Wednesday, September 18, 2019

म्हणी उगम 1

गगनाला गवसणी: गवसणी म्हणजे आवरण. एखादी गोष्ट झाकून ठेवायचे वस्त्र. जसे कि वाद्ये (तबला इत्यादी) झाकून ठेवण्याची गवसणी. त्यावरूनच एखादी अशक्यप्राय गोष्ट साध्य करणे म्हणजे आकाशाला गवसणी घातल्याची उपमा दिली जाऊ लागली. त्यातूनच पुढे खूप मोठ्या अभूतपूर्व पराक्रमाला "गगनाला गवसणी घालणे" म्हटले जाऊ लागले.

ताकास तूर हे खरे तर तागास तूर लागू न देणे असे आहे. ताग आणि तुरीची रोपं सारखी दिसतात. असा कुठे तरी वाचल्याचे आठवतंय.

बऱ्याचदा आपण काही म्हणी अर्धवट वापरतो. पुर्ण वापरणे चारचौघात बरे वाटत नाही. त्यातलीच ही एक.
नावडतीचे मिठ आळणी. (पुर्ण म्हण: आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी. )
ही म्हण मी कुठेतरी आंतरजालावरच वाचली होती. . खुप हसलो होतो. नक्की शब्द माहित नाहीत.
ज्याका आली हागाक, तो घाबरत नाही वाघाक. 

उगम माहिती नाही.


"सोनार, शिंपी, कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा"
कारण हे वर उल्लेखलेले सगळे लोक म्हणे स्वतः काम करत नाहीत आणि दुसर्‍याला ही करू देत नाहीत. फक्त गप्पा हाणित बसतात.






Friday, August 23, 2019

व्यसन मुक्ती

आजकाल कोकणात गावागावात कॅन्सरने गेलेले लोक वाढत आहेत ,त्या व्यसनमुक्ती साठी आपण एकत्र येऊन काहीतरी केले पाहिजे. याच विषयावर विनोदी ढंगाची आज सुचलेली एक मालवणी कविता

3 दिवस झाले,
इट इलो बाबा,
टीव्हीर येता ,
लुंगीवालो खावबा,

निसते कटकटी मेल्यांचे,
घरार टाकतत धाडी
आयकर, इडीवाले,
मारतत गडग्यावरसून उडी

ह्या इडी ईडी आयकान,
कान ह्यो इटाम्बलो,
मेल्यानु तुमका काय ,
दुसरो शब्द नाय गावलो?

एक वरीस झाला ,
ट्रीटमेंट चालू करून
धाप लागता चलताना,
भातो येता भरून

डाकटर म्हणता,कुड्याची
ईडी दि सोडून
त्याका त्वांड लायलय,
तर घेईन तुका बघून

वाडयेतले पोर टॉर,
सगळ्यांका म्हायत आसा,
माझ्यापुढे इडयेचा,
नावपण नाय घेवचा

गावातले लोक हेतूर,
कर्तत माका मदत
चुकान इडयेचो इलोच इशय,
सोमतो बदलतत

टीव्ही वयला मायझयांका,
ह्या कोण सांगतलो
3 दिसापासून मेले ईडी ईडी,
ह्याच बोबंलतले

आता ईडी शब्द इलो तरी,
कायच वाटना नाय
गावातले गेलले कॅन्सरने,
चेहरो इसराक जाणा नाय

इतके पावसाळे बघून ,
सल्लो माझो तुमकाव
दोन पावटाची मजा,म्हणांन
ईडी ,तंबाखू नको खावं

ईडी ईडी टीव्हीर,
केवढाय त्यांका बोंबलू दे,
गावातल्या ह्या व्यसनांका,
येशीच्या भायर जावन दे

वायच मज्जा म्हणांन चालू झालला ,
व्यसन मरे झाला,
जास्त नाय रे म्हणता म्हणता, आंगवळणी पडला

तू मी सगळे जणा ह्येच्यापुढे,
आता याक मातर करूया ,
कोनय लागलोच नादाक तर, त्येच्यापासून दूर त्येका करूया

ईडी तंबाखू घे रे तुपण,
लोकांका वरडू दे  कितक्याव,
आमच्या गावात व्यसनांचो,
आता नाय होवचो शिरकाव

मालवणी आम्ही पक्के,
शब्द नाय बदलुचो
ह्येचापूढे कोणच,
ह्या व्यसनात नाय अडकूचो
-- निलेश जोशी

Saturday, August 3, 2019

सदगुरु अनुभूती #दिव्यानुभव

सद्गुरू श्रीकाकामहाराज की जय

सद्गुरू यांचे सूक्ष्मातून काम चालूच असते आणि बरेच दुवे आपोआप जुळवतात व आपण मात्र त्यात निमित्तमात्र असतो ,अर्थात आपला समावेश हिसुद्धा सद्गुरूंची योजनाच असते, याचाच आलेली अनुभूती
मी पूर्ण घटनाक्रम सांगून मग त्यातील सद्गुरू योजना कशी असते हे नंतर सांगतो ,तर झाले असे,
मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे आम्ही कोकणात गावी जाऊन आलो आणि त्याचवेळी माझा चिंचवडमधील मित्र संदीप पाटील सपत्नीक घरी आला. आम्हीसुद्धा त्याला घरी आल्यावर चहापाणी झाले , गावचाआंबा कापून दिला व घरी जाताना आंबे त्यांना दिले. विशेष म्हणजे आम्ही 4 वर्षांनी भेटत होतो कारण तो मित्र चीनमध्ये कंपनीच्या कामासाठी होता व मागील 4 महिने चिंचवडमध्ये आला पण आजच त्याला मला भेटण्याची इच्छा झाली व मीही त्याला म्हणालो आताच गावाहून आलो म्हणून भेटलो नाहीतर भेट शक्यच नव्हती. थोडक्यात त्या मित्राची 4 वर्षानी झालेली भेट हा पहिला दुवा.

त्यांनतर 5 दिवस मी कामावर गेलो , शनिवारी मला सुट्टी होती म्हणून घरीच होतो आणि त्यावेळी सकाळी कविताने (बायको) मला उठवले व तिच्या मामीच्या भावाचा मृत्यु कोल्हापूरला झाला ही बातमी सांगितली.
तिच्या मामीचा भाऊ व वैनी कोल्हापूर दर्शनाला गेलेले व रात्रीच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला व मामी कोल्हापूरला निघाली होती.
तिलाही 10 मिनिटपूर्वी तिच्या मामीने फोन करून सांगितले. चहा घेताना गप्पा मारताना त्या मृत व्यक्तीने किती मामाच्या मयताच्या वेळी त्रास दिला वैगरे जुन्या आठवणी बोलताना कविता अचानक म्हणाली की मामी तिकडे एकटी आहे तर कोणाची ओळख आहे का म्हणजे हॉस्पिटल व पोस्ट मार्टम प्रक्रियेत एखाद्याची मदत करता येईल का असे विचारले.
मी सुद्धा विचार केला आणि आठवले माझा मित्र संदीप पाटील यांची सासुरवाडी कोल्हापूर ,लगेच त्याला फोन केला व त्यानेही सांगितले ओळकीचे खुपजण आहेत तू डिटेल्स कळव.
मी लगेच कवितांच्या मामीशी बोललो व डिटेल्स घेऊन लगेच संदीपला कळवले.
संदीपने त्याच्या कोल्हापूरमधील मेव्हण्याला फोन करून CPR हॉस्पिटलला पाठवले. त्या मेव्हण्याने ओळख वापरून प्रक्रिया चालू केली व सर्वाना नाश्ता, चहा घ्यायला लावला ,20 मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून डेथ सर्टिफिकेट मिळवून दिले व शव पुण्याला आणण्यासाठी व्हॅन करून दिली.मामी व मयत व्यक्तीची पत्नी पुण्यात आल्या व संध्याकाळी 4 वाजता सर्व संस्कार पूर्णही झाले.
आता यातले दुवे सांगतो ,
1. 4 वर्षांनी भेटलेला मित्र नेमका एक आठवडा आधीच भेटतो (4 महिने एकाच गावात राहूनही भेट नाही पण नेमकी त्याच दिवशी त्याला मला भेटायची इच्छा होते)
2.कविताला मृत्यूची बातमी सांगितल्यावर त्या व्यक्तीला मदत मिळायला हवी असे खूप आतून वाटणे
3.कविताने त्यांना मदत करायला कोणी कोल्हापूरला मित्र आहे का हे विचारणे
4.नेमका माझा मित्राची आठवण होणे व त्यांनतर त्यांच्याकडूनही लगेच सूत्रे हलवणे.
5.मित्राचा मेव्हणा कोल्हापूरला जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करतो काय आणि सरकारी हॉस्पिटलमधील 6-7 तासाची प्रक्रिया 20 मिनिटात पूर्ण करतो काय
6.मृत्यमुळे तणावात असलेल्या मामी व त्यांची वहिनी वेळेत शव घेऊन येतात काय आणि सर्व देहसंस्कार वेळेत होतात.

म्हणजेच त्या बाहेरगावी व्यक्तीला मदत मिळावी ही सद्गुरूंची योजना आणि त्यासाठी सद्गुरुनी निमित्तमात्र म्हणून केलेली आम्हा सर्वांची योजना .
सद्गुरुचे कार्य अश्या प्रकारे चालते हेही अनुभवता आले. सद्गुरुकार्य सदोदित चालूच राहते ,त्या कार्यात आपलाही योजना होण्यासाठी सतत जास्तीत जास्त नामस्मरण करत राहणे हेच आपल्या हातात.

जय साईराम

Monday, July 1, 2019

श्री सद्गुरू आणि आनंद

श्री सद्गुरवे नमः
ओम श्री साईकाकाय नमः
ओम श्री साईनाथाय नमः

आनंद म्हणजे काय ? बऱ्याचदा आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो ,पण कित्येकदा त्या आनंददायक गोष्टी नंतर दुःख देणाऱ्या असू शकतात.
काही अनपेक्षित गवसले की दुप्पट आनंद होतो कारण त्यावेळी ती गोष्ट त्याला अपेक्षित नसते. पण माणसाला असाही आनंद मिळतो जेव्हा तो खुश असतो पण नाचू शकत नाही ,व्यक्त करू शकत नाही फक्त आनंदाश्रू ओघळत राहतात डोळ्यातून तासनतास ,तो खरा त्या माणसाने अनुभवलेला आनंद.
श्री सद्गुरू यांनी आपल्याला कृपा छत्राखाली घेतल्याचा आनंद असाच आहे ,अपरिमित आणि अव्यक्त..
श्री सद्गुरू म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आणि ते जेव्हा आपल्याला अनुभूती देतात ,काळजी नको मी आहे असे आश्वासन देतात त्यावेळी प्रत्यक्ष देवाच्या आशीर्वादात आपण असतो. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर , नित्यपाठात याचा उल्लेख आहेच की आताच्या युुगात जर श्रीराम किंवा हनुुुमान अवतरले तर आपण तेे तेज बघूून गांगरून जाऊ ,म्हणूूूनच सद्गुरु आपल्याला आश्वस्त करायला आले आहेत. ओवी क्रमांक ९८ - "म्हणोनि कालमान पाहोनी ,ईश्वरही झाला सौम्य सुवदनी ,काका स्वरूप आवडोन ,मानववेषी अवतरला.

आज सद्गुरुनी जो निबंध लिहायला सांगितलंय त्याला नित्यपाठतील ओव्या आधार घेऊनच आपण श्री सद्गुरू आणि आनंद हा विषय समजून घेऊया.

नित्यपाठ ओवी क्रमांक १४ "फेडफेडीची ही भाषा , करणे माझी मनाची मूर्खता,तुमच्या उपकारी राहता ,आनंद मजसी वाटतो" 

श्रीसदगुरू या मोहमयी व स्वार्थी जीवनात तुमच्या कृपेने हे जीवनच पालटले आणि आता मनांत विचार येतात की सद्गुरुंचे खूप उपकार आहेत आपल्यावर आणि ते कसे फेडू ,दुसऱ्याच क्षणी तुमच्याच कृपेने मनात विचार येतो की फेडफेडीची ही भाषा म्हणजे निव्वळ व्यवहार आहे आणि हा व्यवहार सदगुरूंना अपेक्षित नाही, त्यापेक्षा त्यांच्या उपकारात जन्मभर राहणे मला मनापासून आवडेल.आणि हे उपकारात आहोत याची जाणीव व्हायला सद्गुरुनी दिलेली चाकोरी सर्व साधकांनी व भक्तांनी मनापासून पाळायला हवी ,आचारायला हवी.ऑटोमोबाईल मेंटेनन्स भाषेमध्ये 3 term वापरल्या जातात , CBM म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स TBM म्हणजे टाइम बेस्ड मेंटेनन्स व IR म्हणजे इंस्पेक्शन व रिपेअर ,ह्याच व्याख्या आपल्याला या भक्तिमार्गात आचारता येतील. आपली पूर्वकर्मे जळून जावीत म्हणून सद्गुरूंनी दिलेली उपासना म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स ,सद्गुरूंनी आखून दिलेली चाकोरी जेणेकरून आपण भक्तिमार्गात राहू ,सदोदित सद्गुरूंचे स्मरण होईल म्हणजेच टाइम बेस्ड मेंटेनन्स व नैमित्तिक साधना सद्गुरू करवून घेतात जसे जप ,हे निबंध लेखन व मंदिरातील सत्संग - भजन हे आपल्यातील जाणीव नेणीव घासून पुसून लख्ख करतात म्हणजेच या गोष्टी इंस्पेक्शन व रिपेअर याचेच काम करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ४१ "पुढे श्रीसाईंचीही कृपा झाली ,तू माझा बंधू ऐसी ओळख दिली ,शिरडीच आनंदनगरी आली ,साईमहिमा वाढविण्या" श्री सद्गुरु राहतात ते ठिकाण शिवकृपा ,आनंदनगर दोन्हीकडे बारकाईने बघितले तर सिंहगड रोड वरील आनंद देणारे नगर असेही आपण म्हणून शकतो.या वास्तूत स्वतः शिवस्वरूप सद्गुरू वास्तव्य करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ६५ , "आपण आनंदी राहावे ,इतरांनाही आनंदी करावे ,कष्टाची भाकर खाऊन राहावे ,एका हरिसी धरुनी"या ओवीतही सद्गुरूंनी बोध दिलेला आणि तोही जसा कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली व जगण्यातील मर्म सांगितले तेच सर्वात सोपे करून सद्गुरू आपल्या सत्संगातून सर्वाना बोध करतात ,की षड्रिपूच्या पार जाण्यासाठी सर्व काही सद्गुरू घडवून आणतात हे सत्य जाणले तर मग आनंदी राहणे सोपे होते व आपोआप आपणसुद्धा सद्गुरूना अपेक्षित तसे वागायला लागतो , त्यासाठीच सद्गुरूंनी सांगितलेली त्रिसूत्री आपण आपल्या मनावर बिंबवायला हवी.

नित्यपाठ ओवी क्रमांक ९२ आहे " तुम्हा उद्धरण्यात मला आनंद ,तुमच्या कल्याणाचाच मला छंद ,तुमचे तोडोनी सर्व बंध ,माझ्यात तुम्हा मेळविन मी " या ओवीतून सद्गुरू साधकांना स्पष्ट सांगतात की अरे मुलांनो ,सद्गुरू यांना आनंद कधी मिळतो तर जेव्हा त्यांचे साधक सर्व बंध तोडून स्वतःमधील सदगुरु तत्वाला जाणायला शिकतील तेव्हा आपोआप श्री सद्गुरूंना अपेक्षित त्यांच्या स्वतःमध्ये साधकांना मेळवायची इच्छा म्हणजे प्रत्येक साधक भगवंत स्वरूप व सद्गुरू स्वरूप होण्याची इच्छा पूर्ण होईल आणि हाच असेल श्री सद्गुरू काकामहाराज यांना मिळालेला सर्वोच्च आनंद.

नित्यपाठ ओव्या व श्री सद्गुरू काकामहाराज यांनी जे विचार माझ्या मनात परावर्तित केले ,त्यांच्याच इच्छेने हा निबंध लिहिला गेला ,जे काही न्यून असेल त्याचा दोष निव्वळ माझ्या विचारातील मळभ असेल ,बाकी सद्गुरू यांनी बोध केलेल्या विचारात व विचार लिहिण्यात काही चूक झाली असल्यास सर्वांनी क्षमा करावी व श्री सद्गुरूंनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

जय साईराम ,शिवस्वरूप सद्गुरू श्री काकामहाराज की जय ,उमास्वरूप सौ काकुमाऊली की जय,संतश्रेष्ठ श्री गडबोले महाराज की जय.

-निलेश जोशी









Tuesday, May 21, 2019

प्रिय प्रत्युष यांस

10 वर्षांपूर्वी याच दिवशी भेटला
डॉ जवळ येऊन म्हणाल्या मला
अभिनंदन मुलगा झालाय कविताला
त्यावेळी निलुचा बाबा झाला

इवलेसे हात, छोटुसे पाय
आईच्या कुशीत पहुडलेला
एकदम झोपमग्न असलेला
मी घेतलं उचलून तुला आणि
नर्स म्हणाल्या काळजी घ्या

दिवसा कमी झोपायचं
रात्र जागवण्यात पटाईत
आई बाबा सर्वाना त्रास,
देण्याची तुझी खासियत
दंगा जेवताना ,झोपतानाही
करामतीत तुझ्या दंग आम्ही

कार्टून बघत जेवायचं नेहमी
जेवताना आईला उठवायचं नेहमी
दिवाळीत उटणं लावायचं मलाही
कित्ती प्रताप करायचा दिसामाजी
त्यात स्वमग्नता अनुभवलीस तू
अनेक ट्रीटमेंटला सामोरा गेलास तू

आज सद्गुरुकृपेने या सर्वातूनही
सुखरूपपणे बाहेर आला आहेस
इतके दिवस न बोलणारा मात्र तू
सर्वच कसर भरून काढतो आहेस
माझ्या हाताचीही काळजी घेतोस
आईला बर नसतानाही संभाळतोस

पुढे मात्र आता खूप सांभाळायचं आहे
स्वतःला सर्व क्षेत्रात घडवायचं आहे
अभ्यासबरोबरीने माणूस व्हायचं आहे
समाजमन जपत स्वसिद्ध व्हायचं आहे
हट्ट बालपण अनुभवत मजा करायची आहे
आई बाबांना अभिमान असे वागायचे आहे


Saturday, April 20, 2019

सौभाग्यकांक्षीणी मुलीला शुभेच्छा

नवीन मुलीला लग्नाआधी द्यायच्या शुभेच्छा

शांत वाहणारी नदी तू
सागरा मिळण्या चालली,
अल्लड सखी ,मुलगी कुणाची
नवी नाती जोडाया चालली

नवे घर, नवे स्वप्न आता
तुला कवेत घ्यायचे आहे
अवखळपणा विसरुनी सारा
जबाबदारी घ्यायची आहे

नवे क्षितिज पेलताना
कधी ठेच लागेलही
घे भरारी पुन्हा एकदा
जुन्या आठवणी आठवुनी

आसमंत नवे खुणावत आहे
तुला सर्वांच्या शुभेच्छा आहे
बळ द्यायला पाठीशी तुझ्या
आईबाबांचा आशिर्वाद आहे
-- निलेश जोशी

Tuesday, February 19, 2019

बदल - गझल

सीमेवरील सैनिकांनी आता बळी होऊ नये
शस्त्र हातात असूनही अगतिक होऊ नये

माणसांतील राक्षसांनी मांडला उच्छाद हा
देवाने आता शंभर अपराधांची वाट बघू नये

माणसे जगतात जर का दहशतीखाली इथे
त्या तगमगीला चुकूनही कमी लेखू नये

अतिपाण्यात वाहून जातात अनेक संसार इथे
दुष्काळी संसारानी पाण्याअभावी दम तोडू नये

चप्पल चोरली तर पाप गेले ही समजूत आहे
चुकीचे वागणाऱ्या चोराला पुण्यदाता ठरवू नये

मीपणा जोपासत अहं विकसित करतात काही
त्यांनी स्मशानराखेतून शिकायची संधी सोडू नये

बोट करून तोच चुकीचा नित्य म्हणत आलोय
स्वयं बदल घडवून आणण्या मुळी लाजू नये

तर्जनी दाखवून तो चुकतो म्हणणे सोपे असेलही
तर्जनी सोडून तीन बोटे माझ्याकडे हे विसरू नये

-- निलेश जोशी