नलिकेचे काम करते. त्या  capillary action मुळे ज्योतीला तेल पुरवठा उत्तम प्रकारे होतो. अन्यथा एकच वात लावणे हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे नाही. 
       येणारा नवरात्रीचा उत्सव, सर्व गोष्टी नीट समजून घेऊन कुठल्याही भीती वा दडपणाशिवाय भक्तिभावाने साजरा करावा.  

II या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: II 

- निलेश जोशी

मराठी अथर्वशीर्ष

मराठी अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥

ऋत मी सत्य मी वदे ॥२॥

करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥

जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥

सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू ॥५॥

तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥

आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥

एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥

एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥

वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥

विराट ! एक अद्भुत , अप्रतिम , विराट खेळी !

विराट !  एक अद्भुत , अप्रतिम , विराट खेळी !

19 Oct 2023
भारत विरुद्ध बांगलादेश

बांगलादेश टॉस जिंकून फलंदाजी घेतो आणि 50 षटकात 256 धावा करतो.
रोहित आणि गील सोबत धावांचा लिलया पाठलाग करण्याचे असामान्य कौशल्य विराट कडेच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
    रोहित आउट झाल्यावर विराट खेळायला आला तेच 2 धावा घेऊन नंतर लागोपाठ 2 नो बॉलमुळे चौकार,षटकार मारत 3 चेंडूत 13 धावावर पोचला. शेवटी श्रेयस आउट झाल्यावर राहुल खेळायला आला तेव्हा  बांगलादेश विरुद्ध जिंकण्यासाठी धावा पाहिजे होत्या 26 आणि विराटचे शतक होण्यासाठी हव्या होत्या 26 !        
प्रचंड संयम , धिरोदात्तपणा व करारी आक्रमण करीत विराटने ते सहज साध्य केले.यासाठी प्रचंड फॉर्ममध्ये असणाऱ्या के एल राहुल ने कमालीचा संयम ठेवून आणि विराट कोहली एक धाव घेत असताना त्याला एक धाव घेऊ नकोस म्हणून थांबविणारा , विराटच्या दोन धावा व्हाव्यात आणि तो स्ट्राईकवर रहावा यासाठी स्वतः धोका पत्करून जीवाच्या आकांताने पळणारा राहूल भारतीयत्व दाखवित होता. सहकाऱ्याचा सन्मान व संघभावना ( टीमवर्क ) कशाला म्हणतात हे त्याने जगाला दाखवून दिले.
    आज अनेकजण विराट विरुद्ध शतक करण्याचा आटापिटा केला असे मीडिया सारखे बोलत आहेत. मोदीनी काहीही केले तरीपण चुकीचेच हे मीडियाचे नरेटीव जसे मीडिया सेट करते तसेच अनेकांच्या पोस्टमध्ये दिसते. विराटने शतक करण्यासाठी काहीही आटापिटा केलेला नाही. संघाला आणि स्वत:च्या शतकाला सारखे रन हवे असतील तर कोणताही फलंदाज दोन्ही पूर्ण करायचा प्रयत्न करेलच ना? Running between wickets उत्तम घेऊन, शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन strike स्वतःकडे ठेवली. एक रनसाठी जर विराटने राहुलला एक ओव्हर टूकुटुकु खेळून काढायला लावली असती तर तो शतकासाठी आटापिटा करतोय असे म्हटले असते,पण रनरेट कमी न करता उलट त्याला गती देत पुढच्या ओव्हर मध्ये strike घेऊन शानदार षटकार ठोकून शतक करणे यालाही धाडस हवे ना ?या शतकाने तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून अजून फक्त एक शतक दूर आहे, उलट wide टाकायचा प्रयत्न करून बांगलादेश बॉलरने मनाचा कोतेपणा दाखवला. विराट कोहली व संपूर्ण भारतीय टीम एकजूट होऊन खेळत आहेत ,आपापसातील हेवेदावे आता दिसत नाहीत आणि हेच या संघाचे यश आहे.आता हे काहीजणांना आणि देशद्रोही विचाराना बघवत नाहीये यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पण भारतीय टीम आणि सर्वच फलंदाज यांना भरपूर शुभेच्छा, विराट कोहलीने या विश्वचषकात सचिनचा विक्रम मोडून ३-४ शतक अजून करावेत हीच सदिच्छा.
- निलेश जोशी