मृत्यूच्या दारातून परतलो आम्ही, आज तीनच दिवस झाले,
माझ्या अर्धांगिनीने स्वतःचे काळीज देऊन, प्राण माझे वाचवले.
गेले सात महिने लढतोय आम्ही, दोघेच वादळाशी,
खोटं हसू चेहऱ्यावर लावून, झुंजलो प्रत्येक लाटेशी.
आता घरी आलोय सुखरूप, सर्वांचे आशीर्वाद आणि श्रीसद्गुरूंची आहे कृपा,
पण मनात साचलेलं मळभ, सांगू कोणास बापा?
दुःख आत दाबून ठेवलेल, आता ते उसळून येतंय,
भीती, वेदना, थकवा सगळा, अश्रू बनून वाहतोय.
"हत्ती गेला, शेपूट राहिले," सगळे देतात हाच धीर,
पण त्या शेपटीच्या फटक्यांनीच, मन झालेय अधीर.
'चिडचिड नको', 'रडू नको', सल्ले सर्वांचेच अगणित,
अहो, सकारात्मकतेचा मुखवटा, आता वाटतोय एक आफत.
तुम्हीच केलीत ना मदत, उचलला भार, 'टीम' म्हणून लढलात भारी,
पण रिकव्हरीतल्या माझ्या चिडचिडीने, पुसली का ती पुण्याई सारी?
आपले मानून बोललो दोन शब्द, तर तुम्ही घेता मनावर,
समजून घ्याल वाटले होते, पण तुम्हीच ठेवता बोटावर.
रडायचे नाही, बोलायचे नाही, तर हे विष कुठे सांडायचे?
दाबून ठेवला उद्रेक जर, तर अजूनच नाही का भडकायचे?
बालिश असेन, लहान असेन, हे मान्य आहे मला,
पण 'आपले' म्हणवून घेणाऱ्यांना, का कळू नये हा जिव्हाळा?
शेवटी समजून घेणारी पत्नीच सोबत, मुलाची दहावी आणि काही थोडेच सोबत आपले वाटणारे
शेवटी तारणहार मनापासून बोल म्हणाले माझेच सदगुरू, कर जप जास्तीत जास्त आणि सगळ काही शेअर कर म्हणाले मीच आधारु
श्रीसद्गुरू आहेत सेनापती, तेच लढती रणभूमीवर,
प्रत्येक नियोजन तेच करवून घेती, जिथे चुकलो तिथे दुरुस्ती करती,
मी आहे सोबत चिंता सोडून बोलत जा म्हणणारे फक्तं श्रीसद्गुरु
आता सदगुरू आणि कवितेच्या ओळींशिवाय , कुणीच नाही सोबतीवर.
औषधांचे डिप्रेशन आणि तुमच्या खऱ्या अनुभवांचे आहेत सल्ले मान्य आता,
फक्त दोन क्षण ऐकून घ्या,
सकारात्मकतेच्या आधी, मला माझं 'माणूस'पण जगू द्या!
-निलेश जोशी

No comments:
Post a Comment