Thursday, January 29, 2015

महाराणा प्रताप

आज महाराणा प्रताप पुण्यतिथि
त्याना त्रिवार वंदन करून त्यांच्याबद्दल थोड़ी माहिती घेऊ

भारताच्या इतिहासात शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच महाराणा प्रताप यांचेही नाव अजरामर झाले आहे. राणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते.

        जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, ``स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे रजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य रजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.''

        राणाजींच्या या घणाघाती वक्तव्याने डिवचला गेलेला मानसिंग वाढलेल्या पानावरून तसाच उठला आणि तेथून जाता जाता म्हणाला, ``प्रतापसिंह! रणांगणात तुझी मी वाट नाही लावली, तर नावाचा मानसिंग नाही !''

स्वामिनिष्ठ चेतक

        मानसिंग प्रचंड सैन्य आणि भरीला अकबराचा मुलगा सलीम यालाही घेऊन राणा प्रताप यांच्या पारिपत्याच्या मोहिमेवर निघाला. राणाजींना ही वार्ता लागताच त्यांनी अरवली पर्वतावरील वाटेने जाणाऱ्या मानसिंगाच्या सैन्यावर छुपे आक्रमण करून त्याचे बरेच सैनिक गारद केले. राणा प्रताप यांच्या तलवारीच्या घावाने शहाजादा सलीम ठार होणार होता; पण वेळीच त्याने हालचाल केल्यामुळे तो वार त्याच्या हत्तीवर बसला. मानसिंग तर राणा प्रताप यांच्या तलवारीच्या धाकाने स्वत:च्या सैन्याच्या पिछाडीला राहिला. राणाजी आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रूसैनिकाने राणाजींचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला.

        आपला पाठलाग कोण करत आहे, हे पहाण्यासाठी राणा प्रताप यांनी मागे नजर टाकली, तर अकबराला जाऊन मिळालेला आपला धाकटा भाऊ शक्तीसिंह हा त्याच्या समवेत आलेल्या चार-पाच मोगल सैनिकांना जिवे मारत होता. राणाजी ते दृश्य पाहून अचंबित झाले. तेवढ्यात त्या पाचही शिपायांचे प्राण घेऊन शक्तीसिंह राणाजींजवळ आला आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाला, ``दादा ! तुझ्यासारखे असीम शौर्य आणि कणखर मन यांच्या अभावी मी जरी मोगलांची सरदारकी करत असलो, तरी तूच माझा आदर्श आहेस. तुझ्यापुढेच काय; पण तुझ्या त्या निष्ठावंत घोड्यापुढेही मी तुच्छ आहे.''

        मेवाडचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉण्ड याने राणा प्रताप यांचा गौरव करतांना म्हटले आहे, `प्रबळ महत्त्वाकांक्षा, शासन निपुणता आणि अपरिमित साधनसंपत्ती यांच्या जोरावर अकबराने दृढनिश्चयी, धैर्यशाली, उज्ज्वल कीर्तीमान आणि साहसी अशा प्रतापला नमवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला.'

--निलेश जोशी

No comments: