Monday, August 1, 2016

दिव्यानुभव 2

#दिव्यानुभव

मी मुंबईत एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होतो तेव्हाची गोष्ट साधारण सप्टेंबर 2003
पंजाब इथे दिलेल्या काही प्रॉडकट मध्ये पार्टस फ्री ऑफ कोस्ट बदलून द्यायचे कंपनीने ठरवले , कारण तसे नसते केले तर ते प्रॉडकट फ्लॉप झाले असते व कोणीही कोर्टात जाऊ शकले असते
या कामासाठी साधारण 7 टीम बनवल्या त्यात माझ्याकडे एका टीमची जबाबदारी
पूर्ण टीम हॉटेल बुकिंग तेथील प्रवास खर्च मलाच करायचा होता म्हणून कंपनीतून 80000 ऍडव्हान्स घेतला
राजधानी एक्सप्रेस चे बुकिंग झाले होते त्याच दिवशी संध्याकाळी निघायचे होते
मनात खूप भीती , एकट्याने एवढा लांबचा प्रवास व एवढे पैसे जायचे कसे ?
मी मनात स्वामी व गजानन महाराजांचे स्मरण केले व यात तुम्हीच मला सांभाळा अशी मनापासून प्रार्थना केली
कंपनीतून घरी निघालो व मालाड स्टेशन जवळील साई मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तेथेही स्वामी व गजानन।महाराज व साई महाराज यांना मनापासून नमस्कार केला व बाहेर आलो तर ICICI बँक ATM दिसले अचानक मनात विचार आला येवढी रक्कम न नेता माझ्या अकाउंटला भरायची व लागेल तशी ATM मधून काढता येईल .
लगेच जवळच्या ब्रँच मध्ये जाऊन माझ्या खात्यावर 75000 भरले व सोबत 5000 ठेवले .
थोडे हायसे वाटले , आता प्रवास चालू कधी होणार ही उत्सुकताही होतीच,
राजधानी एक्सप्रेस एक आलिशान व फास्ट गाडी, मी तिकिटे व बॅग घेऊन व पुन्हा सर्व चेक करून CST ला आलो
दुसऱ्या दिवशी 11 ला गाडी दिल्लीला पोचणार व दुपारी 54 वाजता शताब्दी पकडून जालंधर ,त्याचेही तिकीट कन्फर्म होते
आता प्रॉब्लेम एकाच होता राजधानी जाणार नवी दिल्ली स्टेशन वर व हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून जालंधरसाठी ट्रेन
काय होईल बघतील स्वामी असा विचार करून राजधानी एक्सप्रेस मध्ये बसलो ,
पूर्ण रात्र प्रवास न्जॉय केला व सकाळी जाग आली तेव्हा मात्र टेन्शन यायला लागले , नवी दिल्ली ते हजारात अंतर किती वैगरे काहीच माहिती नाही , भर एसी गाडीत मला घाम सुटला , मी पुन्हा स्वामी व गजानन महाराज यांचे स्मरण केले व मनातल्या मनात गजानन बावंनी म्हणायला लागलो, साधारण तासाभराने दिल्ली स्टेशन येणार होते व इतक्यात एक गृहस्थ येऊन आमच्या कंपार्टमेंट मध्ये बसले , मी कालपासून त्यांना नव्हते पाहिले पण मग वाटले माझ्या प्रवासाच्या धुंदीत नसेल गेले लक्ष , त्यांच्याकडे बघितल्यावर माझ्याकडे त्यांनी बघितले व स्मितहास्य केले , मग हळूहळू कुठे जाणार etc गप्पा चालू झाल्या व मी त्यांना माझा गाड्यांचा प्रॉब्लेम सांगितलं
ते म्हटले ते न्यू दिल्लीला उतरून पुढे कारने जाणार आहेत तेव्हा वाटेत हजारात निजामुद्दीन स्टेशन लागेल तेथे उतर व पुढे गाडी पकडणे सोपे जाईल
जिवात जीव आला पण दिल्ली ठग असतात तसाच कोणी नाही ना अशी शंकाही आली पण नंतर देवावर सोडून मी त्यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला
स्टेशन आले , त्यांच्या मागोमाग मी जायला लागलो , स्टेशन बाहेर अनेक टॅक्सी होत्या व लोक धावून बॅग घेत होते पण ते म्हटले की इकडे टॅक्सी महाग सांगतात आपण बाहेरून टॅक्सी करू , असे म्हटल्यावर मी त्यांच्याबरोबर स्टेशनच्या बाहेर आलो , त्यानी टॅक्सी केली ,मीही बसलो , मला ते निजामुद्दीन स्टेशनबाहेर पोचवून मला म्हणाले घाबरू नको , इथे क्लॉकरूम असेल तिथे बॅग्स ठेवून बिनधास्त आजूबाजूला फिरून ये , सर्व प्रवास व्यवस्थित झाला ना या पुढेही होईल .
मी त्यांना रिक्वेस्ट केली की काका तुमचा नाव व मोबाईल नंबर द्या व मी हॉटेलवर पोचल्यावर फोन करून सांगेन व मनातल्या मनात त्यांना नमस्कार केला.
त्यांनी छान स्मितहास्य केले व मी दिलेल्या पॉकेट डायरी मध्ये सुवाच्च अक्षरात नाव गणेश व मोबाईल नंबर लिहून दिला.

प्रवास सुखरूप झाला व रात्री हॉटेलवर पोचल्यावर त्या नंबर वर फोन करत होतो पण नंबर अस्तित्वात नाही सांगू लागले . विचार केला नेटवर्क बिझी असेन उद्या करू , त्यांनतर जवळपास 2 महिने मी तो नंबर लावण्याचा प्रयत्न केला तर तेच उत्तर हा नंबर अस्तित्वात नाही . मला मार्ग दाखवायला स्वतः गजानन महाराज आले होते हे नक्की .

जय गजानन
।। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ।।

Monday, July 18, 2016

शह प्रतिशह

#केव्हीडीकल्पनाविस्तार

"I beg to disagree !" अतिशय मंजुळ पण आत्मविश्वासपूर्ण आवाज कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला आणि आपल्याच प्रेझेंटेशनमध्ये गुंगलेल्या हर्षदने अविश्वासाने मागे वळून पाहिले!

हर्षद क्षीरसागर, HK ग्रुपचा चेअरमन. फर्स्ट जनरेशन बिझिनेसमन. सेल्फ मेड मॅन. कोट्याधीश. आपले कोणतेही निर्णय कधीच चूक नसतात ह्याचा अभिमान बाळगणारा. आणि काही चुकले तरी "मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया" ह्या टेचात वावरणारा. थोडक्यात आलम दुनियेला फाट्यावर मारून आपल्याच धुनकीत जगणारा मस्त कलंदर. त्याला विरोधाची सवयच नव्हती. त्याचे मुख्य कारण असे की त्याला विरोध करायचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अक्कल असणे आवश्यक होते किंवा नोकरी गमवायची तयारी आवश्यक होती. ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव स्टाफ मेम्बर्सपैकी प्रत्येकात असल्याने कोणी त्याच्या वाटेला जात नसे. हर्षदही शक्यतो धंद्यात चुकत नसे. त्याचे आजवरचे बहुतेक निर्णय लॉन्ग टर्म मध्ये योग्यच ठरले होते. जे चुकले त्यातून त्याने स्वतः धडे घेतले होते. पण आजवर त्याला तू चुकतो आहेस हे सांगणारे ऑफिसात कोणीच भेटले नव्हते. त्यामुळे ते वाक्य ऐकून हर्षद अविश्वासाने मागे वळला. कॉन्फरन्स रूममध्ये दडपणयुक्त शांतता पसरली!

त्या आवाजाच्या दिशेने पाहात हर्षद म्हणाला "come again please!"

तोच आवाज आणखी निर्धाराने आला "मला हा निर्णय कंपनीच्या हिताच्या दृष्टीने जरा रिस्की वाटतो आहे. This will impact the top line badly and also the reputation of the organisation!"

मानसी पटवर्धन, फक्त हुशारीच्या जोरावर सीए आणि एमबीए करून दहा वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन HK मध्ये व्हीपी फायनान्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. HK मध्ये, विशेषतः हर्षद समोर डेसिग्नेशला फारसा अर्थ नसे. हर्षदने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पाचशेच्या वर स्टाफ पगार घेत होता. त्याच्या दृष्टीने त्यातीलच एक "जरा जास्त पगार घेणारी" ह्या पलीकडे फारसे महत्व नसलेली बाई आज त्याला मॅनेजमेंट टीम समोर चॅलेंज करत होती. चक्क तू चुकतो आहेस असे खुल्ला सांगत होती!

"ओह. आपण जे काही म्हणालात ते जरा डिटेल मध्ये समाजवाल का आम्हा सर्वांना?" इतके कुत्सितपणे म्हणत हर्षद त्याच्या गुबगुबीत चेयरमध्ये कॉफी सिप करत बसला आणि मानसीला समोर येऊन बोलायची त्याने सूचना केली. मानसी शांतपणे चालत पुढे आली आणि हर्षदचेच प्रेझेंटेशन एक एक स्लाईड करत दाखवत, त्यावर आपले मत मांडत आपले मुद्दे डेटा पॉइंट्ससह शाबीत करत गेली. हर्षदला तिची हुशारी, आत्मविश्वास, ज्ञान आणि मुख्य म्हणजे हिम्मत ह्याचे मनोमन कौतुक वाटत होते. तिचे प्रेझेंटेशन संपले. हर्षद हातात पेन फिरवत, पेनाकडे बघत विचारात गुंगला होता. दोन मिनिटे शांततेत गेली. सगळेजण हर्षदच्या प्रतिसादाची वाट बघत होते. अचानक हर्षद उठून उभा राहिला. बाकी सर्व लगबगीने उठले. "Gentleman let me think through this. Wait for my mail tomorrow." इतके म्हणून हर्षद निघून गेला. जाताना फक्त एक कटाक्ष मानसीकडे टाकून. ती शांतपणे आणि त्याच आत्मविश्वासाने उभी होती. सुंदर चेहर्यावर मोहक स्माईल लेऊन.

हर्षदने पूर्ण अभ्यास केला , मानसीने सुचवलेल्या बदलांची शहानिशा करताना त्याला 3 गोष्टी विशेषाने जाणवल्या ,
1. मानसी पूर्णपणे दूर उभी राहून प्रेझेन्टेशन ऐकत असतानाही तिने चाणाक्षपणे कमकुवत मुद्दे हेरले होते
2. आता जॉईन झालेली कोणतीही व्यक्ती एवढ्या फटाफट मॅनेजमेंट डिसीजन खाचखळगे ओळखू शकणे कठीण होते
3.तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगत होता कोणीतरी गॉडफादर आहे तिचा

आता या कठपुतळीमागचा खरा सूत्रधार शोधणे त्याला अनिवार्य वाटले , छान पैकी कॉफी घेऊन तो बाहेर लॉनवर आला , विचार करू लागला मला काटशह देऊन कोणाला फायदा होऊ शकतो ? त्यात 3 नावे समोर आली , त्याचा चुलतभाऊ हरीश क्षीरसागर ,त्याचे काका हरीलाल क्षीरसागर व त्याचा बिजनेस पार्टनर अंकित अगरवाल.
शान्त डोक्याने हर्षद आत आला व त्याने लॅपटॉप उघडून मेल लिहिला कि मानसी यांचे अभिनंदन कि त्यांनी कंपनीच्या दृष्टिने विचार करून आपले मत सांगितले तरीही मानसीचे मुद्दे बरोबर नाहीत व त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे , दरम्यान प्रोजेक्टला वेळ असल्याने सर्व स्टाफला या प्रोजेकट सक्सेस रेट बद्दल काय वाटते व काही सूचना असतील तर त्या देण्यासाठी सजेशन बॉक्स व इपोर्टल वर ब्लॉग चालू करण्यात येईल त्यात सर्वानी आपले मत सांगावे.

त्याने दुसरी महत्त्वाची इन्फो चेक केली अंकित अगरवाल पार्टनरशिप डॉक्युमेंट पण त्यात त्याला काहीही वावगे आठळले नाही , अंकितची मार्केटमधील पत पण घसघशीत होती व आजपर्यंत त्याने कोणताही बिजनेस पार्टनर्शीप करून गिळला नव्हता,
तसेच त्याने हरीश व हरीलाल यांचे शेअर संदर्भात कँलकुलेशन केले व त्याला थोडी कल्पना आली तरी ती व्हेरिफाय करण्यासाठी त्याने IT हेड निलेश ला बोलावून घेतले , दोघानी मिळून मानसी जॉईन झाल्यापासून तिला आलेले मेल्स, मोबाईल कॉल व इतर संदर्भ चेक केले , आणि त्याला जाणवले की मानसी खरंच एक बाहुली आहे व तिला नाचवले जातंय दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर ,

निलेश गेल्यावर हर्षदने मानसीला बोलावून घेतले , तिच्याशी सर्व मुद्दे पुन्हा डिस्कस करताना खूप प्रश्न विचारले , काही मेल संदर्भ व डेटा दाखवताना अचानक त्याला जाणवले मानसी प्रचंड दडपणाखाली आहे , मग त्याने लॅपटॉप बंद करुन मानसीला सर्व कल्पना दिली , तिला हेही सांगितले की आजपर्यंत माझ्या विरोधात गेलेला कोणीही कंपनीत टिकणार नाही इव्हन तीही ,
तिला त्याने सांगितले की सर्व मेल्स कॉल तपासून तो हे बोलत आहे , एवढे सांगितल्यावर मानसी एकदम बावरून गेली , तिने एकदा सर्व ऑफिसमध्ये नजर फिरवली व मान्य केले की हे सर्व तिच्याकडून करून घेतले जात आहे , हरीश हिरालाल दोघेही नावाने HKच आहेत पण हर्षदला बाजूला करून स्वतः HKचे मालक बनू इच्छित आहेत व त्यासाठी तिचा वापर करून घेतला जात आहे .
आता हर्षदने शोधून काढलेले सर्व दुवे जुळून आले व त्याने मानसीला ऑफर दिली , या सर्वात तिने न पडता राजीनामा देऊन निघून जावे , त्याबदल्यात अंकित अगरवालच्या कंपनीत तिला जॉब दिला जाईल व आर्थिक मदतही  पण त्याबदल्यात तिने स्वतःचे फायनान्सचे स्किल पणाला लावून हरीश व हिरालाल यांचे शेअर जे बेरजेने 49 टक्के होतात ते 5% नेऊन ठेवायचे . म्हणजे पुन्हा अनभिषिक्त मालक हर्षद होईल व प्रतिशह पण बसेल .
अर्थात मानसीला हे मान्य करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता व त्यामानाने हर्षदने दिलेली ऑफर सुरक्षित होती. तिने 2 दिवसाचा अवधी मागितला व केबिनबाहेर निघून गेली .
       2 दिवसांनी हर्षदच्या मेलबॉक्स ला 3 मेल होते जे वाचून हर्षद आपल्या नावाप्रमाणे आनंदित झाला
1. IT हेड निलेश मेल - प्रोजेकट इपोर्टल रेपोन्स चांगला आहे व खूप चांगले सजेशन्स येत आहेत , सर्व स्टाफ आपल्याला निर्णयात सामील करुन घेतले जाते आहे म्हणून आनंदित आहे.
2. मानासिचे रिजाईन लेटर त्याच्या अप्रोवलसाठी पेंडिंग आहे.
3. मानसीचा पर्सनल मेल थँक्स गिविंगचा व सांगितलेली जबाबदारी (प्रोजेकट 49 to 5 )पूर्ण झाला आहे.

-- निलेश जोशी

Wednesday, July 6, 2016

आधुनिक बहिणाबाई ओव्या

अरे संसार संसार जशी कणिक रोटीमेकरवर
आधी प्रेस व्हावे लागे तेव्हा बनते भाकर

अरे संसार संसार , शिळे जेवण ओव्हनवर,
सेट  करी 3मिनिटे, गरम जेवण ताटात

अरे संसार संसार , नको वाटण घाटण,
विद्युत चक्की तो मिक्सर , येई धावून लगोलग

अरे संसार संसार , झाडलोट नक्को बाई
चुटकीत होई साफ ,फिरवता व्हॅक्युम क्लीनर

अरे संसार संसार , धोबीघाट कित्ती त्रास
हाताशी वॉशिंग मशीन , धुणे करी सुसह्य

अरे संसार संसार , नाही वेळ घालवण्या साधन
टीव्ही वायफाय मोबाईल , स्मार्ट असे न्यू वुमन

-- निलेश जोशी

Tuesday, June 28, 2016

थेंब

थेंब थेंब बनते एक धार
धारा धारा मिळून बनतो पाऊस
पण पाऊस पडायला लागल्यावर
धारा कोण बघतयं ?
अनुभवायचा तो पाण्याचा थंड थेंब

जपून ठेवायचा मनात थेंब अन थेंब
पुढील भविष्यातील वर्षभरासाठी
जशी ऊर्जा साठवावी उमेदीची
पुढील प्रवासात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करण्यासाठी

तो अनुभवायचा प्रत्येक थेंब
वर्तमानातील घटनांसारखा
आणि अवलोकन करत टाकायची भर रोजच्या अनुभवात
उगाच नाही अनुभवला पावसाळे बघितले म्हणत

आणि तोच प्रत्येक थेंब घेऊन जातो भूतकाळात
पावसाळा ऋतूच थोडा अवखळ चांगले वाईट अनुभव जागे करतो
जशी पावसाची खळखळ बाहेर त्याच्या दुप्पट आवाज होत असतो मनाच्या आत
तरंग उमटवत मनावर हळूहळू पुन्हा वर्तमानात यायला कारणीभूत ठरतो आताच्या पावसाचा थेंबच

नकळत त्याचेच प्रतिबिंब झिरपतेय डोळ्यातून अश्रूंच्या रुपात
पाऊस संपला निरभ्र झाले आकाशही आणि सोबत माझे मनही
आणि या सर्वाचा साक्षीदार सुंदर टपोरा पाण्याचा थेंब

-- निलेश जोशी

Thursday, June 16, 2016

हुरहुर सूर्यास्ताची

"भावना वेळीच ओळखणे व नियंत्रित करणे, माणसासाठी महाकठीण काम !!  जेव्हा ते जमेल तोच  खरा संतपदाला पोचला असे समजावे "
टीव्ही वरील प्रवचन संपले आणि शारदाने टीव्ही बंद केला व बाहेर येऊन बसली .
सर्व जीवनपट सर्रकन तीच्या डोळ्यासमोरून सरकला , कोकणातील बालपण , अल्लडपणा , केलेला दंगा मस्ती व चांगले स्थळ आले म्हणून 18व्या वर्षी झालेले लग्न , त्यानंतरचा 5 वर्षाचा राजा राणी संसार , स्वतःचे घर आवरणे ,सांभाळणे ,वाढवणे पण यात लहान मुलाची काही भर पडली नाही.
नवरा शेखर अतिशय लाघवी , मनमिळावू व समजूतदार , छान संसार व जोडीला घरातील मोठे माणूस म्हणून मदतीला अक्का , या अक्का म्हणजे शेखरच्या लांबच्या मावशी म्हणज नात्यानेे शारदाच्या सासू पण मायेने आईच अधिक.

अक्का बाहेर आल्या व शारदाच्या शेजारी बसल्या , त्यांच्या डोळ्यातून काही अश्रू थांबत नव्हते , शारदेचे दुःख मोठे पण तिला कसे समजवावे कळत नव्हते.
3 महिन्यापूर्वी शेखरचे अपघाती निधन झाले होते , कंपनीच्या कामासाठी गेलेला शेखर अपघातात जागीच ठार झाला होता , डेड बॉडी असूनही तो शेखर आहे हे पण मानायला शारदा तयार नव्हती आणि समजावणे आक्कांना जमत नव्हते. शेवटी कंपनीतील लोकांनी सर्व सोपस्कार केले व निघून गेले.

त्या दिवसापासून शारदा खूप आतल्या आत कुढू लागली , अक्कांशी बोलणे कमी , जेवण खाण नाही , शुद्ध नाही , एकटक शेखरच्या फोटोकडे बघत राहणे किंवा टीव्ही बघणे एवढाच उद्योग.
शारदाने घरातील शेखरच्या फोटोला हार घालू दिला ना दिवसकार्य करायला दिले , तिचा एकच विश्वास शेखर परत येणारे , माझे मन मला सांगतेय शेखर जिवंत आहे.

अक्का खूप खचल्या होत्याच पण या पोरीच्या काळजीने अजूनच काळजीत पडल्या. तिला कसे समाजवयाचे कि शेखर गेला तरी हिचे आयुष्य पडलेय , सत्य स्वीकारून पुढे गेले पाहिजे , शो मस्ट गो ऑन.

लाईट गेले म्हणून आक्कांनी मेणबत्ती लावली व कंदील लावायला त्या खाली बसल्या , कंदील साफ करताना त्यांना काच फुटलेली दिसली व एक कल्पना सुचली , त्यांनी शारदाला बोलावून घेतले व विचारले , हा कंदील कुठे घेतलेला ग?
शारदा म्हणालीं,"आम्ही केरळला गेलो तेव्हा घेतलेला , शेखरला खूप आवडायचा हा कंदील,का हो पण असे का विचारले?"
"अग, याची काच फुटली , आता काय करूया असाच वापरायचा का? कि फेकून देऊया "
"नाही आक्का, काच मिळते बाजारात आपण नवीन आणू आणि बदलू , त्यासाठी कंदील कशाला फेकला पाहिजे"
"पोरी, मी हेच तर सांगतेय तुला , काच फुटली म्हणून
आपण वस्तू फेकून देत नाही तसेच बॅड पॅच आला म्हणून आयुष्य तिथेच गोठवून नाही ठेवायचे , जीवन एक झरा आहे तो वाहत राहिला पाहिजे , शेखर नाही हे सत्य स्वीकारून तुला पुढे गेलेच पाहिजे , मी जुने खोड कितीवेळ साथ देईन माहित नाही पण आयुष्याच्या सूर्यास्ताला सामोरे जाताना तशीच तजवीज केली पाहिजे निदान हे सत्य तुला स्विकारलेच पाहिजेस"

शारदा आक्काच्या कुशीत शिरली व हमसून रडू लागली जणू कंदीलाचे उदाहरण तिला पटले होते व तिच्या मनाने जणू सत्य स्वीकारायला सुरुवात केली होती.

आक्का मनाने शांत झाल्या , मोकळेपणाने रडणाऱ्या शारदाला थोपटत राहिल्या , सूर्यास्ताचा संधिप्रकाश त्याने वाढणारी हुरहुर व दूरवरून गाण्याचे बोल ऐकू येत होते

"कहीं दूर जब दिन ढल जाए
साँझ की दुल्हन बदन चुराए"

"दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे
खो गये कैसे मेरे सपने सुनहरे
ये मेरे सपने यही तो हैं अपने
मुझसे जुदा न होंगे इनके ये साये"

-- निलेश जोशी

Saturday, June 4, 2016

Misal भेट देण्याजोगी ठिकाणे

रविवारी काटाकीर प्लान करणाऱ्या सदस्यांसाठी - मी आपल्या समुहाचा एक सदस्य आहे म्हणून नाही पण माझ्या कडची मिसळ नक्कीच चवदार असते म्हणून माझ्या वडोबाला नक्की भेट द्या ….
११ प्रकारचे बटाटे वडे आणि ७ प्रकारची मिसळ देणारे श्री वडोबा हे जगातील एकमेव ठिकाण आहे !!
… फ्युजन बटाटे वड्यात तुम्हाला आगळे वेगळे उडीद ,मुग , डाळ बटाटे वडे सुद्धा मिळतील … आणि हो माझ्या कडे मिसळ खाणे म्हणजे एरवीच ( already ) तुम्हाला डिसकाउंट मिळतो … कारण काटाकिरररर ची अर्धी वाटी ( आमच्या मिसळ वाटीच्या मनाने )मिसळ आहे ६० रुपयाला  आणि आमची आहे ५० रुपयांना शिवाय आमच्या कडील पाव हे एफडीआय प्रमाणित बेकरीतूनच येतात आणि त्याचा आकार सुद्धा काटाकिरररर मध्ये मिळतो त्या पावपेक्षा दुप्पट असतो :) आमची निखारा दम मिसळ हि सगळ्यात स्पेशल मिसळ, याची किंमत आहे ७० रुपये …

नगरला जाताना सरदवाडीला संजय मिसळ.किंवा नवनाथ मिसळ

सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटाआधी भैरवनाथ.
मिसळीसाठी फेवरीट!!!

नाशिक रस्त्याला भामा नदी ओलांडली की लगेचच भाम रिव्हर टी हाऊस येथील मिसळ

बोरिवलीत ..  बाभई नाक्यावर  गोडवा उपहारगृह आणि  दहिसर  पूल  (पश्चिम ) समोर  सनाता  उपहार गृह आहे  तिकडे  काळ्या मसाल्यातली  मिसळ उत्तम  मिळते .. जरूर  खाऊन  बघा

...  अजून  एक  ठिकाण  म्हणजे  प्रबोधनकार  ठाकरे  नाट्यगृहाच्या  बाजूला  प्रकाश  खांडेकर  यांच अन्नदाता  पोळीभाजी  केंद्र  आहे  तिथे  पण  मिसळ उत्तम  मिळते ..

नॅन्सी बस डेपो उपहारगृह मिसळ

Tuesday, March 1, 2016

मराठीने मला काय दिले?

उत्तम शब्द उत्तम संस्कार
उत्तम वाणी उत्तम विचार
सर्वोत्तम माझी भाषा मराठी
मराठीने मला हे सर्व दिले

काय घ्यावे काय टाळावे
काय चाहत काय जरुरत
चांगले वाईट यांची तुलना
मराठीने मला हे सर्व दिले

स्तोत्रे श्लोक व शुभंकरोती
ओव्या, लयबद्ध काव्यपंक्ती
वृत्ते काव्य अर्थपूर्ण गझला
मराठीने मला हे सर्व दिले

मनातील द्वंद्व मराठीमधूनी
वादविवादही त्याच भाषेमधुनी
स्तुतीपर शब्दांचा अगाध कोष
मराठीने मला हे सर्व दिले

बोलीभाषा जरी मालवणी
आईची भाषा असे कोकणी
कुशीत घेऊन पुरविले लाड
मराठीने मला स्वातंत्र  दिले

सुविचार म्हणी सर्वाचा खजाना
अभंग वृत्तपत्रे पुस्तकांचा साठा
भाषणे लेख मजकूर विचारा
मराठीने मला हे सर्व दिले

अनेक मित्र खेळ सवंगडी
लेख निबंध पद्यरचनेची गोडी
विदा पूल विवा वपु खांडेकर
मराठीने नेहमीच भरभरून दिले

-- निलेश जोशी