Tuesday, May 21, 2019

प्रिय प्रत्युष यांस

10 वर्षांपूर्वी याच दिवशी भेटला
डॉ जवळ येऊन म्हणाल्या मला
अभिनंदन मुलगा झालाय कविताला
त्यावेळी निलुचा बाबा झाला

इवलेसे हात, छोटुसे पाय
आईच्या कुशीत पहुडलेला
एकदम झोपमग्न असलेला
मी घेतलं उचलून तुला आणि
नर्स म्हणाल्या काळजी घ्या

दिवसा कमी झोपायचं
रात्र जागवण्यात पटाईत
आई बाबा सर्वाना त्रास,
देण्याची तुझी खासियत
दंगा जेवताना ,झोपतानाही
करामतीत तुझ्या दंग आम्ही

कार्टून बघत जेवायचं नेहमी
जेवताना आईला उठवायचं नेहमी
दिवाळीत उटणं लावायचं मलाही
कित्ती प्रताप करायचा दिसामाजी
त्यात स्वमग्नता अनुभवलीस तू
अनेक ट्रीटमेंटला सामोरा गेलास तू

आज सद्गुरुकृपेने या सर्वातूनही
सुखरूपपणे बाहेर आला आहेस
इतके दिवस न बोलणारा मात्र तू
सर्वच कसर भरून काढतो आहेस
माझ्या हाताचीही काळजी घेतोस
आईला बर नसतानाही संभाळतोस

पुढे मात्र आता खूप सांभाळायचं आहे
स्वतःला सर्व क्षेत्रात घडवायचं आहे
अभ्यासबरोबरीने माणूस व्हायचं आहे
समाजमन जपत स्वसिद्ध व्हायचं आहे
हट्ट बालपण अनुभवत मजा करायची आहे
आई बाबांना अभिमान असे वागायचे आहे


Saturday, April 20, 2019

सौभाग्यकांक्षीणी मुलीला शुभेच्छा

नवीन मुलीला लग्नाआधी द्यायच्या शुभेच्छा

शांत वाहणारी नदी तू
सागरा मिळण्या चालली,
अल्लड सखी ,मुलगी कुणाची
नवी नाती जोडाया चालली

नवे घर, नवे स्वप्न आता
तुला कवेत घ्यायचे आहे
अवखळपणा विसरुनी सारा
जबाबदारी घ्यायची आहे

नवे क्षितिज पेलताना
कधी ठेच लागेलही
घे भरारी पुन्हा एकदा
जुन्या आठवणी आठवुनी

आसमंत नवे खुणावत आहे
तुला सर्वांच्या शुभेच्छा आहे
बळ द्यायला पाठीशी तुझ्या
आईबाबांचा आशिर्वाद आहे
-- निलेश जोशी

Tuesday, February 19, 2019

बदल - गझल

सीमेवरील सैनिकांनी आता बळी होऊ नये
शस्त्र हातात असूनही अगतिक होऊ नये

माणसांतील राक्षसांनी मांडला उच्छाद हा
देवाने आता शंभर अपराधांची वाट बघू नये

माणसे जगतात जर का दहशतीखाली इथे
त्या तगमगीला चुकूनही कमी लेखू नये

अतिपाण्यात वाहून जातात अनेक संसार इथे
दुष्काळी संसारानी पाण्याअभावी दम तोडू नये

चप्पल चोरली तर पाप गेले ही समजूत आहे
चुकीचे वागणाऱ्या चोराला पुण्यदाता ठरवू नये

मीपणा जोपासत अहं विकसित करतात काही
त्यांनी स्मशानराखेतून शिकायची संधी सोडू नये

बोट करून तोच चुकीचा नित्य म्हणत आलोय
स्वयं बदल घडवून आणण्या मुळी लाजू नये

तर्जनी दाखवून तो चुकतो म्हणणे सोपे असेलही
तर्जनी सोडून तीन बोटे माझ्याकडे हे विसरू नये

-- निलेश जोशी

Saturday, February 9, 2019

अध्यात्म

कशाला चिंता सर्व क्लेशतापाची
त्या जाळण्याची ताकत जपात आहे

जाणून घेऊ माझे चुकले कोठे
त्यासाठीच आत डोकावणे आहे

हे सहा शत्रू परास्त करण्यास
हे मानवा ही शक्ती तुझ्यात आहे

आजचे काम उद्यावरी टाळतो
याचाच शेवट हारण्यात आहे

दर दिवशी दोन पावले चालू
अंती फलित ध्येय पूर्तीत आहे

का अट्टाहास सर्व मलाच हवे
खरे समाधान लोकां देण्यात आहे

"सत्य"सांग साखरेत घोळवून
लोकांना सवय कॅप्सूलची आहे

"मी" एवढा निर्ढावलो आता
मीच बरोबर,खोट इतरात आहे

ओळखपत्रे फोटोसहित माझ्या
फोटोत "मी" फक्त बाह्यरूप आहे

नाहीसे करण्या अवघी ही चिंता
फक्त सामर्थ्य "पांडुरंगात" आहे
              
               ----निलेश जोशी

Wednesday, January 2, 2019

लग्नाचा प्रवास - तुझ्यासोबत

बारा वर्षांपूर्वी आलीस
जीवनात माझ्या
जीवनाला खरा अर्थ
दिलास तू माझ्या

अनेक कडू गोड
हृद्य प्रसंगाची मजा
तुझ्यासंगे अनुभवली
कित्येकदा भोगलीही सजा

अनेकदा वाजलाही
भांडणाचा बँडबाजा
अनेकदा अनुभवलीही
तुझी अबोल्याची सजा

होता चार वर्षांचा बॅड पॅच
तेव्हाही तुझी मजबूत साथ
सर्व संकटावर मात करण्याचा
आत्मविश्वास दृढ केला तू माझा

सहजीवनात तूच माझी राणी
जन्मभर मीच ग तुझा राजा
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुला हार्दिक शुभेच्छा

Saturday, December 22, 2018

गझल - भलभलते सांगतेस

तू जन्माची भूल तरीही,
      तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी,
      केवळ हे गझलेचे तारण
असेल माझे चुकले तेव्हा,
      तोल जायला नकोच होता
कशास उकरूनी काढतेस तू ,
      नवीन मुद्दे जुनेच भांडण

भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस ।धृ।

रोज फक्त हासतेस , एवढे कसे पुरेल ?
सांग कधी मजसाठी ,चांदण्यात थांबतेस?

क्षणभर थांबून गडे ,मोज जुने ओरखडे
घाव नवे त्यावर तू ,मीठ किती सांडतेस ?

हे कबूल मी चुकलो ,ऐक जरा बाई ग
तेच तेच दळण पुन्हा ,तू कशाला कांडतेस

घरट्यातच रमणारी ,अबला तू पूर्वीची
आता तू जिद्दीने, सागर ओलांडतेस

गझलकार - मधुसूदन नानिवडेकर ,कणकवली

Monday, October 29, 2018

अनुभूती

सद्गुरू दर्शन

आज आलेली सद्गुरू दर्शनाची एक अद्भुत अनुभूती.
मी पांडुरंग जोशी ,चिंचवडला राहतो .माझे घर चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्याच्या एकदम समोर ,या वाड्यात मोरया गोसावी यांना मिळालेली तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती आहे .
मागील 4-5 दिवस खूप अवस्थ होतो ,एकतर कंपनीतील व्याप ,त्यात ऑडिट होते म्हणून अजूनच वाढलेली कामे आणि त्यात व्हायरल फिवरने विकनेस आलेला ,सुट्टी घेऊ शकत नाही म्हणून गोळ्या घेऊन कामावर जायचो ,आल्यावर ग्लानी आल्यसारखी झोप यायची ,त्यात नामास्मरण रोजच्यासारखे होत नव्हते ,चालत्या गाडीत ओम बीजक्षर असलेला जप करू नये असे ऐकल्यामुळे असेल , कंपनीत येता जाता होणारा जप सुद्धा बंद झालेला. त्यात सद्गुरूची कृपा आहे पण सद्गुरूना अपेक्षित असलेले नामस्मरणही आपण करू शकत नाही अशी बोचणी लागून राहिलेली.
मागील आठवड्यात माझे व पत्नीचे बोलणे झालेले की रोज मंगलमूर्ती दर्शन घेतले की सद्गुरू दर्शन घेतल्यासारखेच आहे ,थोडक्यात काय मनाला पटत होते सर्व पण प्रत्यक्षात घडत नव्हते.रोज कंपनीतून येताना youtube प्ले केले की सद्गुरूंचे जो सत्संग येईल तो पूर्ण ऐकायचा ,तसाच कालच सद्गुरू वियोग विषयावर बोलले आणि  कालच मनातील सद्गुरूंनी मार्गदर्शन करून सर्व शंका फिटल्या व पुनः जप चालू झाला.
आज कामावरून येताना वाड्यात दर्शनाला जायचे मनातही नव्हते पण वाड्याच्या अगदी जवळ आलो आणि मनातून सद्गुरूंचा एक आवाज ऐकू आला ,ये वाड्यात दर्शन घ्यायला . मी वाड्यात गेलो ,लॅपटॉप बॅग बाहेर ठेवली व छोट्या मंदिरात शिवशंकर ,मारुती ,देवी व गणपती यांचे दर्शन घेतले व वाड्यात मोरया मूर्तीच्या समोर उभा राहिलो ,मनापासून हात जोडले ,प्रार्थना केली व अंगारा लावायला गेलो ,अंगारा लावून पुन्हा मोरया तांदळा स्वरूपातील गणेशाला नमस्कार केला तर काय आश्चर्य त्या तांदळा गणपतीच्या आज्ञाचक्राच्या इथे लाईट फोकस पडला होता त्यात सद्गुरू काकामहाराज यांचे दर्शन घडले ,तीच हसरी मूर्ती व हात वर करून आशीर्वाद देत आहेत अशी पोज ,बघत राहवेसे वाटत होते पण अचानक अंतर्मनातून निघायची आज्ञा आली. मी तिथून कोठारेश्वर दर्शन घेऊन आलो पण आश्चर्य म्हणजे 2 -3 दिवसात जे कमी मनात किंतु परंतु होते ते सर्व त्या दर्शनाने विरून गेले .
सद्गुरू काकामहाराज याना त्रिवार वंदन , आपली कृपादृष्टी आहे आमच्यावर पण मला मात्र तुम्हाला अपेक्षित असलेले नामस्मरण करण्याची बुद्धी द्या व शक्ती द्या. जसे आज आपण दर्शन दिलेत तसेच रोज दर्शन द्या म्हणजे मी इकडे चिंचवडला राहूनही आपले दर्शन रोज घेत जाईन.
सद्गुरू काकामहाराज आपल्या चरणी सदैव नतमस्तक
आपल्या सदैव कृपाछायेत न्हाऊन जाणारया माझ्यासारख्या अनेक भक्तांना असेच दर्शन देत राहा व अनुभूती देत राहा हीच कळकळीची विनंती.