Friday, November 8, 2019

टाइम बँक

*टाइमबँकेच्या निमित्ताने. . . .*

वेळेचे महत्व सांगताना आपण बऱ्याचदा इंग्रजीतील Time is Money ही म्हण वापरतो. वेळ कधी सांगून येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही असेही आपण म्हणतो. पण आपल्याकडे असलेला मोकळा वेळ आपल्याला खरोखरीच्या पैशात रूपांतरित करता आला किंवा भविष्यातील वापरासाठी साठवता आला तर?? ही कल्पना काहीशी अशक्य कोटीतली वाटत असली तरी काही प्रमाणात ती ‘टाईम बँके’च्या रूपाने प्रत्यक्षात उतरली आहे. हे टाईम बँक प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण ही संकल्पना सर्वात प्रथम जिथे उगम पावली आणि वापरली गेली त्या स्वित्झर्लंड विषयी थोडी माहिती घेऊ या …

स्वित्झर्लंड हा तसा अत्यंत विरळ लोकवस्ती (४१,००० चौरस किमी मधे जेमतेम ८५ लाख लोक) असलेला देश. आज स्वित्झर्लंड मध्ये प्रत्येक सहा व्यक्तीपैकी एक व्यक्ती ६५ वर्षे किंवा अधिक वयाची (जेष्ठ नागरिक) आहे. अशा अनुत्पादक वयोवृद्धांची, (ज्यांची विशेष काळजी घ्यावी लागते) वाढती संख्या हे स्वित्झर्लंडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपुढील मोठे आव्हान आहे.

स्वित्झर्लंडच्या फेडरल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने २०१० साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांच्या नागरिकांचे सरासरी वयोमान ८३ वर्षे असून, एकूण लोकसंख्येच्या १६.९०% इतके लोक ६५ वर्षाहून अधिक वयाचे आहेत. याउलट लोकसंख्येतील २० वर्षाखालील मुलांचा टक्का दिवसेंदिवस घसरत चालला आहे. जेष्ठ नागरिकांपैकी ७०% हुन अधिक लोक स्मृतीभंश किंवा डिप्रेशनचे शिकार आहेत. खाणे, पिणे, नैसर्गिक विधी करणे, कपडे बदलणे अशी कामे देखील ही लोकं इतरांच्या मदतीशिवाय करू शकत नाहीत.

या पार्श्वभूमीवर, स्वित्झर्लंडच्या पूर्वोत्तर भागात जर्मनीच्या सीमेला लागून असेलेल्या साधारणतः ७५,००० लोकसंख्येच्या सेंट गॅलेन या शहरात २०१२ मध्ये जगातील पहिली टाईम बँक सुरु झाली. पूर्वीच्या काळी (आणि काही प्रमाणात आजही) खेडेगावातील लोक जसे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांची, मग ते त्यांचे कुटुंबीय असोत, शेजारी असोत, नातेवाईक असोत किंवा मित्र असोत, अडीअडचणीच्या वेळी काळजी घेत तशा प्रकारची एक औपचारिक व्यवस्था आणण्याचा प्रयत्न म्हणजे हे टाईम बँक. ही अनोखी बँक सुरु करण्यापूर्वी चार वर्षे म्हणजे २००८ पासून नागरिकांना सेवेच्या बदल्यात सेवा देणारी एक व्यवस्था सेंट गॅलेनची स्थानिक स्वराज्य संस्था स्वीस रेडक्रॉस च्या मदतीने चालवीत होती.

टाईम बँक या व्यवस्थेमध्ये, उत्तम आरोग्य आणि मोकळा वेळ असलेली एक व्यक्ती (ठेवीदार) त्याच्या सभोवतालच्या परिसरातील एखाद्या वयोवृद्धाला मदत करण्यासाठी आपला काही वेळ देते. त्या व्यक्तीने दिलेला हा वेळ नोंदवून ठेवण्याची एक व्यवस्था असते. टाईम बँकेच्या शब्दात त्याला ठेव किंवा डिपॉझिट म्हटले जाते. आणि हे डिपॉझिट जेव्हा त्या ठेवीदाराला गरज असेल तेव्हा त्या टाईम बँकेकडून सेवेच्या स्वरूपात परत केले जाते.

हे सर्व आज आठवण्याचं कारण म्हणजे ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या स्पिकिंग ट्री या स्तंभात आलेलं पुढील अनुभव कथन …

स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरच पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.”

यावरून कुणी निष्कर्ष काढील की, स्वित्झर्लंडमधे आणि एकूणच पाश्च्यात्य जगतात बंधुभाव, शेजारप्रीती ही कमी होत चाललीय त्यामुळे तिथे अशा बँकेची गरज असेल. परंतु हा दावा स्वित्झर्लंड सरकारला मान्य नाही. त्यांच्या मते आज सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित आहे. नोकरी धंद्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी तुमचे कुटुंबीय, तुमचे नातेवाईक तुमच्या जवळ असतीलच असे नाही. अशा वेळी गरजां भागविण्यासाठी आपल्याला आपल्या कौटुंबिक परिघाबाहेर पडण्याची गरज आहे. आणि ती गरज टाईम बँक सारखी संस्था भागवू शकते .

स्वित्झर्लंड सरकारने केलेल्या पाहणीनुसार बाजारहाट, प्रशासकीय कामे, वैयक्तिक आणि घरादाराची स्वच्छता इत्यादी सारखी दैनंदिन कामे करण्यासाठी तेथील जेष्ठ नागरिकांना इतरांच्या मदतीची गरज लागते. या कामांचा भार सरकारच्या डोक्यावर न येता टाईम बँकेसारख्या अभिनव सामाजिक व्यावसायिक संस्थेमार्फत करण्याचा स्विस सरकारचा प्रयत्न आहे. या मुख्य उद्दिष्टाबरोबरच खालील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून स्वित्झर्लंड सरकारने हा टाईम बँकेचा प्रयोग केला आहे …:

१) जेष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरात स्वतंत्रपणे जास्तीत जास्त काळ सुखाने राहता येईल.

२) या योजनेमुळे जेष्ठ नागरिकांना आपल्या एकटेपणावर मात करता येईल आणि विविध प्रकारची लोकं एकत्र येतील.

३) उपलब्ध असलेल्या मानव संसाधन (Human Resource) साधनांचा वापर करणे इतकेच नव्हे तर विरळ होत चाललेले सामाजिक समरसतेचे बांध अधिक दृढ करता येतील.

या टाईम बँकेच्या योजनेत सामील होणे न होणे हे जरी नागरिकांसाठी ऐच्छिक असले तरीही सेंट गॅलेनच्या स्थानिक प्रशासनाने, या प्रकल्पाच्या वेबसाईटचा तसेच प्रशासकीय आणि प्रशिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी सुमारे १५०,००० स्विस फ्रॅंक इतक्या बीज भांडवलाचा एक ट्रस्ट स्थापन केला आहे. भविष्यात काही कारणाने जर हा प्रकल्प चालू ठेवणे अशक्य झाले तर ज्यांनी ह्या प्रकल्पात आपला वेळ गुंतवलेला आहे त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देता येईल अशीही तरतूद या ट्रस्ट ने केलेली आहे.

गरजवंताला मदतीउत्सुक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, एखाद्याने केलेल्या मदतीचा हिशेब ठेवणे, त्या मदतीचे योग्य चलनात रूपांतरण करणे आणि दात्याला जेव्हा गरज भासेल तेव्हा त्याच्या खात्यातील मदतीच्या शिलकीप्रमाणे त्याला मदत मिळवून देणे हे पूर्वीच्या काळी खूप कठीण असलेले काम आता तंत्रज्ञानांतील प्रगतीमुळे (विविध प्रकारचे सॉफ्टवेयर, मोबाईल अँप) खूपच सोपे झाले आहे.

सेवानिवृत्त झालेल्या परंतु शारीरिक आणि आर्थिकदृष्टया सुदृढ असलेल्या अनेक स्वीस नागरिकांना आपला मोकळा वेळ वाया घालविणे हा सामाजिक गुन्हा वाटतो आणि व्यस्त राहण्यासाठी, केवळ कुठलातरी छंद जोपासण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करील अशा एखाद्या कामात स्वतःला जोडून घेणे त्यांना जास्त संयुक्तिक वाटते. अशी विचारसरणी असलेले लोक असणे आणि त्यांची संख्या वाढणे ही टाईम बँकेसारखा प्रकल्प राबविण्यासाठी महत्वाची गरज आहे.

आपण भारतीय लोक एका महान संस्कृतीचा भाग असल्याने, आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक संबंधात अजूनही ओलावा आहे. गरजवंताला मदत करणे, त्यांच्यासाठी वेळ देणे हा आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग आहे. निदान तसा आपला दावा आहे. त्यामुळे केलेल्या मदतीचा हिशेब ठेवणे आणि त्याबदल्यात आपल्याला गरज असताना हक्काने मदत घेणे हे आपल्याकडे सुसंस्कृतपणाचे लक्षण समजले जात नाही. म्हणूनच आपल्याला अशा भावनाशून्य कोरड्या संस्थेची गरज नाही असा बऱ्याच लोकांचा सूर दिसतो. परंतु कितीही निरपेक्ष भावनेने केलेले पुण्यकर्म असो त्याबदल्यात, आता लगेच नाही तर आपल्या गरजेच्या वेळी तरी आपल्याला काहीतरी मिळावे अशी सुप्त इच्छाही नसलेले किती जण भेटतील ? अगदी कसलीच अपेक्षा न करणारा इसम देखील आपल्या पुण्यकर्माबद्दल मृत्यपश्चात आपल्याला स्वर्गात जागा मिळावी अशी अपेक्षा करतोच करतो. आज आपण आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून ठेवतोच की तशीच ही भविष्यात लागणाऱ्या सेवांची तरतूद समजायला हरकत नाही.

हे केवळ स्वित्झर्लंड मधेच होऊ शकते, भारतासारख्या देशात नाही असे आपल्या सारखेच मलाही वाटत होते पण मध्यंतरी वाचनात आले कि केरळमधल्या कोची शहरात १६ तरुण व्यावसायिकांनी एकत्र येऊन HourWorld या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर कोची टाईम बँकेची स्थापना केली आहे आणि सध्या ते त्या बँकेचा विस्तार करत आहेत. ह्या कोची टाईम बँकेची उद्दिष्टे स्वित्झरलँडच्या टाईम बँकेपेक्षा वेगळी असली तरी मूळ संकल्पना मात्र तीच आहे.

जग बदलत आहे आणि त्याबरोबर जगाच्या गरज बदलत आहेत. कुठल्याही परतफेडीची अपेक्षा ना करता गरजूंना मदत करणे हे कितीही उद्दात्त आणि आदर्श असले तरी अशा सेवाभावी लोकांचा टक्का गरजू लोकांच्या तुलनेत नेहमीच अत्यल्प राहिलेला आहे हे सत्य अमान्य करता येणार नाही. त्यामुळे भविष्यात आपल्याला गरज भासेल तेव्हा काही मिळण्याच्या अपेक्षेने आज कुणी सेवा देऊ करीत असेल तर ते स्वागतार्हच मानले पाहिजे. आपल्या सर्व कौटुंबिक, सामाजिक, राजकीय समस्यांसाठी नेहमी सरकारनेच काहीतरी करावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा जितके जमेल तितके योगदान आपणही द्यावे हेच योग्य आहे. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाच्या काळात आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ शकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

आपण एखादा मेडिकल इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन घेतो. दरमहा किंवा दरवर्षी ठराविक रक्कम त्यासाठी भरतो. परंतु, शक्यतो ह्या इन्शुरन्सचा फायदा घ्यायची (म्हणजेच आजारी पडून हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची किंवा अकाली मरण्याची) वेळ आपल्यावर येऊ नये अशीच आपली इच्छा असते. अशाच ‘ नेकी कर और दर्या मे डाल’ या दृष्टीने टाईम बँक या संकल्पनेकडे पाहण्याची गरज आहे असे मला वाटते.

सॅबी परेरा