Saturday, February 9, 2019

अध्यात्म

कशाला चिंता सर्व क्लेशतापाची
त्या जाळण्याची ताकत जपात आहे

जाणून घेऊ माझे चुकले कोठे
त्यासाठीच आत डोकावणे आहे

हे सहा शत्रू परास्त करण्यास
हे मानवा ही शक्ती तुझ्यात आहे

आजचे काम उद्यावरी टाळतो
याचाच शेवट हारण्यात आहे

दर दिवशी दोन पावले चालू
अंती फलित ध्येय पूर्तीत आहे

का अट्टाहास सर्व मलाच हवे
खरे समाधान लोकां देण्यात आहे

"सत्य"सांग साखरेत घोळवून
लोकांना सवय कॅप्सूलची आहे

"मी" एवढा निर्ढावलो आता
मीच बरोबर,खोट इतरात आहे

ओळखपत्रे फोटोसहित माझ्या
फोटोत "मी" फक्त बाह्यरूप आहे

नाहीसे करण्या अवघी ही चिंता
फक्त सामर्थ्य "पांडुरंगात" आहे
              
               ----निलेश जोशी

Wednesday, January 2, 2019

लग्नाचा प्रवास - तुझ्यासोबत

बारा वर्षांपूर्वी आलीस
जीवनात माझ्या
जीवनाला खरा अर्थ
दिलास तू माझ्या

अनेक कडू गोड
हृद्य प्रसंगाची मजा
तुझ्यासंगे अनुभवली
कित्येकदा भोगलीही सजा

अनेकदा वाजलाही
भांडणाचा बँडबाजा
अनेकदा अनुभवलीही
तुझी अबोल्याची सजा

होता चार वर्षांचा बॅड पॅच
तेव्हाही तुझी मजबूत साथ
सर्व संकटावर मात करण्याचा
आत्मविश्वास दृढ केला तू माझा

सहजीवनात तूच माझी राणी
जन्मभर मीच ग तुझा राजा
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुला हार्दिक शुभेच्छा

Saturday, December 22, 2018

गझल - भलभलते सांगतेस

तू जन्माची भूल तरीही,
      तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी,
      केवळ हे गझलेचे तारण
असेल माझे चुकले तेव्हा,
      तोल जायला नकोच होता
कशास उकरूनी काढतेस तू ,
      नवीन मुद्दे जुनेच भांडण

भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस ।धृ।

रोज फक्त हासतेस , एवढे कसे पुरेल ?
सांग कधी मजसाठी ,चांदण्यात थांबतेस?

क्षणभर थांबून गडे ,मोज जुने ओरखडे
घाव नवे त्यावर तू ,मीठ किती सांडतेस ?

हे कबूल मी चुकलो ,ऐक जरा बाई ग
तेच तेच दळण पुन्हा ,तू कशाला कांडतेस

घरट्यातच रमणारी ,अबला तू पूर्वीची
आता तू जिद्दीने, सागर ओलांडतेस

गझलकार - मधुसूदन नानिवडेकर ,कणकवली

Monday, October 29, 2018

अनुभूती

सद्गुरू दर्शन

आज आलेली सद्गुरू दर्शनाची एक अद्भुत अनुभूती.
मी पांडुरंग जोशी ,चिंचवडला राहतो .माझे घर चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्याच्या एकदम समोर ,या वाड्यात मोरया गोसावी यांना मिळालेली तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती आहे .
मागील 4-5 दिवस खूप अवस्थ होतो ,एकतर कंपनीतील व्याप ,त्यात ऑडिट होते म्हणून अजूनच वाढलेली कामे आणि त्यात व्हायरल फिवरने विकनेस आलेला ,सुट्टी घेऊ शकत नाही म्हणून गोळ्या घेऊन कामावर जायचो ,आल्यावर ग्लानी आल्यसारखी झोप यायची ,त्यात नामास्मरण रोजच्यासारखे होत नव्हते ,चालत्या गाडीत ओम बीजक्षर असलेला जप करू नये असे ऐकल्यामुळे असेल , कंपनीत येता जाता होणारा जप सुद्धा बंद झालेला. त्यात सद्गुरूची कृपा आहे पण सद्गुरूना अपेक्षित असलेले नामस्मरणही आपण करू शकत नाही अशी बोचणी लागून राहिलेली.
मागील आठवड्यात माझे व पत्नीचे बोलणे झालेले की रोज मंगलमूर्ती दर्शन घेतले की सद्गुरू दर्शन घेतल्यासारखेच आहे ,थोडक्यात काय मनाला पटत होते सर्व पण प्रत्यक्षात घडत नव्हते.रोज कंपनीतून येताना youtube प्ले केले की सद्गुरूंचे जो सत्संग येईल तो पूर्ण ऐकायचा ,तसाच कालच सद्गुरू वियोग विषयावर बोलले आणि  कालच मनातील सद्गुरूंनी मार्गदर्शन करून सर्व शंका फिटल्या व पुनः जप चालू झाला.
आज कामावरून येताना वाड्यात दर्शनाला जायचे मनातही नव्हते पण वाड्याच्या अगदी जवळ आलो आणि मनातून सद्गुरूंचा एक आवाज ऐकू आला ,ये वाड्यात दर्शन घ्यायला . मी वाड्यात गेलो ,लॅपटॉप बॅग बाहेर ठेवली व छोट्या मंदिरात शिवशंकर ,मारुती ,देवी व गणपती यांचे दर्शन घेतले व वाड्यात मोरया मूर्तीच्या समोर उभा राहिलो ,मनापासून हात जोडले ,प्रार्थना केली व अंगारा लावायला गेलो ,अंगारा लावून पुन्हा मोरया तांदळा स्वरूपातील गणेशाला नमस्कार केला तर काय आश्चर्य त्या तांदळा गणपतीच्या आज्ञाचक्राच्या इथे लाईट फोकस पडला होता त्यात सद्गुरू काकामहाराज यांचे दर्शन घडले ,तीच हसरी मूर्ती व हात वर करून आशीर्वाद देत आहेत अशी पोज ,बघत राहवेसे वाटत होते पण अचानक अंतर्मनातून निघायची आज्ञा आली. मी तिथून कोठारेश्वर दर्शन घेऊन आलो पण आश्चर्य म्हणजे 2 -3 दिवसात जे कमी मनात किंतु परंतु होते ते सर्व त्या दर्शनाने विरून गेले .
सद्गुरू काकामहाराज याना त्रिवार वंदन , आपली कृपादृष्टी आहे आमच्यावर पण मला मात्र तुम्हाला अपेक्षित असलेले नामस्मरण करण्याची बुद्धी द्या व शक्ती द्या. जसे आज आपण दर्शन दिलेत तसेच रोज दर्शन द्या म्हणजे मी इकडे चिंचवडला राहूनही आपले दर्शन रोज घेत जाईन.
सद्गुरू काकामहाराज आपल्या चरणी सदैव नतमस्तक
आपल्या सदैव कृपाछायेत न्हाऊन जाणारया माझ्यासारख्या अनेक भक्तांना असेच दर्शन देत राहा व अनुभूती देत राहा हीच कळकळीची विनंती.

Saturday, August 4, 2018

ऑगस्ट

आला आला ऑगस्ट आला
बेगडी प्रेमाचा महिना आला
देशप्रेमाला उधाण येईल आता
15 ऑगस्ट जवळ आला

14 ऑगस्टपर्यंत सगळे उत्सुक
स्वातंत्र्यदिन सोहळा अचूक
अर्धी जनता सुट्टी म्हणून खुश
बच्चेकंपनी परेडसाठी उत्सुक

मोबाईल गॅलरी आता फुल्ल
तिरंगाच्या फोटोनी सजतील
जवान आता सॅल्युट घेतील
बलिदानाच्या कथा गाजतील

प्रत्येक चॅनेल व रिऍलिटी शो
देश भक्तीपर गाणी डान्स शो
जुने नवे देश भक्तीचे उमाळे
नवीन चित्रपट प्रीमिअरचे वारे

जागृत होईल बंधुत्वाची भावना
तुझ्या माझ्यापेक्षा देशच मोठा
देश पुढे न्यायला वचनबद्धता
सोसायटीत झेंडावंदन सोहळा

सगळा एक दिवसाचा मामला
पुन्हा चालू होईल तुला , मला
बेगडी प्रेमाचा हा सोहळा
अतिदेखणा परंतु तात्पुरता

प्रत्येक दिवस देशाचा का नाही
प्रत्येक दिवस बंधुत्वाचा का नाही
जवानांचा पोलीसांचा का नाही
इतर वेळी झेंड्याला मान का नाही

देश जर माझा आणि मी देशाचा
दंगळीवेळी व्हावा विचार याचा
कोणाचे नुकसान व त्रास ज्याला
का त्रासले मी माझ्याच भावाला

सैनिक ,देश याकडे पूर्ण दुर्लक्ष
इकडे मीच कसा पुढे याकडे लक्ष
मला फायदा होईल यासाठी दक्ष
देव नेते वाटून घेतले हीच याची साक्ष

                                     ---- निलेश जोशी

Thursday, April 5, 2018

कशाला ?

नवीन गझल लिहिण्याचा प्रयत्न केलाय ,अभिप्राय नक्की द्या.

योग्यच न्याय, तो तुरुंगात गेला
त्याच्या दानाचे, हे कौतुक कशाला?

प्रत्येक कडी साखळीचा दुवा
त्यात उणादुणा भेद कशाला?

कर्म चक्र हे फिरवी प्रत्येकाला
सुख दुःख प्रारब्द, सल कशाला?

सकारात्मकता हा एकच हो मंत्र
तो विश्वास असता ,भय कशाला?

भलेच केले ,करतो ,करणार
सत्कर्मफळाची त्या घाई कशाला?

कमळ डुले जळी, मोठ्या झोकाने
हाताने त्या तोडण्या, घाई कशाला?

दगड स्वभाव, बदल अशक्य
आपटून डोकयाला, इजा कशाला?

मुक्तछंद ही विचारांची रचना
काफिया युक्त ही, गझल कशाला?

पारखून घेणे ,स्वतःच स्वतःला
स्वसंवाद करुनी, शोधू स्वतःला

                     -- निलेश जोशी

Saturday, February 24, 2018

गुलाबजाम -परीक्षण

गुलाबजाम

राधाच्या मेसच्या डब्यातील गुलाबजाम जेंव्हा आदित्य पाहिल्यादा तोंडात टाकल्यावर  डोळे मिटून लहानपणी आईने चारलेला घास आठवत राहतो तिथेच हा सिनेमा ओढ लावतो चविष्ट खायला आणि खिलवायला आवडणाऱ्या सर्वांनी बघावा असा चित्रपट अस एका वाक्यात परीक्षण करणंच योग्य होत खरतर .पण हा चित्रपट आहेच इतका रसाळ की परीक्षण नको शब्दांतुन व्यक्त होणे म्हणूया हवे तर.. असो

आदित्य लंडन फ्लाईट मधून उतरून आपले पॅशन जपायला पुण्याला आलाय,त्याचा पुण्यापर्यंत रेल्वे प्रवास .मित्राच्या रूमवर राहायला आल्यावर सर्वाना मासे खिलवणे व मराठमोळा स्वयंपाक शिकवायला कोण गुरू आहे का याचा शोध घेतानाच राधा आगरकर यांचा डबा खाऊन याच माझ्या गुरू असा जिद्दीला पेटणारा आदित्य
हयातील बरेच प्रसंग आपण ट्रेलर मध्ये बघितले आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने साकारलेली बुच्चन राधा आगरकर मस्तच ,फणसासारखी
शिष्य व्हायला सगळी कामे करावी लागतील असे म्हणणे. "पोपट, गाढवा लवकर कामे करा" आणि "पोपट कधी गाढव असतो का?"  तसेच आदित्य शिष्य होऊन कामे करतोय व
राधाचे संवाद "आवरा" ओठावर हसू आणणारे.
हळू हळू गंभीर होणारा चित्रपट व त्यानंतर उलगडत जाणारी व्यक्तिमत्वे.
            तुझं वय किती आहे?त्याचा प्रश्न.
तुझं किती आहे वय?तिचा प्रतिप्रश्न...माझं होय माझं सत्तावीस, मग ती म्हणते- मग माझंही असेल की तेवढंच,या संवादानानंतर आदित्यच राधाकडे भांबावून बघणे म्हणजे आपल्याही मनातील घालमेलीच चित्रण होतंय असं वाटायला लागण्याजोग..
मुलींना कायम वय विचारलं जात आणि ९९% मुली आपलं वय विचारलं की चेहेऱ्यावर जे भाव आणतात अगदी तसेच भाव राधाच्याही चेहेऱ्यावर पण ती नेमकं वय का सांगत नाही याचं कारण मात्र त्या ९९% मुलींसारखं नाहीच ते वेगळं आहे.काय आहे हे सिनेमा बघून अनुभवणं हे जास्त चांगलं होईल.
        गुलाबजाम,हा चित्रपट पाककलेच्या पुस्तकावर पडत जाणाऱ्या शीर्षक नामावलीपासून आपलं वेगळेपण जपत जातो.हळुवार उलघड जातो.
एक्कलकोंड्या आणि स्वतःच्या ध्येयाच्या विश्वात गुंग असणाऱ्या माणसांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायला जितीजागती माणसंच लागतात अस काही नाही.
आदित्य मासळीबरोबर बोलतो,शेंगदाण्याचे कूट करण्यापूर्वी टरफले काढता ,काढता शेंगदाण्यांबरोबर बोलतो.तेंव्हा त्याच्याबद्दल,त्याच्या स्वभावाबद्दलचे एक एक कंगोरे आपल्याला माहीत होतं जातात.
     राधा आणि आदित्य या प्रमुख व्यक्तीरेखांसोबत आपण गुलाबजाम चा रसास्वाद घेत जातो.पाककला हा मुख्य विषय...
जगातील सर्वात आवडती भावना काय तर भूक.
स्वयंपाक ही कला चिरंतन आहे असे संवादांचे स्वगत.

पदार्थ बघून भूक चाळविली जाते आणि समोर उत्तम संवाद व चलचित्र व सर्वोत्तम अभिनय यात आपण गुंतत जातो.
     आठवणी नाहीत म्हणून रडू येत नाहीत,पण तू  का रडतोयस अस राधा, आदित्य ला विचारतेय की आपल्याला अस वाटणारे आणि हळवं करणारे प्रसंग..संवादही कधी खमंग फोडणी दिल्यासारखे आणि कधी साखरपेरणी म्हणजे काय असते हे जाणवून देणारे तर कधी एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याला आवडता पदार्थ करीत असताना चेहेऱ्यावर जे कोणत्याही व्याख्येत बसणार हासू असत ना तस अगदी तसच हासू आणणारे संवाद.

देवाने माझ्याकडून फार मोठी किंमत चुकवून मला आठवणीतून मुक्त केलं आहे हे ऐकल्यावर आपल्याला आठवणी आहेत म्हणून आनंदी व्हायचं की त्या बोचतात म्हणून हळवं काही कळत नाहीच.
     आजारपणातही आदित्यने केलेला स्वयंपाक चाखून राधाने दिलेल्या टिप्स पाहून मजा येते.काही स्वागत संवाद तर निव्वळ quote प्रकारचे आहेत.

काही प्रसंग एवढे सही आहेत जसे vfx माध्यमातून गल्लीच्या भिंतीवरील रेसिपी,
मूळ कथेला कलाटणी देणारा अपघात व त्याचवेळी पार्श्व्वसंगीताला वाजणारी सनई मनाला चटका लावणारी,
वदनी कवळ घेता हे बॅकग्राउंड गीत,
भूतकाळ समोर आल्यावर राधाची होणारी चिडचिड व त्रागा,
लॅपटॉप टाकल्यावर आदित्यचा पॉसिटीव्ह दृष्टिकोन , आदित्यने मी लंडनला गेल्यावर तुझे काय होईल म्हणून केलेला धाडसी प्रयत्न , क्रिएटिव्हिटी आणि उद्यमशीलतेतून उभारलेला युनिक बिजनेस, दिवाळीतील प्रसंग-----निव्वळ लाजबाब व यासाठी सचिन कुंडलकर यास 100 पैकी 100 गुण.

तेव्हा सर्वानी नक्की बघा व अनुभवा --गुलाबजाम.
--निलेश जोशी