Saturday, August 4, 2018

ऑगस्ट

आला आला ऑगस्ट आला
बेगडी प्रेमाचा महिना आला
देशप्रेमाला उधाण येईल आता
15 ऑगस्ट जवळ आला

14 ऑगस्टपर्यंत सगळे उत्सुक
स्वातंत्र्यदिन सोहळा अचूक
अर्धी जनता सुट्टी म्हणून खुश
बच्चेकंपनी परेडसाठी उत्सुक

मोबाईल गॅलरी आता फुल्ल
तिरंगाच्या फोटोनी सजतील
जवान आता सॅल्युट घेतील
बलिदानाच्या कथा गाजतील

प्रत्येक चॅनेल व रिऍलिटी शो
देश भक्तीपर गाणी डान्स शो
जुने नवे देश भक्तीचे उमाळे
नवीन चित्रपट प्रीमिअरचे वारे

जागृत होईल बंधुत्वाची भावना
तुझ्या माझ्यापेक्षा देशच मोठा
देश पुढे न्यायला वचनबद्धता
सोसायटीत झेंडावंदन सोहळा

सगळा एक दिवसाचा मामला
पुन्हा चालू होईल तुला , मला
बेगडी प्रेमाचा हा सोहळा
अतिदेखणा परंतु तात्पुरता

प्रत्येक दिवस देशाचा का नाही
प्रत्येक दिवस बंधुत्वाचा का नाही
जवानांचा पोलीसांचा का नाही
इतर वेळी झेंड्याला मान का नाही

देश जर माझा आणि मी देशाचा
दंगळीवेळी व्हावा विचार याचा
कोणाचे नुकसान व त्रास ज्याला
का त्रासले मी माझ्याच भावाला

सैनिक ,देश याकडे पूर्ण दुर्लक्ष
इकडे मीच कसा पुढे याकडे लक्ष
मला फायदा होईल यासाठी दक्ष
देव नेते वाटून घेतले हीच याची साक्ष

                                     ---- निलेश जोशी

Thursday, April 5, 2018

कशाला ?

नवीन गझल लिहिण्याचा प्रयत्न केलाय ,अभिप्राय नक्की द्या.

योग्यच न्याय, तो तुरुंगात गेला
त्याच्या दानाचे, हे कौतुक कशाला?

प्रत्येक कडी साखळीचा दुवा
त्यात उणादुणा भेद कशाला?

कर्म चक्र हे फिरवी प्रत्येकाला
सुख दुःख प्रारब्द, सल कशाला?

सकारात्मकता हा एकच हो मंत्र
तो विश्वास असता ,भय कशाला?

भलेच केले ,करतो ,करणार
सत्कर्मफळाची त्या घाई कशाला?

कमळ डुले जळी, मोठ्या झोकाने
हाताने त्या तोडण्या, घाई कशाला?

दगड स्वभाव, बदल अशक्य
आपटून डोकयाला, इजा कशाला?

मुक्तछंद ही विचारांची रचना
काफिया युक्त ही, गझल कशाला?

पारखून घेणे ,स्वतःच स्वतःला
स्वसंवाद करुनी, शोधू स्वतःला

                     -- निलेश जोशी

Saturday, February 24, 2018

गुलाबजाम -परीक्षण

गुलाबजाम

राधाच्या मेसच्या डब्यातील गुलाबजाम जेंव्हा आदित्य पाहिल्यादा तोंडात टाकल्यावर  डोळे मिटून लहानपणी आईने चारलेला घास आठवत राहतो तिथेच हा सिनेमा ओढ लावतो चविष्ट खायला आणि खिलवायला आवडणाऱ्या सर्वांनी बघावा असा चित्रपट अस एका वाक्यात परीक्षण करणंच योग्य होत खरतर .पण हा चित्रपट आहेच इतका रसाळ की परीक्षण नको शब्दांतुन व्यक्त होणे म्हणूया हवे तर.. असो

आदित्य लंडन फ्लाईट मधून उतरून आपले पॅशन जपायला पुण्याला आलाय,त्याचा पुण्यापर्यंत रेल्वे प्रवास .मित्राच्या रूमवर राहायला आल्यावर सर्वाना मासे खिलवणे व मराठमोळा स्वयंपाक शिकवायला कोण गुरू आहे का याचा शोध घेतानाच राधा आगरकर यांचा डबा खाऊन याच माझ्या गुरू असा जिद्दीला पेटणारा आदित्य
हयातील बरेच प्रसंग आपण ट्रेलर मध्ये बघितले आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने साकारलेली बुच्चन राधा आगरकर मस्तच ,फणसासारखी
शिष्य व्हायला सगळी कामे करावी लागतील असे म्हणणे. "पोपट, गाढवा लवकर कामे करा" आणि "पोपट कधी गाढव असतो का?"  तसेच आदित्य शिष्य होऊन कामे करतोय व
राधाचे संवाद "आवरा" ओठावर हसू आणणारे.
हळू हळू गंभीर होणारा चित्रपट व त्यानंतर उलगडत जाणारी व्यक्तिमत्वे.
            तुझं वय किती आहे?त्याचा प्रश्न.
तुझं किती आहे वय?तिचा प्रतिप्रश्न...माझं होय माझं सत्तावीस, मग ती म्हणते- मग माझंही असेल की तेवढंच,या संवादानानंतर आदित्यच राधाकडे भांबावून बघणे म्हणजे आपल्याही मनातील घालमेलीच चित्रण होतंय असं वाटायला लागण्याजोग..
मुलींना कायम वय विचारलं जात आणि ९९% मुली आपलं वय विचारलं की चेहेऱ्यावर जे भाव आणतात अगदी तसेच भाव राधाच्याही चेहेऱ्यावर पण ती नेमकं वय का सांगत नाही याचं कारण मात्र त्या ९९% मुलींसारखं नाहीच ते वेगळं आहे.काय आहे हे सिनेमा बघून अनुभवणं हे जास्त चांगलं होईल.
        गुलाबजाम,हा चित्रपट पाककलेच्या पुस्तकावर पडत जाणाऱ्या शीर्षक नामावलीपासून आपलं वेगळेपण जपत जातो.हळुवार उलघड जातो.
एक्कलकोंड्या आणि स्वतःच्या ध्येयाच्या विश्वात गुंग असणाऱ्या माणसांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायला जितीजागती माणसंच लागतात अस काही नाही.
आदित्य मासळीबरोबर बोलतो,शेंगदाण्याचे कूट करण्यापूर्वी टरफले काढता ,काढता शेंगदाण्यांबरोबर बोलतो.तेंव्हा त्याच्याबद्दल,त्याच्या स्वभावाबद्दलचे एक एक कंगोरे आपल्याला माहीत होतं जातात.
     राधा आणि आदित्य या प्रमुख व्यक्तीरेखांसोबत आपण गुलाबजाम चा रसास्वाद घेत जातो.पाककला हा मुख्य विषय...
जगातील सर्वात आवडती भावना काय तर भूक.
स्वयंपाक ही कला चिरंतन आहे असे संवादांचे स्वगत.

पदार्थ बघून भूक चाळविली जाते आणि समोर उत्तम संवाद व चलचित्र व सर्वोत्तम अभिनय यात आपण गुंतत जातो.
     आठवणी नाहीत म्हणून रडू येत नाहीत,पण तू  का रडतोयस अस राधा, आदित्य ला विचारतेय की आपल्याला अस वाटणारे आणि हळवं करणारे प्रसंग..संवादही कधी खमंग फोडणी दिल्यासारखे आणि कधी साखरपेरणी म्हणजे काय असते हे जाणवून देणारे तर कधी एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याला आवडता पदार्थ करीत असताना चेहेऱ्यावर जे कोणत्याही व्याख्येत बसणार हासू असत ना तस अगदी तसच हासू आणणारे संवाद.

देवाने माझ्याकडून फार मोठी किंमत चुकवून मला आठवणीतून मुक्त केलं आहे हे ऐकल्यावर आपल्याला आठवणी आहेत म्हणून आनंदी व्हायचं की त्या बोचतात म्हणून हळवं काही कळत नाहीच.
     आजारपणातही आदित्यने केलेला स्वयंपाक चाखून राधाने दिलेल्या टिप्स पाहून मजा येते.काही स्वागत संवाद तर निव्वळ quote प्रकारचे आहेत.

काही प्रसंग एवढे सही आहेत जसे vfx माध्यमातून गल्लीच्या भिंतीवरील रेसिपी,
मूळ कथेला कलाटणी देणारा अपघात व त्याचवेळी पार्श्व्वसंगीताला वाजणारी सनई मनाला चटका लावणारी,
वदनी कवळ घेता हे बॅकग्राउंड गीत,
भूतकाळ समोर आल्यावर राधाची होणारी चिडचिड व त्रागा,
लॅपटॉप टाकल्यावर आदित्यचा पॉसिटीव्ह दृष्टिकोन , आदित्यने मी लंडनला गेल्यावर तुझे काय होईल म्हणून केलेला धाडसी प्रयत्न , क्रिएटिव्हिटी आणि उद्यमशीलतेतून उभारलेला युनिक बिजनेस, दिवाळीतील प्रसंग-----निव्वळ लाजबाब व यासाठी सचिन कुंडलकर यास 100 पैकी 100 गुण.

तेव्हा सर्वानी नक्की बघा व अनुभवा --गुलाबजाम.
--निलेश जोशी
       

Friday, February 9, 2018

हास्य टेन्शन फ्री

हसलात ना ? हसलात ना?
हसा हसा मनसोक्त हसा
आमच्यावर लोकशाही पद्धतीने
निर्णय घेणारात तुम्ही
त्यामुळे थोडा विरंगुळा हवाच
6 तासात निदान 5 तास तरी
हसायलाच हवंय
कारण शेवटी जनता कुठे आहे?
मतदान केले निवडून दिले
"दान" दिले ते दिले
त्याच्याकडून अपेक्षा नसते ठेवायची
ही भारतीय संस्कृती जपतोय आपण
तंतोतंत अगदी मनापासून

हसून हसून शेरेबाजी करून
वेळ उरला तर तुमचे ते
बिल पास करूया ,संमती देऊया
पण यात जनतेचा काय फायदा होणार
त्यापेक्षा विरोधाला विरोध कसा करता
येईल यांवरच डोळा ठेवूया

मी हसणार मग इतर त्याला उपमा देणार
कोणीतरी आगीत तेल ओतायला
रामानंद सागरकृत व्हिडीओ टाकणार
त्या व्हिडिओत शुर्पणका असंणार
त्यावरून राजकारण तापणार
विरोध निषेध संसद बंद

आमच्या निषेधाला संपाला मात्र
बेकायदेशीर ठरवणे तुमच्या हातात
आणि तुमचा गोंधळ फक्त आम्ही
बघायचा मोबाईलवर साईटवर
त्याला नवे ठेवणारे आम्ही कोण
आम्ही मतदार लोकशाहीचा पाया
पायाच्या पाया पडायचं आहे 2019
तोपर्यंत आहे दीड वर्ष हातात
तोपर्यंत मनमुराद हसून घेऊया
जोक करूया जगाला आदर्श ठेवूया
जगातील मोठ्या लोकशाहीची संसद
कशी असावी याचा वस्तुपाठ घालूया

पक्ष कोणीही असो सत्तेत असो
वा विरोधी बाकावर असो
काय फरक पडतो
इतके काय मनाला लावून घेता लेको
काम करा कर भरा जीवनाचा आनंद घ्या
फिल्म्स बघा ,व्हाट्सअप फेसबुक आहेच
सण आहेत समारंभ आहेत जल्लोष करा
तुम्ही मजा करा आम्ही मजा करतो
आपले संरक्षण करायला सीमेवर सैनिक आहेत
आणि वेळोवेळी त्यांना शाबासकी द्यायला
15 ऑगस्ट 26 जानेवारी आहे
सर्व सेट आहे मित्रानो सर्व सेट आहे
फक्त तुम्ही रोजचे जीवन रडत खडत जगा
आम्ही तुमच्यासाठीच संसदेत निर्णय घेतोय
फक्त एकच विनंती तुम्ही मजा करताय ना
आम्हालाही हसू द्या आम्हालाही हसू द्या
              -- निलेश जोशी

Tuesday, January 16, 2018

पुनःशस्त्रक्रिया #दिव्यानुभव

#दिव्यानुभव

आज बरोबर एक वर्ष झाले,मागच्या 17 जानेवारीला माझे दुसरे ओपेरेशन झाले.याआधी मी पोस्ट केल्याच आहेत की दोनचाकीवर अपघात झाला व तेव्हा हाताच्या फ्रॅक्चरवर रॉड टाकावा लागला.तेव्हा रिकव्हर झालो व कामावर जॉईन झालो.त्यांनतर 6 महिन्यांनी पुन्हा हातात दुखायला लागले व साधे पेनही उचलण्याची ताकत नव्हती.xray काढल्यावर समजले की आधीच्या रोडचे स्क्रू बाहेर आलेत व पुन्हा ऑपरेशन करावेच लागेल.आधीच सुट्ट्या झाल्याने आर्थिक स्थिती नाजूक त्यात पुन्हा ऑपरेशन व रिकव्हरी रेस्ट परवाडणारी नव्हती तरीही आवश्यक कारण डॉ म्हंटले जास्त उशीर केला तर ते स्क्रू त्वचेतून बाहेर येऊ शकतात व परमनंट अपंगत्व येऊ शकते. उजवा हात असल्याने अजून टेन्शन. त्याचदरम्यान मला विचित्र स्वप्न पडू लागली की ऑपरेशन चालू असताना माझी शुद्ध हरपली व मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्याने मी कोमात जातोय etc etc.
खूप घाबरलो ,आता फक्त स्वामी आधार होते व त्याच दरम्यान आपले समूह सदस्य सचिन यांच्याशी मेसेंजरवर बोलणे झाले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमान वडवानल स्तोत्र वाचायला लागलो.16 जाने.ला ऍडमिट झालो व मी व बायको एकमेकांना धीर देतोय. स्वामीकृपेने जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी दाखवली हॉस्पिटल ला , तेव्हा त्यांनी मेडिक्लेमसाठी अर्ज केला. मला वाटत होते की माझी पॉलिसीवर 1 लाखाची मर्यादा आहे कारण याआधीच्या सर्व बोलण्यात एक लाख शब्द वापरलेला ,पण हॉस्पिटल मेडिक्लेम टीमने  त्यांच्या कम्प्युटर डेटानुसार माझी पॉलिसी मर्यादा 10 लाख आहे असे सांगितले (स्वामींनी एक शून्य वाढवले बहुतेक) व सर्व रिपोर्ट्स त्यांना पाठवल्यावर  आधीच 4 लाखपर्यंत मंजूर झाले व अजून काही कोम्प्लेक्सिटी आली तर वाढवून मिळेल असे लेटर होते.आता पैश्याचे काही टेन्शन नव्हते.व डीलक्स रूम मिळाल्याने जास्त टेन्शन नव्हते.
ऍडमिट झालो तर डॉ म्हणाले काही चाचण्या करून त्याच्या रिपोर्टनुसार ऑपरेशन डेट ठरवू. लगेच ब्लड,युरिन सॅम्पल घेतले.xray व इतर चाचण्या पुन्हा केल्या व संध्याकाळी आम्ही निवांत होतो. रात्रौ 9 वाजता नर्स म्हणाली ,आता पेशंटने काहीच खायचे नाही ,पाणी प्यायचे नाही सकाळी 7 ला ऑपरेशन आहे,सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत.
आम्ही अचंबित आणि टेन्शन मध्ये ,मी तर रात्रीच जप चालू केला व वडवानल स्तोत्र पाठ चालू केले.सकाळ झाली ,8 वाजले तरी कोणी येईना म्हणून विचारले तर सकाळची 3 ऑपरेशन उशिरा चालू झाली त्यामुळे माझे साधारण 10 ला होईल ,10 चे 11,12,1 झाला व 1 वाजता मला घेऊन गेले. प्रिपेर्शन रूम मध्ये पुन्हा पाऊण तास गेला व नंतर ऑपरेशन थिएटरला नेले तर तेथील मावशींनी रिपोटचा चुकीचा वापर केला आणि टेबल तिरक्या दिशेने लॉक झाले. माझ्या भुलीची सर्वच तयारी झाली होती. पुन्हा मला प्रिप्रेशन रूमला आणले,20 मिनिटांनी पुन्हा थिएटर ,या सगळ्या वेळेत खूप टेन्शन आले ,मनातल्या मनात जप चालूच होता व एकदाची मला भूल दिली.ऑपरेशन झाले व 8 तासांनी शुद्धीवर आलो,डॉ पण भेटून गेले व दुसया दिवशी जे काही समजले ते हादरावणारे होते व स्वामीकृपा अनुभवायला मिळाली. मनोमन स्वामींचे आभार मानले.
डॉ च्या मते ,माझ्या हाताच्या नसा ,शिरा मॅच होणे खूप महत्वाचे होते व ते नसते झाले तर अपंगत्व येऊ शकले असते ,त्यांच्यामते दुसऱ्या शस्त्रक्रियेत हा धोका जास्त असतो. माझा हात ,बोटे आता छान मूव्ह होत होता.
आधीचा रॉड काढण्यात खूप प्रॉब्लेम आलेले व डॉ ना टेन्शन की माझी भूल नको उतरायला,
3 तासाचे ओपेरेशन साडेपाच तास चालले म्हणून घरचे टेन्शन मध्ये होते,
ऑपरेशन संपल्यावर अचानक सर्वची धावपळ झाली कारण माझा श्वास अपुरा पडत होता व ऑक्सिजन लावावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान माझे बीपी व शुगर एकदम वाढली होती त्यामुळे 2 वेळ भूल डोस बदलून द्यावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान जुन्या रॉडचे स्क्रू निघत नव्हते ,स्लिप झाल्याने व रक्तस्राव खूप झाला ,5 बाटल्या रक्त द्यावे लागले.
सर्वांच्या मते खूपच क्रिटिकल ऑपरेशन पार पडले व डॉ म्हणाले माझ्या 10 वर्षातील एक चॅलेंजिग ऑपरेशन होते.
थोडक्यात स्वामी कृपा व हनुमान वडवानल स्तोत्र प्रभावाने मी यातून सहीसलामत बचावलो होतो व आता हात व्यवस्थित असून नित्य कामे करताना काहीही त्रास होत नाही.
श्री स्वामी समर्थ,ओम् श्री साईनाथाय नमः
-- निलेश जोशी

शंकर महाराज दर्शन

श्री. शंकर महाराज यांनी फोटोतून दिलेले दर्शन.

श्री. शंकर महाराज पुण्यात एका घरी फोटोतून दर्शन देतात असे एकांकडून कळले. म्हणून मी, आई आणि बाबा पुण्यात श्री. धनंजय बापट यांच्या घरी गेलो.

रात्री ८ च्या सुमारास आम्ही त्यांच्याघरी गेलो. त्यांच्या घरी श्री. शंकर महाराजांची एक तसबीर आहे. त्या फोटोच्या डाव्या बाजूला श्री. स्वामी समर्थांचा एक फोटो आहे. तर श्री शंकर महाराजांच्या फोटोच्या उजव्या बाजूला ज्ञानेश्वर माउलींचा एक फोटो आहे.

खोलीतील दिवे बंद झाल्यानंतर फक्त श्री. शंकर महाराजांच्याच फोटोतून प्रकाश येतो. ह्या प्रकाशाचा रंग पांढरा होता. त्यावेळी बाकी कुठलाही फोटो दिसत नाही. महाराजांकडे एकटक बघताना महाराजांच्या डोळ्यांची बुब्बुळे हालताना दिसतात. तर त्यांच्या फोटोतला प्रकाश फिरताना दिसतो. फोटोखाली एक लाल रंगाचे मऊ कापड आहे. त्या कापडावर ॐ अक्षर उमटलेले दिसले. महाराजांना जे केशरी अष्टगंध लावलेले होते ते, दिवे बंद झाल्यानंतर रक्तासारखे लाल झालेले दिसले.

महाराजांच्या फोटोला एक हार घातलेला होता. तो हार दिवे बंद झाल्यावर बाजूला केला असता, त्या हाराची सावली फोटोवर जशीच्या तशी उमटलेली दिसली.

हा अनुभव मलाच नाही तर खोलीत उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना आला.

महाराजांच्या फोटोतून ३०,००० watt ऊर्जा प्रक्षेपित होते, असे एका शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे.

हे दर्शन सर्वांसाठी खुले असते.

आपल्याला दर्शनाचा लाभ घायचा असल्यास पुढील पत्त्यावर जावे.

श्री. धनंजय बापट
दुसरा मजला, भारत भवन बिल्डिंग,
बाजीराव रोड मार्ग,
सरस्वती शाळेच्या मागे,
पुणे.

संध्याकाळी ७.०० ते ७.३० प्रार्थना असते. प्रार्थना झाल्यानंतर थोडया वेळाने खोलीतील दिवे बंद केले जातात. आणि मग महाराज फोटोतून दर्शन देतात.

Sunday, January 14, 2018

यशाचे रहस्य #निलउवाच

यश म्हणजे काय? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी. काहींसाठी पैसा हा मापदंड तर काहींसाठी समाजात मानसन्मान महत्वाचा.
याशिवाय जोडलेली मित्रमंडळी आणि भरपूर कर्तृत्व म्हणजे यश.त्याबरोबरच
व्यक्तिगत व व्यावसायिक संदर्भात यशाच्या संदर्भातील धारणा म्हणजे काहीच्या मते अधिकाधिक उद्दिष्टपूर्ती साध्य करणे. कुणाच्या मते व्यक्ती वा व्यावसायिक संदर्भात ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करणे म्हणजे यश व काहीच्या मते व्यक्तीचे आपल्या आयुष्यात इतरांना आपापल्यापरी व यथासंभव मदत करणे म्हणजे यश.
यावरूनच ‘यशा’चे वेगवेगळय़ा संदर्भात अर्थ स्पष्ट होतात.
असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते , 80% हे वाक्य खरेही आहे कारण एका व्यक्तीला,पुरुषाला घडवण्यात त्याची आजी,आई ,बायको ,बहीण सर्वांचा हातभार असतोच .पण त्याचबरोबर या स्त्रीशक्तीसोबत अनेक पुरुष सुद्धा त्यांचे योगदान देत असतात जसे आजोबा,वडील,भाऊ,शिक्षक,मित्र व अनेक आजूबाजूचे लोक.
या सर्वांच्या मदतीने किंवा सहभागाने खरं तर माणूस अनुभवाने मोठा होतो,समृद्ध होतो आणि हाच अनुभवांचा ठेवा त्याची वाटचाल यशस्वीतेकडे करतो.
काल एक हिंदी वाक्य वाचले व त्यावरून वरील सर्व सुचले,ते वाक्य होते, "वोह धागा ही था जिसने छिपकर पुरा जीवन मोतियों को दिया और ये मोती अपने तारीफ पर इतरते रहे उम्रभर"

किती वास्तववादी आहे ना हे वाक्य, मोठे मोठ्या व्यक्ती जसे पु.ल.देशपांडे,अब्दुल कलाम ,नारायण मूर्ती ,सावरकर ,टिळक,आंबेडकर,ज्योतिबा फुले,विवेकानंद,गांधीजी हे सर्व म्हणजे त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्वाने मोतीच आहेत पण त्यांच्या मोत्याच्या झळालीला एकत्र गुंफून ठेवले त्या मागील अनेक व्यक्तींनी ,विशेष करून महिलांनी.
"आहे मनोहर तरी" सारखे पुस्तक वाचले की हे विशेष जाणवते. शेवटी या धाग्याचे महत्वाचे काम करणाऱ्या असंख्य व्यक्तिमत्वांना ना विसरता त्यांनाही मोतीच्या माळेने महत्व नको का द्यायला? कारण स्पष्ट आहे जेव्हा हा धागा तुटेल तेव्हा मोती विखुरले जातील आणि क्षणात मातीमोल होतील. आपल्याही आयुष्यात अशी धाग्याची माणसे आहेतच ,त्यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांनाही आपण  आपल्या आयुष्यात सर्वोत्तम मान देऊया, कृतज्ञता व्यक्त करूया व नेहमी या धाग्यांचे महत्व लक्षात ठेवूनच वागूया. काय पटतंय ना?
-- निलेश जोशी