Sunday, June 14, 2015

संस्कृत क्रीड़ा -अक्षरशः शब्दछल

केशवं पतितं दृष्ट्वा
पाण्डवाः हर्षनिर्भराः ।
रुदन्ति कौरवास्सर्वे
हा हा केशव केशव ॥

सरळ साधा शब्दशः अर्थ पण अर्थात कोडयात पाडणारा

1) कृष्ण पडलेला पहिल्यावर पांडवाना आनंद झाला
सर्व कौरव मात्र रडू लागले
हे केशवा हे केशवा

म्हणजे कवी पांडव कौरव शब्द रचना करताना चुकला की काय असे वाटावे

पण शब्द संधी विग्रह केल्यावर येणारा अर्थ
केशव जर विग्रह केला तर के -शव  म्हणजे
     के (सातवे रूप कं शब्दाचे) - पाण्यात
     शव - मृत शरीर
           म्हणजे पाण्यातील मृत शरीर

पा अण्डवाः 
     पा - पाणी
     अण्डवाः - जे अंडयापासुन जन्म घेतात
म्हणजे पाण्यातील मासे जे अंडयापासुन जन्म घेतात

कौ रवाः 
     कौ - कौ कौ अर्थात भयानक
     रवाः - असे आवाज करणारे म्हणजे कावळे
             कावळे भयानक गलबलाट करू लागले

2) मृत शरीर पाण्यात पडल्यामुळे पाण्यातील मासे खुप आनंदित झाले पण कावळे मात्र या मृत शरीराचा एकही घास मिळणार नाही म्हणून भयानक गलबलाट करून ओरडू लागले

आता मात्र कवी बरोबर म्हणतोय हे पटते ना ??

--- निलेश जोशी

Saturday, June 13, 2015

शब्द ब्रम्ह -- किर्तन अनुभव

आज एक किर्तन ऐकायचा योग आला , घाग बुवा यांचे चिरंजीव शरदबुवा घाग नृसिंह वाड़ी यांचे चिंचवडला किर्तन होते.
त्यात त्यांनी अतिशय सुंदर शब्दात शब्दांचे सामर्थ्य व बळ समजावून सांगितले, शब्द रत्ने आहेत (धन अशा अर्थी) तशीच ती शस्त्रेही ( शब्दाने माणूस तुटू शकतो अशा अर्थी )आहेत

त्यात त्यांनी शब्दाचे महत्त्व सांगताना एक गोष्ट सांगितली.

एक भगिनी चालत येत होती व तिच्या कानातून रक्त येत होते , म्हणून तिच्या मैत्रिणीने काळजीने विचारले की कानाला इजा कशी झाली ?
त्यावर त्या हुशार , साहित्यिक व विद्याप्रविण भगिनीने खालील पद्य रचना ऐकवून दाखवली,

अलिकुलवहनाचेवाहन आणीत होते
शशीधरवाहनाने ताडिले मार्ग पंथे
नदीपतीरिपु त्याचा तात भंगोनी गेला
रविसूत महीसंगे फार दुःखित झाला

मैत्रिणीला काहीही समजले नाही की ह्या पद्द्याचा व कानाला इजा होण्याचा काय संबंध ??

त्यावर त्या भगिनीने हे कूट सोडवून सांगितले

अलिकुलवहनाचेवाहन आणीत होते
अलि म्हणजे भुंगा (हृदयाम्बुज़ि लीन लोभी अलि हां)
अलि कुल म्हणजे भुंग्याचा समूह
अलिकुलवाहनाचे म्हणजे असा समूह वाहन करतो असे ठिकाण म्हणजे कमळ
वाहन - कमळाचे वाहन म्हणजे पाणी

म्हणजे ही भगिनी पाणी आणत होती

शशीधरवाहनाने ताडिले मार्ग पंथे
शशी धर म्हणजे शंकर
त्याचे वाहन नंदी म्हणजे बैल
त्याने ताडिले मार्ग पंथे
म्हणजे बैलाने वाटेत धक्का दिला

नदीपतीरिपु त्याचा तात भंगोनी गेला
नदी पती म्हणजे समुद्र
समुद्राचा रिपु शत्रु म्हणजे एका पळीत समुद्र पिणारे अगस्ति ऋषि
अगस्ति ऋषींचा तात त्यांचे नाव कुंभ
म्हणजे डोक्यावरचे कुंभ - मडके फुटले

रविसूत महीसंगे फार दुःखित झाला
रविसूत म्हणजे कर्ण म्हणजे कान
महीसंगे म्हणजे जमिनीवर खरचटल्यामुळे
फार दुःखित झाला म्हणजे कानाला ईजा झाली

कित्ती सुंदर होते आपले साहित्य ??
एक मराठी भाषेचा वेगळा पैलू पहायला मिळाला व हे फक्त अभ्यास करून किंवा किर्तन प्रवचन यातूनच शिकायला ऐकायला मिळेल नाही का ???

-- निलेश जोशी

Thursday, June 4, 2015

शीर्षासन

डोकेदुखी सुरु झाली म्हणून
डॉक्टर म्हणती शीर्षासन करी
डोके खाली पाय वरती करोनि
आजुबाजूचे अवलोकन करी

सकाळ झाली पहिलाच प्रयत्न
घेवून आधार स्वतः ला उलटा करी
सरळ राहायची सवय शरीराला
3-4 प्रयत्नातही साध्य न होई

शेवटी एकदाचा झालो उलटा
पाठ भिंतीला टेकुनच बरी
मान डोके यांना आधार दिला
तिकडे गड़बड़ न झालेली बरी

खुर्ची गाद्या उलट्या आभासी दिसता
आपली भूमाता जमीन बरी
कशाला हवी उठबस,तोरा,मान
डाउन टू अर्थ हीच उक्ती खरी

जे जे आकर्षक आहे आभासी
शीर्षासनी हे पूर्ण जाणवुन येई
शरीर व तू हेच सत्य या जगी
पूर्वजानी हेच गूँफले योगासनी

---निलेश जोशी

Tuesday, June 2, 2015

आज दुर्मिळ झालेले अलौकिक नेतृत्व… ! मंगेश नाबर


भारतातल्या राजकारणी पुढा-यांचे आज अवमूल्यन झाल्याचे आपण पाहतो. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण नसतात, सारे भ्रष्टाचाराने लडबडलेले असतात आणि विशेष म्हणजे त्यांना आपण आणि आपले कुटुंबीय सोडले तर इतरांबद्दल कोणत्याही प्रकारची कळकळ अथवा ममत्व नसतेच मुळी. परंतु आज अशीही एक व्यक्ती या देशात आहे की तिने आपल्या अलौकिक गुणांनी देशवासीयांवर चांगलाच प्रभाव पाडला आहे. आज जरी या व्यक्तीने निवृत्ती घेतली आहे तरी त्यांची एक आठवण येथे देण्याचा मोह आवरत नाही.
थुंबा या आपल्या देशातील रॉकेट्स सोडणा-या सुप्रसिद्ध केंद्रातले शास्त्रज्ञ आपापले काम दिवसाचे १२ ते १८ तासांच्या परिश्रमाने पार पाडत होते. त्यावेळची ही आठवण आहे. त्या केंद्रात तेव्हा सुमारे ७० शास्त्रज्ञ त्या प्रकल्पामध्ये कार्यरत होते. कामाचा प्रचंड ताण आणि त्यांच्या मुख्याधिका-यांच्या मागण्या यांनी सगळे शास्त्रज्ञ खरोखर त्रासून गेले होते. तरीही ते सारेच्या सारे, मुख्याधिकारी असलेल्या एका बुद्धिमान संशोधकावर  निष्ठा ठेवून काम करीत होते. आपले काम सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता.
एके दिवशी एक सहकारी या मुख्याधिका-याकडे आला आणि म्हणाला, ” सर, आज मी माझ्या मुलांना आपल्या शहरातल्या प्रदर्शनाला न्यायचं काबुल केलं आहे. मी संध्याकाळी साडे पाचला निघू का ? “
साहेबांनी परवानगी दिली आणि तो सहकारी आपल्या कामात गढून गेला. दुपारच्या जेवणानंतर तो काम करीत राहिला आणि नेहमीप्रमाणे कामात इतका गर्क झाला की त्याला घरी जाण्याची आठवण जेव्हा झाली तेव्हा घड्याळात पाहतो, तर रात्रीचे साडे आठ झाले होते.
त्याला आपण मुलांना वाचन दिल्याचे आठवले. त्याने साहेबांच्या खुर्चीकडे नजर टाकली, तर तेथे कोणीच नव्हते. मग या सहकारी शास्त्रज्ञाने आपले सारे आवरले आणि तो घरी जायला निघाला. घरी पोचतांना त्याला मुलांना निराश केल्याची बोच जाणवत होती. त्या अपराधित्वाच्या भावनेने त्याने घरचा दरवाजा ठोठावला. घरात मुले दिसली नाहीत. त्याची पत्नी दिवाणखान्यात मासिक वाचत बसली होती. आता आपण काही बोललो तर वातावरणात मोठा स्फोट होईल म्हणून आमचा हा शास्त्रज्ञ काहीही न बोलता मुकाट्याने कपडे बदलायला आतल्या खोलीत जाऊ लागला.
तेवढ्यात पत्नीने विचारले, ” आपण कॉफी घेणार की भूक लागली असेल तर सरळ जेवण वाढायला घेऊ का ? “
पतीराजांनी भीत भीत म्हटले, ” हो, तुलाही कॉफी हवी असेल तर घेईन की मी ! आणि मुलं कुठायत ? “
त्याच्या या प्रश्नाचे पत्नीला आश्चर्य वाटलेले दिसले. तिनेच प्रश्न केला,
“म्हणजे तुम्हाला माहित नाही ? “
“कसली माहिती ? ” पतीने प्रश्न केला.
” अहो, तुमचे साहेब आपल्या घरी सव्वा पाचला आले आणि मुलांना प्रदर्शनाला घेऊन गेले ! “
इथे प्रत्यक्षात असे घडले होते की साहेबांनी आपल्या सहका-याला लवकर जाण्याची परवानगी दिली होती पण त्यांना हेसुद्धा दिसले की हा सहकारी सायंकाळी ५ च्या नंतर कामात गढून गेला आहे. त्यांना पुरेपूर ठाऊक होते, की हा माणूस, जरी त्याने आपल्या मुलांना प्रदर्शनाला नेण्याचे वाचन दिले असले तरी आता आपले काम पूर्ण केल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही.
मग त्यांनीच निर्णय घेतला आणि त्या प्रदर्शनाला जाण्यासाठी आतुर झालेल्या त्याच्या मुलांना आपण न्यायचे ठरवले. एखाद्या संस्थेचा प्रमुख अशा प्रकारचे औदार्य आणि कनवाळू वृत्ती आपल्या सहका-याबद्दल दाखवेल का ? असे आगळेवेगळे झाल्यावर कुणाला त्यांच्याविषयी आदर नि निष्ठा वाटणार नाही ? थुंबाच्या या शास्त्रज्ञांना ठाऊक होते की आपल्याला लाभलेला हा बॉस आपली काळजी वाहणारा आहे आणि म्हणून ठुन्बाचे सर्व शास्त्रज्ञ प्रकल्पाच्या कामाचा कितीही ताण पडला तरी त्या बॉसच्या हाताखाली कसलेही काम पार पाडण्यास एका पायावर तयार असत.
हा असा आगळावेगळा बॉस कोण होता, हे ओळखा बरे ?
होय, माझ्या प्रिय मित्रांनो, ते होते आपले माजी राष्ट्रपती माननीय ए. पी. जे. अब्दुल कलाम.