Tuesday, March 24, 2015

माणूस आजारी का पडतो ? भाग 2 संग्रहित

मागच्या लेखात आपण मनाचा आणि आजारांचा असलेला जवळचा संबंध समजून घेतला . आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! त्या लेखानंतर मला भरपूर messages माझ्या inbox मध्ये आले . त्यांनी आजार म्हणजे काय हे अजून विस्ताराने समजून सांगायला सांगितले . आज मी तेच करणार आहे .

आपला मानसिक ताण - तणाव हा आपल्या आजारांचा एक प्रमुख शिल्पकार असला तरी एकुलता एक नक्की नाही ! मानवी आजार हे एक multi - dimensional ( बहु आयामी ) असे प्रकरण आहे . खूप निरनिराळे घटक आजार ठरवतात . त्यातले काही स्वतःच्या शरीरात असतात ( endocrine factors ) तर काही असतात बाह्य घटक ( exocrine factors ) ! बर्याच वेळा हे घटक एकमेकांमध्ये छान विरघळून गेले असतात !!

१ ) माणसाची शरीररचना : प्रत्येक माणूस हा जरी हात , पाय , डोके आणि इतर सर्व अवयव घेऊन आला असला आणि सर्वांमध्ये तेच असले तरी प्रत्येक जण स्वतःची अशी काहीतरी वैशिष्ट्ये घेऊन आला असतो . " No two persons except uniovular twins are identical in all respects ! ". गदिमांनी जे म्हटले आहे " घटाघटाचे रूप आगळे " ते हेच !
हे त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते बऱ्याच प्रमाणावर त्याचे आजार ठरवते . प्रत्येक आरोग्यशास्त्राने त्याची दखल घेतली आहे .
आयुर्वेदात त्याचा उल्लेख कफ , वात आणि पित्त प्रवृत्ती म्हणून केला आहे .
होमिओपथित त्याचा उल्लेख hydrogenoid , lymphatic , plegmatic , rheumatoid - अश्या निरनिराळ्या constitutions खाली केला आहे .
अलोपथित त्याचा उल्लेख हा प्रत्यक्ष आढळत नाही पण अप्रत्यक्ष personality type ( personality disorders नाहीत ) असा आढळतो .
आपण " पिंड " म्हणतो न तो हाच !
समजायला थोडे कठीण जात आहे ना ! हो कठीणच आहे हे !! मलाही पहिल्यांदा हे सर्व अभ्यासल्यावर कठीण गेले होते समजायला !
थोडक्यात प्रत्येक माणसाची एका विशिष्ट प्रकारचे आजार व्हायची एक tendency असते . ते हेच ! माणसाचे वजन , त्याची उंची, त्याची चयापचय क्रिया अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे हे होय !

२ ) अनुवांशिकता ( Genetics ) : माणसाला झालेले पूर्वीचे आजार ( past history of diseases ) आणि त्याच्या रक्ताच्या नातेवायीकांना असलेले आजार ( family history of diseases ) ह्यांचा फार मोठा भाग आजार ठरण्यात असतो . प्रत्येक आरोग्य शाखा ह्या घटकाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर व विचार करते . काही शाखा आजाराचे निदान करण्यासाठी ह्या घटकाचा विचार करतात . तर काही शाखांमध्ये औषधांची निवड करताना ह्याही घटकाचा विचार केला जातो . .
होमिओपथि शास्त्रात आजारांचे psoric , sycotic , tubercular आणि syphilitic असे वर्गीकरण केले आहे आणि त्यानुसार औषधे बदलत गेली आहेत . आयुर्वेदिक शास्त्रात कफ , वात आणि पित्त प्रकृतीचे आजार ह्या नजरेतून त्यांच्याकडे बघितले जाते . अलोपथित मुख्यत्वे आजारांचे निदान करताना आणि त्यानुसार तपासण्या ( laboratory investigations ) करण्यासाठीच ह्याचा वापर केला जातो . अलोपथिक औषधे मात्र genetic load नुसार बदलत नाहीत .
माणसाचा धर्म , त्याची जात , त्याचा प्रदेश हेही genetic load समजून घायला मदत करतात .
जसे पारशी लोकांमध्ये G6PD शी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात असतात . कच्छी लोकांमध्ये थालासेमिया आजाराचे प्रमाण जास्त असते तर आदिवासी लोकांमध्ये Sickle cell anaemia मोठ्या प्रमाणात सापडतो .

३) माणसाचा आहार : आहाराचे महत्व आपल्याला सर्वविदीत आहेच . माणसाचे सर्व आरोग्य , त्याची रोगप्रतिकारक्षमता आणि इतर बऱ्याच गोष्टी आहारावर ठरतात .बऱ्याचवेळा काही आजार होण्यापूर्वी माणसाचा आहार कमी होतो . त्याला "prodromal symptom" असे म्हणतात . " माझी भूक कमी झाली आहे , मला होणार बहुदा काहीतरी " असे आपण म्हणतो ते ह्याचमुळे !
शरीरातील भावनांचे केंद्र hypothalamus हेच शरीराच्या भूकेचेही मेंदूमधील केंद्र ( appetite centre ) आहे आणि त्याच्याच शेजारी posterior pitutary gland आहे जी शरीरातल्या सर्व प्रक्रिया प्रत्यक्षात नियंत्रीत करणाऱ्या सर्व ग्रंथींची राणी आहे . आता कळले आपल्या भावना , आपला आहार आणि भूक , आपले आरोग्य एकमेकांशी कसे संबंधित आहेत ते ! ( मागचा लेखांक १ वाचा - आजार आणि शरीराची ग्रंथीसंस्था ह्यांचा संबंध समजून घेण्यासाठी !)

आपला आहार किती आहे , काय आहे आणि केव्हा केव्हा आहे ह्यावरही आपले आजार अवलंबून असतात . आता fast food च्या जमान्याचे आजार आपल्याला माहित आहेत . त्याचवेळी भरपूर वेळा खाणारी ,बऱ्याच वेळाने खूप खाणारी , सारखे सारखे खाणारी माणसे , कोणत्या आजारांना बळी पडतात हे ही आपल्याला माहित आहे .
मुस्लिम लोकांमध्ये पोटाचे , अपचनाचे आजार मोठ्या प्रमाणावर आढळतात ह्याचे मुख्य कारण त्यांचे अन्न आहे .
प्रत्येक आरोग्यशास्त्र आहाराकडे वेगवेगळ्या नजरेतून पाहते .
आयुर्वेदात अन्नाला , ते शिजवण्याला , त्याच्या गुणधर्मांना भरपूर महत्व आहे . ऋग्वेदातही अन्न कसे खावे , कोणते खावे , कसे शिजवावे , कोणत्या भावनेने शिजवावे , कोणत्या भावनेने वाढावे व खावे ह्याबद्दल अतिशय सखोल सूचना केल्या आहेत .पण आयुर्वेदात भरपूर प्रकारचे पथ्य असते . खाण्यावर भरपूर प्रकारची बंधने असतात . त्यामुळेच आयुर्वेदीक औषधे घेताना " आजार परवडला पण ते पथ्य नको " असे होऊन जाते . ( इथे मी आयुर्वेदाचा अपमान करत नसून एक व्यावहारिक शक्यता / सत्य मांडत आहे . )

होमिओपथि आहाराकडे व्यावहारिक भावनेने बघते . माणसाला ज्या वेळी जे खावेसे वाटेल ते त्याने खावे असे होमिओपथि म्हणते .पण आरोग्यशास्त्राच्या मर्यादेत ! आजाराची पथ्ये पाळायला होमिओपथि सांगते . जसे पिष्ठमय पदार्थांचे ( carbohydrates ) मधुमेहातील मर्यादीत सेवन ! किंवा gout ह्या आजारात प्रथिनांचे ( proteins ) मर्यादेत सेवन ! होमिपथित औषधोपचार ठरवताना माणसाला खायला काय आवडते आणि काय नाही ह्याचाही विचार केला जातो . ( food cravings and aversions ,aggravations and ameliorations. ) बाकी शुद्ध होमिओपथित कॉफी , कांदा , लसुण, लोणचे वगैरे खायला काहीच बंदी नाही .

अलोपथि पण " आहाराकडे " व्यावहारिक नजरेने बघते . सरसकट पथ्ये इथे नसतात . तर आजारानुसार पथ्ये ठरवली जातात .

४ ) माणसाचा विहार : माणसाचे राहणे , त्याचे राहणीमान , त्याच्या सवयी , त्याची वैयक्तिक स्वच्छता , घरातली स्वच्छता , त्याचा व्यायाम , त्याचे recreation , त्याचे छंद , आवडीनिवडी , त्याची व्यसने , अश्या अनेक गोष्टी ह्या सदरात येतात . ह्या सर्व घटकांचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष संबंध आजारांशी येतो .

माणसाचा पोटापाण्याचा धंदा , तेथील ताण - तणाव , तेथील वातावरण , तेथील स्पर्धा , तेथे येणारा निरनिराळ्या पदार्थांशी त्याचा संबंध , संबंधांचा कालावधी अश्या बऱ्याच गोष्टींचा आजारावर प्रभाव असतो . मुंबईसारख्या rat race च्या ( स्पर्धात्मक आणि धावपळीच्या ) जगात तर हा भाग मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत असतो आजारी असणे किंवा नसणे ह्यावर ! ह्याचा अभ्यास " occupational hazzards " ह्या सदरात " preventive and social medicine " ह्या विषयांतर्गत केला जातो .

५ ) निद्रा : दिवसभर झालेल्या बौद्धिक आणि शारीरिक ताणाने झिजलेले शरीर झोपेच्या काळात आपली झीज भरून काढते . कारण त्या काळात शरीराच्या सर्व क्रिया नेहमीच्या , सामान्य धारेत ( optimum ) काम करत असतात . त्यामुळे नियमित आणि शांत झोप आपले आरोग्य मोठ्या प्रमाणात नियंत्रित करत असते .
" सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटणे " हे योग्य आणि पुरेशी झोप झाल्याचे निशाण आहे .

६ ) स्वप्ने : स्वप्नांचा तसे म्हटले तर आरोग्याशी काहीही प्रत्यक्ष संबंध नाही . पण सखोल समजून घेतले तर भरपूर आहे .
आपल्या मराठीत एक म्हण आहे " मनी असे ते स्वप्नी दिसे ". सिगमंड फ्रोइड स्वप्नांना म्हणतो " dreams are the express ways of our subconscious emotions ". ! आपल्या मनात खोलवर दडून बसलेल्या सर्व भावनांचा राजमार्ग म्हणजे स्वप्न !!
आपली स्वप्ने आपल्या मनात खोलवर दडून बसलेल्या सर्व भावनांना व्यक्त करतात . आणि भावनांचा आणि आजारांचा काय संबंध आहे हे आपण कालच पाहिले . म्हणजेच आजार समजून घेण्यापेक्षा आजारी माणसाला समजून घेण्यासाठी स्वप्नांचा महत्वाचा उपयोग होतो . होमिओपथित ह्या अभ्यासाला विशेष महत्व दिले आहे .

७ ) महिलांचा मासिक धर्म ( menstrual cycle ) : महिलांचा मासिक धर्म हा पूर्णपणे शरीराच्या अंतरस्त्रावांवर ( hormones ) वर अवलंबून असतो . ही अंतर्स्त्रावे काय काम करतात , हे आपण अगदी थोडक्यात काल समजून घेतले आहे . शरीराच्या सर्व क्रिया प्रत्यक्ष नियंत्रित करून माणसाचे आरोग्य राखणे वा आजारी पडणे हे ह्या hormones वरच अवलंबून असते .
तसेच महिन्याला होणारा रक्तस्त्राव , त्याचा कालावधी , त्याचे प्रमाण हे शरीरातले रक्ताचे प्रमाण ठरवते . शरीरातले रक्ताचे प्रमाण आणि आपले आरोग्य ह्यांचा संबंध मी वर्णन करायला हवाच असे नाही . आपल्या सर्वांना तो चांगलाच माहीत आहे . मासिक धर्माआधी आणि मासिक धर्माबरोबर भावनांचे जे आंदोलन होते त्याचा आपल्या तब्येतीवर निश्चितच परिणाम होतो .

८ ) माणसाचे लैंगिक आयुष्य : लैंगिक आयुष्य हा प्रत्येक माणसाचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि खाजगी विषय ! ह्यावर खरे तर एक मोठा लेख लिहिता येईल . जागेअभावी अगदी थोडक्यात मांडतो आहे . मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी sex चे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे . .

हे महत्वाचे घटक आपण समजून घेतलेत ! त्यांची तोंड ओळख करून घेतली . हा विषय खूप मोठा आहे . पण आपण तो थोडक्यात समजून घेतला आहे .

आता लक्षात आलेच असेल की माणसाचा आजार म्हणजे फक्त - त्याच्या आजाराची लक्षणे ( symptomatology ) , डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर त्यांना मिळणारे निष्कर्ष
( examination findings ) आणि त्याच्या प्रयोगशालेय तपासण्यांचे निकाल ( laboratory investigation results ) ह्यांची बेरीज नव्हे . ते काही गणित नाही ! जे दिसते , जे जाणवते आणि जे लागते त्याच्यापलीकडे बरेच काही आहे त्यात !

थोडक्यात मानवी आजार हा खालील घटकांवर अवलंबून असतो
अ ) माणसाचा मूळ स्वभाव , त्याच्या आयुष्यात घर , समाज आणि कार्यस्थळ ह्या तीन पातळ्यांवर त्याला आलेले ताण - तणाव ( mental attributes and mental stress )
ब ) माणसाची शरीररचना ( constitution )
क ) माणसाचा आहार , विहार , निद्रा , मैथून , स्वप्ने ( food , habitat , sleep , dreams , sexual life )
ड ) स्त्रियांच्या बाबतीत त्यांचा मासिक धर्म ( menstrual cycle )
इ ) माणसाचे पूर्वीचे आजार आणि त्याच्या रक्ताच्या नातेवायीकांचे आजार ( Genetic history )

ह्या सर्वांची एक गोळाबेरीज .असते . बरे हे घटक स्वतंत्र नसतात . एकमेकांमध्ये असे गुंतलेले असतात की एकमेकांपासून त्यांना अजिबात वेगळे करता येत नाही .
म्हणजेच माणसाचा एखादा अवयव ( organ ) किंवा एखादी शरीरसंस्था ( body system ) आजारी पडत नसून संपूर्ण माणूस आजारी पडतो . " Not the body parts or system is diseased but the entire human is ! ". " माझ्या बाबतीत ही अमुक गोष्ट झाली म्हणून तमुक आजार झाला " असे होत नाही . त्या अमुक एका गोष्टीला फक्त " exciting cause किंवा precipitating cause " म्हणतात ज्याने आजार सुरु होतो . पण आजार वरील सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असतो .

फक्त लक्षणे दुरुस्त करायची म्हणजे मुळापासून आजार बरे करणे होत नाही . ती फक्त वरवरची मलमपट्टी होते . आजार मुळापासून बरा करायचा असला तर मग वर दिलेल्या सर्व घटकांचा विचार करूनच औषध दिले पाहिजे .

एक उदाहरण देतो म्हणजे मी इथे काय म्हणतोय ते स्पष्ट आणि चांगले लक्षात येईल .
Acidity ! मुंबईकरांच्या जीवनातला एक नियमित आजार !! acidity च्या लक्षणांनुसार औषध दिले तर ती फक्त वरवरची मलमपट्टी होईल . तेव्हा acidity चा त्रास होणार नाही . पण तो कायमकरता जावा ह्यासाठी मात्र आपल्याला वर दिलेल्या सर्व घटकांचा म्हणजे माणसाचा मूळ स्वभाव , त्याचे ताण - तणाव , त्याची शरीररचना ( constitution ) , त्याचा आहार , विहार , निद्रा , मैथून , स्वप्ने , त्याची अनुवांशिकता इत्यादी सर्व घटकांचा अभ्यास करून औषध द्यावे लागेल . त्या औषधाच्या वैशिष्ट्यांमध्ये ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असायलाच हवा .
तेव्हा पूर्ण शरीराचे ( The man as a whole ) सर्व आयामात { मानसिक व शारीरिक } आरोग्य कसे लाभेल हे आपण पुढच्या लेखात बघू.

सौजन्य डॉ सुबोध नाईक

माणूस आजारी का पडतो ? भाग 1 संग्रहित

माणूस आजारी का पडतो ?

" अमुक एका आजारावर सल्ले आणि औषधे " ह्या स्वरूपाच्या भरपूर पोस्ट्स सध्या फेसबुकवर दिसतात . बाजारात साधी पाच रुपयाची कोथिंबीर विकत घेताना आपण दहा वेळा ती निट आहे का , ताजी आहे का हे तपासून घेतो . त्यासाठी कमीत कमी दोन भाजीवाल्यांकडे जातो . मग " आपल्या ह्या अमुल्य शरीराबाबत एवढा निष्काळजीपणा का ? बेपर्वाई का ?

"अहो , निसर्गाने दिलेले हे अमुल्य शरीर नेमके काय आहे , त्यातले नेमके काय बिघडले आहे म्हणून मला हा आजार झाला आहे , त्याच्यासाठी मी नेमके काय केले पाहिजे , मी बरा झालो म्हणजे नेमके काय " हे समजून घेणे हा प्रत्येक माणसाचा अधिकार तर आहेच पण कर्तव्यही आहे !

त्यानुसार आजार म्हणजे नेमके काय , निरनिराळे आजार , निरनिराळ्या तपासण्या , त्याचे उपचार ह्याविषयात एक लेखमाला सादर करत आहे .
आपल्या सहकाराची खात्री आहेच . चल सुरुवात करूया !

वैद्यकीय शास्त्रात सर्वोच्च मनाला गेलेला एक नियम " चांगला डॉक्टर हा आजाराचे बिनचूक निदान करतो तर उत्कृष्ठ डॉक्टर हा आजाराबरोबर आजारी माणसाचेही निदान बिनचूक करतो आणि आजारांबरोबर आजारी माणसालाही मुळापासून बरे करतो ". हे वाचल्यावर एक प्रश्न मनात येतो " आजारी माणसाला बरे करणे म्हणजे काय ? औषाधोप्चाराबरोबर योग्य आहार , योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती घेणे म्हणजेच आजारी माणसाला बरे करणे का ? हो ह्या गोष्टी गरजेच्या आहेतच पण त्याच म्हणजे सर्वस्वी " आजारी माणसाला बरे करणे नव्हे ". ही अतिशय व्यापक संकल्पना समजून घेण्यासाठी आपण प्रथम समजून घेऊ

माणूस आजारी का पडतो ?
आजाराची सर्वसामान्य करणे आपल्याला माहित असतात .आजार म्हणजे नेमके काय झाले आहे हेही आपल्याला ढोबळ मानाने का होईना पण माहित असते . पण " nothing exists without a reason " ह्या न्यायाप्रमाणे ह्या गोष्टी नेमक्या का होतात हे समजून घेऊ .

" Man is the social animal "( मनुष्य हा समाजशील प्राणी आहे ) ह्या व्याख्येप्रमाणे माणसाचे अगदी गर्भात असेपासून ( आठवा 'महाभारतातील अभिमन्यु ') ते अगदी म्रुत्युशय्येपर्यन्त ( आठवा ' राजांचे ' बाजीप्रभू देशपांडे' ) समाजाशी घर , समाज आणि कार्यस्थळ ह्या तीन पातळ्यांवर संबंध येत असतो , ह्या तीन पातळ्यांवर त्याचे घर्षण होत असते . न्युटनच्या गतीच्या नियमाप्रमाणे घर्षण झाले की उर्जा तयार होणारच ! आता ही उर्जा नेमकी कोणत्या स्वरुपात असते आणि ती नेमकी काय करते हे समजून घेण्यासाठी शरीराची थोडी रचना समजून घेऊ .

आपल्या मेंदूत भावनांची जी अनेक केंद्रे असतात त्यापैकी एक आहे - hypothalamus ( हायपोथलमस ). मेंदूच्या खाली हा भाग असतो . त्याचाच अर्धा भाग हा posterior pitutary gland म्हणून ओळखला जातो . Gland म्हणजे ग्रन्थि ! ग्रंथीसंस्था हा शरीराचा महत्वाचा भाग असून शरीराच्या सर्व क्रिया - प्रक्रिया ह्या प्रत्यक्षात त्यांच्याकडून अमलात आणल्या जातात . ग्रंथी निरनिराळी आंतरद्रव्ये ( hormons ) स्त्रवून हे काम करत असतात .

आता ही posterior pitutary gland आहे न ती ओळखली जाते " सर्व ग्रंथींची राणी " म्हणून ! कारण प्रत्येक ग्रन्थिने काम केव्हा करायचे आणि कसे करायचे हे ती ठरवते.
म्हणजे भावनांचे एक केंद्र " hypothalamus " आणि शरीराचे सर्व कामकाज प्रत्यक्षात नियंत्रित करणारी " posterior pitutary gland " ह्या एकमेकांना चिकटून असतात .
आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू !

तर कोणत्याही प्रकारे मानवी मनाचे घर्षण झाले ( ताण - तणाव आला ) की मग निरनिराळी आंतर द्रव्ये ( hormones ) स्त्रवली जातात . एका मर्यादेपर्यंत माणूस हा ताण सहन करू शकतो . पण जेव्हा माणूस त्याच्या मर्यादेबाहेर ताण सहन करतो किंवा त्याचा ताण परत परत येत असतो , तेव्हा ह्या posterior pitutary ग्रंथीचे काम बिघडते , त्यामुळे पर्यायाने thyroid व adrenals ह्या उपमुख्य ग्रंथींचे काम बिघडते . त्या प्रमाणाबाहेर स्त्रवू लागतात . त्यामुळे शरीराला हळूहळू functional व नंतर structural आजार व्हायला सुरुवात होते . आजाराची कारणे ( माणसाचे अन्न व राहणे व इतर ) त्याच्यात तेल ओतण्याचे काम करतात . माणूस प्रत्यक्ष आजारी पडतो .
हा झाला मूळ आजार ! आता माणसाला पूर्णपणे त्याच्या आजाराबरोबर बरे करताना ह्याही सर्व गोष्टींचा अभ्यास करून औषध दिल्यावरच तो आणि आजार पूर्णपणे बरा होईल .

थोडक्यात माणसाचा मूळ स्वभाव , त्याला आयुष्यात आलेले ताण - तणाव , त्याचा त्याच्यावर झालेला परिणाम , त्याचे अन्न , राहणीमान , झोप , स्वप्ने , लैंगिक जीवन , मासिक धर्म , त्याचे पूर्वीचे आजार , त्याच्या रक्ताच्या नातेवायीकांचे आजार ह्याचा पूर्णपणे , सखोल अभ्यास केल्यावरच आपण माणसाला बरे करू शकू .

माणसाचे ताण - तणाव आणि त्याला होणारे आजार ह्यांचा जवळचा संबंध ह्यांचा अभ्यास psychodynamics ह्या शाखेत केला जातो . कोणत्या भावनांमुळे कोणते आजार होतात आणि कोणत्या अवयवांना आजार होतात ह्याचाही अभ्यास ह्या शाखेत केला जातो . ( nature of disease and site of disease ). ह्या नजरेने बघितल्यास आपल्याला झालेले आजार आपल्याला एका मोठ्या नजरेतून बघत येतात , समजून घेत येतात . दोन उदाहरणे देतो .

१ Slipped Disc : आपला मणका ( vertebral column ) हा खूप कडक ( stiff ) असतो त्यातील चेतारज्जुचे ( spinal cord ) चे रक्षण करण्यासाठी ! त्याचबरोबर तो लवचीकही ( flexible ) असतो हालचालीसाठी !

केव्हा कडक राहायचे आणि केव्हा लवचिक ते तो ठरवतो .
पण जेव्हा एखाद्या ताठ कण्याच्या माणसाला परिस्थितीपुढे त्याच्या इच्छे विरुद्ध वाकावे लागते तेव्हा ह्या मणक्यांमधील गादी बाहेर सरकते ( intervertebral disc ) आणि त्याला slipped disc चा त्रास होतो .

२ मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात अगदी सामान्य असलेला आजार म्हणजे acidity ! ( असिडिती ) .

आता जेव्हा आपल्या जठरात प्रमाणाबाहेर acid साठते कींवा जठराच्या ( stomach ) अस्तराची ( mucous membrane ) ची असिड चा दाह सहन करायची शक्ती कमी होते तेव्हा acidity होते .
माणसाची झोप कमीजास्त , अनियमित होणे , त्याच्या खाण्यापिण्याचे ताळतंत्र बिघडणे ही acidity ची मुख्य करणे आपल्याला माहित असतात . पण जेव्हा माणसाच्या आयुष्यातील कटू प्रसंग त्याच्या मनात घर करून राहतात , विसरू म्हणता त्याला विसरता येत नाहीत तेव्हा त्याला acidity चा त्रास होण्याची शक्यता वाढते . बघा कडू आठवणी आणि acid ची कडू - आंबट चव !
म्हणजेच आजाराचा असा सर्वांगाने अभ्यास केल्यावरच आपण जे म्हणतो की आजारी माणसालाही बरे करायचे ते आपण करू शकतो . होय त्याबरोबर आजाराची वैद्यकीय कारणे , निरनिराळ्या तपासण्या ह्याही गोष्टींचा ह्या अभ्यासात समावेश झालाच पाहिजे

सौजन्य डॉ सुबोध नाईक

Saturday, March 7, 2015

इर्षा

आज नेहमी प्रमाणे सकाळी सायकल चालवायला निघालो,वाटेत एक सायकल चालवत पुढे एक मनुष्य जात होता
बहुतेक कामाच्या ठिकाणी तो रोज सायकल चालवत जात असावा , हैंडलला टिफिन पिशवी लावलेली
तो रोज सायकल चालवणारा सराइत सायकलपटु होता
माझ्या मनात आले याला मागे काढायला जमते का बघू ?? आणि मी माझा पेडलिंग वेग वाढवला
एका क्षणी मी त्या सायकल स्वाराला मागे काढून 4-5 फुट पुढे निघून गेलो,
2-3 मिनिटामध्ये त्याने मला मागे काढले व एक टफ लुक देवून खुप पुढे निघून गेला
मला खुप हसू आले , कारण नेहमी सायकल चालवणारा तो माणुस एका इर्षेपायी मला हरवल्याचा आनंद मिळवून गेला.
त्यानंतर मी तोच विचार करत होतो
काय असेल त्या माणसाचा विचार , ना मला मागे काढून त्याला कोणता पुरस्कार मीळणार होता ना त्याची रोजची सायकल रपेट थांबणार होती
ना मी त्याला शाबासकी देणार होतो ना की मी त्याच्याशी स्पर्धा करू शकेल एवढा तुल्यबळ सायकल पटू होतो

पण त्याच्या मनातील इर्षा त्याला थांबवू शकली नाही

या इर्षे संदर्भात एक गोष्ट आठवली

चीनमध्ये एक तरुण निष्णात धनुर्धर होता. आपल्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. एकदा तो राजाला म्हणाला , ' मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे तुम्ही जाहीर करा , मला आव्हान देण्याची कुणाची इच्छा असेल तर ते मी स्वीकारण्यासाठी तयार आहे. '

राजा प्रगल्भ होता. तो हसला आणि म्हणाला , ' बाजूच्या जंगलात तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. तू त्याला भेट नंतर आपण ही घोषणा करू. कारण तो ही घोषणा एकून इथे येणार नाही. जो श्रेष्ठ असतो तो कधीच कुणाशी स्पर्धा करीत नाही. इर्षा ही नेहमी कनिष्ठांच्याच मनात असते. '

तरुण धनुर्धर उत्सुकतेनी त्या निर्मनुष्य जंगलात गेला. खूप आत एका झोपडीजवळ एक वृद्ध त्याला काम करताना दिसला. तरुणाने त्याला विचारले , ' आपण धनुर्धर आहात का ?' तो उत्तरला , ' मी कधीकधी धनुष्य चालवत असतो , पण मी धनुर्धर आहे का हे मात्र लोक ठरवतील. ' तरुणाच्या विनंतीवरून त्या वृद्धाने आपली धनुष्यकला दाखवली आणि तरुण चकितच झाला. कारण वृद्धाच्या तुलनेत तरुणाला काहीच येत नव्हते. तीन वर्ष तो तरुण वृद्ध धनुर्धराकडे अभ्यासासाठी थांबला. आता तोही त्या विद्येत चांगलाच पारंगत झाला. आपल्याला सगळे काही येते असे त्याला वाटू लागले.

एक दिवस गुरू लाकडांची मोळी घेवून येत असताना तरुणाने त्यांच्यावर बाण चालवला. अतिशय चपळाईने वृद्ध गुरूने मोळीतील एक लाकूड फेकून मारले आणि बाण उलटा जाऊन तरुणाच्या छातीत घुसला. वृद्धाने तरुणाच्या छातीतून बाण काढताना सांगितले. ' हा एक डाव मी तुला शिकवला नव्हता. कारण मला तुझ्या मनातली इर्षा ठाऊक होती. एक दिवस सर्वश्रेष्ठ होण्यासाठी तू मलाही मारशील हे मला माहीत होते. पण तू घाबरू नकोस. मला मेलेलाच समज. कारण मी कधीही कुणाशीच स्पर्धा करीत नाही. मला माहीत आहे माझ्या गुरूच्या तुलनेत मला काहीच येत नाही. माझ्यापेक्षाही निष्णात असणारे माझे गुरू बाजूच्या हजार फूट उंच डोंगरावर एकटेच राहतात.

तरुण खजिल झाला होता पण अधिक उत्सुकतेनी तो डोंगरावरच्या या महागुरुला भेटायला निघाला. उंच कड्यावर खोल दरीच्या अगदी काठावर हे महागुरू एका पायावर तोल सांभाळून उभे होते. तरुण त्यांना दुरूनच म्हणाला , मी धनुर्धर आहे.

महागुरू म्हणाले , ' अरे मग धनुष्यबाण कशाला बाळगतोस ? ते तर शिकण्याचे साधन आहे. एकदा का तू निष्णात झाला की धनुर्धर तर तुझ्या आत हवा. आत्म्यात भिनलेला. अजूनही तू धनुष्यबाण बाळगतो म्हणजे तू बच्चा आहेस. ये तू माझ्याजवळ ये. मी तुला निष्णात करीन. खोल दरीच्या काठावर येण्यास तरुणाचे मन धजावले नाही. तरुण म्हणाला , ' मी अजून जवळ येवू शकत नाही. भीतीने माझ्या मनाचा थरकाप उडत आहे. '

महागुरू हसले आणि म्हणाले , ' ज्याचे मनच स्थिर नाही त्याचा निशाणा कसा अचूक लागणार. ' तेवढ्यात त्यांनी डोक्यावरून जाणाऱ्या पक्ष्यांच्या रांगेकडे हाताने निशाणा केला आणि सारे पक्षी जमिनीवर येवून कोसळले. अवाक झालेला तरुण परतला आणि राजाला म्हणाला , ' मला कुणाशीच स्पर्धा करायची नाही. मी सर्वश्रेष्ठ तर सोडा साधा धनुर्धर म्हणावयाच्याही लायकीचा नाही. '
तात्पर्य काय स्पर्धा इर्षा फक्त चुरस निर्माण करते पण जोडीला मानसिक अस्वास्थ पण देते
काय वाटते तुम्हाला ??

-- निलेश जोशी