हसलात ना ? हसलात ना?
हसा हसा मनसोक्त हसा
आमच्यावर लोकशाही पद्धतीने
निर्णय घेणारात तुम्ही
त्यामुळे थोडा विरंगुळा हवाच
6 तासात निदान 5 तास तरी
हसायलाच हवंय
कारण शेवटी जनता कुठे आहे?
मतदान केले निवडून दिले
"दान" दिले ते दिले
त्याच्याकडून अपेक्षा नसते ठेवायची
ही भारतीय संस्कृती जपतोय आपण
तंतोतंत अगदी मनापासून
हसून हसून शेरेबाजी करून
वेळ उरला तर तुमचे ते
बिल पास करूया ,संमती देऊया
पण यात जनतेचा काय फायदा होणार
त्यापेक्षा विरोधाला विरोध कसा करता
येईल यांवरच डोळा ठेवूया
मी हसणार मग इतर त्याला उपमा देणार
कोणीतरी आगीत तेल ओतायला
रामानंद सागरकृत व्हिडीओ टाकणार
त्या व्हिडिओत शुर्पणका असंणार
त्यावरून राजकारण तापणार
विरोध निषेध संसद बंद
आमच्या निषेधाला संपाला मात्र
बेकायदेशीर ठरवणे तुमच्या हातात
आणि तुमचा गोंधळ फक्त आम्ही
बघायचा मोबाईलवर साईटवर
त्याला नवे ठेवणारे आम्ही कोण
आम्ही मतदार लोकशाहीचा पाया
पायाच्या पाया पडायचं आहे 2019
तोपर्यंत आहे दीड वर्ष हातात
तोपर्यंत मनमुराद हसून घेऊया
जोक करूया जगाला आदर्श ठेवूया
जगातील मोठ्या लोकशाहीची संसद
कशी असावी याचा वस्तुपाठ घालूया
पक्ष कोणीही असो सत्तेत असो
वा विरोधी बाकावर असो
काय फरक पडतो
इतके काय मनाला लावून घेता लेको
काम करा कर भरा जीवनाचा आनंद घ्या
फिल्म्स बघा ,व्हाट्सअप फेसबुक आहेच
सण आहेत समारंभ आहेत जल्लोष करा
तुम्ही मजा करा आम्ही मजा करतो
आपले संरक्षण करायला सीमेवर सैनिक आहेत
आणि वेळोवेळी त्यांना शाबासकी द्यायला
15 ऑगस्ट 26 जानेवारी आहे
सर्व सेट आहे मित्रानो सर्व सेट आहे
फक्त तुम्ही रोजचे जीवन रडत खडत जगा
आम्ही तुमच्यासाठीच संसदेत निर्णय घेतोय
फक्त एकच विनंती तुम्ही मजा करताय ना
आम्हालाही हसू द्या आम्हालाही हसू द्या
-- निलेश जोशी
