Saturday, December 7, 2013

बाप एक पारिजातक

२० जुन २०१० साली दै सकाळ मधील सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेली कविता...... !!!
काळजाला भिडणारी हि कविता वाचतानाच डोळ्यात पाणी येते .!!
आवडली तर जरुर शेअर करा:
बाप

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Sunday, December 1, 2013

चेहरा एक आरसा

एका राजाच्या दरबारात एक व्यापारी नेहमी यायचा ,त्याच्याशी नजर मिळवल्यावर राजाला मनातून खुप अस्वस्थ वाटायचे व व्यापारयाचा चेहरयावर पण राजाला संनिग्धता दिसायची. असे एकदा नव्हे अनेकदा झाल्यावर राजा विचारात पडला की या व्यापाराकडून आपण काही घेतले नाही ,कसला व्यवहार नाही ,कसली उधारी नाही मग असे का होते??

शेवटी त्याने ही गोष्ट महामंत्रीना सांगितली ,महामंत्री हुशार होते त्यानी त्या व्यापारयाशी मैत्री वाढवून रहस्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला.
थोड्या दिवसानी त्यांनी राजाला सांगितले की "हा व्यापारी आपल्या राज्यातील मोठा व्यापारी आहे,
त्याचा किराणा माल विकण्याचा व्यवसाय आहे .
व त्याने मागच्याच वर्षी खुप मोठ्या प्रमाणात चंदनाची लाकडे स्वस्त दरात घेवुन ठेवलेली आहेत"
"त्याला एकाने सल्ला दिलेला आहे की राजपरिवारातुन कोणाचाही मृत्यु झाल्यास चंदनाची लाकडे लागतात व अधिक नफा कमवून कोणत्याही किमतीस ती विकत घेतली जातात व अधिक नफा कमावण्यासाठी त्याने अधिक पैसे गुंतवून जास्त लाकडे घेवुन गोदामात ठेवलेली आहेत.त्यात त्याचे खुप धन अडकले आहे व दरबारात आल्यावर तो हाच विचार करतो की या राजाच्या परिवारातील कोणाचा तरी मृत्यु व्हावा म्हणजे त्याच्या लाकडाना सांगेल ती किंमत येइल ".

"महाराज,आपला चेहरा म्हणजे आरसा असतो व व्यक्तीच्या मनातील भावना त्याच्या चेहरयावर झळकतात ज्या वाचून तुम्हाला अस्वस्थ वाटते "

मंत्रीने राजाला विचारले की "असा विचार करणारया त्या व्यापारयाला काय शिक्षा द्यावी?? "

राजा म्हणाला की "त्याची लाकडे उचित किंमत देवून ती लाकडे राजकीय गोदामात ठेवली जावीत म्हणजे तय व्यापारयाची चिंताही मिटेल ,शेवटी तो व्यापारी सुद्धा आपली प्रजाच आहे ".

Friday, November 22, 2013

परिस

एक माणूस परीस ( पारस )
शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात
जो दगड येईल तो घ्यायचा, ... ...
गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून
द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू
झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे
सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल
झाला नाही ....दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा आणि मग तो फेकून
द्यायचा.. शेवटी तो माणूस
म्हातारा झाला....
आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे
श्वास मोजत होता त्यावेळी अचानक
त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील
साखळीकडे गेले...
साखळी सोन्याची झाली होती..... दगड
घ्यायचा,
साखळीला लावायचा आणि फेकून
द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....
तात्पर्य:--
प्रत्येकाच्या जीवनातएकदा तरी परीस
येत असतो... कधी आई-
वडिलांच्या रूपाने,तर कधी भाऊ-
बहीनीच्या नात्याने... तर
कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....
तर कधी प्रेयसीच्या नात्याने.....
कोणत्या नाकोणत्या रूपात
तो आपल्याला भेटत असतो...
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत
असतो...... आपण जे
काही असतो किवा बनतो त्यात
त्यांचा बराच हातभार असतो . पण फार
कमी लोक या परीसाला ओळखू
शकतात..!

श्रद्धा

श्रद्धा....

मी कॉलेज मध्ये असताना हा किस्सा माझ्या वाचनात आला होता .. बरेच दिवस सांगायचे ठरवून सांभाळून ठेवलेला ... हा किस्सा नेहमीच माझी श्रद्धा वाढवत आला आहे .. एकदा वाचाच आणि आवडल्यास शेअर करा...

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.'

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर...

प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?

वि. : हो सर...

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'

(विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर ...

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे?

वि. : नाही सर... असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का?

प्रो. : अवश्य ...

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच ...

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.'

(वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ...

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ....

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही....

(सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी
'Wings of Fire' दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...

सेल्फ इनीशेटिव

लहानपणी आई एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची,आणि आम्हीही ती माहीत असलेली गोष्ट पून्हा पून्हा तितक्याच उत्कंठेने ऐकायचो... आता मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?
तर एका गावा बाहेर एक साळीचं (हे धान्य नक्की कुठलं हे आई कधी सांगू शकली नाही)डवरलेलं शेत असतं.चंडोलपक्षानं त्या पिकामधे आसरा घेत पिल्लांसाठी घरटं बांधलेलं असतं
चंडोल पक्षाचं घरटं असलं तरी त्याचा पत्ताच नसतो त्याची मादीच आपली तीन पिल्लाना सांभाळत त्या घरट्याची रखवाली करत असते. पिल्लाना चारा आण, किडॆ आण, टोळ मिळाला तर तो आणून भरव, कुठे काडी निसटली तर ती ठीक कर कापूस आणून भर, पिल्ल आपली बघावं तेंव्हा चोच आवासून आपल्या आईची वाट बघत असायची
ती पक्षीणी पिल्लं जरा मोठी झाल्यावर त्याना सांगते, घाबरायचं नाही कोणाची चाहूल लागली तर गप्प बसायचं कोण काय बोलतय, कसे आवाज काढतय सगळ्यावर लक्ष ठेवायचं
काही महत्वाचं वाटलं तर माझ्या कानावर घालायचं. पिल्लं आपली त्यांच्या भाषेत हो हो म्हणत माना डोलावतात. कुठेही जा माना डोलवणं सेमच असतं नाही.. आपण सुद्धा... असो! तर एकदा काय होतं?
त्या शेताचा जमीनदार शेताची पाहणी करायला शेतात फेरफटका मारायला येतो. बरोबर त्याचा लोचट मुनीमजी असतोच. तयार झालेलं शेत बघून जमिनदार म्हणतो "हं! शेत कापायला झालय, आता कापायला हवं... पिल्ल घाबरतात.. हे आईच्या कानावर घलायला हवं शेत कापलं तर आपण कुठे जायचं? आई आल्या आल्या पिल्ल कलकलाट करतात पण ते ऐकून आई आपली शांतच. पिल्ल विचारतात, आई तुला भिती नाही वाटत? आई म्हणते अजून नाही पण तुम्ही मात्र सावध रहा शब्दंशब्द ऐका आणि मला सांगा काही दिवस जातात पून्हा जमिन्दार येतो सोबत मुनीनजी असतोच
जमिनदार म्हणतो अरे आता शेत कापायला घ्यायला हवं जरा त्या शिरप्याला विचारा म्हणावं जरा कापून दे... पिल्ल हे ऐकातात तत्परतेने आईच्या कानावर घलातात तरी आई आपली शांतच
परत थोडे दिवस जातात शेत तसच डुलत असतं पिल्लं वाढत असतात पण अजून पंखात बळ येणं बाकी असतं त्या दरम्यान जमिनदार असाच फेर्‍या मारून जातो पाहणी करून जातो देवदयेनं या घरट्याकडे त्याचं लक्ष जात नाही. याला सां गा त्याला सांगा करण्यात समय जात असतो.
आणि एक दिवस जमिनदार येतो त्याच्या बरोबर त्याचा मुलगाही असतो कोणा कोणाला शेत कापायला सांगितलं याची उजळणी होते नोकर चाकर गडी माणसं... शेवटी मुलगा म्हणतो जाऊदे अप्पा! आता उद्या अपनच येऊया आणि शेत कापायला घेऊया कशाला कोण हवय?
आई आल्या आल्या पिल्लं तिला हे सांगतात आणि जेंव्हा ती हे ऐकते की आता कोणावरही अवलंबून नं राहता जमिनदार स्वत:च शेत कापायला घेणार आहे तेंव्हा मात्र ती आई अस्वस्थ होते पिल्लाना दाखवत नाही पण जरा घाबरते.. पहाटेलाच पिल्लाना म्हणते जरा उडायचा प्रयत्न करा त्यानिंबावर जाऊन बसा .. आणि आईच्या इशार्‍या बरोबर ती पिल्लं घरटं सोडतात... कसाबसा जवळचा निंब गाठतात

माँरल आँफ द स्टोरी काय?

स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राहाव लागतं..

जो हुवा अच्छा हुवा

( एक बोधकथा....नक्की वाचा आणि आवडली तर शेअर करा )

एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबरचा अंगठा कापला जातो...

अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो...
तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून शहरात पाठवतो...

तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ''महाराज...शांत व्हा...जे होतं ते चांगल्यासाठीच होतं...''

अकबरला राग येतो...तो जास्तच चिडतो...आणि शिपायांना सांगतो
'' जा बिरबल ला घेऊन जा...रात्रभर उलटं टांगून ठेवा....आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ''

सर्व शिपाई तिथून निघून जातात....अकबर एकटाच जंगलात असतो....तो एकटाच पुढे शिकार करायला जातो...!!

पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात..

अकबरची बळी ते देणार असतात...त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात...तितक्यात एका आदिवासीची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,'' हा अशुद्ध आहे...आपण याची बळी नाही देऊ शकत... याचा अंगठा तुटलेला आहे...''

आदिवासी अकबरला सोडून देतात...आणि त्याला बिरबलचं बोलणं आठवतं,
' जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..'

तो धावत पळत त्याच्या महालात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो....आणि म्हणतो, '' मला माफ कर....तुझ्यामुळे मी वाचलो...आणि बघ
माझ्यामुळे तुझी काय हालत झाली....''

बिरबल हसतो आणि म्हणतो, ''नाही महाराज....जे होते ते चांगल्यासाठीच होता...''

अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं...तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला...चांगलं कसं झालं???

त्यावर बिरबल म्हणतो, '' महाराज...मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता.....म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.... ''

तात्पर्य : मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं....कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल...!!!

स्वकीय

एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते.सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होतअसे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे.तो आवाज मोठा कर्णकर्कश असे.
एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला.त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले.सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,
"दादा,आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीततापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तरबाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकचआहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे.पण खरे दुःख याचे आहे की तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो.''

दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो.

जशा चारोळ्या तशाच दारूळ्या

प्यायला लागल्यावर चढायचीच
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही

दारु पिताना एक तत्व पाळावं
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ? उरली, तर घरी न्यावी!

एक एक पेग कसा चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा हिशेब असतो द्यायचा

दारू पिऊन झाल्यानंतर
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते

पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो

ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये

वेळच्या वेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही

आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसर्‍याला घेऊ देऊ नये
दुसर्‍याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये

अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो

आपला पेग आपण भरावा
दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास, आपली बाटली
दुसर्‍याच्या हातात देऊ नये

असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!

एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय, माझी काय
नशा कधी सरू नये

तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,पण दारू अशी सांडू नकोस

स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
बर्फ नको, सोडा नको
उंच आभाळी उडण्यासाठी
पंख हवे... घोडा नको!

फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही

पिणं असतं आगळा उत्सव
त्याचा उरूस होऊ नये
प्यायला नंतर आपला कधी
वकार युनूस होऊ नये

घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे, बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात

आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही

हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा, माझ्या इतकी
पचवून दाखव, नंतर बोल!

प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र

पिणाऱ्यांनी समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये

ग्लासी लागेल ते ढोसत असतो
पानी लागेल ते चरत असतो
जेंव्हा माझं बिल कोणी
दुसराच माणूस भरत असतो

काय होतंय, कुठे होतंय
काही केल्या कळत नाही
एकदातरी वेळ अशी
पिणाऱ्यांना टळत नाही

प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास...

ऑडिट एक अजब कारभार

राम रावण युद्धानंतर राम राज्य पदी बसला आहे. कारभार उत्तम चालला आहे. त्यावेळची हि गोष्ट आहे.

हनुमंताने संजीवनी बुटी आणायला जो विमान प्रवास केला होता त्याचे बिल त्याने रामापुढे मांडले.
रामाने ते आपल्या CA कडे दिले आणि CA ने auditor ला.

Auditor ने ते खालील कारणास्तव नाकारले.
अ) हनुमंताने या प्रवासाअगोदर अयोध्येच्या प्रशासकाची (भरताची) परवानगी घेतली नव्हती.
ब) हनुमान ग्रेड ब अधिकारी असून त्याच्या ग्रेड मध्ये विमान प्रवास अंतर्भूत नाही.
क) हनुमानाला फक्त संजीवनी बुटी आणायला सांगून सुद्धा त्याने संपूर्ण डोंगर उचलून आणला. त्यामुळे त्याला अतिरिक्त सामानाबद्दल जो आकार पडला तो ग्राह्य मानता येणार नाही.
सबब हनुमानाच्या प्रवास खर्च त्याला भरून देता येणार नाही.

राम चक्रावला. काय करावे हे सुचेना. त्याने लक्ष्मणाला यात लक्ष घालायला सांगितले.

लक्ष्मण त्या Auditor ला भेटला बरेच सांगून बघितले अखेर त्याला उत्तम कामगिरी बद्दल लंकेची सफर घडवून आणण्याची ऑफर दिली. ताबडतोब हनुमंताच बिल OK झाले.

कसे?
अ) भरत जरी प्रशासक असला तरी पादुका द्वारा रामच राजा होता त्यामुळे रामाचा आदेश पुरेसा होता.
ब) अपवादत्मक परिस्थितीत दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांचे अधिकार तात्पुरत्या स्वरुपात प्राप्त होतात.
क) वेळ आणीबाणीची होती तशात त्या मोठ्या डोंगरावर बुटी शोधण्यात वेळ गेला असता आणि चुकीची वनस्पती आणली असती तर परत फेऱ्या मारावयास लागल्या असत्या खर्च वाढला असता तो वेगळा. त्यामुळे सगळा डोंगर आणणे चूक नव्हते.

सबब हनुमंताचा प्रवास खर्च योग्य असून तो नियमात बसतो.

सही.................