Saturday, December 22, 2018

गझल - भलभलते सांगतेस

तू जन्माची भूल तरीही,
      तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी,
      केवळ हे गझलेचे तारण
असेल माझे चुकले तेव्हा,
      तोल जायला नकोच होता
कशास उकरूनी काढतेस तू ,
      नवीन मुद्दे जुनेच भांडण

भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस ।धृ।

रोज फक्त हासतेस , एवढे कसे पुरेल ?
सांग कधी मजसाठी ,चांदण्यात थांबतेस?

क्षणभर थांबून गडे ,मोज जुने ओरखडे
घाव नवे त्यावर तू ,मीठ किती सांडतेस ?

हे कबूल मी चुकलो ,ऐक जरा बाई ग
तेच तेच दळण पुन्हा ,तू कशाला कांडतेस

घरट्यातच रमणारी ,अबला तू पूर्वीची
आता तू जिद्दीने, सागर ओलांडतेस

गझलकार - मधुसूदन नानिवडेकर ,कणकवली

Monday, October 29, 2018

अनुभूती

सद्गुरू दर्शन

आज आलेली सद्गुरू दर्शनाची एक अद्भुत अनुभूती.
मी पांडुरंग जोशी ,चिंचवडला राहतो .माझे घर चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्याच्या एकदम समोर ,या वाड्यात मोरया गोसावी यांना मिळालेली तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती आहे .
मागील 4-5 दिवस खूप अवस्थ होतो ,एकतर कंपनीतील व्याप ,त्यात ऑडिट होते म्हणून अजूनच वाढलेली कामे आणि त्यात व्हायरल फिवरने विकनेस आलेला ,सुट्टी घेऊ शकत नाही म्हणून गोळ्या घेऊन कामावर जायचो ,आल्यावर ग्लानी आल्यसारखी झोप यायची ,त्यात नामास्मरण रोजच्यासारखे होत नव्हते ,चालत्या गाडीत ओम बीजक्षर असलेला जप करू नये असे ऐकल्यामुळे असेल , कंपनीत येता जाता होणारा जप सुद्धा बंद झालेला. त्यात सद्गुरूची कृपा आहे पण सद्गुरूना अपेक्षित असलेले नामस्मरणही आपण करू शकत नाही अशी बोचणी लागून राहिलेली.
मागील आठवड्यात माझे व पत्नीचे बोलणे झालेले की रोज मंगलमूर्ती दर्शन घेतले की सद्गुरू दर्शन घेतल्यासारखेच आहे ,थोडक्यात काय मनाला पटत होते सर्व पण प्रत्यक्षात घडत नव्हते.रोज कंपनीतून येताना youtube प्ले केले की सद्गुरूंचे जो सत्संग येईल तो पूर्ण ऐकायचा ,तसाच कालच सद्गुरू वियोग विषयावर बोलले आणि  कालच मनातील सद्गुरूंनी मार्गदर्शन करून सर्व शंका फिटल्या व पुनः जप चालू झाला.
आज कामावरून येताना वाड्यात दर्शनाला जायचे मनातही नव्हते पण वाड्याच्या अगदी जवळ आलो आणि मनातून सद्गुरूंचा एक आवाज ऐकू आला ,ये वाड्यात दर्शन घ्यायला . मी वाड्यात गेलो ,लॅपटॉप बॅग बाहेर ठेवली व छोट्या मंदिरात शिवशंकर ,मारुती ,देवी व गणपती यांचे दर्शन घेतले व वाड्यात मोरया मूर्तीच्या समोर उभा राहिलो ,मनापासून हात जोडले ,प्रार्थना केली व अंगारा लावायला गेलो ,अंगारा लावून पुन्हा मोरया तांदळा स्वरूपातील गणेशाला नमस्कार केला तर काय आश्चर्य त्या तांदळा गणपतीच्या आज्ञाचक्राच्या इथे लाईट फोकस पडला होता त्यात सद्गुरू काकामहाराज यांचे दर्शन घडले ,तीच हसरी मूर्ती व हात वर करून आशीर्वाद देत आहेत अशी पोज ,बघत राहवेसे वाटत होते पण अचानक अंतर्मनातून निघायची आज्ञा आली. मी तिथून कोठारेश्वर दर्शन घेऊन आलो पण आश्चर्य म्हणजे 2 -3 दिवसात जे कमी मनात किंतु परंतु होते ते सर्व त्या दर्शनाने विरून गेले .
सद्गुरू काकामहाराज याना त्रिवार वंदन , आपली कृपादृष्टी आहे आमच्यावर पण मला मात्र तुम्हाला अपेक्षित असलेले नामस्मरण करण्याची बुद्धी द्या व शक्ती द्या. जसे आज आपण दर्शन दिलेत तसेच रोज दर्शन द्या म्हणजे मी इकडे चिंचवडला राहूनही आपले दर्शन रोज घेत जाईन.
सद्गुरू काकामहाराज आपल्या चरणी सदैव नतमस्तक
आपल्या सदैव कृपाछायेत न्हाऊन जाणारया माझ्यासारख्या अनेक भक्तांना असेच दर्शन देत राहा व अनुभूती देत राहा हीच कळकळीची विनंती.

Saturday, August 4, 2018

ऑगस्ट

आला आला ऑगस्ट आला
बेगडी प्रेमाचा महिना आला
देशप्रेमाला उधाण येईल आता
15 ऑगस्ट जवळ आला

14 ऑगस्टपर्यंत सगळे उत्सुक
स्वातंत्र्यदिन सोहळा अचूक
अर्धी जनता सुट्टी म्हणून खुश
बच्चेकंपनी परेडसाठी उत्सुक

मोबाईल गॅलरी आता फुल्ल
तिरंगाच्या फोटोनी सजतील
जवान आता सॅल्युट घेतील
बलिदानाच्या कथा गाजतील

प्रत्येक चॅनेल व रिऍलिटी शो
देश भक्तीपर गाणी डान्स शो
जुने नवे देश भक्तीचे उमाळे
नवीन चित्रपट प्रीमिअरचे वारे

जागृत होईल बंधुत्वाची भावना
तुझ्या माझ्यापेक्षा देशच मोठा
देश पुढे न्यायला वचनबद्धता
सोसायटीत झेंडावंदन सोहळा

सगळा एक दिवसाचा मामला
पुन्हा चालू होईल तुला , मला
बेगडी प्रेमाचा हा सोहळा
अतिदेखणा परंतु तात्पुरता

प्रत्येक दिवस देशाचा का नाही
प्रत्येक दिवस बंधुत्वाचा का नाही
जवानांचा पोलीसांचा का नाही
इतर वेळी झेंड्याला मान का नाही

देश जर माझा आणि मी देशाचा
दंगळीवेळी व्हावा विचार याचा
कोणाचे नुकसान व त्रास ज्याला
का त्रासले मी माझ्याच भावाला

सैनिक ,देश याकडे पूर्ण दुर्लक्ष
इकडे मीच कसा पुढे याकडे लक्ष
मला फायदा होईल यासाठी दक्ष
देव नेते वाटून घेतले हीच याची साक्ष

                                     ---- निलेश जोशी

Thursday, April 5, 2018

कशाला ?

नवीन गझल लिहिण्याचा प्रयत्न केलाय ,अभिप्राय नक्की द्या.

योग्यच न्याय, तो तुरुंगात गेला
त्याच्या दानाचे, हे कौतुक कशाला?

प्रत्येक कडी साखळीचा दुवा
त्यात उणादुणा भेद कशाला?

कर्म चक्र हे फिरवी प्रत्येकाला
सुख दुःख प्रारब्द, सल कशाला?

सकारात्मकता हा एकच हो मंत्र
तो विश्वास असता ,भय कशाला?

भलेच केले ,करतो ,करणार
सत्कर्मफळाची त्या घाई कशाला?

कमळ डुले जळी, मोठ्या झोकाने
हाताने त्या तोडण्या, घाई कशाला?

दगड स्वभाव, बदल अशक्य
आपटून डोकयाला, इजा कशाला?

मुक्तछंद ही विचारांची रचना
काफिया युक्त ही, गझल कशाला?

पारखून घेणे ,स्वतःच स्वतःला
स्वसंवाद करुनी, शोधू स्वतःला

                     -- निलेश जोशी

Saturday, February 24, 2018

गुलाबजाम -परीक्षण

गुलाबजाम

राधाच्या मेसच्या डब्यातील गुलाबजाम जेंव्हा आदित्य पाहिल्यादा तोंडात टाकल्यावर  डोळे मिटून लहानपणी आईने चारलेला घास आठवत राहतो तिथेच हा सिनेमा ओढ लावतो चविष्ट खायला आणि खिलवायला आवडणाऱ्या सर्वांनी बघावा असा चित्रपट अस एका वाक्यात परीक्षण करणंच योग्य होत खरतर .पण हा चित्रपट आहेच इतका रसाळ की परीक्षण नको शब्दांतुन व्यक्त होणे म्हणूया हवे तर.. असो

आदित्य लंडन फ्लाईट मधून उतरून आपले पॅशन जपायला पुण्याला आलाय,त्याचा पुण्यापर्यंत रेल्वे प्रवास .मित्राच्या रूमवर राहायला आल्यावर सर्वाना मासे खिलवणे व मराठमोळा स्वयंपाक शिकवायला कोण गुरू आहे का याचा शोध घेतानाच राधा आगरकर यांचा डबा खाऊन याच माझ्या गुरू असा जिद्दीला पेटणारा आदित्य
हयातील बरेच प्रसंग आपण ट्रेलर मध्ये बघितले आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने साकारलेली बुच्चन राधा आगरकर मस्तच ,फणसासारखी
शिष्य व्हायला सगळी कामे करावी लागतील असे म्हणणे. "पोपट, गाढवा लवकर कामे करा" आणि "पोपट कधी गाढव असतो का?"  तसेच आदित्य शिष्य होऊन कामे करतोय व
राधाचे संवाद "आवरा" ओठावर हसू आणणारे.
हळू हळू गंभीर होणारा चित्रपट व त्यानंतर उलगडत जाणारी व्यक्तिमत्वे.
            तुझं वय किती आहे?त्याचा प्रश्न.
तुझं किती आहे वय?तिचा प्रतिप्रश्न...माझं होय माझं सत्तावीस, मग ती म्हणते- मग माझंही असेल की तेवढंच,या संवादानानंतर आदित्यच राधाकडे भांबावून बघणे म्हणजे आपल्याही मनातील घालमेलीच चित्रण होतंय असं वाटायला लागण्याजोग..
मुलींना कायम वय विचारलं जात आणि ९९% मुली आपलं वय विचारलं की चेहेऱ्यावर जे भाव आणतात अगदी तसेच भाव राधाच्याही चेहेऱ्यावर पण ती नेमकं वय का सांगत नाही याचं कारण मात्र त्या ९९% मुलींसारखं नाहीच ते वेगळं आहे.काय आहे हे सिनेमा बघून अनुभवणं हे जास्त चांगलं होईल.
        गुलाबजाम,हा चित्रपट पाककलेच्या पुस्तकावर पडत जाणाऱ्या शीर्षक नामावलीपासून आपलं वेगळेपण जपत जातो.हळुवार उलघड जातो.
एक्कलकोंड्या आणि स्वतःच्या ध्येयाच्या विश्वात गुंग असणाऱ्या माणसांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायला जितीजागती माणसंच लागतात अस काही नाही.
आदित्य मासळीबरोबर बोलतो,शेंगदाण्याचे कूट करण्यापूर्वी टरफले काढता ,काढता शेंगदाण्यांबरोबर बोलतो.तेंव्हा त्याच्याबद्दल,त्याच्या स्वभावाबद्दलचे एक एक कंगोरे आपल्याला माहीत होतं जातात.
     राधा आणि आदित्य या प्रमुख व्यक्तीरेखांसोबत आपण गुलाबजाम चा रसास्वाद घेत जातो.पाककला हा मुख्य विषय...
जगातील सर्वात आवडती भावना काय तर भूक.
स्वयंपाक ही कला चिरंतन आहे असे संवादांचे स्वगत.

पदार्थ बघून भूक चाळविली जाते आणि समोर उत्तम संवाद व चलचित्र व सर्वोत्तम अभिनय यात आपण गुंतत जातो.
     आठवणी नाहीत म्हणून रडू येत नाहीत,पण तू  का रडतोयस अस राधा, आदित्य ला विचारतेय की आपल्याला अस वाटणारे आणि हळवं करणारे प्रसंग..संवादही कधी खमंग फोडणी दिल्यासारखे आणि कधी साखरपेरणी म्हणजे काय असते हे जाणवून देणारे तर कधी एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याला आवडता पदार्थ करीत असताना चेहेऱ्यावर जे कोणत्याही व्याख्येत बसणार हासू असत ना तस अगदी तसच हासू आणणारे संवाद.

देवाने माझ्याकडून फार मोठी किंमत चुकवून मला आठवणीतून मुक्त केलं आहे हे ऐकल्यावर आपल्याला आठवणी आहेत म्हणून आनंदी व्हायचं की त्या बोचतात म्हणून हळवं काही कळत नाहीच.
     आजारपणातही आदित्यने केलेला स्वयंपाक चाखून राधाने दिलेल्या टिप्स पाहून मजा येते.काही स्वागत संवाद तर निव्वळ quote प्रकारचे आहेत.

काही प्रसंग एवढे सही आहेत जसे vfx माध्यमातून गल्लीच्या भिंतीवरील रेसिपी,
मूळ कथेला कलाटणी देणारा अपघात व त्याचवेळी पार्श्व्वसंगीताला वाजणारी सनई मनाला चटका लावणारी,
वदनी कवळ घेता हे बॅकग्राउंड गीत,
भूतकाळ समोर आल्यावर राधाची होणारी चिडचिड व त्रागा,
लॅपटॉप टाकल्यावर आदित्यचा पॉसिटीव्ह दृष्टिकोन , आदित्यने मी लंडनला गेल्यावर तुझे काय होईल म्हणून केलेला धाडसी प्रयत्न , क्रिएटिव्हिटी आणि उद्यमशीलतेतून उभारलेला युनिक बिजनेस, दिवाळीतील प्रसंग-----निव्वळ लाजबाब व यासाठी सचिन कुंडलकर यास 100 पैकी 100 गुण.

तेव्हा सर्वानी नक्की बघा व अनुभवा --गुलाबजाम.
--निलेश जोशी
       

Friday, February 9, 2018

हास्य टेन्शन फ्री

हसलात ना ? हसलात ना?
हसा हसा मनसोक्त हसा
आमच्यावर लोकशाही पद्धतीने
निर्णय घेणारात तुम्ही
त्यामुळे थोडा विरंगुळा हवाच
6 तासात निदान 5 तास तरी
हसायलाच हवंय
कारण शेवटी जनता कुठे आहे?
मतदान केले निवडून दिले
"दान" दिले ते दिले
त्याच्याकडून अपेक्षा नसते ठेवायची
ही भारतीय संस्कृती जपतोय आपण
तंतोतंत अगदी मनापासून

हसून हसून शेरेबाजी करून
वेळ उरला तर तुमचे ते
बिल पास करूया ,संमती देऊया
पण यात जनतेचा काय फायदा होणार
त्यापेक्षा विरोधाला विरोध कसा करता
येईल यांवरच डोळा ठेवूया

मी हसणार मग इतर त्याला उपमा देणार
कोणीतरी आगीत तेल ओतायला
रामानंद सागरकृत व्हिडीओ टाकणार
त्या व्हिडिओत शुर्पणका असंणार
त्यावरून राजकारण तापणार
विरोध निषेध संसद बंद

आमच्या निषेधाला संपाला मात्र
बेकायदेशीर ठरवणे तुमच्या हातात
आणि तुमचा गोंधळ फक्त आम्ही
बघायचा मोबाईलवर साईटवर
त्याला नवे ठेवणारे आम्ही कोण
आम्ही मतदार लोकशाहीचा पाया
पायाच्या पाया पडायचं आहे 2019
तोपर्यंत आहे दीड वर्ष हातात
तोपर्यंत मनमुराद हसून घेऊया
जोक करूया जगाला आदर्श ठेवूया
जगातील मोठ्या लोकशाहीची संसद
कशी असावी याचा वस्तुपाठ घालूया

पक्ष कोणीही असो सत्तेत असो
वा विरोधी बाकावर असो
काय फरक पडतो
इतके काय मनाला लावून घेता लेको
काम करा कर भरा जीवनाचा आनंद घ्या
फिल्म्स बघा ,व्हाट्सअप फेसबुक आहेच
सण आहेत समारंभ आहेत जल्लोष करा
तुम्ही मजा करा आम्ही मजा करतो
आपले संरक्षण करायला सीमेवर सैनिक आहेत
आणि वेळोवेळी त्यांना शाबासकी द्यायला
15 ऑगस्ट 26 जानेवारी आहे
सर्व सेट आहे मित्रानो सर्व सेट आहे
फक्त तुम्ही रोजचे जीवन रडत खडत जगा
आम्ही तुमच्यासाठीच संसदेत निर्णय घेतोय
फक्त एकच विनंती तुम्ही मजा करताय ना
आम्हालाही हसू द्या आम्हालाही हसू द्या
              -- निलेश जोशी

Tuesday, January 16, 2018

पुनःशस्त्रक्रिया #दिव्यानुभव

#दिव्यानुभव

आज बरोबर एक वर्ष झाले,मागच्या 17 जानेवारीला माझे दुसरे ओपेरेशन झाले.याआधी मी पोस्ट केल्याच आहेत की दोनचाकीवर अपघात झाला व तेव्हा हाताच्या फ्रॅक्चरवर रॉड टाकावा लागला.तेव्हा रिकव्हर झालो व कामावर जॉईन झालो.त्यांनतर 6 महिन्यांनी पुन्हा हातात दुखायला लागले व साधे पेनही उचलण्याची ताकत नव्हती.xray काढल्यावर समजले की आधीच्या रोडचे स्क्रू बाहेर आलेत व पुन्हा ऑपरेशन करावेच लागेल.आधीच सुट्ट्या झाल्याने आर्थिक स्थिती नाजूक त्यात पुन्हा ऑपरेशन व रिकव्हरी रेस्ट परवाडणारी नव्हती तरीही आवश्यक कारण डॉ म्हंटले जास्त उशीर केला तर ते स्क्रू त्वचेतून बाहेर येऊ शकतात व परमनंट अपंगत्व येऊ शकते. उजवा हात असल्याने अजून टेन्शन. त्याचदरम्यान मला विचित्र स्वप्न पडू लागली की ऑपरेशन चालू असताना माझी शुद्ध हरपली व मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्याने मी कोमात जातोय etc etc.
खूप घाबरलो ,आता फक्त स्वामी आधार होते व त्याच दरम्यान आपले समूह सदस्य सचिन यांच्याशी मेसेंजरवर बोलणे झाले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमान वडवानल स्तोत्र वाचायला लागलो.16 जाने.ला ऍडमिट झालो व मी व बायको एकमेकांना धीर देतोय. स्वामीकृपेने जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी दाखवली हॉस्पिटल ला , तेव्हा त्यांनी मेडिक्लेमसाठी अर्ज केला. मला वाटत होते की माझी पॉलिसीवर 1 लाखाची मर्यादा आहे कारण याआधीच्या सर्व बोलण्यात एक लाख शब्द वापरलेला ,पण हॉस्पिटल मेडिक्लेम टीमने  त्यांच्या कम्प्युटर डेटानुसार माझी पॉलिसी मर्यादा 10 लाख आहे असे सांगितले (स्वामींनी एक शून्य वाढवले बहुतेक) व सर्व रिपोर्ट्स त्यांना पाठवल्यावर  आधीच 4 लाखपर्यंत मंजूर झाले व अजून काही कोम्प्लेक्सिटी आली तर वाढवून मिळेल असे लेटर होते.आता पैश्याचे काही टेन्शन नव्हते.व डीलक्स रूम मिळाल्याने जास्त टेन्शन नव्हते.
ऍडमिट झालो तर डॉ म्हणाले काही चाचण्या करून त्याच्या रिपोर्टनुसार ऑपरेशन डेट ठरवू. लगेच ब्लड,युरिन सॅम्पल घेतले.xray व इतर चाचण्या पुन्हा केल्या व संध्याकाळी आम्ही निवांत होतो. रात्रौ 9 वाजता नर्स म्हणाली ,आता पेशंटने काहीच खायचे नाही ,पाणी प्यायचे नाही सकाळी 7 ला ऑपरेशन आहे,सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत.
आम्ही अचंबित आणि टेन्शन मध्ये ,मी तर रात्रीच जप चालू केला व वडवानल स्तोत्र पाठ चालू केले.सकाळ झाली ,8 वाजले तरी कोणी येईना म्हणून विचारले तर सकाळची 3 ऑपरेशन उशिरा चालू झाली त्यामुळे माझे साधारण 10 ला होईल ,10 चे 11,12,1 झाला व 1 वाजता मला घेऊन गेले. प्रिपेर्शन रूम मध्ये पुन्हा पाऊण तास गेला व नंतर ऑपरेशन थिएटरला नेले तर तेथील मावशींनी रिपोटचा चुकीचा वापर केला आणि टेबल तिरक्या दिशेने लॉक झाले. माझ्या भुलीची सर्वच तयारी झाली होती. पुन्हा मला प्रिप्रेशन रूमला आणले,20 मिनिटांनी पुन्हा थिएटर ,या सगळ्या वेळेत खूप टेन्शन आले ,मनातल्या मनात जप चालूच होता व एकदाची मला भूल दिली.ऑपरेशन झाले व 8 तासांनी शुद्धीवर आलो,डॉ पण भेटून गेले व दुसया दिवशी जे काही समजले ते हादरावणारे होते व स्वामीकृपा अनुभवायला मिळाली. मनोमन स्वामींचे आभार मानले.
डॉ च्या मते ,माझ्या हाताच्या नसा ,शिरा मॅच होणे खूप महत्वाचे होते व ते नसते झाले तर अपंगत्व येऊ शकले असते ,त्यांच्यामते दुसऱ्या शस्त्रक्रियेत हा धोका जास्त असतो. माझा हात ,बोटे आता छान मूव्ह होत होता.
आधीचा रॉड काढण्यात खूप प्रॉब्लेम आलेले व डॉ ना टेन्शन की माझी भूल नको उतरायला,
3 तासाचे ओपेरेशन साडेपाच तास चालले म्हणून घरचे टेन्शन मध्ये होते,
ऑपरेशन संपल्यावर अचानक सर्वची धावपळ झाली कारण माझा श्वास अपुरा पडत होता व ऑक्सिजन लावावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान माझे बीपी व शुगर एकदम वाढली होती त्यामुळे 2 वेळ भूल डोस बदलून द्यावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान जुन्या रॉडचे स्क्रू निघत नव्हते ,स्लिप झाल्याने व रक्तस्राव खूप झाला ,5 बाटल्या रक्त द्यावे लागले.
सर्वांच्या मते खूपच क्रिटिकल ऑपरेशन पार पडले व डॉ म्हणाले माझ्या 10 वर्षातील एक चॅलेंजिग ऑपरेशन होते.
थोडक्यात स्वामी कृपा व हनुमान वडवानल स्तोत्र प्रभावाने मी यातून सहीसलामत बचावलो होतो व आता हात व्यवस्थित असून नित्य कामे करताना काहीही त्रास होत नाही.
श्री स्वामी समर्थ,ओम् श्री साईनाथाय नमः
-- निलेश जोशी

शंकर महाराज दर्शन

श्री. शंकर महाराज यांनी फोटोतून दिलेले दर्शन.

श्री. शंकर महाराज पुण्यात एका घरी फोटोतून दर्शन देतात असे एकांकडून कळले. म्हणून मी, आई आणि बाबा पुण्यात श्री. धनंजय बापट यांच्या घरी गेलो.

रात्री ८ च्या सुमारास आम्ही त्यांच्याघरी गेलो. त्यांच्या घरी श्री. शंकर महाराजांची एक तसबीर आहे. त्या फोटोच्या डाव्या बाजूला श्री. स्वामी समर्थांचा एक फोटो आहे. तर श्री शंकर महाराजांच्या फोटोच्या उजव्या बाजूला ज्ञानेश्वर माउलींचा एक फोटो आहे.

खोलीतील दिवे बंद झाल्यानंतर फक्त श्री. शंकर महाराजांच्याच फोटोतून प्रकाश येतो. ह्या प्रकाशाचा रंग पांढरा होता. त्यावेळी बाकी कुठलाही फोटो दिसत नाही. महाराजांकडे एकटक बघताना महाराजांच्या डोळ्यांची बुब्बुळे हालताना दिसतात. तर त्यांच्या फोटोतला प्रकाश फिरताना दिसतो. फोटोखाली एक लाल रंगाचे मऊ कापड आहे. त्या कापडावर ॐ अक्षर उमटलेले दिसले. महाराजांना जे केशरी अष्टगंध लावलेले होते ते, दिवे बंद झाल्यानंतर रक्तासारखे लाल झालेले दिसले.

महाराजांच्या फोटोला एक हार घातलेला होता. तो हार दिवे बंद झाल्यावर बाजूला केला असता, त्या हाराची सावली फोटोवर जशीच्या तशी उमटलेली दिसली.

हा अनुभव मलाच नाही तर खोलीत उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना आला.

महाराजांच्या फोटोतून ३०,००० watt ऊर्जा प्रक्षेपित होते, असे एका शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे.

हे दर्शन सर्वांसाठी खुले असते.

आपल्याला दर्शनाचा लाभ घायचा असल्यास पुढील पत्त्यावर जावे.

श्री. धनंजय बापट
दुसरा मजला, भारत भवन बिल्डिंग,
बाजीराव रोड मार्ग,
सरस्वती शाळेच्या मागे,
पुणे.

संध्याकाळी ७.०० ते ७.३० प्रार्थना असते. प्रार्थना झाल्यानंतर थोडया वेळाने खोलीतील दिवे बंद केले जातात. आणि मग महाराज फोटोतून दर्शन देतात.

Sunday, January 14, 2018

यशाचे रहस्य #निलउवाच

यश म्हणजे काय? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी. काहींसाठी पैसा हा मापदंड तर काहींसाठी समाजात मानसन्मान महत्वाचा.
याशिवाय जोडलेली मित्रमंडळी आणि भरपूर कर्तृत्व म्हणजे यश.त्याबरोबरच
व्यक्तिगत व व्यावसायिक संदर्भात यशाच्या संदर्भातील धारणा म्हणजे काहीच्या मते अधिकाधिक उद्दिष्टपूर्ती साध्य करणे. कुणाच्या मते व्यक्ती वा व्यावसायिक संदर्भात ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करणे म्हणजे यश व काहीच्या मते व्यक्तीचे आपल्या आयुष्यात इतरांना आपापल्यापरी व यथासंभव मदत करणे म्हणजे यश.
यावरूनच ‘यशा’चे वेगवेगळय़ा संदर्भात अर्थ स्पष्ट होतात.
असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते , 80% हे वाक्य खरेही आहे कारण एका व्यक्तीला,पुरुषाला घडवण्यात त्याची आजी,आई ,बायको ,बहीण सर्वांचा हातभार असतोच .पण त्याचबरोबर या स्त्रीशक्तीसोबत अनेक पुरुष सुद्धा त्यांचे योगदान देत असतात जसे आजोबा,वडील,भाऊ,शिक्षक,मित्र व अनेक आजूबाजूचे लोक.
या सर्वांच्या मदतीने किंवा सहभागाने खरं तर माणूस अनुभवाने मोठा होतो,समृद्ध होतो आणि हाच अनुभवांचा ठेवा त्याची वाटचाल यशस्वीतेकडे करतो.
काल एक हिंदी वाक्य वाचले व त्यावरून वरील सर्व सुचले,ते वाक्य होते, "वोह धागा ही था जिसने छिपकर पुरा जीवन मोतियों को दिया और ये मोती अपने तारीफ पर इतरते रहे उम्रभर"

किती वास्तववादी आहे ना हे वाक्य, मोठे मोठ्या व्यक्ती जसे पु.ल.देशपांडे,अब्दुल कलाम ,नारायण मूर्ती ,सावरकर ,टिळक,आंबेडकर,ज्योतिबा फुले,विवेकानंद,गांधीजी हे सर्व म्हणजे त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्वाने मोतीच आहेत पण त्यांच्या मोत्याच्या झळालीला एकत्र गुंफून ठेवले त्या मागील अनेक व्यक्तींनी ,विशेष करून महिलांनी.
"आहे मनोहर तरी" सारखे पुस्तक वाचले की हे विशेष जाणवते. शेवटी या धाग्याचे महत्वाचे काम करणाऱ्या असंख्य व्यक्तिमत्वांना ना विसरता त्यांनाही मोतीच्या माळेने महत्व नको का द्यायला? कारण स्पष्ट आहे जेव्हा हा धागा तुटेल तेव्हा मोती विखुरले जातील आणि क्षणात मातीमोल होतील. आपल्याही आयुष्यात अशी धाग्याची माणसे आहेतच ,त्यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांनाही आपण  आपल्या आयुष्यात सर्वोत्तम मान देऊया, कृतज्ञता व्यक्त करूया व नेहमी या धाग्यांचे महत्व लक्षात ठेवूनच वागूया. काय पटतंय ना?
-- निलेश जोशी

Monday, January 8, 2018

बोल बच्चन #निलउवाच

बोल बच्चन #निलूउवाच

किती बडबड चालली आहे रे ,जरा गप्प राहा की ,नुसती टकळी चालू ,नशीब त्या देवाने ते तोंड चामड्याचे बनवले ,मातीचे बनवले असते तर आतापर्यंत फुटून गेले असते -- थोरामोठ्यांचे उद्गार

असे उद्गार ऐकत मोठे झालो आपण ,हमखास आयुष्यात हा संवाद ऐकला नाही याला अपवाद फार कमी असतील ,जे इतर अपवादात्मक असतील जे अपंग किंवा दिव्यांग श्रेणीतील .
पण खरंच नीट बघितले तर किती बोलतो आपण दिवसभरात ,महिन्याभरात ,वर्षभरात . हे सिद्ध झालेय की 70% बडबड ही अनावश्यकच असते आणि उरलेल्या 30% बडबडीला 10% मध्ये संपवू शकतो पण तरीही आपण बोलतो .
संवाद साधणे आणि त्यासाठी बोलणे हे आवश्यकच पण किती बोलणे हे आपल्या हातात आहे की नाही?
मला तर अशीच वाईट खोड होती की कोणी काही विचारले तर त्याचे उत्तर सविस्तर द्यायचे म्हणजे त्याचा इतिहास ,मला कसा समजला , माझे मत ,इतरांचे मत आणि मग एकदम शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर , पण यात वेळ वाया गेलाच बरोबर समोरचा माणूस वैतागून जाण्याचा धोका अधिक. पण नंतर समजायला लागले की सगळे थोडक्यात व सुटसुटीत पाहिजे तेवढीच माहिती देता येतेच आणि त्यासाठी पाल्हाळ लावायची काहीच गरज नसते .
8-9 वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकर यांची मुलाखत ऐकली मालाड वाचनालयात. पाडगावकर महणजे बडबडगीते व बोलगीतांचा बादशाह. तसे मराठी साहित्यात पाडगावकर, विंदा ,गदिमा ,शांताबाई यांची बडबडगीते खूप प्रसिद्ध आहेत पण मंगेश जी त्या मुलाखतवजा कार्यक्रमात म्हणाले "बडबडगीते म्हणजे काय? तर मुलांचा चाळा ,त्यांना नवीन बोलायला आलेले असते मग बडबड करत राहायची ,त्या सवयीत गीते लिहिली म्हणण्यासाठी तर झाली बडबडगीते .बोबड्या बोलतील गाणी म्हणूया हवे तर....
बडबडमध्ये बड शब्द दोनवेळा आला ज्याला स्वतंत्र अर्थ काहीच नाही पण मग जेव्हा बड शब्द 2वेळा येतो तेव्हा तो निरर्थक शब्दही अर्थशील होऊन जातो".किती सुंदर विचार ना ?
असे हे बडबडणे आणि अशी माझी बडबड , अरे हो सांगायलाच विसरलो ,हे सगळे सुचले कशावरून तर खाली आलेल्या वाक्यावरून ,आहे इंग्रजीत पण एकदम अर्थपूर्ण

Speak only when your words are more beautiful than the Silence
जेव्हा शब्द हे शांततेपेक्षा सुंदर असतील तेव्हाच बोला

थोडक्यात काय
बडबड टाळा ,मौन पाळा
बडबडीला लावा टाळा
शांतता हीच सुंदरता माना
अनावश्यक बोलणे टाळा

-- निलेश जोशी

Sunday, January 7, 2018

असेच एक अफलातून परीक्षण

परिक्षण #निलउवाच

जाहिरात बनवणे आणि त्या लोकांना सतत दाखवून प्रॉडक्ट्स गळी उतरवणे ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ,पण त्याचा आजकाल अतिरेक होताना दिसतोय .
काही जाहिराती अश्या असतात की त्या पाहिल्या की लगेच तोंडातून "वाह" शब्द बाहेर पडतो पण काहींची खूपच कीव येते . कालच नवीन ऍड बघितली जे सर्दीवरील रब औषध बनवणारी फेमस कंपनी , तर त्यांनी म्हणे लहान मुलांसाठी बेबी नाव असलेले रब बनवलेय ज्यात मुलांना इजा होणार नाही असे ऍलोवेरा ,खोबरेल तेल घटक वापरून बनवलेय ,इथपर्यंत खूपच छान वाटते जाहिरात व मनात भिडतेही ,आपल्यालाही त्या इनोव्हेशन चे कौतुकही वाटते . कारण सर्दी ,खोकला,ताप असतो स्पेशली लहान मुलांना तेव्हा त्यांना व मोठयाना किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे.
जाहिरातीतील बाळ रब लावल्यावर शांत झोपते ,आई पण खुश वाटते ,मला वाटले जाहिरात संपली ,पण नाही ,रब च्या म्युसिक पीसला बाळ झोपलंय व मागे त्याचे आईबाबा नाचत आहेत असे दृश्य ,
खरोखर कीव आली ,आधीच्या 50 सेकंदात जो इम्पॅक्ट आलेला तो त्या 5 सेकंदात निघून गेला ,अरे नॉर्मल आयुष्य असे नसते यार ,आईबाबा मनातून खुश होतील पण ते दाखवायला नाच नाही करणार . खूप हसलो त्या जाहिरातीवर आणि मनातल्या मनात हसलोही.


अशीच एक दुसरी जाहिरात ज्यात कन्टिन्यूटी ची कमतरता आहे.आपण चित्रपटात कन्टीन्यूटी शोधतो तसच जर जाहिरातीत पण शोधायची ठरवली तर खुप त्रुटी मिळतील

उदा* एका प्रसिद्ध डिटर्जेंट कंपनीची जाहिरात,
आजोबा (रमेश देव) नातवाला सांगताहेत आम्ही लवकर परत येवू
नातू हिरमुसलेला तेवढ्यात त्याला ऐकू येते आजोबा बूट शोधत आहेत
नातू पळत पळत जाउन बूट शोधतो
बुटाना पॉलिश नसल्याचे लक्षात येताच स्वतः पॉलिश करतो अर्थातच पूर्ण पांढरा टी शर्ट व पैंट पॉलिशने काळी झालेली
आजोबा तारीफ करतात तर आजी कौतुकाने सुनेला म्हणते तुझ्या हातांचे काम वाढले
सुन अर्थात मुलाची आई म्हणते टीशर्ट वरील डाग काढणे सोप्पे आहे (अशी कौतुक करणारी आई फ़क्त जाहिरातीच दिसते खरी मिळणे दुरापास्तच)

नेक्स्ट 4 सेकन्द ग्राफिक्स च्या माध्यमातुन डिटर्जेंटचे कौतुक (दहा हातांची शक्ती वगैरे)

पुढील फ्रेम मध्ये आजोबा आजी आई मुलगा बाबा घराबाहेर
बाबा गाडीत बॅग चढवण्याचा प्रयत्न करताहेत
मुलगा म्हणतो बाबाना पण हवी दहा हातांची शक्ती
हे म्हणताना त्याचा टी शर्ट एकदम पांढरा सफेद पैंट पण स्वच्छ
म्हणजे आईने दहा हातांची शक्ती वापरली
शर्ट पैंट धुतली वाळवली
आजोबा आजी 5-6 थांबले व सर्व नीट झाल्यावर प्रवास चालु करणार

धन्य ती जाहिरात व धन्य ते कंट्यूयूटी पाळणारे दिग्दर्शक

(हा एक विनोद म्हणून घ्यावा ,त्या मुलाकडे तसेच 2  शर्ट पैंट होते अश्या कॉमेंट करू नयेत हाहाहाहा)

---निलेश जोशी

Saturday, January 6, 2018

आयुष्य #निलउवाच

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

आयुष्यावर बोलू काही ....#निलउवाच

आयुष्य म्हणजे काय ? कोणी म्हणेल प्रवास ,कोणी म्हणेल संघर्ष ,कोणी म्हणेल सुंदर पण खडतर वाटचाल तर कोणी म्हणेल अनुभव देणारा शिक्षक , गुप्तेच्या भाषेत आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे.

माझ्या मते दोन श्वासामधील अंतर म्हणजे आयुष्य ,हे दोन श्वास कोणते ? आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर घेतलेला पहिला श्वास ते मरण्यापुर्वी घेतलेला शेवटचा श्वास .
मधले सर्व अंतर म्हणजेच आयुष्य .
या अंतरातील प्रवासात काय नाही मिळत आपल्याला ? प्रेम ,माया ,ईर्षा ,उमेद ,अडचणी ,त्यावर केलेली मात ,त्यामुळे आलेला आत्मविश्वास ,कधी भीती ,कधी शहारा ,कधी रोमांच तर कधी आलेला सेटबॅक.
हे सर्व म्हणजेच आयुष्य आणि जसे जेवताना पंचरसयुक्त जेवण नसेल तर मजा येत नाही तसेच हे सर्व नसेल तर आयुष्य रुटीन होत जाईल व बेचव वाटायला लागेल.
या सर्व प्रवासात संकटे येणारच आणि अशा वेळी आपलीच माणसे ,मित्र ,नातेवाईक आपल्यामागे खंबीर उभे राहतात ,धीर देतात ,आपल्याला धीट बनवतात.
आयुष्य म्हणजे एक रंगमंच ,एक कॅनव्हास ,त्यावर कलाकृती सादर करायची पूर्ण मुभा ,त्यावर आपण कसे चित्र रेखाटतो व सादर करतो हेच तर आयुष्य ..
काही कॅनव्हास ब्लॅक राहतात तर काही रंगानी उजळून निघतात आणि अशीच आयुष्य मग स्मरणात राहतात पिढ्यांन पिढ्या त्यांचा वारसा चालत राहतो ,अविरत झिरपत जातो पुढील अनेक जन्मामध्ये पिढीजात वारशासारखा.
सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ,ते शिल्प घडवायला तुला अवसर दिलाय देवाने आणि त्यातून जे अद्भुत शिल्प म्हणजे आपले आयुष्य साकारेल तेही तुमची मेहनत आणि त्याला मिळालेली देवाची साथ असेल .
वरून खुप साधा पण गहन असा हा विषय म्हणजे आयुष्य.
मला आयुष्याबद्दल काय वाटते ,ते म्हणजे मला सुचलेले पुढील चार विचार

भूतकाळात पहा आणि त्यातून अनुभव (Experience)घ्या.
भविष्यात पहा आणि आशा(Hope)वृद्धिंगत करा.
वर्तमानात पहा आणि वास्तव (Reality)काय आहे ते बघा.
स्वतःमध्ये शोध घ्या आणि आत्मविश्वास (Confidence) शोधा.

लहानपणी झोक्यावर बसायचो ,त्यासमोर तुळईवरील लाकडावर एक वाक्य लिहिलेले होते ,
"हे ही दिवस जातील " म्हणजेच आज जर दुःखात असशील तर हेही दिवस जातील आणि सुख येईल ,अर्थात त्याच्याच उलट आता सुखात असाल तरीही हेही दिवस जातीलच ,म्हणजेच अनित्य आयुष्याचा एक भाग आहोत आपण आणि या सर्वासाठी मनाची तयारी करून सुंदर जीवन व्यतीत करणे म्हणजेच आयुष्य ,बरोबर ना?

-- निलेश जोशी
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂