Wednesday, February 15, 2017

तो व ती

तो व ती
एकाच बागेतील
झाडावरील
तो मोठा म्हणून
नाव गुलाब
ती लहान म्हणून
नाव कळी

खानदान ,घर,कुल
गोत्र एकच
शेवटी दोघेही
"पंछी एक डाल के"
एकाच रोपावर
विलसलेले ते दोघे

आज माळीबुवा
आले आनंदात
कळी निर्धास्त
कारण अजून काही दिवस
तिचा मुक्काम इथेच

पण गुलाब जाईल आज
पुनः एकटी होईन
या रोपावर पण
थोडेच दिवस
खालच्या फांदीवर
नवीन अंकुर फुटतोय
त्याच्यातून कळी होतेय

माळीबुवा शीळ घालत
आले रोपाकडे
गुलाब बघून स्मित करत
देठाकडे कात्री नेली
कळी घाबरली
माहितेय काय होणारे
तरी डोळे मिटून घेतले

"अरे ! पण हे काय"
स्वगत कळीचे
अजूनही जाणवतेय
आहे कोणीतरी
माझ्या देठाकडे काय
टोकेरी टोचतेय

गुलाब परडीत बसतोय
तोच कळी आली बाजूला
अरे आज या माळ्याला
काय झालंय
कळी का खुडली
गुलाब तरी होऊ द्यायचे ना?

शेवटी पैसाच जिंकला
व्हॅलेंटाईन डे का काय
डे असतो म्हणे
बाजारात गुलाबाना
खूप मागणी

शेवटी माळ्याचे काही
चुकलेच नाही
भावना जपून
पोट नसते भरत
आणि उद्या खुडणारी
कळी आज खुडली
मान्य कमी झाले आयुष्य
पण 4 रु किंमत
न येता 40 रु आली

कळी अस्वस्थ
गुलाब परेशान
ताटातूट माहितीच
पण आता ताण दोघांनाही
प्रेम पुढे नेण्यात
हातभार आपला
कि पाकळ्या विखरून
पुन्हा बलिदान

'त्या'ने घेतला गुलाब
विकत पैसे मोजून
इकडे 'ती'ही
तेवढीच अधीर
भेटायला 'त्या'ला
पण काय द्यावे

काय घेउ
द्यायला 'त्या'ला
हि कळी कित्ती
सुरेख आहे
"दादा ही कळी द्या"

"डार्लिंग हैप्पी
व्हॅलेंटाईन डे"
हातात गुलाब
'ति'ला केला नजर
'तिने'ही लाजून
मागील हात पुढे
घेतला थँक्स

हे घे माझे गिफ्ट
'तु'ला 'माझ्या'कडून
गुलाब आश्चर्यात
पाहतोय कळीकडे
होयं तीच
त्याची सवंगडी
कळी हसून पाहतेय

त्या दोघांना वाटतेय
व्हॅलेंटाईन डेला
आपणच एकत्र आलोय
इकडे मात्र
2 जोड्या व्हॅलेंटाईन
साजरा करताहेत
एक 'तो' व 'ती'
आणि
दुसरी तो व ती

तो व ती
एकाच बागेतील
झाडावरील
तो मोठा म्हणून
नाव गुलाब
ती लहान म्हणून
नाव कळी

-- निलेश जोशी

Wednesday, February 8, 2017

संचय

संचय म्हणता वृद्धी आली धन,अनुभव ,ज्ञानाची
ठिपका जोडून होते रेघ त्यालाही कारण बिंदूसंचय....

मित्र परिवार ज्ञाती सखे सोबती अपरिहार्य या जगती
अनोळखीही जोडून वाढे हि यादी,हाच तो मित्रसंचय..

क्षण कण वेचून,अनुभव जोडुनी,वाटचाल वार्धक्याची
ठेच वाचवी,करे शहाणा,नव्या पिढीला हा अनुभवसंचय

जुने फोटो,अनेक वस्तू तळातील जागा कपाटामधली
पुन्हा जागतो,अनुभवतो ते क्षण,पाहता हा वस्तू संचय

व्यस्त प्रमाणात वेळ व कामे,गोम हीच आयुष्यामधली
त्यातूनही थोडे व्यक्त होऊनी,वाढवूया स्मृतींचा संचय

क्षणाक्षणाने ठिबकत असते पखाल या आयुष्याची
थेंबाथेंबाने आठवणींचा वाढत असतो स्मरणसंचय.....

-- निलेश जोशी

Tuesday, February 7, 2017

मटार भेळ

हिरवे ( Yes, GREEN ) अथवा मटार भेळ

तयारी ला लागणार वेळ : 15 minutes
बनवण्याचा वेळ  : 10-12 minutes.

अंदाजे ३ जाणां साठी
सकाळी किंवा संध्याकाळ साठी
बनवण्यास लागणारे जिन्नस:
२५०-३०० gms* सोललेला ताजा हिरवागार मटार
२  माध्यम आकाराचे कांदे
२  बारीक चिरलेली मिरच्या  
१  टेबल  स्पून मोहऱ्या ,
१  टेबल स्पून जिरे
१/२  टेबल स्पून हिंग
१  टेबल स्पून   हळद पावडर
३-४   टेबल स्पून तेल  .
१/२  बाउल  खवलेला ओला नारळ
चिरलेली  कोथिंबीर  
१ रसाळ  लिंबू
सैंधव चवी नुसार 
नायलॉन शेव (हवी असल्यास )

कृती :
कांदा बारीक चिरावा
मिक्सर मध्ये मटार आणि मिरच्या अर्ध बोबड्या* वाटून घ्या (*एकदम बारीक नको)
कढई अथवा पॅन मध्ये तेल तापवा
चांगले तापल्यावर मोहरी, जिरे घालून - चांगले तडतडल्या वर हिंग , हळद घाला
लगेच मिक्सर मधला मटार आणि मिरच्या घाला 
एकदा सर्व एकत्र करा/ ढवळून घ्या , व झाकण ठेऊन वाफ काढा 
साधारण ५ मिनीटांनी चेक करा
जरूर असल्यास आणखी २-३ मिनिटे झाकण ठेवा
आता सैंधव चवी नुसार घालून चांगले एकत्र करा .
कोणाला जर थोडे ब्राउन हवे असेल तर जास्ती वेळ न परतता तसे होऊंद्या 

प्लेट मध्ये घेऊन , वरून चिरलेला कांदा , खोवलेला नारळ , चिरलेली  कोथिंबीर , हवी असल्यास शेव आणि वरून लिंबू पिळून सर्व्ह  करा .

हा पदार्थ बाहेर कुठे  मिळत नाही - माझ्या आत्याची खास रेसिपी आहे ( लहान पणीच्या आठवणी )- मी एका कूकिंग स्पर्धेत करून खिलवली होती - नक्कीच नवीन काही तरी सदरात आहे आणि सध्या हिवाळयात मटार चा हंगाम आहेच
--पोस्ट बाय श्रीनिवास जोशी

Saturday, February 4, 2017

जॉर्डन गोष्ट - स्वतःची किंमत वाढवा

मला खालील गोष्ट खूपच प्रेरणादायी वाटली म्हणून सर्वाना पाठवत आहे.

मायकल जॉर्डन हा 1963 मध्ये ब्रुकलिंन न्यूयार्क मधील एका झोपडपट्टीत जन्मला.त्याला 4 भावंडे होती व त्याच्या वडिलांची कामे एवढी कमी होती की सर्व 7 जणांचा महिनाभर उदरनिर्वाह होईल याची शाश्वती नसायचीच.तो वाढलाच अश्या परिस्थितीमध्ये जिथे नेहमीची झोपडपट्टीतील भांडणे व हिंसा बघायला मिळत व हे सर्व रोज बघून त्याला स्वतःचे भविष्य अंधःकारमय दिसू लागले.
त्याच्या वडिलांना मायकलमध्ये एक निष्क्रिय मुलगा दिसायला लागला व त्यांनी ही निष्क्रियता घालवायला काही उपाय योजयाचे ठरवले.त्यांनी एका सकाळी 13 वर्षाच्या मायकलला जवळ बोलावले व त्याच्या हातात एक वापरलेले कापड हातात ठेवले व त्याला विचारले "ह्याचे किती डॉलर मिळतील असे तुला वाटते ?"
जॉर्डन म्हणाला "कदाचित एक डॉलर"
त्याच्या वडिलांनी विचारले "हेच कापड तू 2 डॉलरला विकू शकशील का? असे केलेस तर आपल्या पूर्ण कुटुंबाला खूप मोठी मदत होईल "
जॉर्डनने मान डोलावली, "बाबा मी नक्की प्रयत्न करेन , पण मी किती यश मिळवेन हे देवालाच ठाऊक"

जॉर्डनने ते कापड काळजीपूर्वक धुऊन एकदम स्वछ केले , त्यांच्याकडे इस्त्री नव्हती त्यामुळे ते कापड नीट दिसण्यासाठी त्याने एका फळीखाली त्याला सरळ केले व उन्हात सुकायला ठेवून दिले.दुसऱ्या दिवशी ते नीटनेटके कापड घेऊन तो गर्दीच्या भूमिगत स्टेशनवर घेऊन आला व सहा डॉलरला विकू लागला पण शेवटी जॉर्डन त्या कापडाला दोन डॉलरला विकण्यात यशस्वी झाला व 2 डॉलर घेऊन घरी आला.यातून प्रेरणा घेऊन तो दररोज वापरलेले कापड शोधायचा व त्याला धुऊन,इस्त्री करून गर्दीत विकू लागला व वडिलांना मदत करू लागला.
साधारण दहा दिवसानी त्याचे वडीलानी पुन्हा त्याला एक वापरलेले कापड दिले व विचारलं "हे विकून तुला 20 डॉलर मिळवता येतील का? "
ताबडतोब जॉर्डन म्हणाला "कसे शक्य आहे? याचे जास्तीत जास्त 2 डॉलर मिळू शकतील"
त्याचे वडील म्हणाले "तू 20 डॉलरसाठी प्रयत्न का करत नाहीस?कदाचित मार्ग असतीलही, बघ स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव दे  "
जवळजवळ काही तास विचार केल्यावर जॉर्डनला एक कल्पना सुचली व आपल्या कुटुंबातील इतरांची मदत व कौशल्य वापरायचे त्याने ठरवले.
त्याने त्याच्या भावांची मदत घेऊन त्या धुतलेल्या व इस्त्री केलेल्या कापडावर डोनाल्ड डक व मिकी माउस रंगवून घेतला व श्रीमंत वर्गातील शाळेच्या परिसरात ते कापड विकण्याचा प्रयत्न करू लागला.काही तासात एक माणूस आपल्या मुलाला न्यायला आलेला होता त्याने ते कापड आपल्या दहा वर्षाच्या मुलासाठी वीस डॉलरला घेतले व शाबासकी म्हणून पाच डॉलर टीप म्हणून दिले. त्यादिवशी जॉर्डन खूप खुश झाला कारण पंचवीस डॉलर जॉर्डनसाठी खूप मोठी रक्कम होती व त्याच्या बाबांच्या महिन्याच्या कमाईएवढी होती.
खुशीत तो घरी आला व बाबाकडे पंचवीस डॉलर सुपूर्त केले , बाबांनी त्याला शाबासकी दिली व खूप कौतुक केले व म्हणाले "आता अजून एक कामगिरी देतो" असे म्हणून अजून एक वापरलेले कापड दिले व ते 200 डॉलरला विकायला सांगितले.
खुश झालेल्या जॉर्डनचे डोळे आपोआप विस्फारले गेले.
यावेळी मात्र जॉर्डनने ते कापड आत्मविश्वासाने स्वीकारले व धुऊन इस्त्री करून ठेवले व तो विचारपूर्वक वाट बघू लागला.
त्याने एक गोष्ट हेरून ठेवली कि दोन महिन्यांनी चार्ल्स एंजल्स या चित्रपट प्रमोशन साठी प्रसिद्ध तारका फराह फॉसेट न्यूयार्कला येणार होती. तिच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर गर्दीतून व सर्व पोलीस सरंक्षणातून तो तिच्याजवळ पोचण्यात यशस्वी झाला व तिला त्या कापडावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.जेव्हा फॉसेटने पाहीले कि एक निरागस लहान मुलगा स्वाक्षरी मागत आहे तिने आनंदाने त्या कापडावर ऑटोग्राफ दिला.
जॉर्डन खूप उत्साहाने व आनंदाने ओरडू लागला "याहू ! ही जर्सी जी स्वतः फराह फॉसेट या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने ऑटोग्राफ केलेले आहे व याची किंमत मी ठेवतोय 500 डॉलर्स , पण त्याला मिळालेली मागणी बघता त्याने त्या जर्सीचा लिलाव केला व एका बिजनेसमन ने ती जर्सी 1200 डॉलरला विकत घेतली."
घरी परतल्यावर त्याचे वडील खुश झाले व त्याचे यश बघून त्यांच्या डोळ्यातूनआनंदाश्रू ओघळू लागले व त्याला म्हणाले "जॉर्डन तू करून दाखवलेस पोरं , तू खरंच ग्रेट आहेस".
त्या रात्री जॉर्डन त्याच्या वडिलांसोबत झोपला , त्यावेळी त्याच्या बाबांनी विचारले ,"मुला ? तू तुझ्या अनुभवातून सांग , हे जे तीन वेळा वापरलेले कापड तू विकलेस त्यानुसार तू यशाबाबत काय शिकलास ?"
जॉर्डन म्हणाला ,"इच्छा आहे तिथे मार्ग आहेतच"
वडिलांनी मान डोलवत म्हटले,"तू म्हणतोस ते पूर्णतः चुकीचे नाही पण माझा उद्देश वेगळा होता , ही कामगिरी मी तुला यासाठी दिली होती ,तुला कळावे की एक डॉलर किंमत असलेल्या वापरलेल्या निर्जीव कापडाची किंमत वाढवणे शक्य आहे मग आपल्याबद्दल काय? आपण तर जिवंत व बुद्धिवान मानव आहोत , मग जरी आपणात वर्णभेद, गरिबी श्रीमंती असली तरीही आपली समाजातील किंमत आपण वाढवू शकतो का?"
हा वेगळाच विचाराने लहान जॉर्डन एकदम चमकला , एक वापरलेला कापडाची किंमत आपण वाढवू शकलो तर मग स्वतःची का नाही? असे एकही कारण नाहीये ज्याने मला स्वतःला कमी लेखावे लागेल.
या प्रसंगानंतर मायकल जॉर्डनला स्वतःला जाणवले की त्याचे भविष्य व आयुष्य सुंदर आणि अपेक्षांनी भरलेले असणार आहे.तो मेहनत घेत गेला व जगातील सर्वश्रेष्ठ बास्केटबॉल खेळाडू बनला.

मी माझी स्वतःची किंमत कशी वाढवू शकतो? हा विचारच एकदम जगावेगळा आहे आणि मला खात्री आहे या विचाराने तुम्हालाही झपाटून टाकले असेल.

तुमचा पुढील आठवडा असाच उत्साहपूर्ण व जगावेगळा जावो.

(मराठी अनुवादाचा पहिलाच प्रयत्न)
--निलेश जोशी