Monday, September 8, 2014

चार वेदांविषयी थोडक्यात विवेचन


श्री स्वामी समर्थ
एका परिवारात वेदांवर वाचल्याचे आठवते. चर्चा ही आर्युवेदावर होती. त्या वेळी आणि काही जणांनी वेदावर काही माहिती मिळेल का असे विचारलेही...
काही वाचलेले आणि ऐकलेले आणि अभ्यासलेले असे आपल्या चारही वेदावरचे मोजके विवेचन माझ्याकडे आहे.

आज ऋग्वेद जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. थोडक्यात, ह्याबद्दलच्या माझ्या काही टिप्पणी खाली देत आहे.
================================
ऋग्वेदविषयी थोडेसे विवेचन

१) चारही वेदांमध्ये सर्वात अग्र असा हा वेद ह्याला आद्यवेद असेही म्हटले जाते. ज्या मंत्रांनी भगवंताची स्तुती केली जाते त्यास ऋग असे म्हणतात. उअश्या अनेक ऋग असलेलला वेद म्हणून त्यास ऋग्वेद हे नाव पडले.

२) पैल ऋषीनी (व्यास मुनींचे शिष्य) ह्या वेदाचे दोन भाग केले. एकास सुक्त असे म्हणतात आणि दुसऱ्यास मंडल असे ओळखले जाते. सुक्तात स्तुतीपर बरेच मंत्र आहेत. त्यास सुक्ते असेही म्हणतात. प्रत्येक सुक्तात साधारणपणे १० ते १३ मंत्र असतात. ऋग्वेदातील सूक्तांचे ऋषीसुक्त, देवतासुक्त, अर्थ सुक्त आणि छंदसुक्त असे प्रकार आहेत.

३) ऋग्वेदाचे वेगवेगळे अध्याय हे मंडल, अनुवाक, अष्टक, अध्याय, वर्ग ह्या नावाने सम्भोधले जातात.

४) संपूर्ण ऋग्वेदात १० मंडले, ८५ अनुवाक, १०१७ अष्टके, ६४ अध्याय आणि २०८ वर्ग आहेत. सर्व मिळून ऋग्वेदात १०,५८० मंत्र आहेत.

५) वेदांमध्ये प्रकरणाना छंद असे म्हणतात. ऋग्वेदात एकूण १५ छंद आहेत. त्यातील प्रमुख, गायत्री, उष्णिक, अनुस्तूप, पंक्ती, बृहती आणि जगती हे आहेत.

६) ऋग्वेद अग्नीसूक्ताने सुरु होतो आणि सज्ञानसूक्ताने संपतो.

"अग्नीमिळे पुरोहितम, यज्ञस्य देवमृत्वीजम, होतारं यज्ञधातारम" हा ऋग्वेदातील आद्य मंत्र आहे.

७) पुराणात काही ऋषीनी ऋग्वेदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांना ह्या वेदाचे द्रष्टे असेही म्हणतात. मंडल, गुत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज आणि वसिष्ठ हे ते ऋषी होत.

८) ऋग्वेदाच्या एकूण २१ शाखा किंवा खंड आहेत. त्यातील मुख्य मानले जाणारे, शाकल, बाश्फल, आश्वलायन, शांखयानी आणि मांडूकेवी हे आहेत.

९) ज्या विद्येचे मूळ एखाद्या वेदात असते, म्हणजे जी विद्या त्या वेदाचा base असतो, त्यास वेदांच्या भाषेत उपवेद म्हणतात. ऋग्वेदाचा उपवेद "आयुर्वेद" हा आहे.

१०) आपण सर्वांनी महावाक्य हे नाव ऐकले किंवा वाचले असेल. महावाक्य म्हणजे, ज्याचा अभ्यास केला जातो आणि ते पुर्णप्रकारे अंगिकारले जाते त्यास महावाक्य म्हणतात. उदाहरणार्थ "अहम ब्रह्मास्मि" हे महावाक्य आहे.

ऋग्वेदात ऐतरेय नावाचे एक उपनिषद आहे. त्यात एक महावाक्य आहे ते असे " प्रज्ञानं ब्रह्म" ह्या वाक्याचा अभ्यास खूप रंजक आहे.

=================================

यजुर्वेदचा अभ्यास आणि त्याबद्दल थोडी माहिती

१) यजुर्वेदास "अध्वर्यूवेद" असेही नाव आहे. ज्या मंत्रांच्या अक्षरांचा अंत अनिश्चित असतो त्यास संस्कृत मध्ये "यजु" असे म्हणतात. त्यावरूनही ह्यास यजुर्वेद हे नाव पडले असावे असे ज्ञानीजणांचे मत आहे. धातुपाठाच्या प्रमादाप्रमाणे "यज" म्हणजे पूजा करणे असा त्याचा अर्थ आहे. ह्यावरून हे नाव पडले असावे असावी तर्क आढळतो.

२) ह्यातील बरेचसे मंत्र हे गद्य स्वरूपात आहेत.

३) यजुर्वेदाची व्याप्ती सांगताना "यजुरेक शतात्मकम " असे म्हटले जाते. म्हणजेच यजुर्वेदाच्या १०० शाखा आहेत. त्यापैकी ५ शाखा अत्यंत महत्वाच्या. १. कठ २, मैत्रायणी ३. आपस्थंभ ४. हिरण्यकेशी ५. वाजसनेयी.

४) यजुर्वेदाचे कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे दोन मुख्य भाग आहेत. याज्ञवल्क्य ऋषी हे शुक्ल यजुर्वेदाचे अधिपती आहेत. त्याना हा वेद सूर्याकडून मिळाला अशी मान्यता आहे. तर कृष्ण यजुर्वेदाचे अधिपती वैशंपायन ऋषी आहेत.

५) यजुर्वेदात वेगवेगळ्या संहिता (प्रकरणे) आहेत. थोडक्यात खालील प्रमाणे

वाजसनेयी संहिता: संपूर्ण अध्याय ४० ह्यात वैदिक धर्माचे कर्मकांड आहे.

काण्व संहिता : संपूर्ण अध्याय ४०. ह्याचे पाठीराखे बरेच आहेत. ते काण्व शाखीय ब्राह्मण म्हणून ओळखले जातात.

काठक संहिता: ह्यात ५ खंड आणि ३०९१ मंत्र आहेत

कपिष्ठल संहिता : ह्यात ८ अध्याय आहेत

मैत्रायणी संहिता: ह्यात ३१४४ मंत्र आहेत. ह्याच संहितेत, वाजपेय, अश्वमेध, राजसूय आणि सौत्रमणी ह्या यज्ञाचे विधी आहेत.

आपस्थब संहिता: ह्यात याजमान आणि पैरोडाश ह्या यज्ञाचे विधी आहेत. दक्षिण भारतातील काण्व द्रविड आणी उत्तर भारतातील गौड काण्व आणि महाराष्ट्रातील काण्व ब्राह्मण हे ह्याचे पाठीराखे आहेत. ऋग्वेदी ब्राह्मणापेक्षा यजुर्वेदी ब्राह्मणाची संख्या खूप जास्त असल्याचे हे कारण आहे.

६) आपल्या बहुतेक सर्व पूजा, हवन, यज्ञ, याग ह्याच्या विधीने यजुर्वेद सजलेला आहे.

७) "धनुर्वेद" हा यजुर्वेदाचा उपवेद आहे.

८) वाजसेनेयी शाखेच्या ब्राह्मणोप्निशदात बृहदारन्यक हे प्रकरण आहे त्यातच " अहं ब्रह्मास्मि" हे महावाक्य आहे.

=================================

आता थोडेसे सामवेदाविषयी....

१) कोणत्याही यज्ञातील तिसऱ्या विधीस उद्गाता असे म्हणतात आणि त्याचा मंत्रसंग्रह सामवेदात आढळतो. उद्गात म्हणजे योग्य स्वरात भगवंताचे मंत्र म्हणून त्यास आळवणे. म्हणून मंत्र गायनाला साम गायन असेही म्हणतात.

२) सामगायनाचे ५ प्रकार आहेत. प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, उपद्रव आणि निधान. हे गायची एक विशिष्ठ पद्धत आहे. ते गानार्याना प्रस्तोता, उद्गाता, प्रतीहार्ता अशी नावे आहेत.

३) सामवेदाच्या सुद्धा १००० शाखा आहेत. पण त्यातील ३ अत्यंत महत्वाच्या त्या म्हणजे कौथुम, राणायनिय आणि जैमनीय. ह्यापैकी कौथुमी शाखा ही गुजरात मध्ये, राणायनिय ही शाखा महाराष्ट्रात तर जैमनीय ही शाखा कर्नाटकात मानली जाते. सामवेदात एकंदरीत १५४९ मंत्र आहेत. पण ७५ मंत्र सोडले तर बाकीचे सर्व मंत्र ऋग्वेदाचेच आहेत. ह्यामुळेच सामवेदाला ऋग्वेदाहून वेगळे समजत नाहीत.

४) आपल्या मंत्रांच्या समूहास आर्चिक असे नाव आहे. सामवेदात पुर्वार्चिक आणि उत्तरार्चीक असे दोन भाग आहेत आणी ह्यात अग्निविषयक मंत्र आहेत.

५) सामवेद हा गायनाचा पाठीराखा आहे. ह्यातील पुर्वार्चीकेत ग्रामगेय आणि अरण्यगेय असे दोन गायनाच्या प्रकारांचे विश्लेषणही आहे. सामवेद गानार्याना सामगायक असेही संबोधतात.

६) सामवेद हा गायनाची पुष्टी करतो. तलावकार ह्या उपशाखेत स्वर, ताल, लय, वाद्य ह्याचे अति सूक्ष्म असे वर्णन आहे. त्यावरून भारतीय संगीत प्राचीन काळी सुद्धा किती प्रगत होते ह्याची प्रचीती येते.

७) सामवेद हा ऋग्वेदातून आल्याने ह्याबाबत बरेच मतभेद आहेत.

८) गंधर्वविद्या हा सामवेदाचा उपवेद आहे.

९) सामवेदातील छांदोग नावाच्या शाखेत छांदोग्य नावाचे उपनिषद आहे. त्यातच "तत्वमसी" हे महावाक्य आहे.

=================================

आता शेवटचा वेद ज्यास अथर्ववेद म्हणून ओळखले जाते, त्याबद्दल थोडे बोलू या

१) ह्या वेदाच्या निर्मिती मागे एक आख्यायिका आहे. सर्वप्रथम ह्या वेदाचे नाव अथर्वान्गीरस असे आहे. ब्रह्मदेव सृष्टीउत्पत्ती साठी तप करताना त्यांच्या तप सामर्थ्यातून दोन ऋषी निर्माण झाले. एक म्हणजे भृगु ह्यांचेच दुसरे नाव अथर्वण आणि दुसरे म्हणजे अंगिरा ऋषी. ह्या दोघांनी हा ग्रंथ लिहिला (ब्रह्मदेवाचे ऐकून). म्हणून ह्याचे नाव अथर्वान्गीरस असे पडले.

२) आता हा वेद लिहित असताना, ह्या दोन महान ऋषीनी आपले काही मंत्र ह्या वेदात घातले. भृगुऋषी रोगनाशक मंत्रांचे द्रष्टे आहेत तर अंगिरा ऋषी शत्रूनाशक मंत्रांचे. त्यामुळे अथर्व वेद हा अश्या मंत्रांनी परिपूर्ण आहे.

३) संपूर्ण वेदात ५ प्रकारचे अत्यंत प्रभावशाली असे मंत्र आहेत आणि ते खालीलप्रमाणे
अ) रोग, हिंस्त्र पशु, पिशाच्च ह्यांची बाधा टाळणारे
ब) बुद्धी भ्रंश, क्षय, सर्पबाधा, कुष्ठ इत्यादी व्याधी निवारक मंत्र
क) मंत्र प्रयोग करणाऱ्या शत्रुंचा नाश करणारे मंत्र
ड) कुटुंबात शांती प्रस्थापित करणारे मंत्र
इ) दीर्घायुष्य, संतती लाभ करून देणारे मंत्र

४) धर्मशास्त्र, विवाह, राज्याभिषेक, मृत्यू इत्यादी बद्दलचे अनेक मंत्र ह्यात आहेत.

५) अथर्व वेदाच्या वीस कांडामध्ये ७३९ सुक्ते आहेत आणि ५८४९ मंत्र. ह्यातील १२०० मंत्र हे ऋग्वेदातील आहेत. ह्यात चार उपनिषदे आहेत, क्रमवार त्यांची नावे अशी... प्रश्न, मुंड, मांडुक्य, नृसिंह आणी तापिनी.

६) पहिल्या १३ कांडात जारण, मारण उच्चाटन ह्याबद्दल मंत्र आहेत. १४ व्या कांडात विवाह, १८ व्या कांडात श्राद्ध आणि २० व्या कांडात सोमयाग ह्या विधीबद्दल मंत्र आहेत.

७) अथर्व वेदाच्या ९ शाखा आहेत पण अति महत्वाच्या दोन त्या म्हणजे पैपलाद आणि शौनक. ह्या शाखांवर पाश्चात्य लोकांनी खूप संशोधन केले आहे आणि करत आहेत.

८)
) स्थापत्यशास्त्र हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.

९) अथर्व वेदाच्या मांडुक्य उपनिषदात "अयआत्मा ब्रह्म" हे महावाक्य आहे.

ह्याबरोबरच चारही वेदांचे अत्यंत संक्षिप्त विवेचन पूर्ण झाले. खूप सदस्यांनी वेदान्वरची माहिती विचारली होती. माझ्या अल्पमतीस जमेल तशी थोडक्यात लिहून स्वामीचरणी सादर केली. स्वमिकृपेनेमुळेच आज चारही वेदाची माहिती पोस्ट करू शकलो.

                               ------साभार राहुल पिकळे

Tuesday, August 19, 2014

मी कोण??

एकदा एक मुलगी तिच्या वडिलांकडे आपल्या आयुष्याबाबत तक्रार करत होती, की एक प्रॉब्लेम संपला, की दुसरा सुरू होतो.

तिला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे.

व्यवसायाने शेफ असलेले तिचे वडील तिला काही न बोलता स्वयंपाकघरात
घेऊन येतात आणि काही न बोलता तीन पातेल्यांत पाणी उकळत ठेवतात. पाणी जरासे उकळल्यावर ते त्यातल्या एका भांड्यात बटाटा, एकात अंडे आणि एकात कॉफी घालतात.

दुसरीकडे त्या मुलीच्या तक्रारी सुरूच असतात. साधारण वीस मिनिटांनंतर वडील गॅस बंद करतात आणि बटाट्याला एका भांड्यात, अंड्याला दुसऱ्या भांड्यात आणि कॉफीला एका कपामध्ये ओततात.

मुलीकडे वळून विचारतात,
'बाळा, तुला समोर काय दिसते आहे?'

ती मुलगीदेखील वडील हे काय विचारत आहेत, म्हणून जरासे चिडून उत्तर देते,
'बटाटा, अंडे आणि कॉफी.'

ते मुलीला ती प्रत्येक वस्तू जवळून पाहायला सांगतात.

ती बटाट्याला हात लावते, तर तो मऊ झालेला असतो.
अंड फोडून पाहिल्यावर ते उकडून कडक झालेले असते.
ते तिला कॉफी प्यायला सांगतात. ती चवदार कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्यावर समाधान येते.

वडील तिला समजावतात.
यातील बटाटा, अंडे आणि कॉफी या तिघांनाही गरम पाण्यातून खडतर प्रवास करावा लागला; पण त्याच्याशी प्रत्येकाने प्रत्येक वेळी सामना केला.

कडक आणि ताठ बटाटा गरम पाण्याला सामोरे गेल्यावर नरम
पडला.

आतून लिबलिबित, मऊ असलेले अंडे गरम पाण्यात पडताच बदलत गेले आणि बाहेर आले उकडलेले कडक अंडे;

पण या सगळ्यात कॉफीची कमाल आहे. ती गरम पाण्यात टाकल्याबरोबर तिने पाण्यालाच बदलले आणि त्यातून काहीतरी नवे पेय तयार झाले.

ते मुलीकडे वळून म्हणतात, 'आता विचार तू करायचा आहेस.

या तिन्हीपैकी तू कोण आहेस?'

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकटे, अवघड प्रसंग येतच असतात.
त्यांना सामोरे जाताना एकच महत्त्वाची बाब म्हणजे आपल्यावर त्यांचा कसा परिणाम होतो आणि
त्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो.

हे केवळ त्या मुलीच्याच बाबतीत नाही, तर आपल्या सर्वांनाही लागू पडते. आपण स्वतःला फक्त प्रश्न
विचारायचा,

'या तिन्हीपैकी मी कोण?'

Monday, August 18, 2014

बंडगार्डन नाव कसे पडले?

पुण्यातील बंडगार्डन एरिया सर्वाना माहितच आहे

आम्ही सर्व मित्र पुण्यात फिरताना नेहमी भंकस करायचो
एकदा बंडगार्डन स्टॉपवर उतरलो आणी मित्राने विचारले
"काय रे नीलू ,या भागाचे नाव बंडगार्डन का आहे ??"
क्षणभर मलाच प्रश्न पडला
पण मग भंकस म्हणून मीही सांगितले
"काय यार तुषार ,एवढे माहित नाही ??
अरे जेव्हा इंग्रज होते तेव्हा पुण्यात स्वातंत्र मिळवण्यासाठी चळवळी,उठाव चालु रहायचे
असेच एकदा पुण्याचा इंग्रज गव्हर्नर बायकोसहित या भागात आला तेव्हा एका बागेत उठाव,घोषणाबाजी चालु होती
तेव्हा त्या गवर्नरबाईनी आपल्या नवरयाला विचारले ,हे हनी, व्हाट ए मोब? धिस इज बंड इन द गार्डन

तेव्हापासून या भागाला बंडगार्डंन म्हणु लागले "

हे स्पष्टीकरण ऐकून आम्ही दोघेही बराच वेळ मनसोक्त हसत राहिलो

:):):):)

मजा जाऊ दया पण बंडगार्डन नावाची खरी स्टोरी अशी आहे की
या मुळा मुठा नदीचे पाणी अडवण्यासाठी छोटा बंधारा किंवा भिंत म्हणु हवे तर बांधलेली आहे
त्याला इंग्रजीत BUND म्हणतात
त्याजवळील बाग -Garden म्हणून तो परिसर बंडगार्डन

आहे की नाही मजेशीर नावाची गंमत ??

Saturday, August 16, 2014

तुझे भास पावसाचे

लिहा ओळीवर कविता - भाग ११७ या उपक्रमासाठी माझा प्रयत्न

ओळ - तुझे भास पावसाचे

स्वप्नमय दिस श्रावणाचे
पानांवरील दवबिंदुंचे
मनात अजुनही ताजे
तुझे भास पावसाचे

भास की अनुभव आपले
एकाच छत्रीतुन जाणे
दोघांचेही खांदे भिजलेले
सुखावह येणे पावसाचे

तकलादू छत्री म्हणुनी
बसथाबां आडोसा घेणे
भोवताली माणसे असुनही
आपले एकटेच असणे

पावसा थांबू नको तू
आवडले अवचित येणे
ओठी तिच्या हसू आले
देवून गेले नजराणॆ

पाउस ओसरला अन
आपण चालत निघालो
अजुनी दिसती नेत्री तिच्या
अल्लड भाव पावसाचे

पावसाला कुणी सांगितले
त्याच वेळी कोसळणे
हे तर जगनियंत्याचे
भासे रूप सुत्रधाराचे

----------निलेश जोशी

घोरकष्टोधरणस्तोत्रम

!! घोरकष्टोधरणस्तोत्रम !!

 
श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव ।
श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।।

त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् ।
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।।
त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।।

पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् ।
भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।।
त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।
त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।।

धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् ।
सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।
भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५।।

श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥

!! इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज विरचितं घोरकष्टोधरणस्तोत्रम सम्पूर्णम् !!

Friday, August 15, 2014

माझे काही चुकले का ??

"अर्धा किलो भाजी दया मावशी"मी म्हटले
मावशीनी एक दगड ठेवला एका पारड्यात व दुसरया पारड्यात भाजी ठेवू लागल्या
मी म्हटले "मावशी ,हा दगड अर्धा किलोचा आहे कशावरून ??"
"कशावरून म्हणजे मी पुरावा देते ,ए महादु तुझे अर्धा किलोचे मापड़े दे रे ,साहेबाना विश्वास नाय आपल्यावर " असे म्हणून मलाच दोषी ठरवून अर्धा किलोचे माप व तो दगड दोन्ही पारड्यात तोलत तो दगड अर्ध्या किलोपेक्षा कसा जास्त आहे हे मला दाखवले वरून मलाच सुनवले
"साहेब भाजी विकतो पण फसवणार नाही तुम्हाला ,एक टाइम जास्त भाजी गेली तरी चालेल पण ग्राहकाला नाराज नाही करायचा "
"आणि साहेब ही घ्या जास्तीची काकडी , ताई नेतात नेहमी मुलाला आवडते म्हणून पण तुम्ही आज घेतली नाही ,तेव्हा आज माझ्याकडून तुमच्या मुलाला दया "
मी भाजी घेतली काकडी घेतली पैसे दिले व येताना विचार करत होतो

नक्की काय चुकले माझे ?

दगड माप म्हणून योग्य का ??
महादुचे अर्धा किलो माप तरी कैलीब्रेटेड असेल का ??
याबाबत काही नियम आहेत का??
आणि खरच मावशी दोषी नसेल तर फुकट काकडी का दिली ??
मला लाच म्हणून की आपल्याविषयी माझे मत अनुकूल व्हावे म्हणून ??

मला काहीच समजत नाही

तुम्हाला काय वाटते??

Friday, August 8, 2014

श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा

श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा

श्री गणेशाय नमः I श्री सरस्वत्यै नमः I श्री गुरुभ्यो नमः I
जय जया सिद्धमुनि I तूं तारक भवार्णी I
सुधारस आमुचे श्रवणीं I पूर्ण केला दातारा II १ II
गुरुचरित्र कामधेनु I ऐकतां न धाये माझें मन I
कांक्षीत होतें अंतःकरण I कथामृत ऐकावया II २ II
ध्यान लागलें श्रीगुरूचरणीं I तृप्ति नव्हे अंतःकरणीं I
कथामृत संजीवनी I आणिक निरोपावें दातारा II ३ II
येणेंपरी सिद्धासी I विनवी शिष्य भक्तीसीं I
माथा लावूनि चरणांसी I कृपा भाकी तये वेळीं II ४ II
शिष्यवचन ऐकोनि I संतोषला सिद्धमुनि I
सांगतसे विस्तारोनि I ऐका श्रोते एकचित्तें II ५ II
ऐक शिष्या-शिखामणि I धन्य धन्य तुझी वाणी I
तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं I तल्लीन झाली परियेसा II ६ II
तुजकरितां आम्हांसी I चेतन जाहलें परीयेसीं I
गुरुचरित्र आद्यंतेसीं I स्मरण जाहलें अवधारीं II ७ II
भिल्लवडी स्थानमहिमा I निरोपिला अनुपमा I
पुढील चरित्र उत्तमा I सांगेन ऐका ऐकचित्तें II ८ II
व्कचित्काळ तये स्थानीं I श्रीगुरू होते गौप्योनि I
प्रकट जहाले म्हणोनि I पुढें निघाले परियेसा II ९ II
वरुणासंगम असे ख्यात I दक्षिणवाराणसी म्हणत I
श्रीगुरू आले अवलोकित I भक्तानुग्रह करावया II १० II
पुढें कृष्णातटाकांत I श्रीगुरू तीर्थें पावन करीत I
पंचगंगासंगम ख्यात I तेथें राहिले द्वादशाब्दें II ११ II
अनुपम्य तीर्थ मनोहर I जैसें अविमुक्त काशीपुर I
प्रयागासमान तीर्थ थोर I म्हणोनि राहिले परियेसा II १२ II
कुरवपुर ग्राम गहन I कुरुक्षेत्र तेंचि जाण I
पंचगंगासंगम कृष्णा I अत्योत्तम परियेसा II १३ II
कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य I तयाहूनि अधिक असे जाण I
तीर्थे असतीं अग्रण्य I म्हणोनि राहिले श्रीगुरू II १४ II
पंचगंगानदीतीर I प्रख्यात असे पुराणांतर I
पांच नामें आहेति थोर I सांगेन ऐका एकचित्तें II १५ II
शिवा-भद्रा-भोगावती I कुंभीनदी-सरस्वती I
' पंचगंगा ' ऐसी ख्याति I महापातक संहारी II १६ II
ऐसी प्रख्यात पंचगंगा I आली कृष्णेचिया संगा I
प्रयागाहूनि असें चांगा I संगमस्थान मनोहर II १७ II
अमरापुर म्हणिजे ग्राम I स्थान असे अनुपम्य I
जैसा प्रयागसंगम I तैसें स्थान मनोहर II १८ II
वृक्ष असे औम्दुबरु I प्रत्यक्ष जाणा कल्पतरू I
देव असे अमरेश्वरू I तया संगमा षट्कूळी II १९ II
जैसी वाराणसी पुरी I गंगाभागीरथी-तीरीं I
पंचनदी संगम थोरी I तत्समान परियेसा II २० II
अमरेश्वर संनिधानीं I आहेति चौसष्ट योगिनी I
शक्तितीर्थ निर्गुणी I प्रख्यात असे परियेसा II २१ II
अमरेश्वरलिंग बरवें I त्यासी वंदूनि स्वभावें I
पूजितां नर अमर होय I विश्वनाथ तोचि जाणा II २२ II
प्रयागीं करितां माघस्नान I जें पुण्य होय साधन I
शतगुण होय तयाहून I एक स्नानें परियेसा II २३ II
सहज नदीसंगमांत I प्रयागसमान असे ख्यात I
अमरेश्वर परब्रह्म वस्तु I तया स्थानीं वास असे II २४ II
याकारणें तिये स्थानीं I कोटितीर्थे असतीं निर्गुणी I
वाहे गंगा दक्षिणी I वेणीसहित निरंतर II २५ II
अमित तीर्थें तया स्थानीं I सांगतां विस्तार पुराणीं I
अष्टतीर्थ ख्याति जाग्रणी I तया कृष्णातटाकांत II २६ II
उत्तर दिशीं असे देखा I वाहे कृष्णा पश्चिममुखा I
शुक्लतीर्थ नाम ऐका I ब्रह्महत्यापाप दूर II २७ II
औदुम्बर सन्मुखेसी I तीनी तीर्थें परियेसीं I
एकानंतर एक धनुषी I तीर्थें असती मनोहर II २८ II
" पापविनाशी " 'काम्यतीर्थ ' I तिसरें सिद्ध 'वरदतीर्थ ' I
अमरेश्वरसंनिधार्थ I अनुपम्य असे भूमंडळीं II २९ II
पुढें संगम-षट्कूळांत I ' प्रयागतीर्थ ' असे ख्यात I
' शक्तितीर्थ ' ' अमरतीर्थ ' I ' कोटितीर्थ ' परियेसा II ३० II
तीर्थें असती अपरांपर I सांगतां असे विस्तार I
याकारणें श्रीपाद्गुरू I राहिले तेथें द्वादशाब्दें II ३१ II
कृष्णा वेणी नदी दोनी I पंचगंगा मिळोनि I
सप्तनदीसंगम सगुणी I काय सांगूं महिमा त्यांची II ३२ II
ब्रह्महत्यादि महा पातकें I जळोनि जातीं स्नानें एकें I
ऐसें सिद्धस्थान निकें I सकळाभीष्ट होय तेथें II ३३ II
काय सांगूं त्यांची महिमा I आणिक द्दावया नाही उपमा I
दर्शनमात्रें होती काम्या I स्नानफळ काय वर्णूं II ३४ II
साक्षात् कल्पतरु I असे वृक्ष औदुम्बरु I
गौप्य होऊन अगोचरु I राहिले श्रीगुरु तया स्थानीं II ३५ II
भक्तजनतारणार्थ I होणार असे तीर्थ ख्यात I
राहिले तेथें श्रीगुरुनाथ I म्हणोनि प्रकट जाहले जाणा II ३६ II
असतां पुढें वर्तमानीं I भिक्षा करावया प्रतिदिनीं I
अमरापुरग्रामीं I जाती श्रीगुरू परियेसा II ३७ II
तया ग्रामीं द्विज एक I असे वेदाभ्यासक I
त्याची भार्या पतिसेवक I पतिव्रताशिरोमणी II ३८ II
सुक्षीण असे तो ब्राह्मण I शुक्लभिक्षा करी आपण I
कर्ममार्गी आचरण I असे सात्विक वृत्तीनें II ३९ II
तया विप्रमंदिरांत I असे वेल उन्नत I
शेंगा निघती नित्य बहुत I त्याणें उदरपूर्ति करी II ४० II
एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी I वरो न मिळे परियेसीं I
तया शेंगांतें रांधोनि हर्षी I दिवस क्रमी येणेंपरी II ४१ II
ऐसा तो ब्राह्मण दरिद्री I याचकपणें उदर भरी I
पंचमहायज्ञ कुसरी I अतिथी पूजी भक्तीनें II ४२ II
वर्ततां श्रीगुरू एके दिवसीं I तया विप्रमंदिरासी I
गेले आपण भिक्षेसी I नेलें विप्रें भक्तीनें II ४३ II
भक्तिपूर्वक श्रीगुरूसी I पूजा करी तो षोडशी I
घेवडे-शेंगा बहुवसी I केली होती पत्र-शाका II ४४ II
भिक्षा करून ब्राह्मणासी I आश्र्वासिती गुरु संतोषीं I
गेले तुझे दरिद्र दोषी I म्हणोनि निघती तये वेळीं II ४५ II
तया विप्राचे गृहांत I जो का होता वेल उन्नत I
घेवडा नाम विख्यात I आंगण सर्व वेष्टिलें असे II ४६ II
तया वेलाचें झाडमूळ I श्रीगुरूमूर्ति छेदिती तात्काळ I
टाकोनि देती परिबळे I गेले आपण संगमासी II ४७ II
विप्रवनिता तये वेळीं I दुःख करिती पुत्र सकळी I
म्हणती पहा हो दैव बळी I कैसें अदृष्ट आपुलें II ४८ II
आम्हीं तया यतीश्र्वरासी I काय उपद्रव केला त्यासी I
आमुचा ग्रास छेदुनि कैसी I टाकोनि दिल्हा भूमीवरी II ४९ II ऐसेपरी ते नारी I दुःख करी नानापरी I
पुरुष तिचा कोप वारी I म्हणे प्रारब्ध प्रमाण II ५० II
म्हणे स्त्रियेसी तये वेळीं I जें जें होणार जया काळीं I
निर्माण करी चंद्रमौळी I तया आधीन विश्व जाण II ५१ II
विश्वव्यापक नारायण I उत्पत्तिस्थितिलया कारण I
पिपीलिकादि स्थूळ-जीवन I समस्तां आहार पुरवीतसे II ५२ II
' आयुरन्नं प्रयच्छती ' I ऐसें बोले वेदश्रुति I
पंचानन आहार हस्ती I केवीं करी प्रत्यहीं II ५३ II
चौर्यायशीं लक्ष जीवराशी I स्थूल सूक्ष्म समस्तांसी I
निर्माण केले आहारासी I मग उत्पत्ति तदनंतरे II ५४ II
रंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I
आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II ५५ II
पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I
आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II ५६ II
आपुलें दैव असतां उणें I पुढिल्या बोलती मूर्खपणें I
जें पेरिलें तेंचि भक्षणें I कवणावरी बोल सांगे II ५७ II
बोल ठेविसी यतीश्वरासी I आपलें आर्जव न विचारिसी I
ग्रास हरितला म्हणसी I अविद्यासागरी बुडोनि II ५८ II
तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I
नेलें आमुचे दरिद्रदोषी I तोचि तारील आमुतें II ५९ II
येणेंपरी स्त्रियेसी I संभाषी विप्र परियेसीं I
काढोनि वेलशाखेसी I टाकीता झाला गंगेंत II ६० II
तया वेलाचें मूळ थोरी I जें कां होतें आपुलें द्वारीं I
काढूं म्हणूनि द्विजवरीं I खणिता झाला तया वेळीं II ६१ II
काढितां वेलमूळासी I लाधला कुंभ निधानेसीं I
आनंद जाहला बहुवसी I घेऊनि गेला घरांत II ६२ II
म्हणती नवल काय वर्तलें I यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले I
म्हणोनि ह्या वेला छेदिलें I निधान लाधलें आम्हांसी II ६३ II
नर नव्हे तो योगीश्वर I होईल ईश्वरीअवतार I
आम्हां भेटला दैन्यहर I म्हणती चला दर्शनासी II ६४ II
जाऊनि संगमा श्रीगुरूसी I पूजा करिती बहुवसी I
वृतांत सांगती तयांसी I तये वेळीं परियेसा II ६५ II
श्रीगुरू म्हणती तयासी I तुम्हीं न सांगणें कवणासी I
प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II ६६ II
ऐसेपरी तया द्विजासी I सांगे श्रीगुरू परियेसीं I
अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं I पुत्रपौत्रीं नांदाल II ६७ II
ऐसा वर लाधोन I गेली वनिता तो ब्राह्मण I
श्रीगुरूकृपा ऐसी जाण I दर्शनमात्रें दैन्य हरे II ६८ II
ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I
कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II ६९ II
दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I
तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II ७० II
जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I
अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II ७१ II
सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I
भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं II ७२ II
गंगाधराचा कुमर I सांगे श्रीगुरूचरित्रविस्तार I
पुढील कथामृतसार I ऐका श्रोते एकचित्तें II ७३ II
II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोSध्यायः II
श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु II
श्रीगुरुदेवदत्त II शुभं भवतु II